Categories
व्यक्तिविशेष

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रदूत नरेंद्र ….. विवेकानंद

वार्षिकांक – २०१३

वीस ऑगस्ट हा दिवस नरेंद्रच्या आणि या देशाच्या इतिहासातील पण एक महत्वाचा दिवस आहे. नरेंद्र म्हणजे विवेकानंद. विवेकात आनंद घेणारा म्हणून विवेकानंद हे नाव त्यांनी घेतले होते. तो प्रवासही पुढे थोडा समजावून घेऊ. वीस ऑगस्ट 1893 रोजी विवेकानंद अनेक विवंचनेत असणार; ते पण आपण पुढे लक्षात घेऊ. मात्र या अनेक विवंचना बाजूला ठेऊन त्या दिवशी अमेरिकेतून आपल्या शिष्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय, “मी ठामपणे सांगतो, माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचे औषध मला समजले आहे.” विवेकानंद एवढ्या ठामपणे हे विधान करताहेत याचे कारण परिव्राजक म्हणजे भटका संन्यासी म्हणून 1890 मध्ये वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी वरहानगर मठ सोडला. 31 मे 1893 ला अमेरिकेस जाण्यासाठी ते बोटीवर चढले. पण त्या तीन वर्षात त्यांनी भारत उभा आडवा पिंजून काढला. अस्वस्थ होऊन पत्रे लिहिली. त्यात धर्मचर्चा अजिबात नाही. चर्चा आहे ती फक्त हा देश या अवनतीला का पोचलाय याची. अंधश्रद्धा पसरवीत, या देशातील बहुजनसमाजाची, पाशवी, घृणास्पद पिळवणूक करीत पुरोहितशाही उभी आहे. त्यांचे आर्थिक संबंध त्यात गुंतलेत. हे ते सांगताहेत. ते अधिक नेमक्या भेदक शब्दात पुन्हा याच दिवशी त्यांनी एक वर्ष आधी सांगितलंय, 20 ऑगस्ट 1892 रोजी जुनागडच्या नवाबाला पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय, “ज्यांच्या पाचशे पिढ्यांनी वेद ही काय चीज आहे हे बघितलेले नाही ते पुरोहित आज या देशाला धर्मग्रंथ सांगून लुबाडताहेत. देवा, ब्राम्हणांच्या रूपाने या देशात आज वावरणार्‍या या राक्षसांच्या पासून या देशाचे रक्षण कर.”

अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या पाशामधून या देशाला मुक्त केल्याशिवाय या देशाच्या स्वातंत्र्यालाही काही अर्थ असणार नाही, हे स्वातंत्र्य लढ्याची अभिनव रचना करणार्‍या विवेकानंदांनी नेमके सांगितलंय. 19 नोव्हेंबर 1894 रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या शिष्यांना आठवण करून दिली.” समजा, उद्या इंग्रजांनी आपल्या हातात राज्य दिले आणि ते निघून गेले तर काय होईल? ज्यांच्या हातात हे राज्य येईल ते इतरांना पुन्हा गुलामासारखे वापरतील. या देशात हे जवळ जवळ कायम होत राहिलंय. गुलामांना स्वराज्य हवे असते इतरांना गुलाम बनविण्यासाठी. आणि त्या प्रक्रियेत स्वत: पुन्हा गुलाम होण्यासाठी” आणि हे सारे टाळावयाचे असेल तर काय करावयास हवे हे त्यांनी आपला मित्र शशी, जो रामकृष्णांचा सर्वात आवडता म्हणून ज्याला रामकृष्णानंद म्हणत त्याला 19 मार्च 1894 रोजी लिहिलेल्या पत्रातून कळवलंय. त्यांनी लिहिलंय, “प्रत्येक खेड्यात एक संन्याशी म्हणजे कार्यकर्ता ठेवावा लागेल. त्याच्या बरोबर वेद, कुराण, बायबल असतील. सार्‍या धर्मांचे मूलतत्त्व एकच आहे. ‘माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म’ ही धर्माची खरी व्याख्या आहे. त्यामुळे एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील आणि एक धर्म नाकारलात तर सारे धर्म नाकारावे लागतील हे या संन्याशांना खेड्यातील लोकांना समजावून द्यावे लागेल. त्याचबरोबर धर्म न मानणारी पण खर्‍या अर्थाने धार्मिक असणारी माणसेपण असतात हे लोकांना दाखवून द्यावे लागेल. म्हणजे माणूस बनण्यासाठी एखादा धर्म स्वीकारण्याची पण गरज नाही हे लोकांच्या लक्षात आणून द्यावे लागेल. मात्र या संन्याशांच्या बरोबर पृथ्वीचा गोल असेल. भूगोलाच्या मदतीने इतिहास शिकवतील. त्यांच्याबरोबर लोहचुंबक असेल, रसायनातील प्रयोग असतील. आधुनिक विज्ञान समजावून देऊन आपणाला या आपल्या लोकांना तमोयुगातून बाहेर काढून, त्यांची आज जी पाशवी पिळवणूक होते आहे त्यातून मुक्त करावे लागेल.”

आपले खरे राष्ट्र आज झोपडीत रहात आहे. आणि झोपडीत राहणार्‍या या आपल्या भावंडांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व मनुष्यत्वाचा विसर पडला आहे. हिंदू, मुसलमान व ख्रिस्ती लोकांच्या पायाखाली सतत तुडविले गेल्यामुळे त्यांची अशी समजूत झाली आहे की, ज्यांच्यापाशी पैसा आहे त्यांच्या टाचेखाली चिरडून जाण्यासाठीच आपला जन्म आहे. त्यांना त्यांच्या विस्तृत व्यक्तिमत्वाचे पुन:ज्ञान करून दिले पाहिजे- आपण आपल्या बांधवांना उपयुक्त विचार वा कल्पने देऊ, बाकीचे कार्य ते स्वत:च करतील. - पण या कार्यात अनेक अडचणी आहेत. (20 जून 1894 रोजी शिकागो येथून हरीदास यांना पाठविलेल्या पत्रामधून)

हे सारेच दर्शन विलक्षण आहे. मात्र अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करावयाचे असेल तर भविष्य आणि चमत्कार या वेडगळ समजुतीपासून समाजाला मुक्त करणे ही प्राथमिक गरज आहे हे त्यांनी सांगितले. अमेरिकेत पॅसिडोना येथे भाषण देताना ते म्हणाले, “आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणार्‍या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात असे समजणे हा मानवी मनाला होणारा एक रोग आहे. माणसाचे सामर्थ्य खच्ची करणारी यासारखी दुसरी भयावह गोष्ट नाही.” काही बिलंदर लोकांनी हा आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय केलाय. त्यांचे पितळ उघडे पाडणे गरजेचे आहे आणि सहजशक्य आहे हे सांगताना त्यांनी त्याच भाषणात एक गोष्ट सांगितली. खरं तर नंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये ही गोष्ट वापरण्यात आल्यामुळे आपणाला थोडीफार माहीत आहे. मात्र विवेकानंदांनी सांगितलेली गोष्ट अशी, विवेकानंद म्हणाले, “आमच्या भारतात एक फार चांगला राजा होता. पण या भविष्याच्या नादी लागल्याने त्याचे व त्यामुळे त्याच्या प्रजेचे फार नुकसान होत होते. राजाच्या दरबारात एक नावाजलेला ज्योतिषी आला. त्याने राजाची पत्रिका बघितली आणि म्हणाला, “राजा सहा महिन्यात तू मरणार. अपघाताने वा दगाफटका होऊन. राजाच्या दरबारात सन्नाटा पसरला. प्रधान शहाणा होता. तो ज्योतिषाला म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या कुंडलीप्रमाणे किती वर्षे जगणार?’ ज्योतिषी म्हणाला, ‘माझी कुंडली सांगते, मी शंभर वर्षे जगणार’- प्रधानाने आपली तलवार काढली. ज्योतिषाचे मुंडके उडवले. म्हणाला, ‘राजा पाहिलंत, मानवी कर्तृत्व आणि कुंडलीतला योग यातील फरक?’

विवेकानंदांनी चमत्कार नाकारलेत. त्यांनी सांगितलंय, “विज्ञान, कार्यकारणभाव मानते. त्याचप्रमाणे धर्म पण कार्यकारण भाव मानतात. त्यामुळे विज्ञानाप्रमाणे धर्मातही चमत्कारांना स्थान नाही. धर्मग्रंथातील रूपककथांना नंतर बेरकी लोक चमत्कार मानावयास लागले” मात्र विवेकानंद प्रथम मोकळेपणांनी आपल्याला आयुष्यात आलेले दोन चमत्कारीक अनुभव सांगतात. अमेरिकेत जाण्यापूर्वी ते मद्रास प्रांतात होते. तेथे त्यावेळचे कोणी सत्यसाईबाबा होते. ते अलिकडच्या सत्यसाईबाबांपेक्षा अधिक पॉवरफुल होते. विवेकानंदांना ते बाबा म्हणाले, “कोणत्याही फुलाचे वा फळाचे नाव तुझ्या हातातील कागदावर लिही.” विवेकानंदांनी मद्रासमध्ये कुणी ऐकलेही नसेल अशा हिमाचल प्रदेशातील एका फुलाचे नाव कागदावर लिहिले. तो कागद न वाचता, बाबांनी आपल्या झोळीत हात घातला आणि ते फूल काढून दिले. दुसरा अनुभव तर याहून भारी आहे. खरं तर ही गोष्ट पण ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये वापरली आहे. विवेकानंद अमेरिकेत भाषणे देत हिंडत होते. ‘या करंट्या कंटाळवाण्या भाषणांचा मला कंटाला आलाय. पण मला भारतात खेड्यात जाऊन नवनिर्माण करणार्‍या संन्याशांची संघटना उभारायची आहे. भारतात या कामासाठी कोणी दिडकीसुद्धा देत नाही. म्हणून मी भाषणे देऊन पैसे मिळवायला येथे आलोय’ म्हणून मित्रांना कळवत होते.’ एके दिवशी दिवसभर भाषणे देऊन ते थकले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा त्याच श्रोत्यांसमोर भाषण द्यावयाचे होते. उद्या काय बोलावे या विवंचनेत, दमलेले, थकलेले विवेकानंद गादीवर कलंडले आणि नकळत झोपी गेले. मध्यरात्री एक साधू आला. साधूने त्यांना उठवले. वही त्यांच्या हातात दिली. म्हणाला, ‘लिही.’ आणि तो साधू सांगत गेला. विवेकानंद लिहित गेले. सकाळी उठून बघतात तर ते सारे खरेच, अगदी तसेच वहीत लिहिलेले- मात्र हे दोन अनुभव सांगून विवेकानंद सांगतात, “त्या बाबाने जी हातचलाखी केली ती गल्लीतले अनेक जादूगार करू शकतात. आणि दुसर्‍या वेळी, माझ्याच थकलेल्या शरीराने, माझ्याबरोबर एक छान खेळ केलाय.”

महान त्यागाखेरीज कोणतीही गोष्ट कधी साध्य होत नाही. मला निश्चित ठाऊक आहे की, भारतमातेला तिच्या सर्वोत्कृष्ट व सर्वश्रेष्ठ संतानांच्या बलिदानाची आवश्यकता आहे आणि असे बलिदान करण्याचे सौभाग्य तुम्हाला लागावे हीच माझ्या मनातील इच्छा आहे.
(30 नोव्हेंबर 1894 रोजी डॉ.नंदुराव यांना पाठविलेल्या पत्रामधून)

‘दि मेम्फिस कमर्शियल’ च्या 15 जानेवारी 1894 च्या अंकात त्यांची याबाबतची एक मुलाखत आहे. त्यात त्यांनी सांगितलंय, “चमत्कारावर आमचा मुळीच विश्वास नाही. परंतु वरवर पाहता अद्भुत वाटणार्‍या गोष्टी निसर्गनियमांच्या सहाय्याने साध्य होणे शक्य आहे. माणूस आस्तिक आहे की, नास्तिक हा प्रश्न नाही. माणूस चांगला आहे का एवढेच पहावे. सर्वच धर्म चांगले आहेत असा आमचा विश्वास आहे. आणि या धर्माच्या अनुयायांनी आपापसात भांडणे हे पाप आहे.”

‘धर्म- त्याच्या पद्धती आणि उद्देश’ या निबंधात विवेकानंद आणखी स्पष्टपणे सांगतात, “केवळ धर्मग्रंथांच्यावरच विश्वास ठेवायचा असेल तर आपल्याला तर्कबुद्धी कशासाठी मिळाली आहे? तर्कबुद्धीच्या विरूद्ध एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे ही फार मोठी ईश्वरनिंदा नव्हे काय? ईश्वराने दिलेल्या या श्रेष्ठतम देणगीचा उपयोग न करण्याचा आपल्याला काय हक्क आहे? माझी खात्री आहे, जो माणूस ईश्वराने दिलेल्या शक्तींचा उपयोग न करता अंधपणे विश्वास ठेवतो त्याला ईश्वर क्षमा करणार नाही…. काही माणसे जगाला सांगत सुटतात की, “आम्ही मोठे धार्मिक लोक आहोत.” त्यांच्यात काय धार्मिकता आहे कोण जाणे! त्यांनी आजीबाईंच्या काही भाकडकथा ऐकलेल्या असतात आणि मतलबी पुरोहितांनी त्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवावयास बजावलेले असते- आणि ते जर विश्वास ठेवणार नाहीत तर झालीच त्यांची कंबक्ती हे त्यांना पटवून देण्यात मतलबी पुरोहित यशस्वी होतात.” राखाल म्हणजे ब्रम्हानंद यांना 1895 मध्ये पत्र पाठवून त्यांनी सांगितले, “ढोंगी साधुसंन्याशी व विविक्षित वर्गातील ब्राम्हण यांनी देशाला विपत्तीच्या खाईत लोटले आहे. चोरीमारी आणि दुष्टपणा यातच हे लोक मग्न असतात आणि हेच लोक स्वत:ला धर्मोपदेशक म्हणतात!” या देशात 25 टक्के माणसे भुकेने तडफडून मरताहेत. आठ वर्षांच्या अजाण मुलीचा तीस वर्षांच्या माणसाशी विवाह होतो आहे- आणि याला आम्ही विरोध केला तर “तुम्ही आमचा धर्म बुडवीत आहात.” म्हणून आमच्यावर टीका होते.” – आपले नशीब एवढेच की, अश्वमेघ यज्ञातील याहूनही, बीभत्स, भयावह गोष्टी, आमचा धर्म म्हणून हे लोक करीत नाहीत!

विवेकानंद समाजवादी आहेत. मात्र विवेकानंद समजवादी आहेत असे म्हटले की, अनेकांना राग येतो. वाईट वाटते. काहीजण समंजसपणे इतरांना समजावून सांगत म्हणतात, ‘ते खरेच समाजवादी नाहीत. आमच्या परिवारातील आहेत.’- हे लोक असे म्हणतात याचे कारण त्यांना समाजवाद समजला नाही, विवेकानंद समजले नाहीत, अंधश्रद्धेविरूद्धच्या चळवळीतून आणि परिवर्तनाच्या लढाईत सहजपणे विकसित होणारा समाजवाद समजला नाही, या चळवळीपण समजल्या नाहीत – आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘हिंदूचाच हिंदुस्थान’ या एकमेव उद्देशाने आम्ही कार्य करतोय, या देशात फाळणीनंतर मागे उरलेले सारे मुसलमान पंचमस्तंभीय आहेत, म्हणून सांगणारा शंभर मुखवट्यांमागचा खरा परिवार पण त्यांना समजला नाही, असे काही आहे का?

काही गोष्टी नीट लक्षात घ्यावयास हव्यात. 1894 मध्ये शिकागोहून आपला शिष्य अळसिंगा पेरूमल यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटले, “मी दार्शनिक नाही, तत्वज्ञ नाही, व संतही नाही. मी गरीब आहे आणि गरीबांबद्दल मला प्रेम वाटते. दारिद्र्य, अज्ञान आणि रूढी, अंधश्रद्धा यात रूतून बसलेल्या भारतातील वीस कोटी स्त्री-पुरूषांबद्दल कुणाचे मन कळवळले का? या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता?” आणि त्यानंतर 1 नोव्हेंबर 1896 या दिवशी, लंडनहून अमेरिकेतील आपली शिष्या कुमारी मेरी हेल यांना पाठविलेल्या पत्राची सुरवातच त्यांनी ‘मी समाजवादी आहे’ या वाक्याने केलेली आहे. हे वर्ष पण अनेक दृष्टीने महत्वाचे आहे. विवेकानंदांचे वय त्यावेळी 33 वर्षाचे आहे. 39 वर्षांच्या आयुष्यातील हा महत्वाचा टप्पा आहे. आणखी एक म्हणजे त्यापूर्वी 1890 ते 1893 अशी तीन वर्षे परिव्राजक, म्हणजे भटक्या संन्याशी, विविदिशानंद, सच्चिदानंद अशी नावे बदलून शेवटी विवेकानंद हे नाव त्यांनी स्वत:साठी नक्की केलंय. या तीन वर्षांत त्यांनी अस्वस्थ होऊन, या देशातील प्रश्न आणि त्यावरची उत्तरे शोधलीत. 1893 साली हा अनाम संन्याशी अचानक एके दिवशी जगाच्या व्यासपीठावर विराजमान झाला. प्रगत देश पाहताना मानवी समस्यांची मांडणी त्यांनी मनात नक्की केली आणि त्यापुढील तीन वर्षांच्या चिंतनाचे फलीत म्हणून त्यांनी पत्राची सुरवातच केली. ‘मी समाजवादी आहे’ म्हणून सांगून. विवेकानंद समाजवादी आहेत पण हा दार्शनिक हे अंतिम सत्य म्हणून स्वीकारीत नाही. त्याच पत्रात ते पुढे म्हणतात, “समाजवाद ही परिपूर्ण रचना आहे असे मी मानत नाही. पण आजवर मानवजातीने ज्या वेगवेगळ्या रचना शोधल्या आणि वापरल्या यात ती अधिक चांगली रचना आहे. म्हणजे ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने मी समाजवादी आहे. त्याच पत्रात हा दार्शनिक समाजवादाची शक्तीस्थाने आणि मर्मस्थाने सांगतो. हा समाजवाद येईल त्यावेळी शुद्रांची, कामगारांची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यांचा समाजातील दर्जा सुधारेल. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल. हे सारे सांगून ते पुढे म्हणतात, मात्र या समाजरचनेत मानवी स्वातंत्र्याचा लोप होईल. असामान्य प्रतिभावान माणसे निर्माण होणार नाहीत. आणि हे सारे सांगत असतानाच, हा प्रयोग आता झाला पाहिजे. त्यामुळे या रचनेतील त्रुटी आपणाला समजतील व आपण त्या दूर करू हा त्यांचा विचार आहे. या समाजवादाला धर्माची जोड द्यावी लागेल हे त्यांनी इतरत्र सांगितले आहे. मात्र त्याचबरोबर, उद्याचा धर्म सर्व धर्मावर आणि विज्ञानावर आधारीत असेल. त्यामुळे यापुढे धर्म हा स्थितीशील नसेल तर विज्ञानावर आधारीत असल्याने तो गतीशील आणि परिवर्तनीय असेल.

धार्मिक माणसे किंवा परिवारातील माणसे ज्यांचा विचारही करू शकणार नाहीत अशी पत्रे, जी पत्रे फक्त समाजवादी माणूसच लिहू शकतो. अशी पत्रे यापूर्वी व यानंतरही विवेकानंदांनी लिहिलीत. डॉ.लागू ज्यावेळी म्हणाले, ‘देवाला रिटायर करा’ त्यावेळी काय महाभारत झाले, कोणी घडवले, हे आपणाला माहीत आहे. मात्र विवेकानंदांनी, लागूंच्या शंभर वर्षे आधी, 27 एप्रिल 1896 रोजी आलमबाजार मठातील आपल्या गुरूबंधूंना पत्र पाठवून कळवले, “आपले देव आता जुने झालेत. आपल्याला आता नवे देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे कारण आपल्याला आता नवा भारत घडवायचा आहे.” आणि फक्त खरा समाजवादीच वापरू शकेल अशा शब्दात 9 सप्टेंबर 1895 च्या पत्रात त्यांनी लिहिलंय, “फक्त सुशिक्षित हिंदूंमध्येच आढळून येणार्‍या जात्यंध, धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक भेकडांमधील एक बनून जगावे आणि मरावे यासाठीच मी जन्माला आलो आहे असे का तुम्हाला म्हणावयाचे आहे?…. मला माझ्या देशाविषयी खोटा अभिमान नाही. मी जितका भारताचा आहे तितकाच जगाचाही आहे. याबाबतीत खोटेपणा मुळीच नाही.”

फक्त सुशिक्षित हिंदूमध्येच आढळून येणार्‍या जात्यांध, धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक भेकडांमधील एक बनून जगावे आणि मरावे यासाठी मी जन्माला आलेलो नाही. भित्रेपणाचा मला तिटकारा आहे. भेकडांशी, तसेच राजकारणातील मूर्खपणाशी मला काहीही कर्तव्य नाही. कोणत्याही प्रकारच्या राजकारणावर माझा मुळीच विश्वास नाही.- तुमच्याशी चर्चा करताना माझी अडचण ही आहे की, तम्हाला धर्म नाही. स्वयंपाकघर हाच तुमचा परमेश्वर आहे. आणि स्वयंपाकाची भांडी हाच तुमचा धर्मग्रंथ आहे.
(ऑगस्ट/सप्टेंबर 1895, अलसिंगा पेरूमल यांना पाठविलेल्या पत्रामधून)

समाजवादी माणूस पाशवी वागणूक आणि घृणास्पद पिळवणूक यावर उभी असलेली जातीव्यवस्था मोडण्याचे मार्ग शोधत असतो. कोलंबो ते अलमोरा या आपल्या विजय रथयात्रेत विवेकानंद कुंभकोणमला आलेत. मद्रासमधील सनातनी ब्राम्हणांचा हा बालेकिल्ला आणि तेथील ब्रह्मवृंदांसमोर भाषण देणारा हा समाजवादी सांगतो, “ब्रह्मवृंदहो, मी तुमच्या आणि माझ्या जातींची मृत्यूघंटा वाजवायला येथे उभा आहे. आपल्या जाती जर सुखाने मेल्या नाहीत तर त्या कुजतील. त्यामुळे आपल्याला व समाजाला पण त्रास होईल. आपल्याला सुखाने मरण यावे म्हणून आपण फक्त एक गोष्ट करू या. आपण सांगूया, “आम्ही उच्चवर्णीय आहोत. आम्ही अर्थार्जनासाठी नोकरी करणार नाही त्या सर्व नोकर्‍या दलितांच्यासाठी मोकळ्या ठेवणार आहोत.” विवेकानंद शंभर टक्के आरक्षण मागतात. मात्र समाजवादी विवेकानंद आरक्षणाच्या व्यावहारिक बाजूंचा पण विचार करतात. ते सांगतात, “दलित आपल्याएवढे हुशार नाहीत. कारण आपण त्यांना शेकडो वर्षे ज्ञानापासून वंचित ठेवलंय. त्यामुळे आपल्याला जर एक शिक्षक लागत असेल तर दलित मुलांना सात शिक्षक लागतील. आपल्यापेक्षा सातपट अधिक चांगल्या शिक्षणाची आपण त्यांच्यासाठी सोय केली पाहिजे.” विवेकानंद केवळ येथेच थांबत नाहीत. 1896 मध्ये आपला मित्र राखाल(म्हणजे नंतरचा ब्रह्मानंद) याला पत्र पाठवून ते सांगतात, “काही लोक म्हणतात, निसर्गातच समता नाही त्याला आम्ही काय करणार?- त्यांना आपण सांगितले पाहिजे, निसर्गात ती नसेल तर ती निर्माण करण्यासाठी आमचा जन्म आहे. म्हणजे दलितांच्या साठी सातपट नव्हे तर दहापट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपणाला करावी लागेल.”- मात्र हे सारे सांगणारे विवेकानंद ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ वाद खेळत नाहीत. आपले ‘महाप्रतापी पूर्वज तामीळ’ या लेखात ते म्हणतात, “ब्राह्मणांना अनेक शतके शिक्षण मिळाले त्याचा एक फायदा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला नेतृत्व देत आज ब्राम्हण तरूण उभे आहेत. आपण जातीअंताची लढाई लढतोय. आपणाला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण बनवायचे नाही!”

स्वर्ग, नरक, आकाशपलिकडील शासक इत्यादीसंबंधीच्या काल्पनिक कथांच्या किंवा खुळ्या समजुतींच्याद्वारे सर्वसामान्य लोकांना भुलवून आत्मत्यागाच्या या एकमेव ध्येयाकडे नेले जाते. भ्रामक समजुतींना थारा न देता कामवासनांचा त्याग करून तत्त्वज्ञही बुद्धिपुर:सर याच ध्येयाकडे जात असतो. म्हणूनच बाह्य, इंद्रियग्राह्य स्वर्गाचे अस्तित्व काल्पनिकच असते. -खरे सत्य असे आहे की, ब्रह्म आपल्या आतच आहे. आपणच ब्रह्म आहोत.(1 नोव्हेंबर 1896, मेरी हेल यांना पाठविलेल्या पत्रामधून)
ढोंगी संन्यासी साधू व विविक्षित वर्गातील ब्राह्मण यांनी देशाला विपत्तीच्या खाईत लोटले आहे. चोरीमारी आणि दुष्टपणा यातच हे लोक मग्न असतात. आणि हेच लोक स्वत:ला धर्मोपदेशक म्हणवतात.... “जर बटाट्याचा वांग्याला स्पर्श झाला तर किती वर्षांनी ब्रह्मांड रसातळाला जाईल? हात स्वच्छ करण्यासाठी दहाबारा वेळा जर हातांना माती चोळली नाही तर पूर्वजांच्या चौदा पिढ्या नरकात जातील की चोवीस पिढ्या? - गेली दोन हजार वर्षे असल्या गहन प्रश्नांची उत्तरे शोधण्यात त्यांची मती गुंग होऊन गेली आहे. तर दुसरीकडे देशातील एक चतुर्थांश माणसे भुकेने तडफडून मरत आहेत. अष्टवर्षा कन्येचा तीस वर्षांच्या घोडनवर्‍याशी विवाह होत आहे. आणि ह्याला कोणी विरोध करू लागताच, “आमचा धर्म तुम्ही बुडवत आहात” अशी ओरड केली जाते- ज्यांना आपल्या मुली वयात येण्यापूर्वी माता झालेल्या पाहण्याची घाई झालेली आहे आणि त्यासाठी जे शास्त्रीय स्पष्टीकरणे देतात त्यांना कसला आला आहे धर्म? तसेच अनेक लोक मुसलमानांच्या माथी दोषाचे खापर फोडून मोकळे होतात, आपल्या मूर्खपणाला मुसलमान जबबादार हं! - या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यामागे माझा हेतू असा की, प्राचीन भारतात जशा अनेक चांगल्या गोष्टी होत्या तशाच अनेक वाईट गोष्टीही होत्या. चांगल्या गोष्टींचे जतन झाले पाहिजे हे खरे, परंतु होऊ घातलेला भारत, उद्याचा भारत हा प्राचीन भारतापेक्षा खूपच महान असला पाहिजे.
(1895 मध्ये राखाला, म्हणजे शशी यांना लिहिलेल्या पत्रामधून)

समाजवादी माणूस सर्वधर्मसमभाव मानतो. विवेकानंद या देशाच्या संदर्भात या प्रश्नाची मांडणी भेदक आणि नेमकी करतात. ते सांगतात, “या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारांमुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांमुळे झालीत. ते आपले अभागी भाऊ आहेत. दलितांच्याबद्दल जी कणव आपल्या मनात आहे तीच त्यांच्याबद्दल आपल्या मनात हवी. कारण धर्मांतरमुळेही त्यांची जात बदललेली नाही. त्यांनी आपापल्या जातीत धर्मांतर केलंय!” – परिवार विचारही करू शकणार नाही. अशी एक गोष्ट विवेकानंद सांगतात. ते सांगतात, “इस्लाम हा समतेचा संदेश व्यवहारात आणणारा एक श्रेष्ठ धर्म आहे. हे सांगून या प्रश्नाची सोडवणूक कशी करावी हे समाजवादी विवेकानंद सांगतात. 10 जून 1898 रोजी अल्मोरा येथून मोहम्मद सर्फराज हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, “माझी अगदी पूर्णपणे खात्री पटली आहे, की वेदान्त मताचे सिद्धान्त कितीही सूक्ष्म व सुंदर असले तरी जोपर्यंत इस्लाम धर्मातील प्रत्यक्षात आणलेल्या समतेची जोड त्यांना दिली जात नाही तोपर्यंत ते समाजाच्या दृष्टीने पूर्णपणे निरूपयोगी आहेत. मात्र ज्या ठिकाणी वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानव जातीला घेऊन जावयाचे आहे. मात्र हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल.”

समाजवादी माणूस हा परिवर्तनशील असतो. त्यामुळे तो अंधश्रद्धेच्या विरूद्ध असतो. याचा व्यत्यासही खरा आहे- अंधश्रद्धा विरोधी चळवळीतील माणसे भाषा जपून वापरतात. मात्र विवेकानंद ही लक्ष्मण रेषा अनेकदा सहजपणे ओलांडतात. विवेकानंद ही लक्ष्मण रेषा कशामुळे ओलांडू शकतात, त्याचा फायदा काय, तोटा काय ते आपण पुढे पाहणार आहोत. मात्र विवेकानंदांची ही अग्निफुले ‘सर्वांनीच’ नीटपणे समजावून घेतली पाहिजेत. त्यातील काही ज्वालाग्राही विचार असे आहेत.

‘जे ग्रंथात सांगितले आहे, त्याच्यावर मी विश्वासही ठेवू शकत नाही किंवा अविश्वासही करू शकत नाही. जे माझ्या बुद्धीला पटते, जे मी प्रत्यक्ष पाहिले आहे किंवा अनुभवले आहे तेवढेच मी स्वीकारले’(अमेरिकेत 23 मार्च 1900 रोजी दिलेले व्याख्यान.)

‘ज्याला आपण आज आपला धर्म म्हणतो तो ठिकठिकाणच्या लहान लहान ग्रामदैवतांमध्ये आणि क्षुद्र, खुळचट रूढींमध्ये सामावला आहे. एखादी क्षुद्र सामाजिक रूढी बदलली म्हणजे काही तुमचा धर्म बुडत नाही. मुळीच बुडत नाही. लक्षात ठेवा, रूढी या नेहमीच बदलत आल्या आहेत. बदलल्या पाहिजेत. याच भारतात असा एक काळ होता की, गोमांस खाल्ल्यावाचून ब्राह्मण हा ब्राह्मण राहू शकत नसे, वेदात तुम्हाला आढळेल की, जेव्हा एखादा संन्याशी, राजा किंवा थोर पाहुणा घरी येई तेव्हा उत्तम बैल मारण्यात येत असे. जेव्हा लक्षात आले या शेतीप्रधान देशात बैल मारल्याने शेतीचे नुकसान होते तेव्हा ही रूढी बंद पडली व गोमांस निषिद्ध मानले जाऊ लागले’(मदुरा येथील मानपत्राला दिलेले उत्तर)

‘कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नको. वेद थापाडे आहेत. शास्त्रे जर माझ्या अनुभूतींशी वा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचेच भाग्य! सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वत: मीच आहे. यागयज्ञ आणि देवदेवतार्चन निष्फळ होत.’(दैवीवाणी, कु.वाल्डो यांनी संकलित केलेल्या विचारांमधून)

भारतात गरिबांमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मुसलमान झालेले का आढळतात? केवळ तलवारीच्या जोरावर त्यांचे धर्मांतर घडवून आणले गेले असे म्हणणे म्हणजे महामूर्खपणाच होय. त्यांनी धर्मांतर केले जमीनदारांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, ..... पुरोहितांच्या हातून मुक्त होण्यासाठी, स्वाधीनतेसाठी या लाखो अवनत व दलित माणसांच्या उद्धाराची चिंता आहे कुणाला? इतिहासाच्या कुठल्यातरी कालखंडात आपल्या श्रीमंत व उच्चभ्रू लोकांनी, पुरोहितांनी आणि सत्ताधीशांनी या गरीबांबद्दल सहानुभूती तरी दाखविल्याची नोंद आढळते काय? - आणि या गरीबांच्या पिळवणुकीमुळेच या सार्‍यांची चैन चालली आहे. 
(नोव्हेंबर 1894, दिवाणजी यांना पाठविलेले पत्र)
विकासासाठी पहिली आवश्यक गोष्ट असते स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व आचारस्वातंत्र्य माणसाला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जोवर त्याच्या हातून इतरांचे अनिष्ट होत नाही तोवर त्याला आहार, पेहराव, विवाह या सर्वच बाबतीत स्वातंत्र्य असावयास हवे.
मुसलमानांनी हिंदूंवर विजय मिळविले. कसे शक्य झाले हे मुसलमानांना? भौतिक सभ्यतेबाबतचे हिंदूंचे घोर अज्ञान हेच यामागचे कारण आहे. शिंप्यांनी शिवलेले कपडे घालायलासुद्धा हिंदूंना कुणी शिकवले असेल तर ते मुसलमानांनी. रस्त्यातील धुळीने माखलेले अन्न खाण्यापेक्षा स्वच्छ रीतीने अन्न कसे खावे हे जर हिंदू लोक मुसलमानांपासून शिकले असते तर किती बरे झाले असते! जो भगवान इथे माझ्या बांधवांना अन्न देऊ शकत नाही तो स्वर्गात मला अनंत सुखात ठेऊ शकेल यावर माझा विश्वास नाही. - भारताचा उद्धार करावयास हवा. पुरोहितगिरी नष्ट करायला हवी. पुरोहितांचा जुलूम नको, सामाजिक अत्याचार नको, प्रत्येकाला पोटभर अन्न, शिक्षण आणि जीवनात पुढे येण्याची अधिकाधिक संधी मिळायलाच हवी.
(19 नोव्हेंबर 1894, न्यूयॉर्क येथून आपल्या मद्रास येथील भक्तांना उद्देशून पत्र)

‘भारतातील थोर विचारवंतांमध्ये बुद्धदेव हेच असे एकमेव आहेत की, ज्यांना जातीभेद मान्य नव्हता. इतर सर्वच दार्शनिकांनी सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळले आहे. समाजाच्या खुळचट समजुतींना खतपाणी घातले आहे. कितीही उंच उडाले तरी त्यांच्या मनात घार गिधाडांची वृत्ती आहेच.’(मंगळवार 9 जुलै 1895 रोजी दिलेल्या प्रवचनातून)

– ‘जुन्या दंतकथांना रूपकांचा वेश देऊन त्यांना वेडपट महत्व दिल्याने अंधविश्वास व खुळचट समजुती बळावतात. हा मानवी समाजाचा दुबळेपणा आहे आणि भोंदू लोक त्याचा फायदा घेऊन समाजाला नागवतात. कृपया कोणत्याही खुळचट समजुतीचे व अंधविश्वासाचे समर्थन करू नका. त्यांना विरोध करा’(26 जुलै 1895 रोजी बृहदारण्यक उपनिषदावर प्रवचन देताना)

‘देशात कोणताही समाजाला हितकारक विचार मांडल्यावर त्याच्या विरूद्ध रूढीप्रिय सनातनी लोकांनी संतापून मोर्चे उघडावेत हे होणारच. छळ, अत्याचार सहन करण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनी या परिवर्तनाच्या लढाईपासून दूर रहाणेच श्रेयस्कर आहे’(1901 मध्ये बेलूर मठात दिलेले भाषण)

जर दक्षिणेश्वरासारख्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वेश्यांना जाऊ दिले नाही तर मग त्यांनी कोठे जावे? ईश्वर अवतार घेतो तो विशेष करून पाप्यांसाठी, पुण्यवंतांसाठी नव्हे! मंदिरात उभे राहूनही ज्यांच्या मनात, अमूक एक स्त्री वेश्या आहे, अमका मनुष्य खालच्या जातीचा आहे, अमका दरिद्री आहे अशा गोष्टी येतात, अशा लोकांची(म्हणजेच ज्यांना तुम्ही ‘सभ्यगृहस्थ’ म्हणता त्यांची!) संख्या जितकी घटेल तितकी चांगली.
(23 ऑगस्ट 1896, स्वित्झर्लंडमधून आपला मित्र शशी(रामकृष्णानंद) यांना पाठविलेल्या पत्रामधून)

‘जे धर्मगुरू आज सत्वगुणी म्हणून मिरवताहेत त्यातील 90 टक्के खरेतर तमोगुणी आहेत. आता आपण या देशातील लोकांना मांस, मासे खाऊन कार्यप्रवण करण्याची गरज आहे.’(बेलूर मठात 1898 मध्ये शिष्यांचे प्रबोधन)

– ‘शंकराचार्यांची बुद्धी वस्तर्‍याच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे. दक्षिणी भटजींप्रमाणे ब्राह्मणांचा त्यांना भलताच गर्व आहे. ब्राह्मणेतर जातींना ब्रह्मज्ञान होणार नाही हे वेदान्तसूत्र-भाष्यात काय ठामपणे मांडले आहे त्यांनी. आणि हा केवढा भयंकर माणूस. वादात हरवून त्यांनी कितीतरी बौद्ध श्रमणांना जाळून मारले’(बेलूर मठात शिष्यांचे प्रबोधन)

‘आपण जोवर माणून आहोत तोवर आपणाला ईश्वराची मानवापेक्षा उच्चतर कल्पना करता येणार नाही. ज्यावेळी आपला मेंदू अधिक प्रगल्भ होईल, त्यावेळी आपल्याला कदाचित काही वेगळे दर्शन घडेल. पण आज मात्र आपणाला त्याची मानवरूपातच उपासना करावयास हवी. खरी अडचण ही आहे की, धर्मग्रंथातील एखादा उतारा घेऊन त्यात गडबडगुंडा करून मतलबी पुरोहित त्यातून हवा तो अर्थ काढतात’(भक्ती विषयक प्रवचनांमधून)

भारतात सर्व संघटीत प्रयत्न एका दोषामुळे असफल होतात. कारण काम करण्याची काटेकोर पद्धत आपण अजून शिकलो नाही. काळ, काम, वेग कायम लक्षात ठेवा. काम म्हणजे काम, मग तेथे मैत्री किंवा भीड अजिबात उपयोगाची नाही. आपल्या ताब्यातील सर्व रकमेचा प्रत्येकाने हिशोब ठेवला पाहिजे. पैसा फक्त त्याच कामावर खर्च करा, अगदी तुमच्यावर भुकेने मरण्याची पाळी आली तरीसद्धा. आणखी एक लक्षात ठेवा. व्यवहार म्हणजे व्यवहार. पैशाच्या व्यवहारात प्रत्यक्ष बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो. आणि सर्वप्रथम स्वत:च्या प्रकृतीची नीट काळजी घ्या. तुमचे काम तुम्हालाच पार पाडायचयं. आणि त्यासाठी तुम्ही आरोग्यसंपन्न रहा.
(21 ऑगस्ट 1896, स्वित्झर्लंडहून नाजुका राव यांना पाठविलेल्या पत्रामधून)

‘आज ब्राह्मण आणि पुरोहित सत्वगुणाच्या बहाण्यावरून देश तमोगुणात बुडवीत आहेत. मठ्ठ लोक बह्मविद्येवरील प्रेमाच्या नावाखाली स्वत:चा अजागळपणा झाकून ठेवत आहेत. हे आळशी लोक स्वत:च्या सामाजिक निष्क्रियतेवर वैराग्याचे पांघरूण घालत आहेत. अतिशय क्रूर असे हे लोक तपश्चर्येचे आणि यज्ञांचे ढोंग रचून आपली वागणूक म्हणजे धर्म असे आम्हाला सांगत आहेत. पुस्तके पोपटासारखी पाठ करणे आणि बापजाद्यांची खोटी बढाई मारणे एवढेच यांचे कर्तृत्व आहे. देश यांच्यामुळे रसातळाला जातोय’(श्रीमती मृणालिनी बोस यांना लिहिलेल्या पत्रामधून)

‘कोणत्याही धर्माने अंधविश्वासाची शिकवण दिली नाही. हा अंधविश्वास धर्मग्लानीच्या काळात पुढे येतो. मूर्ख लोक स्वत:मध्ये काहीही सामर्थ्य नसताना, पोपटपंचीच्या जोरावर इतरांना डोळे मिटून विश्वास ठेवावयास सांगतात. पण आंधळेपणाने विश्वास ठेवल्यास अध:पात होतो हेच तर सारे धर्म सांगत असतात, तुम्ही नास्तिक झालात तरी चालेल. पण हे लोक धर्माच्या नावाने सांगतात म्हणून त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून स्वत:ला पशूच्या पातळीवर आणू नका’ (5 जानेवारी 1896 रोजी धर्माचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावर भाषण देताना)

‘आजचे सर्व धर्म म्हणजे बाह्य घटनांची भंपक स्पष्टीकरणे देणारी भारूडे बनली आहेत. उदाहरणार्थ, रथातून फिरणारा सूर्य. धर्माच्या मते सर्वकाही कुठल्यातरी देवतेमुळे घडते आहे. म्हणजे सर्व कारणे कार्याबाहेरची आहेत. मात्र विज्ञानाचा अर्थ हा की प्रत्येक गोष्टीचे कारण तिच्या क्रियेतच आहे. विज्ञान क्रमश: प्रगत होत आहे आणि घटनांचे कारण देव व राक्षस यांच्या हातातून काढून घेत आहे. आज आपण बुद्धदेव काय म्हणाले ते म्हणूनच समजावून घेण्याची गरज आहे. ते म्हणालेत, “ईश्वरकल्पना नुसती तर्कविसंगतच नाही तर ती अनीतीला कारणीभूत होणारी आहे. कारण माणसाला ती दुर्बल बनविते व बाहेरून मदतीची याचना करण्यास त्याला शिकविते. ज्याला कोणी कधी पाहिले नाही, ज्याला कोणी कधी अनुभवले नाही व ज्याच्याकडून कोणालाही कधी सहाय्य लाभले नाही त्याच्यावर विसंबून का राहता? तुम्ही असे भित्रे का बनता?”(12 नोव्हेंबर 1897, लाहोर येथे दिलेले भाषण)

प्रामाणिकपणे व सर्वशक्ती एकवटून संघर्षासाठी मैदान सतत मोकळे ठेवण्याचा निश्चय करा. आणि मग तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्म किंवा साहित्य यापैकी कोणताही विषय निवडून त्यालाच ईश्वर समजा व जीवनातले अंतिम क्षणापर्यंत त्याचाच पाठपुरावा करीत राहा.
(17 सप्टेंबर 1896, इंग्लंडमधून मेरी हेल यांना पाठविलेल्या पत्रामधून)

‘या देशात युधिष्ठिर, अशोक, अकबर यांच्यासारखे कार्यक्षम व दयाळू राजे झाले हे खरे. पण हे अपवाद आहेत. बहुसंख्य राजे प्रजेला पिळणारे होते. प्रत्येक देशाचा राज्यकारभार हा त्या देशातील लोकांच्या मताप्रमाणे चालला पाहिजे हे आधुनिक पाश्चात्य देशांचे ब्रीदवाक्य आपण स्वीकारले पाहिजे.’ (‘उद्धोनन’ मासिकात 1899 च्या मार्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून)

‘ज्याप्रमाणे काही धार्मिक लोकभ्रम असू शकतात. त्याचप्रमाणे विज्ञानाच्या क्षेत्रातही काही लोकभ्रम आढळून येतात. खरे विज्ञान आपणाला सांगते की, आपण याबाबत सावधपणा दाखविला पाहिजे. आधुनिक विज्ञानातील बर्‍याचशा प्रचलित समजुती व कल्पना सिद्ध झालेल्या नाहीत. आपली प्रगती थांबविण्यासाठी पसरविलेल्या त्या वैज्ञानिक अंधश्रद्धा आहेत का हे तपासून बघायला शिका.’ (कॅलिफोर्नियात ‘होम ऑफ ट्रुथ’ या ठिकाणी दिलेल्या व्याख्यानामधून)

‘जगाचे, मानवाचे मंगल करण्यासाठी जन्म घेतलेल्या सर्व धर्मांनीच सर्वाधिक रक्तपात करून मानवाला सर्वाधिक दु:ख दिले आहे. भविष्यकाळात जग जिंकण्यासाठी बौद्ध, ख्रिस्ती व इस्लाम यांच्यात झगडा होईल. इतर धर्मांना अनिवार्यपणे या झगड्यात वापरले जाईल. आणखी एक गुंता आपणासमोर आहे. विज्ञान वस्तूंची विपुलता आपणासमोर आणेल. अनावश्यक वस्तूत मानवजात गुंतून पडेल. त्यातून चंगळवाद येईल. वस्तूंच्या विपुलतेमुळे माणसे आत्मकेंद्री बनतील. माणसांचे एकमेकात गुंतणे संपेल. आपणाला कदाचित नवी समाजरचना शोधावी लागेल. प्रत्येक चळवळीला या सर्वाचे भान हवे’(बाल्डो यांच्या कागदपत्रातील अपूर्ण लेखावरून)

‘कार्यकर्त्याचे प्रेम मृत्यूवर असले पाहिजे, याचा अर्थ आपण आत्महत्या करावी असा मुळीच नाही. आत्महत्या करणारे लोक भ्याड असतात. आत्महत्या करताना एखादा अयशस्वी झालेला माणूस तो प्रयत्न दुसर्‍यांदा करताना फारसे आढळत नाही. मग मृत्यूवर प्रेम करणे म्हणजे काय? आपण मरणार हे जन्म घेतल्यावर निश्चितच आहे. मग आपण चांगल्या उद्दिष्टासाठी मरूया. आपली सर्व कामे आपण आत्मसमर्पणाच्या भावनेने करू या….. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. माणसे तयार करणे हे कोणत्याही कार्याचे उद्दिष्ट हवे’(मठातील नोंदवहीत 19 जून 1899 रोजी काढलेल्या टिपणांचा सारांश)

आपण बंगाली लोक मोठे आळशी, निरूपयोगी, असभ्य, चैनी, मत्सरी, भ्याड व भांडखोर आहोत. ज्यांना आपल्यात सामील व्हायचे असेल त्यांनी खरं तर सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. जे असे करत नाहीत त्यांची पर्वा करू नका. ‘म्हातार्‍या मूर्खासारखा मूर्ख नाही’ अशी एक म्हण आहे. त्यांना थोडा आरडाओरडा करू द्या. त्यांचा धंदा नाहीसा होतोय. दुर्दैवी बिचारे!
(20 डिसेंबर 1896, फ्लॉरेन्स येथून स्वामी ब्रह्मानंद यांना पाठविलेल्या पत्रांमधून)

‘तुमचे आयुष्य तुमच्या कार्यासाठीच आहे. पण तरीही सर्वप्रथम स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. कारण तुमचे अस्तित्व तुमच्या कार्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. व्यावहारिक बाबतीत अजिबात अजागळपणा नको. – पैशाच्या व्यवहारात प्रत्यक्ष बापावरही विश्वास ठेवू नका. व्यवहार हा व्यवहार असतो. व्यवहार न समजल्याने अनेक चांगले उपक्रम नाहीसे होतात.’(शिष्यांना पाठविलेल्या पत्रातून)

‘जो धर्म, जो समाज स्त्रियांना समानतेचा हक्क देत नाही, तो धर्म तो समाज हा सैतानाचा बाजार आहे. पक्षी कधी एका पंखाने उडू शकत नाही. अमेरिका संपन्न आहे, सुसंस्कृत आहे, श्रीमंत आहे कारण येथील स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या सर्व क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंबा आहेत. मृत्यूपूर्वी अशा शंभर स्त्रिया जरी मी भारतात निर्माण करू शकलो तर मी सुखाने मरेन. पण हे फार कठीण काम आहे. कारण रजस्वलेने मंदिराता जाऊ नये असा भंपक उपदेश करीत येथील धर्म उभे आहेत. आणि मी तर तुम्हाला सांगतोय दक्षिणेश्वरचे मंदिर वेश्यांसाठीही खुले असले पाहिजे.’(शिष्यांना पाठविलेल्या पत्रामधून)

‘समाजाचे भले करू पाहणार्‍यांचे काम आज अधिाकाधिक कठीण होत जाणार आहे. कारण विज्ञानाच्या झंजावातापुढे सर्व स्वमतान्ध धर्माचे बुरूज धडाधड कोसळत आहेत. मात्र धर्म हे ज्यांच्या उपजीविकेचे साधन बनलंय ते लोक त्यामुळे वेगळी खेळी खेळताहेत. ते धर्माला व्यक्तीगत बाब न ठेवता त्याला सांघिक कयावतीचे स्वरूप देताहेत! धर्म त्यांनी दिवाणखान्यात आणि रस्त्यावर आणायला सुरवात केली आहे. आणि गोंधळलेली मानवजात धर्माच्या सांगाड्यालाच धर्म समजून त्याला कवटाळून बसायला लागली आहे…’(विज्ञान व धर्म यावरचे चिंतन, प्रवचन व पत्रे यामधून)

विवेकानंद समाजवादी आहेत. परिवर्तनाच्या व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ते अग्रदूत आहेत. मात्र त्यांची मांडणी वेगळी आहे. धर्माची मर्यादा आणि धर्माने केलेल्या चुका सांगताना 3 मार्च 1894 च्या पत्रात ते म्हणतात,

“सामाजिक गोष्टींच्या बाबतीत धर्माने ढवळाढवळ केली ही धर्माची मोठी चूक झाली. पण हाच धर्म पुन्हा ‘समाजसुधारणेशी धर्माचा काय संबंध?’ असेही म्हणतो. हा धर्माचा ढोंगीपणा आहे. अशाने धर्म स्वत:चे म्हणणे स्वत:च खोडून काढीत आहे. धर्माने समाजसुधारक होऊ नये असे आम्हालाही वाटते हे खरे, पण त्याचबरोबर आमचा असाही आग्रह आहे की, सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचाही धर्माला काही अधिकार नाही. प्रत्येक लहानसहान सामाजिक गोष्टीत ढवळाढवळ करण्याची पुरोहित वर्गाला काय आवश्यकता होती? त्यामुळेच तर आज अगणित माणसे कष्ट भोगत आहेत.- म्हणून धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी असून त्याने सामाजिक बाबतीत हात घालू नये हे त्याला सांगितले पाहिजे.”

ख्रिस्ती, मुसलमान, हिंदू असली वर्गवारी माणसांच्यामधील बंधूभाव आज नाहीसा करताहेत. या वर्गवारीतील सर्व शुभशक्ती आता नाहीशा झाल्या आहेत आणि त्यांचा जो प्रभाव पडतो आहे तो हानीकारक स्वरूपात. आणि त्यांच्या या भयानक प्रभावामुळे अगदी चांगली माणसेसुद्धा जादूने भारावून जाऊन एखाद्या सैतानाप्रमाणे वागू लागतात- अटोकाट प्रयत्न करून आपल्याला याविरूद्ध विजय मिळवायचाय.
(21 मार्च 1895 न्यूयॉर्क येथून श्रीमती बुल यांना पाठविलेल्या पत्रामधून)

मात्र एवढी परखड मते मांडणार्‍या विवेकानंदांची चळवळीची मांडणी वेगळी आहे. सप्टेंबर 1893 मध्ये झालेल्या सर्वधर्म परिषदेतील त्यांच्या एका भाषणामुळे स्वामी आणि धर्मगुरू म्हणून ते अचानक जगाच्या व्यासपीठावर आले. मात्र त्यानंतर केवळ दोन महिन्यानंतर 2 नोव्हेंबर 1893 मध्ये आपल्या शिष्यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, “बुद्धदेवांपासून राजाराममोहन रॉय यांच्यापर्यंतच्या सर्व धर्मसुधारकांचे आणि परिवर्तनवादी तरूणांचे प्रयत्न फसले. कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपणाला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल.” – या मांडणी मागचा विचार आपण समजावून घ्यावयास हवा. विज्ञान कितीही श्रेष्ठ असले तरी विज्ञान माणसाचे शाश्वत अस्तित्व नाकारते. जन्माला येण्यापूर्वी तू माती किंवा मातीमधून बनलेले एक रसायन होतास आणि मृत्यूनंतर तू माती बनून कायमचा नाहीसा होणार आहेस म्हणून सांगते. 99 टक्के माणसे हे स्वीकारू शकत नाहीत. याउलट सारे धर्म माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून उभे असतात. सारे धर्म त्याला ठामपणे सांगतात, जन्माला येण्यापूर्वीही तू होतास. नंतरही अनेककाळ असणार आहेस. धर्म ही माणसाची मानसिक गरज असते. तुम्ही त्याच्यावर आघात करताहात असा जरी नुसता संशय आला तरी माणसे बिथरतात. त्यामुळे धर्माचा आधार घेऊन धर्मावर आघात करीत विवेकानंद उभे आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे ‘वेदोक्त’ प्रकरण झाले 1899 च्या चातुर्मासात. पण त्याच्या दहा वर्षे आधी उद्या येऊ शकणार्‍या या बीभत्स वादळाचा अंदाज घेत हा दार्शनिक उभा आहे. 1889 मध्ये विवेकानंद 26 वर्षांचे आहेत. वरहानगर मठातील ‘विविदिशानंद’ नावाचा एक संन्याशी एवढीच त्यांची ओळख आहे. पण त्यावेळी पुज्यपादांना पत्र पाठवून ते सांगतात, “आपल्या वेदांनी शुद्रांना वेदाध्यायनाचा अधिकार नाही असे कुठेच म्हटलेले नाही. ती नंतर शंकरांनी(म्हणजे शंकराचार्यांनी) आणि व्यासांनी खेळलेली एक खेळी आहे.” त्यानंतर पाच वर्षांनी 1894 मध्ये स्वामी म्हणून त्यांचा जगभर जयजयकार सुरू आहे. मात्र मनात अजून तोच झंजावात आहे. मुदलियार यांना अमेरिकेतून पत्र पाठवून त्यांनी हेच सांगितलंय. 1896 मध्ये विवेकानंद लंडनला आहेत. त्यांच्याहून सहा वर्षांनी लहान असलेला त्यांचा भाऊ महेंद्रनाथ तेथे त्यांना भेटायला आलाय. विवेकानंदांनी परिव्राजक म्हणून 1890 मध्ये कलकत्ता सोडल्यावर तो त्यांना प्रथमच भेटतोय. त्या प्रसंगाचे वर्णन त्याने ‘लंडनेर स्वामी विवेकानंद’ या आपल्या पुस्तकात असे दिलंय “नरेंद्रचे सकाळचे प्रवचन संपले होते. भोजन झाले होते. आरामखुर्चीवर बसून तो डुलकी घेत होता. नंतर दुपारचे प्रवचन होते. श्रोत्यांना स्वामी चिंतनात किंवा समाधी अवस्थेत आहेत असे वाटत असणार! पण डुलकी संपली. नरेंद्रने डोळे उघडले. माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, “भाऊ, मला ओळखलेस का? मी सेंट पॉलप्रमाणे धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही.”

आपले तुकाराम नेमके हेच करतात. वेदात वर्णाश्रमधर्माचा घृणास्पद असा जयजयकार आहे. मात्र तुकाराम वेदावर आघात करीत नाहीत. लोकांनी आश्चर्यचकित व्हावे अशा शब्दात वेदाचे मोठेपण सांगत म्हणतात, “वेदा निंदी तो चांडाळ/दुष्ट सुतकिया खळ/ वेदाची जो निंदा करी/मातेची तो थाने फाडी” – आणि हे सारे सांगितल्यावर विवेकानंदांप्रमाणे समोरच्या ब्रम्हवृंदाना ऐकवतात, “वेदाचा तो अर्थ/आम्हासची ठावा/ येरांनी वहावा/भार माथा!” वर्णाश्रमधर्मांनी ब्राह्मणांना दिलेले मोठेपण एकदम नाकारता येणार नाही हे तुकाराम जाणतात. ज्ञानेश्वरांनी त्यांना ‘पृथ्वीतलीचे देव’ म्हटलंय आणि रामदास ‘झाला ब्राह्मण मुढमती। तरी तो जगद्वंदय’ याची समाजाला आठवण करून देताहेत. या सामाजिक परिस्थितीत ब्राह्मणांचे मोठेपण नाकारणे कोण स्वीकारणार? तुकाराम एक विलक्षण गोष्ट करतात. ते ब्राह्मणांचे मोठेपण नाकारत नाहीत स्वीकारतात. पण पुढे सांगतात, “महाराच्या स्पर्शे, कोपे तो ब्राह्मण नव्हे! ज्याचा स्पर्श चित्ती, तुका म्हणे तू त्या याती!” आणि पुढे जाऊन परमेश्वराला सांगतात, “गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण। यातीशी कारण नाही देवा।”- तुकाराम मूर्तीपूजा नाकारत नाहीत. पण पंढरपूरच्या विठोबासमोर उभे असताना पाठीमागे उभे असलेल्या वारकर्‍यांना आठवण करून देतात “पाषाण देव, पाषाण पायरी। पूजा एकावरी पाय ठेवी। सार तो भाव, सार तो भाव। अंतरीचा देव ओळखावा।”

त्यापूर्वी रामशास्त्री प्रभुणे यांनी पण हे केलंय. नेपाळ हे या जगातील शेवटचे हिंदू राष्ट्र. दहा वर्षांपूर्वीपर्यंत राजाला खून माफ होते आणि ब्राह्मणांनी खून केला तर त्यांना मामुली शिक्षा होती. धर्मग्रंथ तसे सांगत होते. पण हेच धर्मग्रंथ हातात घेऊन न्यायनिवाडा करायला बसलेले रामशास्त्री, याच धर्माचा आधार घेऊन सांगतात, “आरोपी राजा आहे, ब्राह्मणही आहे पण माझे धर्मशास्त्र सांगते या गुन्ह्याला फक्त मृत्यूदंड एवढी एकच शिक्षा आहे.”

खरेखुरे राष्ट्र निर्माण व्हावयाचे असेल तर अन्य देशातील विचारप्रवाहांशी आपण खुल्या व मोकळ्या मनाने कायम संबंध ठेवला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की, आपण आपल्याच लोकांवर अत्याचार करणे ताबडतोब थांबविले पाहिजे. जर एखादा भंगी एखाद्या माणसाजवळ जाऊन उभा राहिला तर तो माणूस, ज्याप्रमाणे आपण प्लेगसारख्या स्पर्शजन्य रोगापासून दूर पळतो तसे तो त्या भंग्यापासून दूर पळेल. दक्षिण भारतात खालच्या जातीचे लाखो लोक ख्रिश्चन का बनत आहेत? ज्या ठिकाणी ब्राह्मणच संपूर्ण जमीनीचे मालक असून जेथील सार्‍या स्त्रिया-एवढेच नव्हे राजवंशातील स्त्रिया देखील ब्राह्मणांची उपपत्नी होऊन राहण्यात मोठा सन्मान मानतात; जिथे पुरोहितांचा अत्याचार भारतात सर्वांपेक्षा जास्त आढळतो त्या त्यावणकारे प्रांतात एकचतुर्थांश लोक ख्रिस्ती बनले आहेत. आणि त्यांना का दोष देऊ?
(20 सप्टेंबर 1892 मुंबई येथून खेतरीनिवासी पंडित शंकरलाल यांना पाठविलेल्या पत्रातून)

आपली अडचण एवढीच आहे की, तुकाराम, रामशास्त्री, विवेकानंद यांच्या मांडणीचे फलित आणि अंनिसच्या रचनेचे फलित एकच असते. तुकारामांना जिवंतपणे वैकुंठयात्रेला पाठविले जाते. रामशास्त्र्यांना पायउतार होऊन खेड्यात जाऊन उरलेले आयुष्य अज्ञातवासात घालवावे लागते.- आणि विवेकानंदांना, थिऑसॉफीस्ट, अमेरिकेतील पंडिता रमाबाईंच्या कार्याचा भार वाहणार्‍या ‘रमाबाई सर्कल’च्या मिसेस मॅक्वीन, सनातनी मंडळी, ब्राह्मोसमाज, यांनी जो त्रास दिला तो लक्षात घेतल्यावर त्यांना 39 वर्षांपेक्षा अधिक आयुष्य मिळाले असते तर सनातनी मंडळींना त्यांना कोणत्या यातना दिल्या असत्या याची कल्पना आपण करू शकतो.

तुम्ही अंधश्रद्धेविरूद्धची लढाई कोणत्याही मार्गाने लढा, तुमचे प्राक्तन हेच आहे. ते असे का आहे हे पण विवेकानंदांनी सांगितलंय. त्यांनी लिहिलंय, “प्रत्येक धर्माची धार्मिक नव्हे तर आर्थिक मांडणी कशी आहे त्यावर तो धर्म तरतो किंवा संपतो”- हिंदू धर्माने आपल्याच देशात वसाहतीचे राज्य निर्माण करून 80% लोकांची, पिढ्यान्पिढ्या, शतकानुशतके घृणास्पद पिळवणूक करणारी रचना देऊन 20 टक्के लोकांना या देशात सोन्याचा धूर निघतो आणि दुधाच्या आणि मधाच्या नद्या वाहतात अशी जीवनपद्धती दिली. भविष्य, रत्ने, अनुष्ठाने यातून काही लोकांना काहीही श्रम न करता अपरंपार पिळवणूक करण्याची संधी दिली- ज्यावेळी या वा त्या कोणत्याही मार्गाने तुम्ही त्यांच्या हितसंबंधांना आता धोका झालाय, हे त्यांच्या लक्षात येते त्यावेळी तुम्हाला जिवंतपणी परलोकास पाठवायचे, रस्त्यावर चिरूडून मारायचे, की महात्मा फुलेंच्याप्रमाणे, प्रथम उपेक्षेने, नंतर उपहासाने संपवायचा प्रयत्न करायचा आणि मृत्यूनंतर त्यांना हवे तसे कापून आपल्या चौकटीत, आपल्या नेत्यांच्या बरोबर बसवायचे एवढेच ते ठरवत असतात!

कोणत्याही मार्गाने जा. पाच हजार वर्षांचा लेखाजोखा पुरा करण्याची ही लढाई यातनामय आणि प्रदीर्घ आहे. बरोबर असाव्यात फक्त सुरेश भटांच्या ओळी,

हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके
पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही
आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव
विजय जो कसला उरावर जखम जो करणार नाही….

–दत्तप्रसाद दाभोलकर