इस्लामपूर – विविध आजार बरे करणे, व्यसनमुक्ती, करणी काढणे, कोर्ट कचेरीतून मुक्तता करणे, संतती प्राप्ती अशा अनेक समस्यांचे निवारण करण्याचा दावा करणारा भोंदू रामदासजी याचा पर्दाफाश करण्यात येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे. इस्लामपूर पोलीसांनी या भोंदूस गजाआड केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, येथून जवळच असणार्या राजारामनगर येथे गेल्या आठवड्यापासून रामदास गंगाराम मंडाले-जोशी उर्फ रामदासजी महाराज वय 40 (रा. कुंभारी बुद्रुक, ता. जामनेर, जि. जळगांव) व त्याचा साथीदार विनोद ईशनाथ जोशी (वय 20) यांनी खोली भाड्याने घेऊन बुवाबाजी करण्यास सुरुवात केली होती. कोणतीही समस्या घेऊन त्यावर खात्रीशीर इलाज करण्याचा दावा हा महाराज करत होता. यासंबंधी शहरात मोठ्या प्रमाणात जाहीरात केली होती. सदर जाहीरात अं.नि.स.च्या कार्यकर्त्यांच्या हातात पडल्यावर सदरच्या बुवाचा भांडाफोड करण्याचे ठरले. रामदास महाराजाच्या विरोधात अं.नि.स राज्य सरचिटणीस संजय बनसोडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कार्यकर्ते व पोलीस बोगस गिर्हाईक बनून महाराजास भेटले. दारूचे व्यसन सुटत नाही असे एका कार्यकर्त्यांने महाराजास सांगितले. या समस्येवर उपाय म्हणून महाराजांनी 1700 रुपये खर्च येईल असे सांगितले. संतती नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केल्यावर त्यावरही उपाय आहे त्यासाठी कांही खर्च येईल तसेच प्रेमविवाह यशस्वी होण्यासाठी महाराजांनी उपाय सांगितला. या कारवाईत प्रत्यक्ष पोलीस असल्याने सदर महाराज लोकांची फसवणूक करत असल्याची पोलीस व कार्यकर्त्यांची खात्री झाली. पोलिसांनी त्वरित भोंदू बुवास व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले. थोड्या कालावधीत अनेक लोकांची फसवणूक या बुवाने केली आहे. ज्या नागरिकांची या बुवाने फसवणूक केलेली असेल त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
अं.नि.स.चे कार्यकर्ते संजय बनसोडे, अवधूत कांबळे, भास्कर सदाकळे, प्रा. बी. आर. जाधव, राजेंद्र मोटे, प्रा. अशोक जाधव, प्रा. संजय माने यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे, कॉ. इसाक चौगुले, कॉ. दिनकर पाटील, कॉ. अशोक उगळे, मोहन गुरव यांनी पोलीस कारवाई केली.
– अवधुत कांबळे, इस्लामपूर