रेव्हपार्टीमध्ये सापडलेल्या तरूण-तरूणींचे तोंड झाकणारे फोटो, विकएन्ड पार्टीच्या नावाखाली हौसिंग सोसायटीच्या फ्लॅटमध्ये मद्यपान करून धुडगूस घालणार्या तरूण-तरूणींच्या बातम्या आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करतात. हे फक्त पुण्या-मुंबईत आणि ते देखील उच्च वर्गीयांमध्येच घडत असेल असे म्हणून मनाची समजूत घालावी तर आमच्या सातार्यामध्ये देखील ठोसेघर आणि कोयनानगरला मद्यधुंद तरूण-तरूणींची टोळकी हे आता रूटीन चित्र होऊ लागले आहेत. आपण असे काही बोलू लागलो की, आपली मित्रमंडळी आपल्याला वेड्यात काढतात. म्हणतात, ‘अरे तरूण पोरच ती त्यांनी आता मजा करायची नाही तर कधी करायची’ आमच्या एका मित्राने तर ह्या तरूणाईच्या वतीने मला गुलाम अलीची गजलच ऐकवली परवा ‘थोडी सी जो पीली है डाका तो नही डाला चोरी तो नही की है’ व्यसनाचे उदात्तीकरण करणार्या ह्या संस्कृतीचा आपण जरा अंदाज घेतला पाहिजे असे वाटते.
सगळ्यात महत्वाची अधोरेखीत करावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे, ‘व्यसन करणे ही काहीतरी चुकीची गोष्ट आहे’ असा दहा-पंधरा वर्षांपूर्वी समाजमान्य असलेला विचार गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे बदलला गेला आहे. सामाजिक सर्व वर्गांमध्ये व्यसन करणे हा एक प्रतिष्ठेची बाब झाली आहे. व्यसन न करणारे लोक आयुष्यामध्ये काही तरी महत्वाचे गमावत आहेत, अशी समाजधारणा तयार झाली आहे. डॉक्टर, वकील, पत्रकार, विचारवंत व राजकारणी सगळ्यांनाच मोकळे व्हायला दारूचा आधार लागतो. स्वाभाविकच बहुसंख्यंच्या नियमानुसार व्यसन न करणे ही हळूहळू हास्यास्पद आणि टिंगलटवाळीची गोष्ट होऊ लागली आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाचा प्रश्न आता आरोग्याचा प्रश्न अथवा सामाजिक प्रश्न न रहाता व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न झाला आहे. राज्यशासनाच्या दारू पिण्यासाठीचे कायदेशीर वय पंचवीस वर्षे करण्याच्या धोरणाविषयी मराठी व इंग्रजी भाषेतील काही प्रमुख वृत्तपत्रांनी चालवलेली मोहीम ह्या गोष्टीचे चांगले उदाहरण आहे. अठराव्या वर्षी व्यक्ती मतदान करू शकते. सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करू शकते तर दारू का पिऊ शकत नाही? अशा पान पान भराच्या खोडसाळ जाहिराती ह्या जाणीवपूर्वक व्यसनाला व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न करण्याच्या प्रयत्नांचे करण्याचे उदाहरण उत्तम उदाहरण आहेत.
सर्वात खेदाची गोेष्ट हीआहे की, ह्या समाजामधील तरूण वर्ग ह्या गोष्टींचा सर्वात मोठा बळी ठरतो आहे. असे देखील म्हणता येईल की भारतामधील झपाट्याने वाढणारा युवावर्ग हा आंतरराष्ट्रीय लिकर-लॉबीच्या दृष्टीने एक मोठा ग्राहक वर्ग आहे व त्याला भुलवण्यासाठीचे सर्व प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. गेली अनेक वर्षे दारूबंदी व्यसनमुक्ती सेवातले कार्यकर्ते महिला मतदानाने दारूबंदी करणे, धान्यापासून मद्यनिर्मितीला विरोध करणे तीव्र स्वरूपाचे व्यसन सोडवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र चालवणे अशा विविध गोष्टींद्वारे ह्या प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्या सर्व गोष्टी चालू ठेवूनच समाजामधील खास करून युवा वर्गामधील व्यसनाला मिळालेली प्रतिष्ठा तोडणे ह्यावर येत्या कालखंडामध्ये आपल्याला मोठा भर द्यावा लागणार आहे. व्यसन करणे म्हणजे स्वत:च्याच शरीरावर डाका घालणे आहे आणि व्यसनाला प्रतिष्ठा मिळवून देणे म्हणजे कुठेतरी कुणाला तरी चोरी करायला प्रवृत्त करणेच आहे. म्हणून ‘थोडी सी जो पी ली है डाका तो नही डाला चोरी तो नही की है।’ म्हणणार्यांना आपल्याला सांगावे लागणार आहे. ‘तू ने डाका ही डाला है। तूने चोरी ही की है।’
कुठल्याही स्वरूपाचे व्यसन हे मुख्यत: विवेकाच्या विरोधी गोष्ट आहे. त्यामुळे विचारांच्या पातळीवर व्यसनाच्या बदनामीची ही आपल्या व्यापक विवेककरणाचा एक भाग आहे. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विवेकवाहिनी, अंनिस आणि परिवर्तन संस्था युवा वर्गामध्ये व्यसन बदनाम करण्यासाठी’ ‘बलशाली युवा महाराष्ट्रासाठी चला व्यसन बदनाम करूया’ ही मोहीम चालवत आहे. युवकांमध्ये जाणीवपूर्वक रूजवल्या जाणार्या व्यसनी आणि अविवेकी संस्कृतीला स्वत:चा विवेक प्रखर करून दिलेले हे एक उत्तर आहे. मोहीमेच्या माहितीचे रिपोर्टिंग घेऊन दर महिन्याला आपली भेट होतच राहील तोपर्यंत गुलाम अलीची क्षमा मागून आपल्यालादेखील उच्च स्वराने म्हणायला शिकावे लागेल ‘तुने डाका ही डाला है, तुने चोरी ही की है।’
– डॉ. हमीद दाभोलकर