Categories
चिकित्सा

 डॉ. रविंद्रनाथ टोणगावकर यांचा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ बाबतचा अनुभव

फेब्रुवारी – २०१२

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने लक्षावधी लोक आर्ट ऑफ लिव्हिंगची विचारसरणी आणि त्या अनुषंगाने त्यांना शिकविलेली जीवनसरणी आचरणात आणत असून अनेकांची जीवने पूर्णत: बदलली असून ते सुखी आणि आनंदी झाली आहेत हे ऐकून आणि वाचून मी अत्यंत प्रभावित झालो होतो.

            दोंडाईचे येथेच सहा दिवसांचे प्राथमिक शिबीर आयोजित करण्यात येत असल्यामुळे त्या शिबिरात सहभागी झालो. मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे सर्व विधी मी पूर्ण केले. त्यातील व्यायाम, प्राणायाम याचबरोबर ‘सुदर्शन क्रियाही’ केली शेवटच्या दिवशी डोळे मिटून केलेल्या संगीताच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नृत्यातही भाग घेऊन ‘स्वर्गीय आनंदाचा’ अनुभव बेधुंद होऊन घेतला. या सर्व क्रिया शिकवल्या म्हणून माझ्यापेक्षा कितीतरी वर्षांनी लहान असलेल्या ‘गुरूंचे’ साष्टांग प्रणिपात करून आभार मानले.

            शिबीर संपल्यानंतरही सर्व गोष्टी व्यायाम, सुदर्शन क्रिया महिनाभर मनोभावे करीत होतो व त्याचा आनंद लुटत होतो. पण नंतर सद्सद्विवेक बुद्धीने आणि शास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे ‘मला बरे का वाटते’ याचा जेव्हा शास्त्रीय निकषावर अभ्यास करू लागलो तेव्हा लक्षात येऊ लागले की, सुदर्शन क्रियेमुळे शरीरातील कार्बन डायऑक्साईड कमी झाल्यामुळे भरभर श्वास घेतल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते तशी हवेत तरंगण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे अतिश्रमामुळे(कॅथार्सीस) मेंदू बधीर होतो. (हीच गोष्ट अंगात आल्यावर खूप भरभर श्वास घेतल्यावर होते तसा हा परिणाम आहे) तो तात्कालिकच असतो.

            त्याबरोबरच इतर सर्व क्रिया केल्यानंतर अशा प्रकारच्या सर्व शिबिरात आपल्या मेंदूत तयार होणार्‍या ‘एन्डॉर्फिन’ नावाच्या अफूच्या जातीतील स्त्रावामुळे ‘मला बरे वाटते’. एन्डॉर्फिन हा स्त्राव अफूच्या गटातील असल्यामुळे जोपर्यंत त्याचा परिणाम असतो तेवढेच  बरे वाटते आणि त्याची ‘सवय’ व्यसन लागते. बरे वाटण्याकरीता जसे अफू, गांजा, दारू परत-परत घ्यावी लागते तसेच ‘सुदर्शन’ व इतर क्रिया परत परत कराव्या लागतात आणि अफू-दारू प्रमाणेच त्यांचा परिणाम हा ‘क्षणिक’ आणि ‘भ्रामक’ असतो. असे अफू-दारूमुळे कोणाचेही कायमस्वरूपी कोणतेच दुखणे बरे होत नाही किंवा जीवनातील कोणत्याच समस्या कायमस्वरूपी सुटू शकत नाही. तसेच सुदर्शन क्रिया, आर्ट ऑफ लिव्हिंग, राजयोग, विपश्यना किंवा इतर कोणत्याही गुरूने सांगितलेल्या क्रियांनी तात्पुरतेच ‘फिल गुड’ तंद्री, ‘मला बरे वाटते’ असे होऊ शकते. त्यामुळे मी या सर्व गोष्टींचा स्वत: अनुभव घेऊन त्यानंतर ‘विवेक बुद्धीने’ एन्डॉर्फिन मुळे होणार्‍या तात्कालिक व्यसनसदृश गोष्टींचा पूर्ण त्याग केला आहे. आता अशा प्रकारच्या गुरूंच्या मागे लागून कोणाचाही कायमस्वरूपी फायदा होत नाही या निष्कर्षाप्रती आलो आहे.

-डॉ.र.रं.टोणगावकर