Categories
व्यक्तिविशेष

‘मिशन परिवर्तन’ चे प्रणेते जिल्हाधिकारी श्याम वर्धने

फेब्रुवारी – २०१२

            चळवळीतील कसलेल्या कार्यकर्त्याप्रमाणे सांगलीचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी अघोरी व अनिष्ट प्रथा विरूद्ध सर्वेक्षण, प्रबोधन, प्रतिबंध या सर्व टप्प्यांवर अष्टपैलू कामगिरी नोंदवली आहे. सामाजिक परिवर्तनाची लढाई ही त्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रेरणा आहे. वर्धने साहेबांनी ‘साहेब’ म्हणून प्रशासनात कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवताना विविध सामाजिक प्रश्नांबद्दल घेतलेली भूमिका स्तुत्य, अनुकरणीय, पथदर्शक आहे. त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा या लेखाच्या माध्यमातून घेत आहे.

            सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने(आय.ए.एस.) यांनी समाजाभिमुख कार्य करत सामाजिक भान जपले आहे. एप्रिल 2010 मध्ये त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये अघोरी व अनिष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन करणारे ‘मिशन परिवर्तन’ हे अभियान प्रभावीपणे राबविले. जिल्ह्यातील सर्व विभागातील खाते प्रमुखांची बैठक आयोजित केली. विशेषत: महसूल आणि पोलीस खात्यातील सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत श्री.वर्धने यांनी जिल्ह्यातील अघोरी, अनिष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन कसे करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, हे अभियान आपण का यशस्वी करायचे यांची प्रभावी मांडणी त्यांनी केली. या बैठकीस जिल्ह्यातील अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.प.रा.आर्डे, संजय बनसोडे उपस्थित होते. त्यांनीही समितीची भूमिका मांडून या अभियानास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. हे अभियान राबविण्याचे काही टप्पे ठरविण्यात आले होते. प्रथम सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अघोरी, अनिष्ट प्रथांचे सर्वेक्षण करण्याचे ठरले. युद्धपातळीवर ही माहिती गोळा करून मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात यावी. तसेच तालुकास्तरावरही ग्रामसेवक, तलाठी, पोलीस कर्मचार्‍यांची या विषयावरची बैठक घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन तालुकास्तरीय अधिकार्‍यांनी केले.

            जिल्ह्यातील सर्व माहिती संकलित झाल्यावर ज्या -ज्या ठिकाणी अघोरी अनिष्ट प्रथा-परंपरा सुरू आहेत त्या-त्या ठिकाणी अधिकारी-कार्यकर्त्यांनी व्यापक प्रबोधन करण्याचे ठरले, ते केलेही. तिथल्या अनिष्ट व अघोरी प्रथा रोखण्यासाठी वैचारिक चर्चेचा, प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम झाला. अघोरी व अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी वर्धने यांनी आखलेली मिशन परितर्वन ही योजना यशस्वी झाली.

            सांगली जिल्ह्यातील कवलापूर(ता.मिरज) येथे मंदिरावरून लहान मुले टाकण्याची अघोरी प्रथा सुरू होती. त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रबोधन केले. ज्यांनी मंदिरावरून मुले टाकली त्या पालकांवर व संबंधित पुजार्‍यावर बालहक्कांचे उल्लंघन केले म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात आली. मागील वर्षी ही प्रथा पूर्णपणे बंद झाली. याचे सर्व श्रेय श्याम वर्धने यांना जाते.

            जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील भाटवडे या ठिकाणी खोल विहिरीत पाळण्यातून मुले सोडण्याची अनिष्ट, अघोरी प्रथा होती. गावकर्‍यांची जाहीर सभा घेतली. सुसंवाद झाला. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. तुम्ही कालबाह्य प्रथा जपत असून ही प्रथा बंद केली पाहिजे असे आवाहन केल्यावर संवाद-प्रबोधन कायद्याचा धाक दाखवत ही प्रथा रोखली. मागच्या जत्रेच्या वेळी खोल विहिरीत मुले सोडण्याचे बंद करण्यात यश मिळाले. तसेच आटपाडी तालुक्यातील करगणी, घाणंद या ठिकाणच्याही देवळावरून मुले टाकण्याची अघोरी प्रथा वर्धने साहेबांच्या प्रयत्नाने आणि स्थानिक अधिकार्‍यांच्या सहकार्याने बंद झाली.

            जिल्ह्यातील काही ठिकाणी जत्रांमध्ये निखार्‍यावरून चालण्याच्या अनिष्ट प्रथेविरूद्ध प्रशासन व अं.नि.स.कार्यकर्ते प्रबोधन करीत आहेत. भिंगेवाडी(ता.आटपाडी) येथील अघोरी उपचार करणार्‍या भोंदू वैद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वर्धने यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. भोंदूगिरी करणारा गावचा माजी सरपंच होता, त्याचे राजकीय वजनही होते.

            मागील वर्षीच्या सांगली जिल्हास्तरीय माध्यमिक शिक्षकांच्या शिबीरात श्याम वर्धने यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करून शिक्षकच विद्यार्थ्यांच्यात सामाजिक व वैज्ञानिक जाणीवा प्रभावीपणे रूजवू शकतात, शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रीय हेण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. अं.नि.स. प्रबोधन चळवळीत गरज पडेल तेथे मदत करणारे अधिकारी म्हणून त्यांचा आदराने उल्लेख करावा लागेल. सांगली जिल्ह्यातील अं.नि.स.च्या कार्याला वर्धने यांचे नेहमीच सहकार्य आणि प्रोत्साहन मिळते आहे.

            पुणे जिल्हा परिषदेमध्ये सी.ई.ओ. म्हणून काम करतानाही सामाजिक बांधिलकी ठेवत व्यापक समाजभान वर्धने यांनी जपले होते. ऑनलाईन बदल्यांची संकल्पना प्रथम त्यांनी सुरू करून पारदर्शक कारभाराचे दर्शन घडविले. त्यामुळे अनेकांच्या हितसंबंधांना धक्का बसला. कर्मचार्‍यांना विचारून, चर्चा करून बदल्या केल्या व कर्मचार्‍यांच्यात सुसंवाद केला.

            पुणे असेल किंवा सांगली दोन्ही ठिकाणी काम करताना वर्धने यांनी पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले. मिशन परिवर्तन राबवून शिक्षकांच्यातील नकारार्थी भावना दूर करून त्यांच्यातील स्फुलिंग जागे करून त्यांच्यातील सुप्त गुणांना संधी देण्याचे काम वर्धने यांनी केले. त्यांनी विचारवंतांचे मार्गदर्शन शिक्षकांना उपलब्ध करून दिले. चर्चासत्राच्या माध्यमातून त्यांना बोलते केले व त्यांच्या हातून अधिक दर्जेदार काम करवून घेतले आहे. प्रचंड निर्धारीत कामे असताना वेगळ्या वाटेने जाऊन सामाजिक कामाला त्यांनी महत्व दिले आहे.

            सांगली, पुणे येथील जि.प.शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही तितकेच मोलाचे आहे. शिक्षकांच्यातील ‘स्वत्व’ जागे केल्यास, शिक्षकांचा योग्य सन्मान केल्यास जि.प.शाळाही बदलू शकतात, त्यांची गुणवत्ताही वाढविता येते. कामात चूक करणार्‍यांना दुसर्‍यांदा त्यांना संधी दिली पाहिजे. निलंबन हा काय योग्य मार्ग नव्हे. कर्मचार्‍यांच्यातील/शिक्षकांच्यातील क्षमतांचा विकास करून त्यांना सामाजिक, शैक्षणिक कार्यात सक्रीय करण्याचे आवाहन वर्धने नेहमी करत असतात.

            भूत, करणी, भानामती, चेटूक या भ्रामक संकल्पना समाजजीवनातून हद्दपार करण्याचे आवाहन ते नेहमी करतात. शालेय जीवनात त्यांनी आपल्या मित्रांबरोबर रात्री 12 वाजता स्मशानात थांबण्याची पैज लावली ती त्यांनी जिंकलीही. मात्र उशीरा घरी आल्याने आईचा मारही खावा लागला. बालपणीच भूतासारख्या भ्रामक संकल्पनांना आम्ही विरोध करत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. माझ्या आई वडीलांच्या विवेकी मूल्य विचारातून आम्ही घडलो असे ते सांगतात. त्यांच्या मातोश्रीना आदर्श ग्रामसेविका पुरस्कार यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते दिला गेला होता. तर वडीलही एक आदर्श तलाठी म्हणून त्यांची ख्याती होती. दुसर्‍याचे ऐकून घेऊन त्या व्यक्तीला जेवढी मदत करता येईल ते करण्याचा संस्कार आई-वडिलांकडून त्यांना मिळाला.

            वर्धने हे आस्तिक आहेत. मात्र आपण कोणत्याही स्वरूपाच्या अंधश्रद्धेला थारा देत नसल्याचे अभिमानाने सांगतात. माणसातले माणूसपण जपण्याला लोकांनी प्राधान्य द्यावे. नीतीने, सदाचाराने जगण्याचे आवाहन ते सातत करतात. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना पारदर्शकता, संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा जपत सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करण्याला वर्धनेसाहेब प्राधान्य देतात.

            उच्चशिक्षित लोकही अंधश्रद्धेला कसे बळी पडतात किंवा अंधश्रद्धेचे वाहक बनतात यांचा त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांच्या एका बॅचमेंटच्या अंगात देवी संचारत होती. अंगात येत होते. त्यावर वर्धने साहेबांनी तू असे करू नकोस देवाला एवढेच काम आहे का तुझ्या अंगात यायला? ही सगळी तुझी नाटके बंद कर आणि कामाला प्राधान्य दे, त्यावर त्या व्यक्तीने वर्धने साहेबांच्यावर देव कोपणार, त्यांचे वाटोळे होणार असा शाप दिला. परंतु वर्धने म्हणतात की, त्यांने किंवा कोणी शाप दिला म्हणून माझे काही वाईट झाले नाही. मी अत्यंत आनंदात व सुखी आहे. मात्र त्या बॅचमेंटने सरकारी नोकरी सोडली. त्याचे अंगात येणे सुरूच आहे. त्याने एक मठ स्थापून आपले बस्तान बसविले आहे.

            काम, व्याप सांभाळत सामाजिक चळवळीला विशेषत: अंनिसला मदत करण्याचे, प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्यासाठी श्याम वर्धने हे उत्सुक असतात. म्हणूनच ते अं.नि.स.चे मित्र बनले आहेत. वर्धनेसाहेबांच्यासारख्या सकारात्मक आणि विवेकी विचार करणार्‍या अधिकार्‍यामुळे अं.नि.स.चे काम विस्तारत आहे.

– संजय बनसोडे