ज्योतिषांची ऐशी की तैशी
मार्च 2011 मध्ये झालेल्या एक दिवशीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावून संपूर्ण देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी केली. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्योतिषांनी जे ‘तारे’ तोडले त्यामुळे ज्योतिषांचा फोलपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या एका परिसंवादात बहुसंख्य ज्योतिषांनी असे भविष्य वर्तविले होते की, या स्पर्धेचा अंतिम सामना भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल आणि यात ऑस्ट्रेलिया बाजी मारेल. काय घडले ते सर्वांना ज्ञातच आहे. रमल पद्धतीचा अभ्यास करणार्या एका ज्योतिषाने मात्र ग्रहस्थिती भारताला अनुकूल असून, भारतच विजेतेपद मिळवेल असे सांगितले. परंतु ऑस्ट्रेलिया व द.आफ्रिका हे संघ उपांत्यफेरी गाठतील हे त्याचे भविष्य चुकीचे ठरले. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या उपउपांत्य सामन्याच्या दिवशी एका प्रथितयश ज्योतिषाने ग्रहस्थिती भारताला प्रतिकूल असून ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल असे प्रतिपादन केले. हे चुकीचे भाकित वर्तवल्यामुळे या ज्योतिषाचा निषेध करावा असे आवाहन काही लोकांनी वर्तमानपत्रातून केले. ग्रहस्थिती एकच असताना ती भारताला अनुकूल असल्याचे एक ज्योतिषी म्हणतो तर दुसरा ती प्रतिकूल असल्याचे सांगतो. यावरून ज्योतिषांमधील अंतर्विरोध लक्षात येतो. भारत, पाकिस्तान संघाच्या सामन्याच्या अगोदर एका ज्येष्ठ ज्योतिषाने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकणे अशक्य आहे असे वर्तमानपत्रातून जाहीर केले. प्रत्यक्षात प्रथम फलंदाजी करून भारताने हा सामना जिंकला हा आता इतिहास आहे. कायम शक्याशक्यतेच्या भाषेत भविष्य वर्तविणारे ज्योतिषी जेव्हा कधी ठाम प्रतिपादन करतात तेंव्हा ते बहुतांश वेळा चुकीचेच ठरतात. आणि म्हणूनच ते कोणत्याही वैज्ञानिक कसोटीस सहसा तयार होत नाहीत. ज्योतिषांवर बंदी घालण्याची ‘जन-हित’ याचिका जरी न्यायालयाने फेटाळली असली तरी ज्योतिषांपासून लांब राहण्यातच खरे ‘जन-हित’ आहे हे लोकांनी लक्षात घ्यावे.
–श्रीपाल ललवाणी, पुणे.
सावित्रीच्या लेकींचे अभिनंदन
महालक्ष्मी मंदिरात महिलांना देवीच्या गाभार्यात जाण्याची असलेली प्रवेशबंदी झुगारून देऊन भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.नीता केळकर यांनी त्यांच्या सहकारी महिलांसह गाभार्यात जबरदस्तीने प्रवेश करून स्त्रियांवर अन्याय करणारी परंपरा नष्ट केली. ही क्रांतिकारक घटना आहे. स्त्रियांची गुलामगिरी मनूने निर्माण केली आहे. तो म्हणतो, “स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या धाकात, तरूणपणी नवर्याच्या धाकात, तर म्हातारपणी मुलाच्या धाकात राहावे; कारण स्त्रिया स्वातंत्र्य देण्याच्या लायकीच्या नसतात. त्यांची साक्षसुद्धा ग्राह्य मानू नये.” त्यामुळे आपल्या बर्याच रूढी-परंपरा स्त्रियांवर अन्याय करणार्या आहेत. याविरूद्ध गौतम बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बंड करून स्त्रीची अस्मिता जागी केली. आधुनिक विज्ञानानेसुद्धा स्त्री पुरूषापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही, हे सिद्ध केले आहे. डॉ.आंबेडकरांनी घटनेमध्ये स्त्री-पुरूष समतेचे तत्व घालून स्त्रियांची गुलामगिरी नष्ट केली आहे. म्हणूनच हे आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करून त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे, हे समयोचित आहे.
-के.डी.खुर्द, कोल्हापूर
अमेयचे अभिनंदन!
आपल्या वार्तापत्राच्या मे 2011 या अंकात डॉ.तृप्ती शहा यांनी शब्दांकित केलेला त्यांचा अनुभव वाचनात आला. त्याचा हा आगळावेगळा, स्तुत्य उपक्रम व आपल्या मुलाने लहानपणापासून विज्ञाननिष्ठ व्हावे याबद्दलची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. अशा स्पर्धांमधून मनोरंजनासोबतच विज्ञानवादी दृष्टिकोन पोहोचवण्यासाठी मदत होऊ शकते.
पारितोषिकासाठी सहभागी न होता प्रबोधन करणे हा उद्देश मनाशी ठेऊन त्यांनी केलेल्या या प्रयत्नांचे खरंच कौतुक आहे. आपल्या विज्ञानवादी आईच्या प्रयत्नांना समर्थपणे साथ देणार्या आणि लहानपणापासून प्रत्येक गोष्टीमागचे विज्ञान जाणून घेण्याची वृत्ती असणार्या अमेयचे मन:पूर्वक कौतुक!
–कु.कल्याणी मांगले, कराड, जि.सातारा