Categories
अघोरी प्रथा

‘तीन’ वर्षाच्या चिमुकल्या मुलीचे ‘चाळीस’ वर्षाच्या खुन्याशी लग्न लावणारी जात पंचायत

फेब्रुवारी – २०१४

साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी घडलेली घटना. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ताया लोखंडे यास गुप्तधनाची लालसा झाली. घरातच असलेले गुप्तधन काढण्यासाठी नरबळी द्यावा लागेल असा सल्ला एका मांत्रिकाने त्यास दिला. धनाच्या लोभामुळे त्याने स्वत:च्या छोट्या मुलाचा बळी दिला. घटना उघडकीस आल्यावर त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. तो तुरूंगात गेला. त्याची पत्नी मात्र सासरीच रहात होती. गावातील तिच्या वैदू समाजातील एका व्यक्तीने तिला लग्नाची मागणी घातली. त्याने जातपंचायतीबरोबर आर्थिक व्यवहार केला. जातपंचायतीचे स्वयंघोषित न्यायाधीश चंदरबापू दासरजोगी यांनी त्यांचे लग्न लावून दिले. पंचाच्या दहशतीमुळे निर्णय स्वीकारण्याखेरीज काहीच पर्याय नसतो. पाच वर्षांनी ताया तुरूंगातून बाहेर आला. त्याने जातपंचायतीकडे पत्नीचीमागणी केली. परंतु पंचांनी ती फेटाळली. ताया मात्र हट्टाला पेटला. भटक्यांची पंढरी समजल्या जाणार्‍या मढी(पाथर्डी) येथील मुख्य यात्रेतील जातपंचायतमध्ये हा विषय पुढे आला. पंच दासरजोगी यांनी अजब निर्णय दिला. तायाच्या पत्नीच्या घरच्या दुसर्‍या कोणत्याही मुलीचे लग्न तायाशी लावण्यात यावे. सर्वांना जबरदस्त धक्का बसला कारण तायाच्या पत्नीच्या माहेरी तिच्या भावाची मुलगी सुनीता अवघ्या तीन वर्षांची होती. आणि तायाचे वय होते चाळीस वर्षे! प्रचंड विरोध होऊनही जातपंचायत निर्णयावर ठाम राहिली. सर्वांच्या समक्ष झालेला निर्णय स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. पंचांनी सुनीताचे लग्न तायाशी लावून दिले. समाजाच्या रिवाजाप्रमाणे बारा वर्षांपर्यंत मुलगी माहेरी राहते. त्यानंतर सासरी जाते. त्याप्रमाणे सुनीता बारा वर्षांची झाल्यावर तायाने परत जातपंचायतीची मदत घेतली. परंतु सुनीताच्या परिवाराने नकार दिला. वादविवाद झाल्यावर खटला पुढच्या वर्षाच्या यात्रेपर्यंत पुढे ढकलण्यात आला. मात्र लग्नासाठी एक वर्षाची सुट मिळणार असल्यामुळे सुनीताच्या परिवारास दंड भरावा लागला. हा परिवार गरीब असल्यामुळे दंड भरणे अवघड झाले. त्यासाठी सुनीताच्या आईवडीलांनी मुंबईत जाऊन डोक्यावर टोपली ठेवत वस्तू विकण्यास सुरवात केली. सुनीता मात्र श्रीरामपूरला आजी-आजोबांसोबत रहात आहे. तायाने स्वत:च्या मुलाचा खून केल्याची वृत्तपत्रांची कात्रणे तिच्याकडे आहेत. त्यामुळे ती तायाचा द्वेष करते. सातवीनंतर तिचं शिक्षणही थांबलं गेलं. खुन्याशी लग्न करायचं नाही एवढी खूणगाठ मात्र तिने मनाशी बांधली आहे. तिच्या त्या बालविवाहाची फारकत व्हावी अशी तिची मागणी आहे. तर संसार न केलेल्या बायकोस फारकत देणार नाही तर लग्न पक्के करण्याचा विधी, सुनिताचा ताबा मिळावा अशी तायाची मागणी आहे. दरवर्षीच्या मढीच्या यात्रेत हा खटला चालतो आहे. यंदाचं हे सहावं वर्ष आहे. दरम्यान आजपर्यंत सुनीताच्या परिवाराने जातपंचायतीला दोन लाखाहून अधिक दंड दिला आहे. आज सुनिताचे लग्नाचे वय त्यांच्या लेखी टळून गेले आहे. ताया हेका सोडण्यास तयार नाही. जातपंचायतीमध्ये पेच निर्माण झाला. स्वयंघोषित न्यायाधीश दासरजोगी यांनी अंतिम निर्णय सुनावला. त्या निर्णयामुळे संपूर्ण परिवार कोलमडून पडला. सुनीताने एका रात्रीसाठी तायाबरोबर राहावं असा भयंकर निर्णय झाला. आज सुनीता सतरा वर्षांची आहे तर खुनी ताया चोपन्न वर्षांचा! उठसूठ पुरोगामीत्व आणि सामाजिक न्यायाचा टेंभा मिरविणार्‍या राज्याला ही सणसणीत चपराक आहे. हाडे मोडून पडलेली वृद्ध आजी-आजोबा मात्र खंबीरपणे उभे आहेत. सुनीताला आयुष्यभर मुलगा समजून सांभाळू पण असं काही करणार नाही असं त्यांचं ठाम मत आहे.

दोन अल्पवयीन लग्नं लावून दिल्याबद्दल पंच दासरजोगी यास अटक झाली होती. त्यानंतर आम्हाला वरील घटना समजली. अंनिसचे डॉ.टी.आर.गोराणे, अ‍ॅड.रंजना गवांदे, विलास बढे व मी श्रीरामपूर गाठले. त्या परिवाराशी चर्चा करून सुनीतास न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा होती. सुनीताच्या आजूबाजूचे भागातील लोकांनी मात्र असं काही झालंच नाही, उलट जातपंचायत चांगल्या असतात असं अर्धा तासभर आम्हालाच समजावले. पोलीस आमच्यासोबत येण्यास तयार नसल्यामुळे रात्रीच्या वेळी त्या वैदू वस्तीत आम्हा कार्यकर्त्यांना मारहाणीची शक्यता होती. तरीही प्रबोधन व कायद्याचा धाक अशा दुहेरी भूमिकेतून आम्ही त्यांना विश्वासात घेतलं. जातपंचायतीविरूद्ध बोलल्यास जातीबाहेर टाकले जाते. ह्या भीतीमुळे ते मन मोकळं करू शकत नव्हते. परंतु शेवटी सुनीताने एकदमच आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल भडभडा बोलायला सुरवात केली. ‘मी मरेन पण रात्रभर तायाबरोबर रहाणार नाही.’ असं बोलून अश्रूला मोकळी वाट करून दिली. जबरदस्त हिंमतवान असलेल्या ह्या मुलीकडे एक प्रकारचे ग्रामीण शहाणपण आहे. आज पोलिसांत तक्रार केली तर पंचांना अटक होईल परंतु पंचाच्या दहशतीमुळे तिच्याशी लग्न कोण करणार? असा तिचा रोकडा सवाल आहे. तिने प्रसारमाध्यमांच्या मदतीने जातपंचांना ठासून सुनावले की, मी तुम्हास सुधारण्याची संधी देते. तुम्ही मला योग्य निर्णय द्या. नाहीतर मी पोलीसांत जाईन.

आम्ही पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. अप्पर पोलीस अधिक्षक ही स्त्री असून त्यांना दुसर्‍या स्त्रीचं दु:ख समजून घेण्यास लवकर वेळ मिळाला नाही. आम्ही महिला व बाल हक्क संघटना समिती, जिल्हा अधिक्षक यांना निवेदन दिल्यामुळे कुठे स्थानिक पोलीसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर तिसर्‍या दिवशी महाराष्ट्रातील वैदू समाजातील मुख्य पंचांची बैठक बसली. मुख्य पंच दासरजोगी वगळता इतर पंच उपस्थित होते. सुनीताला योग्य न्याय द्यावा, बालविवाह व इतर अनिष्ट प्रथा बंद कराव्या असे एकमताने निर्णय घेतले. दुसर्‍या दिवशी नांदेडमधील माळेगाव येथील भटक्या समाजातील यात्रा सुरू झाली. पाच लाखांच्यावर होणार्‍या ह्या यात्रेस इतर राज्यातील लोक येतात. महाराष्ट्र अंनिसच्या अंबेजोगाई, गंगाखेड व लातूर शाखेने प्रथमच यात्रेत प्रबोधनाचा स्टॉल लावला. श्रीरामपूरची घटना व जातपंचायताशी झालेल्या सुसंवादातून शंभर वर्षांची परंपरा असलेली भटके समाजातील सर्वांत मोठी जातपंचायत बरखास्त करण्यात आली. तसं त्यांनी जाहीरपणे घोषीत केले. सात महिन्यांपूर्वी नाशिकहून सुरू झालेल्या जातपंचायत मूठमाती अभियानामुळे नाशिकमधील भटके जोशी समाजातील सर्वोच्च जातपंचायत तेव्हाच बरखास्त झाली होती. अनेक ठिकाणी नवीन तरूणांचे नवीन सामाजिक संघटन स्थापन करण्यात येत आहे हे अभिनंदनीय व आश्वासक आहे. मृत्यूनंतर प्रेतश्रृंगार न करता सुतकाचा कालावधी कमी करणे, साखरपुड्यातील चहा-जेवण बंद करणे, लग्नातील खर्च, अनिष्ट प्रथांना विरोध करणे इ. हे निश्चितच अनुकरणीय आहे.

महाराष्ट्र अंनिसने जातपंचायतीच्या मनमानी विरोधात लढा चालू ठेवल्यामुळे अनेक जात बहिष्कृत परिवारांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. ते अंनिसच्या मदतीने मोठ्या हिंमतीने पुढे येत आहेत. दिवसाआड एक प्रकरण उजेडात येत आहे. एकट्या रायगड जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत अठरा प्रकरणांची पोलिसांत नोंद झाली आहे. त्यामध्ये महाड येथील बबन गायकवाड हे कारगील युद्धातील जवान असून त्यांची मुलगी अश्विनीने राष्ट्रीय पातळीवर चोवीस क्रीडाक्षेत्रातील सुवर्णपदके मिळविली आहे. अशा परिवाराने बौद्धविवाहाच्या खर्चाचा अहवाल मागितला बौद्ध जात पंचायतीने पंचवीस वर्षांपासून त्यांना वाळीत टाकले आहे. त्यांच्यावर पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी अठरा पंचाविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. सुधागड येथील गजानन भोईर व इतर चार कुटुंबांना जमीनीच्या वादातून आठ वर्षांपासून बहिष्कृत केले आहे. वीस हजार रूपयांचा दंड करण्याची पंचांनी दवंडी पेटवून घोषणा केली. पंचांविरूद्ध पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घरी जातांना वृशाद कदम याच्यावर पंचांनी हल्ला करून खून केल्याचा आरोप आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभासदत्व स्वीकारले या कारणास्तव मुरूड येथील अनिल मोरे व इतर सतरा कुटुंबांना बौद्ध समाज सेवा संघाने जात-बहिष्कृत केले आहे. शिवाय त्यांच्यावर दंडही ठोठावला आहे. या दोन्ही प्रकरणात अंनिस अलिबागचे कार्यकर्ते नितीन राऊत यांनी कृतीशील हस्तक्षेप केल्यामुळे 32 पंचांना एकाच वेळी अटक झाली. वाळीत टाकल्यानंतरचे नियम पाळले नाहीत व बहिष्कृत व्यक्तीशी जवळीक केली ह्या कारणास्तव मुरूड येथील प्रकरणात सरपाटील व इतर कुटुंबांना दोन वर्षांपासून बहिष्कृत केले आहे. त्यामध्ये मागील वर्षी एकाचा संशयास्पद मृत्यू झाला.

राज्याच्या इतर भागातूनही जातपंचायतीने त्रस्त झालेले परिवार न्यायासाठी पुढे येत आहेत. जातीय दंगलीत भाग घेतला नाही हे कारण देत धुळे जिल्ह्यतील वेल्हाणे येथील मधुकर वाघ यांना बहिष्कृत करण्यात आले. सामंजस्याच्या बैठकीनंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मुंबईच्या वर्सोवा येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका छाया भानजी व एका डॉक्टर परिवारास कोळी जातपंचायतीने बहिष्कृत केले आहे. मोडत असलेले लग्न जमविले म्हणून सांगली मधील सामाजिक कार्यकर्त्या उषा व इतर कुटुंबांना पंधरा वर्षांपासून बहिष्कृत करत पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील गायत्री परवत ह्या विधवा महिलेने तिच्या मुलीस जास्त शिकवल्यास बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी गोसावी जातपंचायतीने दिली आहे. मात्र त्यांनी हा विरोध धुडकविला आहे. बौद्ध समाज मंडळाला केवळ पंचवीस रूपये दिले नाही हा राग मनात ठेवत रत्नागिरीतील वित्तीय अधिकारी यशवंत पवार यांना पंचवीस वर्षांपासून बहिष्कृत करण्यात आले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पारंपरिक दफन विधी न करता दहन केले हे कारण देत मुंबई येथील गोसावी समाजाचे श्रीकांत गिरी यांना जातबहिष्कृत करण्याची धमकी देण्यात आली. मात्र त्यांनी पंचांना न घाबरता जागेच्या उपलब्धेअभावी इतरांना तसेच करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय. कधीही जातपंचायतविरोधात एक शब्दही न उच्चारणारी कुटुंब आता अन्याय झुगारत आहेत.

येत्या काळात जातपंचायतविरोधी कायदा व प्रबोधनाची वाटचाल ठरविण्यासाठी नाशिकमध्ये एक चर्चासत्र होत आहे. त्यात निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्राचे शिक्षक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी इ. सामील होतील…. विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी आणखी एक पाऊल टाकू या.

–कृष्णा चांदगुडे

मोबा.9822630378