Categories
बालविवाह

उमरग्यात अंधश्रद्धेतून देवीसोबत होणारा बालविवाह रोखला

मे - २०१९

उमरगा तालुक्यातील मुळजमध्ये अंधश्रद्धेतून एका कुटुंबाने स्वत:च्या मुलीचा विवाह देवीसोबत लावण्याचा अघोरी प्रकार सुरू केला होता. मात्र वेळीच बालविवाह प्रतिबंध समिती, अंनिस व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी या कुटुंबाचा शोध घेऊन या कुटुंबाचे समुपदेशन केले आणि घडणारा अघोरी प्रकार रोखला.

मुळज गावातील झोपडपट्टी वस्ती असलेल्या एका कुटुंबातील तरुण मुलीच्या कानातून रक्तस्त्राव होत होता; पण त्या तरुणीच्या पालकांनी देवीला साकडे घातले की, रक्तस्त्राव थांबल्यानंतर मुलीचा विवाह देवीसोबतच करू आणि तसाच रक्तस्त्राव थांबला. त्यामुळे हे कुटुंबीय 2 एप्रिल रोजी पहाटेच्या मुहुर्तावर तालुक्यातील भगतवाडी येथील देवीच्या ठिकाणी जाऊन त्या मुलीचा अघोरी प्रथेच्या जाळ्यात लग्न करणार होते. ही माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सचिन बिद्री यांनी बालविवाह प्रतिबंध समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांना कळवली. त्यानंतर पराग सोमण, महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी सात वाजता उमरगा येथे बैठक घेण्यात आली. यात बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रा. किरण सगर, अ‍ॅड. हिराजी पांढरे, पोलीस स्टेशनच्या समुपदेशक राऊ भोसले, महिला सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी दुबे, संजीव विभूते आदी उपस्थित होते. वेळ कमी असल्याने रात्रीच त्या परिवाराचा शोध घेऊन त्यांना समुपदेशन करून या अघोरी प्रथेस आळा घालण्याचे ठरले. रात्री 9 वाजता मुळज गावात झोपडपट्टी भागात संबंधित परिवाराचा शोध घेऊन मुलीची आजी, वडील, आई, काका आणि मुलगी यांचे समुपदेशन करण्यात आले. मुलीचे कुटुंबीय तिचा विवाह भगतवाडीच्या देवीसोबत लावून जोगतीण-मुरळी म्हणून सोडून देणार होते. मुलीच्या कानातून अधून-मधून रक्तस्त्राव होत होता. रुग्णालयात दाखवूनही गुण लवकर येत नसल्याचे कारण सांगत आजीने भगतवाडीच्या आईला नवस मागून घेतला होता. नातीचे कानातून येणारे रक्त बंद झाले की, मुलीचे लग्न देवीशी लावून देण्यात येईल.

बकर्‍याचा बळी अन् दारूचा बेत; सुशिक्षित नातलगांचीही उपस्थिती

पारंपरिक अघोरी पद्धतीने विधी करून हे लग्न लावून दिले जाणार होते. या लग्नाला नातेवाईक जमा झाले होते. बोकड, दारू आदींचा बेत होता. काही शिक्षित नातेवाईक मंडळीही या कार्यक्रमाला आली होती. बालविवाह प्रतिबंध समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकार पाहिल्यानंतर सर्वांना अंधश्रद्धेबाबत माहिती दिली. उपस्थितांना प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तब्बल दोन ते अडीच तासाने संबंधित कुटुंब व नातेवाईकांनी विचार बदलला, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले.

प्रा. किरण सगर, उमरगा जि. उस्मानाबाद