करगणी(ता.आटपाडी, जि.सांगली) येथील श्रीराम मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो.देवाला नवसाने मुले मागायची. मुले झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी ती मंदिरावरून खाली झोळीत टाकायची. जरी नवस केले नसले तरी मुलांना देवाचा आशिर्वाद मिळावा व ती निकोप असावीत, यासाठी पाच वर्षाच्या आतील प्रत्येक मुलं किमान एकदा तरी मंदिरावरून टाकले जात असे.या गावातील मुलाशिवाय बाहेरगावी लग्न होऊन गेलेल्या मुलींचीही मुले टाकली जात.त्यामुळे त्याही सासुरवासीनी मुली न चुकता यावेळी येत असतात.
ही प्रथा अनिष्ट असून यातून लहान मुलांना इजा होण्याचा धोका आहे.म्हणून तहसीलदार रामहरी भोसले यांनी अं.नि.स.कार्यकर्ते सुनिल भिंगे व पत्रकार गावात नेऊन ग्रामपंचायत सदस्य, मंदिराचे विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांची बैठक घेतली.त्यामध्ये ही प्रथा यावर्षीपासून बंद करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांना काही लोकांनी विरोध केला. त्यावर उपाय म्हणून लहान मूल पुजार्याच्या हातात देऊन,त्या मुलाचे मस्तक मंदिराच्या दगडी खांबाला टेकवून, मातेच्या ओट्यात देण्याचा सर्वसमावेशक तोडगा काढण्यात आला. त्याला सर्वच लोकांनी मान्यता दिली. याशिवाय जर कोणी मंदिरावरून लहान मुले टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये प्रथम मंदिराचे पुजारी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व संबंधीत मुलाचे आई-वडिल यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे गावातील लोकामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु काही अनुचित प्रकार होऊ नये,यासाठी प्रशासनाने अधिक पोलीस कुमक तैनात केली होती. सकाळी आठ वाजले पासून देवदर्शनासाठी लोक येत होते.परंतु मुख्य पारण्याचा कार्यक्रम दुपारनंतर झाला.यावेळी देवळाच्या बाहेर राम, लक्ष्मण, सीता यांचा फोटो लावण्यात आला. त्याठिकाणी लहान मुलाचे डोके टेकवून ते मातेच्या ओट्यात दिले जात होते. याला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे कोणता अनुचित प्रकार न होता दोन दिवस सुरू असलेला उत्सव शांततेत पार पडला.