Categories
वाचक प्रतिसाद

‘फसवे विज्ञान’ लेख आवडला

एप्रिल - २०१४

मार्च 2014 च्या अंनिवाच्या अंकात लिहिलेला “फसवे विज्ञान : आधुनिक बुवाबाजी” हा लेख वाचला. या लेखात सरांनी होमिओपॅथी हे फसवे विज्ञान (Pseudo-Science) आहे. असा उल्लेख केला आहे. परंतु त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. याबद्दल अधिक माहिती घेताना डॉ.शंतनू अभ्यंकर लिखीत ‘माझा प्रवास होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी’ हे पुस्तक वाचावयास मिळाले. ते पुस्तक एका रात्रीत मी अधाशासारखे वाचून काढले. अन् मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

डॉ.अभ्यंकरांच्या या पुस्तकाचे बारकाईने व अभ्यासू नजरेने वाचन केल्यास कोणत्याही सामान्य माणसाला ज्याला वैद्यक क्षेत्राचे ज्ञान नाही त्यालाही होमिओपॅथी हे छदम् विज्ञान हे समजून येईल यात मला तरी शंका नाही. प्रस्तुत पुस्तकाचे वाचन केल्यानंतर, मी माझ्या काही डॉक्टर मित्रांना (होमिओपॅथीच्या) विश्वासात घेऊन छेडले असता बहुतांशी डॉक्टर मित्रांनी आपण होमिओपॅथीचे डॉक्टर असलो तरी प्रॅक्टीस मात्र 100% अ‍ॅलोपॅथीमध्ये करतो हे आवर्जुन सांगितले व होमिओपॅथी हे फसवे विज्ञान असलेचे प्रांजळपणे कबूल केले. हा त्यांचा मोठेपणाच म्हटला पाहिजे. काही मोजक्या डॉक्टर मित्रांनी मात्र होमिओपॅथीचे समर्थन केले. परंतु गंमत अशी की, समर्थनापित्यर्थ त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, परंतु वाद-विवादाअंती त्यापैकी काही डॉक्टर माझ्या कानात म्हणाले, “का उगाच आमच्या पोटावर पाय आणतोस?” या त्यांच्या कानगोष्टीतच सर्व काही दडलं आहे.

वाचकांना हे ज्ञात असेल की, काही वर्षांपासून होमिओपॅथीवाले, त्यांना अ‍ॅलोपॅथीमध्ये प्रॅक्टीस करावयास परवानगी मिळावी म्हणून एकजूट होऊन आंदोनल करीत होते. काही थोड्याच दिवसांपूर्वी शासनाने परिपत्रक काढून काही अटींवर होमिओपॅथी डॉक्टर्सना अ‍ॅलोपॅथीमध्ये 1 वर्षाचा कोर्स करून उपचार करावयास परवानगी दिली आहे.

डॉ.शंतनु अभ्यंकरांच्या लेखावर सडकून टीका करणार्‍यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर होमिओपॅथीमध्ये ‘दम’ असता तर त्यांनी एकजूट होऊन अ‍ॅलोपॅथीमध्ये प्रॅक्टीस करायला परवानगी मिळावी म्हणून का आंदोलन केले? याचा अर्थ असा होत नाही का, की होमिओपॅथी हे कालबाह्य छद्म विज्ञान आहे.

असे जरी असले तरी काही रूग्ण छातीठोकपणे सांगतात की, होमिओपॅथी उपचारांमुळे त्यांना 100% बरे वाटले. याचं स्पष्टीकरण डॉ.अभ्यंकरांनी त्यांच्या पुस्तकात दिले आहे. बर्‍याच रूग्णांना होमिओपॅथीचे डॉक्टर अ‍ॅलोपॅथीचे औषध देतात हेच माहीत नसते आणि त्यामुळे श्रेय आपसूक होमिओपॅथीला जाते. कित्येक आजार हे मानवात असणार्‍या नैसर्गिक रोग प्रतिकार शक्तीमुळे काही दिवसांनी आपोआप बरे होतात. असे रूग्ण जर होमिओपॅथीचे उपचार घेत असतील तर श्रेय होमिओपॅथीलाच मिळणार यात नवल ते काय? आपण उपचार घेत आहोत या कल्पनेनेच कित्येक रूग्णांना बरं वाटतं. याला वैज्ञानिक भाषेत प्लासिबो इफेक्ट असं म्हणतात पण बरं वाटणं म्हणजे आजारमुक्त होणे नव्हे.

मानवी जीवन हे अमुल्य आहे आणि हजारो, लाखो शास्त्रज्ञांच्या संशोधनात्मक अथक परिश्रमातून मानवी जीवनाला मिळालेले वरदान म्हणजे अ‍ॅलोपॅथी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याउलट डॉ.हनियान हे होमिओपॅथीचे एकमेव जनक. सुमारे 200 वर्षांपूर्वी हॉ.हानिमान यांच्या पायारहित कल्पनेतून या अवैज्ञानिक पॅथीचा जन्म झाला. या पॅथीवर संशोधन झाले नाही आणि पुढेही होणे शक्य नाही कारण डॉ.हनिमान यांनीच त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवले आहे की, “मी सांगितलेली तत्वे अंतिम, अचल, अपरिवर्तनीय आहेत.” होमिओपॅथीचे जनकच जर असे म्हणत असतील तर या पॅथीचे संशोधन होऊन नवीन काय साध्य होणार? त्यांची तत्वे तर अंतिम, अचल आणि अपरिवर्तनीय आहेत. थोडक्यात डॉ.हनिमान यांच्या मते त्यांचे शास्त्र हे परिपूर्ण असल्यामुळे त्यात नव्याने संशोधन करण्याची गरज नाही. म्हणजेच ही (अ)वैद्यकीय शाखा ग्रंथप्रामाण्यवादी, शब्दप्रामाण्यवादी आहे. अशा या शाखेला विज्ञान शाखा कसे म्हणता येईल? खर्‍या विज्ञान शाखेत सतत संशोधन होऊन दररोज नवनवीन शोधांची भर पडत असते. या संदर्भात डॉ.अभ्यंकर आपल्या पुस्तकात म्हणतात, “होमिओपॅथीमध्ये संशोधन होत असल्याचे डॉ.राजेंद्र श्रीमाळी म्हणतात. पण या संशोधनातून जे पुरावे पुढे आले आहेत. त्या बाबतीत मात्र मुग गिळून गप्प बसतात. होमिओपॅथीत काय दर्जाचे संशोधन चालतं; याची खालील दोन उदाहरणे बोलकी आहेत.

(1) आयजिंग शँग यांनी लॅन्सेट मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनात होमिओपॅथीचे दृश्य परिणाम हे प्लॅसिबो परिणामच असल्याचा नि:संदिग्ध निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा निष्कर्ष काढताना तब्बल 110 अभ्यासांच्या पाहण्यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.

(2) वाय ने जोन यांनी सन 1945 ते 1995 अशा अर्धशतकातील सर्व होमिओ संशोधन निबंधांचा कीस पाडला. तेहतीस निकषांच्या आधारे त्यांनी छाननी केली. निष्कर्ष काय, तर होमिओपॅथी संशोधन अजून बाल्यावस्थेत आहे.

या छोटेखानी लेखाचा समारोप डॉ.शंतनु अभ्यंकरांच्या “प्रवास : होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी या पुस्तकातील शेवटच्या परिच्छेदाने करतो. तो असा

“खरं तर होमिओपॅथीची निष्पक्ष चौकशी होईल, अशी समिती नेमायला हवी. आपल्या केसेस पुरव्यानिशी दाखविणारे होमिओ डॉक्टर अशा स्वतंत्र समितीपुढे आपापले पुरावे सादर करू शकतात. वैज्ञानिक मापदंड वापरून अशी समिती मग पुरावा आहे का आणि असल्यास तो किती सबल आहे, हे सांगू शकले.” रूग्णानी चिकित्सक वृत्तीने माहिती घ्यावी व कोणती औषधे घ्यायची याचा निर्णय ज्ञानाधारीत वृत्तीने घ्यावा.

–चंद्रकांत शिंदे, सांगली.