डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहिदत्वाला ऑगस्ट 2019 ला सहा वर्षे पूर्ण झाली. आजही खटला चालूच आहे. खुन्यांना शिक्षा नाही, तपास यंत्रणा सूत्रधाराला पकडण्यात अपयशी ठरलेल्या आहेत. तपासात काहीच प्रगती होत नाही, याबद्दल न्यायालय तपास यंत्रणांना तीव्र शब्दांत जाब विचारत आहे. पण ‘तपास चालू आहे,’ हे सांगण्यापलिकडे तपास यंत्रणांकडून काहीच होताना दिसत नाही. सरकारी पातळीवर तर तपास पूर्ण होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, याबद्दलच गेल्या सरकारमध्ये उदासीनताच होती. ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ताधार्यांना दणका बसून आज नवीन तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आले असले तरी त्यांच्याही कार्यक्रम पत्रिकेत डॉ. दाभोलकर – पानसरे यांच्या खुनाचा तपास हा काही अग्रक्रमाचा विषय खचितच नसणार. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा विषय ‘अंनिस’ च्या कार्यकर्त्यांनी समविचारी संघटनांच्या सहभागाने रस्त्यावर निर्भयपणे ‘जवाब दो’सारख्या मोहिमेतून निदर्शने, धरणे, निर्भय मॉर्निंग वॉक; याबरोबरच व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे जनतेच्या समोर सातत्याने जागता ठेवला आहे. आणि यापुढेही हा विषय जागता ठेवण्यासाठी रस्त्यावरचा लढा अधिकच तीव्र करावा लागेल, हे निश्चित! हे वर्ष ‘अंनिस’ च्या त्रिदशकपूर्तीचे होते. त्यानिमित्ताने मुंबईत ‘मानवतेसाठी विवेकवाद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद व दोन दिवसांचे अधिवेशन मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आले. तसेच अमेरिकेतील ‘फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन’ या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘अविजित रॉय करेज अवॉर्ड’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाला. या वर्षातील या काही ठळक घटना.
या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांत धर्मनिरपेक्षता, आविष्कार स्वातंत्र्य, वैज्ञानिक जाणिवा व विवेकवादाविरोधात असलेले धर्मांधता, अतिरेकीपणा, अंधश्रद्धा, फसवे विज्ञान, जादूटोणा, मांत्रिक – तांत्रिकतेला व आक्रमक राष्ट्रवादाला प्रोत्साहन देणारे सरकार केंद्रात प्रचंड बहुमताने आलेले आहे. सत्तेवर आल्या-आल्या त्यांनी 370 कलम रद्द करणे, एनआरसी, तिहेरी तलाक सारखे आपल्या कार्यक्रमपत्रिकेवरील वादग्रस्त विषय धडाक्यात घेतल्याने देशभरातील वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात हवामान बदलाचे फटके प्रचंड पाऊस, वादळे यांच्या रूपाने बसत आहेत. कोल्हापूर-सांगलीला महापुराने दिलेल्या दणक्याने प्रचंड नुकसान शहरी, ग्रामीण भागातील लोकांना सोसावे लागले आहे. त्यानिमित्ताने पर्यावरणाच्या नासाडीचा प्रश्न गंभीरपणे पुढे आलेला आहे. दुसर्या बाजूला आर्थिक मंदीचे चटकेही जनतेला बसायला सुरुवात झाली आहे. बेरोजगारीने कळस गाठला असून प्रचंड फीवाढीविरोधात दिल्लीच्या ‘जेएनयू’ सारख्या विद्यापीठातून विद्यार्थी आंदोलनांनी जोर धरला आहे.
या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकात आम्ही नेहमीप्रमाणे वैचारिक लेख, कार्यकर्ता परिचय, समविचारी संघटनांचा परिचय, धार्मिक स्थळांची चिकित्सा या संदर्भात लेख प्रकाशित करीत आहोत. गेल्या काही वर्षांत कलावंताच्या आविष्कार स्वातंत्र्याचा प्रश्न जसा पुढे आला, तसेच कलावंतांच्या सामाजिक भानाबद्दलही प्रश्न उपस्थित केले गेले. या अनुषंगाने कलावंतांनी आपल्या कलाकृतीतून आपल्या कलेच्या सामर्थ्याचा वापर करीत शोषितांचा आवाज जगापर्यंत कसा पोहोचविला, यासंदर्भात छायाचित्रकार, कवी, नाटककार, गायिका यांच्या मुलाखतीतून जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. शबरीमला मंदिरात स्त्रियांना मंदिरप्रवेशाचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देऊनही प्रचंड हिंसक गदारोळ उसळला आणि त्यांना मंदिरात राजरोसपणे प्रवेश करता आला नाही. यावरून स्त्रियांचा मंदिरप्रवेश हा प्रश्न आपल्या समाजात किती स्फोटक आहे, हे समजून येते. यासंदर्भात आम्ही प्रत्यक्ष मंदिरस्थळी जाऊन शबरीमला तीर्थस्थळाची सर्वांगीण चिकित्सा करणारा लेख दिला आहे, तो निश्चितच वाचकांना केवळ नवीन माहितीच देईल, असे नव्हे तर आपल्यापुढील आव्हानाची जाणीवही देईल. त्याचप्रमाणे कोणतीही पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता चळवळीशी संबंध आल्यावर संघर्ष करीत आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करीत कशी वाटचाल करतो, हे या अंकात दिलेल्या कार्यकर्त्याच्या परिचयातून वाचकांना येईल. महात्मा गांधींची 150 वी जयंती, तर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी व आगरकरांच्या मृत्यूला 125 वर्षे पुरी होत आहेत. त्यानिमित्ताने या पूर्वसुरींना अभिवादन करण्यासाठी त्यांचे कार्यकर्तृत्व व विचारांतील काही पैलूंची ओळख ‘अंनिवा’ च्या वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. याबरोबरच इतर लेखांनाही वाचक प्रतिसाद देतील, याची खात्री वाटते.
या अंकासाठी मदत केलेल्या जाहिरातदार, देणगीदार यांचे आभार; तसेच यासाठी प्रचंड मेहनत घेणार्या कार्यकर्त्यांना सलाम!
या अंकाचे वाचक स्वागत करतील, अशी आशा आहे.
लढेंगे! जितेंगे!