कोल्हापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कार्यकर्त्यांचा प्रेरणा संकल्प मेळावा रविवार दि.15 एप्रिल रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मुख्याध्यापक संघ विद्याभवन, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात इचलकरंजी, गडहिंग्लज, पन्हाळा, करवीर, चंदगड व कोल्हापूर शहर शाखेतील सव्वाशे पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष डी.बी.पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर, अंनिसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनीलकुमार लवटे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.प्रकाश भोईटे, कोल्हापूर जिल्हा अंनिसचे संस्थापक अध्यक्ष बी.एम.पाटील, कॉम्रेड दिलीप पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात “बोला आज मिळून सारे, हा निश्चय करूया रे” या अंनिसच्या गीताने करण्यात आली.
मेळाव्यात बीजभाषण करताना डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी संघटनेच्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षातील प्रेरणादायी घटना तसेच संघटनेपुढील आव्हाने यांची मांडणी केली. यावेळी ते म्हणाले मानवी प्रगतीचा इतिहास हा सत्य तपासण्याचा इतिहास आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली श्रद्धा तपासली पाहिजे. व्यापक परिवर्तनासाठी लोकांची मानसिक गुलामगिरी नष्ट करण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटना असा इशारा देते की, सन 2020 साली जगातील पहिल्या पाच आजारात डिप्रेशन(औदासिन्य) व अॅडिक्शन(व्यसनाधिनता) हे आजार असतील. हे वास्तव कळण्यासाठी एका व्यापक समाजपरिवर्तनाची गरज आहे. समाजामध्ये कोणत्याही वेळी लोकांची तपासणी केल्यास 10 ते 15 टक्के लोकांना औदासिन्याचा आजार दिसून येतो. सर्व जिल्ह्यांना डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ लागू होणार आहे. आज शाळेपासूनच मुलांच्यावर बिंबवले जाते की, प्रश्न विचारू नको. भ्रष्टाचार का वाढला, प्रश्न विचारू नको. शेतकरी आत्महत्या का करतो प्रश्न विचारू नको. महागाई का वाढली प्रश्न विचारू नको. ज्या देशात विचार करण्याची प्रवृत्ती नष्ट होते त्या देशात लोकशाही धोक्यात येते. आणि भारतात प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती नष्ट व्हावी हे जाणीवपूर्वक केले जाते. यासाठी अंनिस कार्यकर्त्यांनी लोकांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे. ही गोष्ट कार्यकर्त्यांना आव्हानात्मक आहे. आज समाजात अंनिस विचाराच्या बाजूने लोकशाही शिक्षणाचा गाभा घटक, मूल्य शिक्षण, एकविसावे शतक, समाजसुधारक हे सर्व आपल्या बाजूने आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा होण्यास अनुकूलता आहे.
यावेळी मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष डी.बी.पाटील म्हणाले आपले जीवन कार्य निसर्गाच्या नियमाने चालते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व जीवन चालते. कोणत्या तरी देवळात जाऊन व देवाला पाण्यात ठेवून पाऊस पडत नाही. तर पाऊस पाडण्यासाठी योग्य प्रक्रिया व्हावी लागते. तेव्हा तो आपोआप पडत असतो. नवस बोलून मुले होत नाहीत. काही लोक देव नवसाला पावतो म्हणून जातात. व चेंगराचेंगरीमध्ये मरतात. हे सर्व थोतांड आहे. कुणाचे तरी पोट भरण्यासाठी ही धडपड आहे. पूजा-अर्चा करून देशाचे संरक्षण करता आले असते तर मिलिटरीवरचा खर्च शासनाला करावा लागला नसता. महाराष्ट्र शासनाने जी मूल्ये दिलेली आहेत, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य दिलेले आहे. त्याचा उपयोग करून भावी पिढीवर वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य फक्त सांगून नव्हे तर कृतीतून हे मूल्य मुलांच्यावर रूजवले पाहिजे. परिक्षेत पास होण्यासाठी मुलांनी अभ्यासच केला पाहिजे, त्याला पर्याय नाही. हे मुलांच्यावर बिंबवले पाहिजे. कोणत्याही देवाला खेटे घालून कोणत्याही परिक्षेत पास होता येणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्यावर बिंबवणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणे होय.
यावेळी विद्यामंदिर कारभारवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी लेक वाचवा या विषयावर पथनाट्य सादर केले. यानंतर जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कार्याध्यक्षांनी अहवाल सादर केला. यानंतर स्वतंत्र गट चर्चा व पुढील वर्षातील कार्यनियोजन केले. यानंतर डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते अंनिस कार्यकर्त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये विनायक चव्हाण(इचलकरंजी), दिनकर जगदीश(करवीर), प्राचार्य डॉ.पी.आर.पाटील(चंदगड), तानाजी कुरळे(गडहिंग्लज), संजय कळके(पन्हाळा), बी.एम.पाटील(कोल्हापूर शहर) यांचा समावेश आहे.
पर्यावरण पूरक गणेश विसर्जन, होळी लहान याबाबत कोल्हापूर जिल्हा अंनिसने गेल्या दशकात पुढाकार घेतला. याची चर्चा झाली. न्यायालय व शासन यांच्या आदेशाने आता अनुकूलता झाली असून पुढील वर्षी संपूर्ण जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठरले. याबरोबर चला व्यसनाला बदनाम करू या आणि दैववादाची होळी हे दोन्ही उपक्रम पुढील वर्षात अधिक प्रभावीपणे आयोजित करण्याचे ठरले. सद्याही कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मरीआईचा गाडा सोडला जातो. तसेच देवाच्या नावाने पशू हत्या होते या दोन्हीच्या विरोधात येत्या वर्षात संघर्ष केला जाईल. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यात समितीचे कार्य चालू राहील आणि त्या कामात तरूण तरूणी मोठ्या संख्येने सहभागी होतील यासाठी खास प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक शिक्षक व डी.एड.चे विद्यार्थी यांची वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबीरे घेण्यात येणार आहेत. आंतरजातीय विवाहासाठी मदत व मार्गदर्शन करणारे केंद्र कोल्हापूर जिल्ह्यातील समिती गेली काही वर्षे परिणामकारकपणे करीत आहे. या स्वरूपाची आधार व समुपदेशन केंद्रे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सातारा येथे समितीमार्फत चालू करण्याचा प्रयत्न करणार आहेत. असे प्रतिपादन डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी केले.
पत्रकार परिषद :-
अंनिसवरील आरोप बिनबुडाचे, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी-डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे प्रतिआव्हान
राज्यात अंनिस काम करीत असताना दुखावलेल्या हितसंबंधितांकडून आपणास अनेक वेळा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. वारकरी संप्रदाय मंडळाने आपल्या संस्थेला निधी मिळत असल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा आहे. त्यासाठी अंनिस संस्थेची शासनाने कधीही चौकशी करावी. आपण या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. असे प्रतिआव्हान अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ.दाभोलकर यांनी केले.
पुस्तक प्रकाशन व समारोप :
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हस्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर व डॉ.हमीद दाभोलकर लिखीत ‘प्रश्न मनाचे’ या पुस्तकाचे व दहा भाषणांच्या ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी कॉम्रेड गोविंदराव पानसरे म्हणाले, ज्यांची लढण्याची इच्छा आहे त्याला लढता येते. तुम्ही सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प केलेलेच कार्यकर्ते आहात. त्यासाठी अंनिस कार्यकर्त्यांनी सतत प्रश्न विचारले पाहिजेत. ते प्रश्न प्रथम स्वत:ला विचारले पाहिजेत. त्यानंतर इतरांना विचारले पाहिजेत. तसेच इतरांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले पाहिजे. त्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. त्यासाठी संघर्ष करा. समाजामध्ये कोणताही बदल हा संघर्षाशिवाय झालेला नाही.
यानंतर ज्येष्ठ साहित्यिक व कोल्हापूर जिल्हा अंनिचे अध्यक्ष डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कार्यशाळा यशस्वीतेबद्दल आभार मानले. यावेळी डॉ.लवटे म्हणाले, पुढील वर्षाचा प्रेरणा मेळावा हा मोठ्या थाटात संपन्न झाला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांची संख्या दुप्पट होण्याच संकल्प करण्यात आला. संघटनेचे बळ संख्येने व कार्याने वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शाखा स्थापण्याचे कार्य करणार असल्याचे सांगितले. वेळ प्रसंगी दगडाचा मार खाण्यास व तोंडाला काळे फासून घेण्यास आपण जो पर्यंत तयार होत नाही, तो पर्यंत संघटनेचे बळ वाढत नाही. बुद्धीला बुद्धी, विचाराला विचार देऊन काम केल्याशिवाय संघटनेला बळ येणार नाही. “हम होंगे कामयाब” या समूह गीताने प्रेरणा मेळाव्याची सांगता करण्यात आली.
–संजय कळके