भारतीय साधू अमेरिकेत गेला. हायटेक आध्यात्मिक गुरू झाला. लोकांना मनावर नियंत्रण ठेवण्याचे सल्ले देणारा हा स्वामी स्वत:च्या मनावर मात्र ताबा नाही ठेवू शकला…. कामभावनांच्या आहारी गेला. त्याला लैंगिक विकृती जडली. आश्रमातीलच दोन 12 वर्षांच्या मुलींचे त्याने लैंगिक शोषण सुरू केले. मुली मोठ्या झाल्या. स्वामीचे अत्याचार दिवसेंदिवस वाढू लागले. अखेर दोन्ही मुलींनी धाडस करून पोलिसांत स्वामीच्या अत्याचाराचा पाढा वाचला आणि स्वामीचे बिंग फुटले. पाश्चात्य देशांसह भारतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या स्वामी प्रकाशानंद सरस्वतीचे हे खरे रूप उघड झाल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकणे साहजिक होते…. सुरवातीला लोकांना स्वामींच्या विरोधात हे कारस्थान वाटले पण आता न्यायलयानेच स्वामीला दोषी ठरवल्याने लोकांचे डोळे उघडले आहेत…
स्वामी प्रकाशानंद सरस्वती विरोधात श्याम रोज(30) आणि वेरला टोनेसन केजिमर(27) यांनी लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवली होती. दोन्ही युवती 12 वर्षांच्या असताना स्वामीने त्यांच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला होता. त्यानंतर वर्षानुवर्षे स्वामीचा लैंगिक अत्याचार त्या सहन करत आल्या. या युवतींचे कुटुंबीय ऑस्टिन येथील 200 एकरात परसलेल्या स्वामीच्या आश्रमाचे सदस्य आहेत. बरसाना धाग नावाखाली स्वामीचा आश्रम आहे. अमेरिकेच्या विविध भागात राहणारे हजारो हिंदू श्रद्धेने या आश्रमात येत होते. त्यांची स्वामीवरही प्रचंड श्रद्धा होती. पण स्वामीचे कारनामे आता सिद्ध झाल्याने भक्तांमध्ये संताप पसरला आहे. स्वामीने या आश्रमाची स्थापना 1990 साली केली होती. स्वामीच्या विरोधात युवतींनी एप्रिल 2008 मध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर स्वामीला अटक करण्यात आली होती. नंतर 10 लाख अमेरिकी डॉलरच्या जामिनावर त्याची सुटका झाली होती. या युवतींच्या तक्रारीत सत्यता असल्याचे न्यायालयात सुनावणीदरम्यान समोर आल्याने स्वामी प्रचंड अडचणीत सापडला असून, एकूण 20 गुन्ह्यांत दोषी आढळेल्या स्वामीला किमान 20 वर्षांची कैद सुनावली जाऊ शकते. याशिवाय त्याची संपूर्ण संपत्ती सरकारजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण अमेरिकेतील हिंदू ही संपत्ती हिंदू धर्माच्या कल्याणासाठी वापरली जावी, अशी मागणी करण्याची शक्यता आहे. तूर्त, आश्रमाच्या प्रवक्त्याने न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय व्यक्त केला आहे. स्वामी निर्दोष सिद्ध होईपर्यंत कायदेशीर लढाई चालू राहील, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे दोन्ही युवतींच्या तक्रारीवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना गेल्या काही दिवसांपूर्वीच कॅट टोनेसन(31) या महिलेनेही स्वामीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. मात्र तिने पोलिसांत तक्रार केली नव्हती. पैसे देऊन तिचे तोंड बंद करण्यात आले असावे, असा संशय सर्वांना आहे.
गेल्या वर्षी स्वामी नित्यानंद, इच्छाधारी बाबा यांच्या सेक्स स्कँडल्समुळे भारतात खळबळ उडाली होती. हे भारतीय साधू जगभरात सेक्सी बाबा म्हणूज गाजले होते. पण त्यांच्याही पुढे एक पाऊल प्रकाशानंद स्वामीने टाकल्याचे दिसून येईल. कारण त्याने अमेरिकेत जाऊन तेथील लोकांमध्ये स्वत:प्रती विश्वास निर्माण केला. ऑस्टिनसारख्या महागड्या शहरात मोठा आश्रम बांधला. स्वत: धर्मगुरू म्हणवून जगभरात नावलौकिक मिळवला आणि केवळ विकृतीने त्याचा सर्व सन्मान धुळीस मिळाला. विकृतीतही त्याने नित्यानंद आणि इच्छाधारी बाबाला मागेच टाकल्याचे दिसून येईल.