Categories
संपादकीय

विवेकद्रोही पळपुटे

जानेवारी - २०१९

प्रागतिक विचारांना पुढे नेणार्‍या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अडवू पाहणार्‍या अविवेकी शक्तीपुढे नांगी टाकणार्‍या विविध क्षेत्रातील खुर्चीबहाद्दरांच्या पळपुटेपणाचा आम्ही धिक्कार करतो. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात अशा घटना गेल्या अनेक वर्षांपासून वाढत चालल्या आहेत, याची चिंता वाटते. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांचा यानिमित्ताने आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. यवतमाळ साहित्य संमेलनात नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचे भाषण रद्द करणे आणि महाराष्ट्र अंनिसच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या शिबिरासाठी मराठवाडा विद्यापीठातून काढलेले पत्रक रद्द करणे याच त्या दोन घटना.

मानवी समाजाची प्रगती ही विचारांच्या वाद-प्रतिवादातून गतिमान होते. इतिहास त्याला साक्षी आहे. उदारमतवादी विचारसरणीतून चुकीच्या समजुती टाकून देण्यास मदत होते, तसेच कालानुरूप नवविचारांची पेरणी करण्यास गती मिळते. या जाणिवेतूनच जगाच्या पाठीवर लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात आल्या. या व्यवस्थांनी आपल्या राज्य घटनांची निर्मिती केली. या घटनांत व्यक्तीस्वातंत्र्याला व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान मिळाले. टीका-प्रतिटीकेतून वैचारिक घुसळण होऊन नेमके सत्य समोर यावे व त्याचा स्वीकार होऊन समाज दोन पावले पुढे जावा या मार्गानेच सर्व समाजघटकांना न्याय मिळेल, अशी व्यवस्था लोकशाहीत केली जाते. पण जे नव्या, विकासशील टीकात्मक विचारांना घाबरतात ते आडून लपून धमक्या देतात, अशा धमक्यांना न घाबरता संबंधित निर्णय घेणार्‍या खुर्चीवर बसलेल्यांनी खमकेपणाने निर्णय घेणे त्यांचे कर्तव्य ठरते. पण अकारण भीतीतून ही मंडळी कायदा व सुव्यवस्थेचा बाऊ करून कार्यक्रम रद्द करतात व स्वत:चे हसू करून घेतात. कुणीतरी धमकी दिली म्हणून नयनतारा सहगल यांचे भाषण रद्द करणे, या पळपुटेपणाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे; शिवाय भारतात घडत असलेल्या प्रचलित चिंताजनक घटनांवरील त्यांचे परखड भाष्य याला भिऊन जर त्यांचे भाषण रद्द झाले असेल, तर ही विचारांची मुस्कटदाबीच म्हणावी लागेल.

विचारांचा प्रतिवाद विचारांनीच व्हावा, हे लोकशाहीतील महत्त्वाचे मूल्य आहे. त्यालाच नख लावण्याचा उद्योग म्हणजे अराजकाला निमंत्रण होय. अशा वेळी संबंधित संयोजकांनी भ्याडपणा दाखविणे धिक्कारार्हच आहे. भारतीय राज्य घटनेला प्रमाण मानून महाराष्ट्र अंनिस समाज परिवर्तनाचे काम करते. अंनिसचे प्रथम कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्रात विविध ठिकाणी परिवर्तनाचा विचार मांडत असताना मूलतत्त्ववादी दिवाभीतांनी त्यांना असाच विरोध केला होता. पुण्यातील एका कार्यक्रमात काही धर्मांधांनी विरोध केला म्हणून त्यांचे भाषण संयोजकांनी रद्द केले होते. असाच प्रकार नुकताच लातूर येथे घडला. अंनिस महाराष्ट्रात जोडीदाराची विवेकी निवड हा कार्यक्रम राबविते. आयुष्याचा जोडीदार निवडताना छद्मवैज्ञानिक पत्रिका जुळवत बसण्यापेक्षा परस्परांना समजून घेऊन, परस्परांच्या आवडी-निवडी जाणून जोडीदाराची निवड करणे, हे अधिक योग्य. याबाबत एक दिवसाचे मार्गदर्शन शिबीर लातूर येथे अंनिसने आयोजित केले होते.

मराठवाडा विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील युवक-युवतींना या शिबिरासाठी पाठवावे म्हणून विद्यापीठाच्या संबंधित अधिकार्‍यांना विनंती करण्यात आली. हा कार्यक्रम आवडल्याने संबंधितांनी तसे पत्रक काढले; पण या पत्रकाला अंनिसच्या हितशत्रूंनी विरोध केला म्हणून ते पत्रक रद्द करण्यात आले. एका चांगल्या विधायक उपक्रमाला खीळ घालणारा हा पळपुटेपणा निषेधार्ह आहे. समाजातील विविध पदांवर आरूढ झालेल्या अधिकार्‍यांनी अशी पलायनवादी भूमिका घेणे समाजाच्या प्रगतीला हानिकारकच होईल. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.