नोव्हेंबर-डिसेंबर 2011 चा विशेषांक प्रसिद्ध करताना आम्हाला आनंद होत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे एका सामाजिक चळवळीचे मुखपत्र आहे. समाजपरिवर्तनासाठी जी कृतीशीलता आवश्यक असते तिच्यामागे विचारांची पेरणी आवश्यक असते. विचाराशिवाय कृती ही धोकेदायक ठरू शकते व कृतीशिवाय पोकळ बडबडही व्यर्थ असते. आमच्या वार्तापत्रातून, समाजाने ज्या दिशेने कृतीशील वाटचाल करणे अपेक्षित आहे तिच्यासाठीची वैचारिक बैठक मांडण्याचा प्रयत्न होतो.
या विशेषांकात आम्ही जाती-अंताची लढाई या एका जटील प्रश्नाला हात घालणारा परिसंवाद प्रसिद्ध करीत आहोत. या परिसंवादात विविध मान्यवरांनी व विचारवंतांनी योगदान दिले आहे. त्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. एकूण सामाजिक विकासासाठी जातवार संघटन असावे, कारण ते विधायक उपक्रमासाठी उपयोगी ठरते, येथपासून जातवार संघटनांचे रूप अखेरीस जातीय विखार वाढविणारे होते. इथपर्यंत विविध मतमतांतरे या परिसंवादात आपणास वाचावयास मिळतील. जातीय द्वेष व जातीय दंगली हा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. संघटना जाती-जातीत संघर्ष वाढीला कारण ठरणे. एकूण समाजाला हितावह नाही. पण अलिकडे हा नवा विद्वेषी प्रवाह वाढताना दिसतो. याबाबत आपण गंभीरपणे अंतर्मुख व्हावे यासाठी हा परिसंवाद आपणाला मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते. जातीय विद्वेष या विषयावर या अंकाचे मुखपृष्ठ कलात्मक पद्धतीने चित्रित करण्याचे काम गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी उत्तमपणे पार पाडले आहे. त्यांचे मन:पूर्वक आभार!
धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील काळाबाजार या विषयावर, वार्तापत्र वाचकांना चिकित्सक बनण्यासाठी पेरीत करते. विविध धार्मिक स्थळी, नैतिक जाणिवा देण्याच्या नावाखाली अंधश्रद्धांचे पीक वाढविले जाते ह्याची खंत वाटते. लातूरचे पत्रकार रामकुमार रायवाडीकर यांनी दिंडोरी(नाशिक) येथील व राहुल थोरात यांनी झारखंड येथील सम्मेद शिखरजी या धार्मिक ठिकाणांना भेटी देऊन तेथील धर्मविकृती उजेडात आणल्या. हे दोन लेख वाचकांचे प्रबोधन करणारे आहेत.
या विशेषांकाचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा परिचय व अंनिसला पूरक ठरणार्या इतर क्षेत्रातील कृतीशील विचारवंतांचा परिचय. कुमार मंडपे व प्रमोदिनी मंडपे यांनी अंनिसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात व एकूण समाजात विज्ञाननिष्ठा वाढविण्यासाठी जे कार्य केले त्याचा वृत्तांत व अरविंद गुप्ता यांचे वैज्ञानिक खेळण्याद्वारे शिक्षण आनंददायी करणार्या प्रयोगांचा परिचय आपणास प्रेरक ठरेल.
बालकुमारांसाठी खास विभाग हेही या अंकाचे वैशिष्ट्य आहे. आशुतोष मुळ्ये यांनी हा विभाग कष्टपूर्वक संपादीत केला आहे. या शिवाय कथा, कविता, व्यंगचित्रे यांच्या समावेशाने हा विशेषांक सजलेला आहे.
हा अंक सर्वांगसुंदर बनविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक जाहिराती मिळविल्या व अंकाच्या प्रसिद्धीसाठीचा आर्थिक भार यशस्वीरित्या सांभाळला. जाहिरातदार व कार्यकर्ते यांच्या सहकार्याविना विशेषांक प्रसिद्ध करणे अवघड झाले असते. आम्ही आपल्या या योगदानासाठी कृतज्ञ आहोत. अंकातील विषय निवड व लेखन प्राप्ती यासाठी संपादक मंडळाने अविरत कष्ट घेतले व अंक छपाईसाठी आमचे कार्यालयीन सेवक व कुमार प्रिंटींग प्रेसचे अण्णासाहेब कोरे आणि प्रेस कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य दिले. वार्तापत्र व्यवस्थापन यासाठी त्यांचे आभारी आहे.
मनोरंजन व प्रबोधन करणार्या ह्या विशेषांकाचे स्वागत वाचक करतीलच याबद्दल आम्हास शंका नाही.
–प्रा. प. रा. आर्डे