वाचकांना व अंनिसच्या हितचिंतकांना सुखद धक्का देणारा हा डिसेंबर 2013 चा विशेषांक आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याबद्दल प्रखर आदरभावना असणार्या व अंनिस चळवळीवर मनापासून प्रेम करणार्या आमच्या मित्रांनी व सहकार्यांनी या अंकासाठी जाहिरातींचा जो वर्षाव केला त्याचे फलित म्हणजे हा विशेषांक. आम्ही या सर्वांचे मन:पूर्वक ऋणी आहोत.
2013 साल संपत आहे. या वर्षात अंनिसच्या नेतृत्वावर डॉ.दाभोलकर यांच्यावर घाला घातला गेला. त्याच्या जखमा अजूनही भरून निघत नाहीत. पण त्या उरावर घेऊनच पुढची वाटचाल करावी लागेल. दाभोलकरांचा खून करणार्यांना अंनिसची चळवळ संपवायची स्वप्ने पडत असतील. पण त्यांना लवकरच कळून चुकेल की दाभोलकरांनी महाराष्ट्रीयांच्या मनोभूमीत पेरलेले विवेकाचे बीज करपणार तर नाहीच पण अधिक जोमाने सर्वत्र फोफावेल. अंनिस वार्तापत्राचा आर्थिक भार अनेक हातांनी आपल्या खांद्यावर पेलून हे सिद्ध केलंय की अंनिस भविष्यकाळात अधिक जोमाने पुढे जाईल.
नियमाने विनाखंड जवळजवळ गेली दोन दशके अंनिस वार्तापत्र प्रसिद्ध होत आहे. अंनिसचा कृती कार्यक्रम, तिची विचारधारा, तिच्यावरील टीकेचा प्रतिवाद अशा विविध प्रकारच्या लेखनातून सामान्य जनांना प्रबोधित करणार्या या मासिकाचा सर्वाधिक खपाचे वैचारिक मासिक म्हणून नावलौकिक झाला आहे. अंनिस वार्तापत्राच्या अंकाची आतुरतेने वाट पहाणारी पत्रे व फोन आम्हास सतत मिळतात; त्यावरून या मासिकाच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो व मन समाधानाने भरून जाते.
नेहमीसारखाच हा विशेषांक विविध प्रकारच्या वैचारिक व ललित साहित्याने नटलेला आहे. डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी अंनिसचे कार्य पुढे नेले अशा साथींचे ‘आठवणीतील दाभोलकर’ स्मृती लेख या अंकात समाविष्ट आहेत. डॉक्टरांच्या स्वभावाचे व कर्तृत्वाचे विविध पैलू या लेखांमधून वाचकांना माहीत होतील. या आठवणी केवळ कृतज्ञ भावना जागविण्यासाठी नाहीत तर डॉक्टरांचा विचार पुढे नेणार्या कृती कार्यक्रमात सहभाग देण्यासाठी असावा याचे भान आपण सर्वांनी सुटू देता कामा नये.
अनंत काणेकरांच्या एका निबंधात मानवी मनाच्या कमकुवतपणावर मार्मिक भाष्य केलंय. ‘बुद्धीला पटतं पण मनाला कसंसंच वाटतं!’ तर्काला पटेल तेच करणार असं वागणारी मंडळी कमीच. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष एन.डी.पाटील यांची कणखर विवेकनिष्ठा हा आमचा अभिमान आहे. टीका व सहकार्यांची नाराजी यांनी विचलित न होता एन.डी.सरांनी शोषितांसाठी राजकीय चळवळी राबविल्या. त्याचबरोबर शोषितांच्या मानसिक गुलामीविरोधात डॉक्टर दाभोलकरांना त्यांनी मन:पूर्वक साथ दिली. एन.डी.सरांच्या कार्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. या संदर्भातला त्यांचा जीवनकार्य परिचय वाचकांना प्रेरणा देईल.
महाराष्ट्राला समाजसुधारकांची तेजस्वी परंपरा आहे; पण यांच्या उलट तथाकथित आध्यात्मिक लबाडांची काळी परंपरा पण संपलेली नाही. अलिकडे आपल्या बुवाबाजीच्या पराक्रमांनी प्रसारमाध्यमात गाजत असलेले आसाराम-नारायण पिता पुत्रापासून ते केडगावच्या नारायण महाराजापर्यंत पोचत असलेली ही काळी परंपरा आहे. ही बुवाबाजी का फोफावते? तिला प्रतिबंध कसा करता येईल? याची भयानकता काय? याचा समाचार घेणारे लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य ठरेल. विलास गिते व नीलम माणगावे यांच्या कथा व आशुतोष मुळ्ये संपादित बालविभाग यांनी या अंकात मनोरंजनातून प्रबोधनाचा हेतु छान साध्य केलाय. आमचे कार्यकर्ते, कार्यालयीन सहकारी व संपादक मंडळ यांनी घेतलेल्या अविश्रांत मेहनतीमुळेच हा अंक साकार झालाय. मी त्यांचा आभारी आहे.
आपण सर्वजण या अंकाचे उत्तम स्वागत कराल याबद्दल संदेह नाही.
आठवणीतले दाभोलकर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि डॉ.दाभोलकर यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. ते वडीलकीचे, मार्गदर्शकाचे, मित्राचे असे विविध स्तरांवरचे होते. नेता व अनुयायी असे अजिबात नव्हते. कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्याही आनंदात, दु:खात, अडचणीत डॉक्टर नेहमीच सामील असत. प्रत्येक कार्यकर्त्याजवळ दाभोलकरांविषयीच्या अमाप आठवणी आहेत. त्यांचा अल्पसा सहवासही काहीतरी आठवण मागे ठेवून जायचाच. डॉक्टरांच्या जाण्याने या त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी कार्यकर्त्यांच्या मनात खूप गर्दी केली. एकमेकांच्या भेटीत त्यांना वाटही मिळाली. पण या आठवणी अंनिवाच्या वाचकांच्या समवेतही व्यक्त कराव्यात व त्यातून वाचकांना दाभोलकरांच्या संपन्न, विविधांगी व्यक्तिमत्वाचा परिचय घडावा या हेतूने आम्ही कार्यकर्त्यांच्या ‘आठवणीतले दाभोलकर’ प्रसिद्ध करीत आहोत.
परंतु, जागेच्या मर्यादेमुळे अनेक कार्यकर्त्यांच्या आठवणी या अंकात आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही. यासाठी जानेवारीपासून पुढील वर्षभर हे सदर आम्ही चालू ठेवणार आहोत.