राजर्षी शाहू आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राच्या वतीने सांगली येथील कष्टकर्यांची दौलत येथे पहिला सत्यशोधक विवाह पार पडला. यावेळी पुरोगामी चळवळीतील अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, महाविद्यालयीन तरूण आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाती, रूढी, परंपरा यांना तिलांजली देऊन पुरोगामी महाराष्ट्र ही संकल्पना सत्यात उतरविताना राजर्षी शाहू आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राच्या वतीने एक पाऊल पुढे पडले आहे. दत्त कॉलनी, मालगाव रोड, मिरज येथील स्वप्नील किशोर लोहार व तुळशीनगर, जामसांडे, ता.देवगड येथील प्रतिक्षा प्रकाश कांबळे हे सत्यशोधक पद्धतीने झालेल्या विवाहबंधनात अडकले. ना कार्यालय, ना बँडबाजा, ना लग्नातल्या पंगती, ना आहेर आणि पाहुण्यांचा मानपान….
गुरूवार ता.13 जून रोजी दुपारी 4 वाजता पंचमुखी मारूती रोड येतील कष्टकर्यांची दौलत येथे या विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. कोणताही दिखावा नाही, बँजो, डॉल्बी नाही, पै-पाहुणे, आहेर-माहेर, रितीरिवाज, जुन्या चाली, रूढी, परंपरा या सर्व गोष्टींना फाटा देत व विवाहामध्ये असणार्या सर्व खर्चिक बाबी टाळत दोघांच्या सहमतीने हा विवाह पार पडला. प्रतिक्षा व स्वप्नील हे दोघेही सज्ञान व सुशिक्षित असून दोघेही नोकरी करतात. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी अॅड.अमित शिंदे यांच्या कानावर घातला. अॅड.शिंदे यांनी सर्व गोष्टींची खातरजमा करून विवाहाची तयारी केली.
दुपारी 4 वाजता हा विवाह पार पडला. यावेळी सप्तपदी घेताना पारंपारिक रूढीला फाटा देत सप्तपदीमध्ये दोघेही समांतर सात पावले चालले. प्रत्येक पावलावर त्यांना एक प्रतिज्ञा दिली. व नंतर वधू-वरांना शपथ देऊन विवाह पार पडला.
यावेळी बापूसाहेब मगदूम, प्रा.विजयकुमार जोखे, संजय बनसोडे, नामदेव करगणे, विकास मगदूम, सुशीला कुंदे, आर्कि.रवींद्र चव्हाण, सुनीता मोरे आदींसह महाविद्यालयीन तरूण, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पौरोहित्य अॅड.के.डी.शिंदे यांनी केले. संयोजन अॅड.अमित शिंदे, राहुल थोरात यांनी केले.