Categories
उपक्रम

शालेय मुलांनी दिला ग्रामस्वच्छतेतून होळीचा कानमंत्र

मे - २०१२

मुलांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी सतत प्रत्येक वर्गा-वर्गात जाऊन माहिती सांगायची मी स्वत: अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत असल्याने व योगायोगाने होळीचा सणही होता. सार्वजनिक स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन यांची सांगड घालून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवावा अशी कल्पना मनात आली. आपण ग्रामस्वच्छतेतून होळी साजरी केली तर? वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला छेद देण्याचे धाडस मुले करतील का? गावकरी काय म्हणतील? सहकारी शिक्षक सहकार्य करतील का? हे प्रश्न माझ्या समोर आ वासून उभे होते. हो नाही करत मुख्याध्यापकांना मी ही कल्पना सांगितली. क्षणभर विचार करून होकार दिला व तसे इतर शिक्षकांना सुचविले. आणि मी तयारीला लागलो.

            गाव स्वच्छ करून अभिनव पद्धतीने होळी साजरी करण्याचे ठरविले परंतु यात महत्व होते ते मुलांच्या प्रतिक्रियांना. आमची शाळा 7 वी पर्यंतची निसर्गत:च पश्चिम किनारपट्टी लाभलेला हिरवागार परिसर. मला हा परिसर नवीनच. डहाणू तालुका आदिवासी तालुका म्हणून प्रसिद्ध त्यातल्या त्यात मला शिक्षण सेवक म्हणून एक वर्ष पूर्ण झालेलं, त्यामुळे अनुभव कमीच होता. म्हणून माझे मित्र अंनिसचे कार्यकर्ते अण्णा कडलास्कर यांचा सल्ला घेतला सदर उपक्रमाचे स्वरूप गावचे सरपंच सतिश पाटील यांना सांगितले असता त्यांनीही मला हवी ती मदत करण्याचे संकेत दिले. मी पूर्वतयारीला लागलो प्रत्येक वर्गात जाऊन अभिनव होळीचा उपक्रम मुलांना सांगितला. अक्षरश: मुलांनी माझा उपक्रम डोक्यावर घेतला. मुलांचा उत्साह पाहून माझाही आनंद द्विगुणित झाला.

उपक्रमाची उद्दिष्ट्ये : 1)मुलांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी. 2)श्रमाचे महत्व कळावे. 3)पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज लक्षात यावी. 4)सहकार्याची भावना वाढीस लागावी. 5)अनिष्ट रूढी, परंपरा यांना बगल देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. इत्यादी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन इ.4 थी ते 7 वीच्या मुलांना एकत्रित केले. उपक्रमाच्या स्वरूपाविषयी काही सूचना केल्या.

1)प्रत्येकाने होळीच्या आदल्या दिवशी आपल्या घरातील व परसातील कचरा स्वत: झाडून जमा करून ठेवावा. 2)अभिनव होळी साजरी करण्यासाठी पालकांना शाळेत येण्यास सांगावे. 3)गाव स्वच्छ करण्यासाठी स्वत: झाडू, खराटे, टोपली घेऊन यावे. 4)सफाई करताना नाकावर रूमाल बांधावे. 5)कोणालाही शारीरिरिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व नेमून दिलेली कामे काटेकोरपणे करावी.

            सूचना देऊन झाल्यावर विद्यार्थ्यांची 4 गटात विभागणी केली. ओला कचरा मंडळ, कोरडा कचरा मंडळ, प्लॅस्टीक कचरा मंडळ, कचरा संकलन मंडळ निवडले. शरीराने काटक असलेल्या मुला-मुलींना त्यांचे प्रमुख केले. सर्वांना आपापली कामे समजावून सांगितली.

अमंगलाची होळी : होळी साजरी करताना मुद्दामहून लाकडे जाळली जातात. त्यासाठी आपल्या देशात शेकडो झाडांची तोड होते यामुळे पर्यावरणाची दीर्घ कालीन हानी होते. तसेच काही ठिकाणी अर्वाच्य शिव्या दिल्या जातात. या सर्व बाबींना बगल देऊन ग्राम स्वच्छतेतून होळीचा सण साजरा करण्याची पद्धत गावात नवीनच होती. गावातील नवयुवक मंडळाला हा उपक्रम आवडल्यामुळे तेही या कामात सामील झाले. तर कशाला लहान मुलांना कामाला लावतात? त्यांचं वय आहे का? गुरूजींना काही काम नाही असंही काही लोक पुटपुटत होते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा मात्र प्रयत्नांती निष्फळता आली. शाळेतील मुले मुली यांच्या सोबतच शिक्षकही हातात झाडू, खराटे घेऊन सफाई कामाला सुरवात केली. राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा, ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ चा जयघोष करत बाल शक्तीने पाहता पाहता सर्व गाव साफ केला. जमा केलेला प्लॅस्टिक युक्त कचरा मुलांनी शाळेच्या मैदानात जमा केला.

            दुपारचे दोन वाजले होते. सर्व मुले एकत्र जमली. सफाई करून सर्वांना भुका लागल्या होत्या. काही निरागस मुलांची तोंडे सुकली होती पण त्याहीपेक्षा आपण काही तरी वेगळं केलं याचं समाधान त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होतं. मुलांनी हात पाय धुवून शालेय पोषण आहाराचा लाभ घेतला.

महिलांच्या हाताने पेटवली होळी : महिलांच्या हाताने होळी पेटविणे अमंगल समजले जाते म्हणून मुद्दामहून नवा पायंडा पाडण्यासाठी केंद्र प्रमुख सौ.दर्शना जाधव यांच्या हस्ते होळी पेटविण्याचे ठरविले होते. उद्देश एकच होता स्त्री-पुरूष समानता.

            दुपारच्या सत्रात सर्व मुले आपापल्या पालकांसोबत नव्या जोमात सभागृहात जमली. कारण होते महिलांच्या हस्ते होळी पेटविणार. सर्वजण अवाक् होऊन पहात होते. केंद्र प्रमुख जाधवबाई वेळेवर आल्या त्याचप्रमाणे गावचे सरपंच सतिश पाटील उपस्थित होतेच. मुलांनी स्वागत गीत गाऊन पाहण्यांचे स्वागत केले. यावेळी सौ.जाधवबाईंनी मुलांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार, सवयी एका कागदावर लिहून होळीत टाकले. तद्वतच नवीन संकल्प पत्रे भरून घेऊनच केंद्रप्रमुख जाधवबाईंच्या हस्ते होळी पेटविण्यात आली.

            होळीचा अभिनव उपक्रम साधा पण उत्साही वातावरणात संपन्ना झाला. आता होळीने चांगलाच पेट घेतला होता. काही प्रमाणात का होईना मुलांच्या वाईट सवयी धुरांच्या लोंढ्यासोबत आकाशात उंच उंच जात होत्या अन् सर्व मुले नवसंकल्पाचा धगधगता निखारा तेवत ठेवण्यासाठी घरी परतत होती.

विजय वाघमारे, वासगाव, जि. ठाणे.