Categories
कार्याध्यक्षांची डायरी

संघटना वाढ व बांधणीसाठी स्वागत आहे!

जुलै - २०११

            महाराष्ट्र अंनिसचा संसार सुरळीत चालू आहे. येत्या नागपंचमीला समितीच्या स्वतंत्र व संघटीत कार्याला 22 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे आता. नागरीकत्वाच्या वयात आलेल्या संघटनेला आपल्या सशक्त बांधणीसाठी व भविष्यातील वाढीसाठी अधिक नेमकेपणाने विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने नुकत्याच सांगली येथे झालेल्या संघटनेच्या विस्तारीत राज्य कार्यकारिणी बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय

घेण्यात आले. त्यामध्ये संघटीत कार्याचे महत्त्व अबाधित ठेवून त्याच्या बांधबंदिस्तीला आणि आजच्या अनुकूल परिस्थितीतील विस्ताराला प्राधान्य देण्याचे ठरविले. तसेच कार्यकर्त्यांच्या सहभागातील शिस्त, समर्पण ‘एक व्यक्ती- एक पद’ आणि ‘देह-नेत्र-रक्त दान’ संकल्पातून अधोरेखित करण्यात आले. यापुढे संघटनेस शाखा, जिल्हा, राज्य या स्तरांपैकी एकावेळी कुठल्यातरी एकाच पदावर राहण्याचा निर्णय संघटनेने घेतलेला आहे. जेणेकरुन सतत नवनविन कार्यकर्त्यांना जबाबदारीची संधी देता येईल आणि संघटन प्रवाही राहील. तसेच किमान राज्य कार्यकारिणीतील सर्वांनी देहदानासाठी, नेत्रदानासाठी व रक्तदानासाठी संकल्पीत होण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अंनिसचा कार्यकर्ता आता व्यसनाधीनतेच्या विरोधात उभा राहतांना समाजाप्रती आपली

उपयोगिता सिद्ध करु शकेल.

            चळवळीला आपल्यातील भरीव योगदान देणार्‍या जेष्ठ सहकार्‍यांबद्दलचा कृतज्ञतेचा भाव महाराष्ट्र अंनिसतर्फे ‘कार्यकर्ता जीवन गौरव पुरस्कार’ देऊन व्यक्त करण्याचे देखील ठरले आहे. पहिला पुरस्कार आपण कोल्हापूर मध्ये दि. 9 जुलै रोजी के. डी. खुर्द (कोल्हापुर) व टी.आर.शिंदे (इचलकरंजी) यांना मान्यवरांच्या हस्ते देत आहोत.

            कुठल्याही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटीत कार्याला पर्याय नाही, याची खुणगाठ लोकशाही- प्रजासत्ताक राष्ट्रातील नागरीकांच्या मनात असणे आवश्यक वाटते. कारण जगात आजपर्यंत माणसाने त्याचे जीवन सुखी-समाधानी करण्यासाठी विधायक व कृतिशील संघटन शक्तीचे हत्यार वापरल्याचे बघायला मिळते. परंतु त्यासाठी संघटनेला सुस्पष्ट वैचारिक अधिष्ठान आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्तीचा बौद्धिक पाया असण्याची पाया आवश्यकता आहे. नाही तर मग, लोकशाही जीवनप्रणाली मध्ये देखील नागरीकत्वाच्या व्यक्ती-संघटन स्वातंत्र्याचा स्वैराचार होतो. आणि संघटीत शक्तीचे झुंडशाहीमध्ये केंव्हा रुपांतर झाले हे आपलेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या सजग मानवतावादीसमतावादी-विवेकनिष्ठ विचारांच्या लोकांना अखिल मानव समाजाला शोषणमुक्त समाजवादी-धर्मनिरपेक्ष करण्याचे ध्येय अधिक सुस्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्या महामार्गावर जाण्यासाठीची अंधश्रद्धा निर्मूलन-वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे काम ही एक पाऊलवाट आहे, असे आम्हाला वाटते. महाराष्ट्र अंनिस कटिबद्ध असलेल्या या व्यापक समाजबदलाच्या व मानवविकासाच्या कार्याचा विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ‘तालुका तिथे- शाखा महाराष्ट्र अंनिसची’ हे घोषवाक्य या वर्षअखेरीस प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आपण आपल्या गावात महाराष्ट्र अंनिसची शाखा सुरु करु इच्छित असल्यास मला बेधडक संपर्क साधा (मो. 9422790610)

            महिनाभरात आम्ही आपल्यापर्यंत निश्चित पोहचू. आपल्याला स्थानिक ठिकाणी काम करण्यासाठी उपयोगी पडणारे सर्व तपशील आजच संघटनेकडे आहेत. ते घेऊन जबाबदार कार्यकर्ता तुमच्यापर्यंत पाठविण्याची व्यवस्था होऊ शकेल.

-अविनाश पाटील