शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे ‘विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा’ घेण्यात आली. या वर्षी ‘जातिप्रथा आणि त्यांच्या विविध समस्या’ हा विषय लघुपट स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंनिसने आपला लढा कृतिशील मार्गाने पुढे नेत सन 2016 मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय घेऊन लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. सन 2017 मध्ये ‘जात’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली, तिलाही भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र जात या विषयाचे अनेक कांगोरे असल्यामुळे यावर्षीही जातिप्रथा व प्रथेशी निगडित अनेक समस्यांबाबत सांस्कृतिक क्षेत्रात अधिक गंभीर चिंतन होऊन नवीन आशयासह लघुपट निर्माण व्हावेत व जातीनिर्मूलनाची सांस्कृतिक चळवळ जोमाने पुढे जावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.
लघुपटनिर्मिती करताना, जात या वास्तवाचे विविध पैलू योग्य रीतीने समाजासमोर मांडले जावेत म्हणून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि एम. जी. एम. वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालय, फिल्म आर्टस् विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 16 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 दरम्यान आईन्स्टाईन सभागृह, एन 06, सिडको, औरंगाबाद येथे राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. अभिवादन गीताने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी म. अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रा. माधव बावगे, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, म. अंनिस औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. अनमोल कोठडिया हे उपस्थित होते.
म. अंनिस औरंगाबाद जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रा. अजित कोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी भारूड, लोकगीतांतून अंधश्रद्धा आणि जात विषयाबाबत संतांच्या द़ृष्टिकोनांची मांडणी केली. जातप्रश्नाची सैद्धांतिक मांडणी आणि महाराष्ट्र अंनिसची जातप्रथांबाबतची भूमिका या विषयावर म. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. फिल्म विषयाची मांडणी, दिग्दर्शन व निर्मिती या विषयावर डॉ. अनमोल कोठडिया यांनी सहभागी सोबत संवाद साधला. फिल्म निर्मितीची तंत्रज्ञान या विषयावर प्रा. शिव कदम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रावणी आणि सोनालिका यांनी केले, तर अतुल यांनी आभार मानले.