अंनिस मित्र : मा.लक्ष्मीकांत देशमुख
(जिल्हाधिकारी, कोल्हापूर)
“अंधश्रद्धांच्या अतिरेकामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. अघोरी, अनिष्ट प्रथा आणि विविध अंधश्रद्धांमुळे माणूसपण नाहीसे होते. अंधश्रद्धांमुळे मानवी हक्कांची पायमल्ली होत असेल तर अशा अंधश्रद्धांच्या विरोधात उभे राहणे हे प्रत्येक भारतीयांचे घटनादत्त कर्तव्य आहे.” ही वैचारिक भूमिका घेऊन कृतीशील पाऊल टाकणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मित्र बनले आहेत.
‘वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे जर प्रत्येकाचे कर्तव्य असेल तर त्यामध्ये कसूर करता कामा नये; विचाराला, तर्काला, विवेकाला जे पटते तेच करणे हा खरा मानवी धर्म आहे. विवेकी माणसे अंधश्रद्धांना विरोध करतात. विचार कृतीत आणण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.’ असा विचार मांडून जिल्हाधिकारी देशमुख प्रबोधनाचे काम करत आहेत.
गेली 25 वर्षे प्रशासकीय सेवेत ते कार्यरत आहेत. उपक्रमशील, कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. ते मूळचे नांदेडचे असून नरहर कुरूंदकरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. ‘युक्रांद’मध्ये घडल्याचे ते अभिमानाने सांगतात. साने गुरूजींच्या ‘साधना’ परिवाराचा आणि त्यांचा अत्यंत जवळचा स्नेह आहे. ते इ.7 वीत असताना त्यांची कथा साधनेच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यावेळेपासून ते साधनेशी संबंधित आहेत. साधनेमधील त्यांच्या लेखमाला गाजल्या आहेत. वास्तववादी, सृजनशील, संवेदनशील साहित्यिक म्हणून आज त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. श्री.देशमुख यांनी प्रत्यक्ष अनुभवांच्या, यशापयशाच्या चिंतनाच्या आणि निरीक्षणांच्या आधारे लिहिलेले ‘बखर भारतीय प्रशासनाची’ हे पुस्तक वाचनीय आहे. अं.नि.स.चळवळीने धर्माच्या विधायक चिकित्सेला प्राधान्य दिले आहे. धर्मचिकित्सा ही समाजाला पुढे घेऊन जाणारी आणि आधुनिक समाजाला उपयुक्त ठरणारी बाब आहे, या भूमिकेतूनच श्री.देशमुख यांनी आपल्या साहित्यकृतीतून धर्मांची विधायक चिकित्सा केली आहे. ‘इन्क्लाब विरूद्ध जिहाद’ ही कादंबरी, तर ‘देवबंद’ ही कथा असो किंवा त्यांचे इतर ललित लेख असो त्यांनी कालसुसंगत व सम्यक चिकित्सा करून समाजजीवनाचे वास्तव पुढे आणले अहे. मानवी सुखदु:खाचे यथार्थ दर्शन त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. विविध सामाजिक प्रश्न, समस्या हा तर त्यांच्या चिंतनाचा विषय असतो. कोल्हापूरच्या शाहू स्मारक ट्रस्टचे स्वरूप पूर्णत: बदलल्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी ट्रस्टच्या वतीने अनेक नवे समाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलनाची सुरवात केली. त्यामुळे अनेक नव्या चेहर्यांना संधी प्राप्त झाली. विविध विषयावर चर्चा घडवून आणल्या. सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांचे काम लक्षवेधी असून पथदर्शक आहे. प्रशासकीय काम सांभाळत असताना वाचन, चिंतन, लेखन यासाठी वेळ काढायचाच हा त्यांचा स्थायीभाव आहे.
शासकीय कार्यालयात होणार्या धार्मिक कार्यक्रमांना देशमुख साहेबांनी नेहमीच विरोध केला आहे. त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केले तिथे कधीही धार्मिक कार्यक्रम करू दिले नाहीत. याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना ते म्हणतात ‘धर्म ही वैयक्तिक बाब आहे, तुमची श्रद्धा किंवा धर्मश्रद्धा घरापुरती मर्यादित असावी तिचे सार्वत्रिकरण करण्याची गरज नाही. शासकीय कार्यालयात विशिष्ट धर्माचे कार्यक्रम करणे, पूजा-अर्चा करणे हे धर्मनिरपेक्ष मूल्यांना बाधा आणणारे आहे.’ या विचारांशी ठाम राहून शासकीय स्तरावरील धार्मिक कार्यक्रमांना ते प्रतिबंध करतात. कोणत्याही स्वरूपातील धार्मिक कार्यक्रमांना जाण्याचे ते जाणीवपूर्वक टाळतात. ते उघडपणे सांगतात की, मी नास्तिक आहे, मला कशाला अशा कार्यक्रमांना बोलवता’ सामाजिक काम जिथे प्रामाणिकपणे चालू आहे तिथे मात्र ते आवर्जून जातात.
अं.नि.स.चळवळीस ते नेहमीच सहकार्य करत आलेले आहेत. बार्शीमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करणार्या एका शिक्षिकेला अचानक दृष्टांत झाला की, हुपरी(जि.कोल्हापूर) येथील एका शेतात देवाची मूर्ती जमिनीखाली आहे आणि त्या दृष्टांतानुसार देवाची मूर्ती जमिनीतून काढणे आवश्यक आहे. हुपरी येथे मूर्ती शोधण्यासाठी खोदकाम करण्यात सुरवात झाली. मॅडमच्या दृष्टांताची बातमी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात वृत्तपत्राच्या माध्यमातून सगळीकडे झळकली. अं.नि.स.ने मॅडमच्या कथित दृष्टांतास, व तिच्या भूलथापेस विरोध केला. मॅडम जनतेची दिशाभूल करत असून तेथील खोदकाम त्वरीत थांबविण्याची मागणी प्रशासनाकडे केली. याबाबत जनजागृती केली. जिल्हाधिकारी श्री.देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, चालू असलेले खोदकाम थांबविले. त्या विज्ञान शिक्षिकेला चांगलीच समज देऊन बार्शीला पाठविले. शिवसेनेसारख्या राजकीय संघटनेचा विरोध डावलून देशमुख साहेबांनी अंधश्रद्धा पसरविणार्या व्यक्तींना प्रतिबंध केला व योग्य कार्यवाही केली.
‘विसर्जित गणपती व निर्माल्य दान करा’ या अं.नि.स.च्या महत्त्वाकांक्षी पर्यावरणीय उपक्रमाची सुरवात कोल्हापूरातून झाली. संपूर्ण राज्यभर त्याचे अनुकरण झाले एवढेच नव्हे तर आता शासकीय पातळीवर हा उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापूर अं.नि.स., समविचारी संघटना, शैक्षणिक संस्था यांच्या सहभागाने, पुढाकाराने या उपक्रमास चालना मिळाली. कोल्हापुरातील काही सनातन्यांनी या उपक्रमास विरोधही केला. गेल्या काही वर्षांत जिल्हाधिकारी देशमुख यांच्या सहकार्याने हा उपक्रम कोल्हापूर व परिसरात प्रभावीपणे राबविला गेला. प्रशासकीय पातळीवरील प्रभावी, व्यापक प्रबोधन आणि कृतीकार्यक्रम राबविण्यास श्री.देशमुख यांचा वाटा मोठा आहे. पाण्याच्या स्त्रोतात मूर्ती आणि निर्माल्य टाकल्याने पाण्याचे प्रदूषण होते. पाण्यात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती सहजासहजी बुडत नाहीत, मूर्तीचे विसर्जन केल्यावर त्या तशाच पाण्यावर तरंगत राहतात. नदीच्या पाण्यातील विसर्जनाने मूर्तीची विटंबना कशी होते, पर्यावरणाचे नुकसान कसे होते? याबाबतचा प्रबोधनपर माहितीपट त्यांनी कोल्हापूर परिसरातील अनेक गणेश मंडळे, व तरूण मंडळांना दाखविला. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन त्यांनी याबाबत प्रबोधन केले, लोकांना या पर्यावरणीय उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. शासकीय यंत्रणेकडून पर्यायी विसर्जनाची चांगली सोय उपलब्ध करून दिली. पंचगंगा नदीच्या काठाला निर्माल्यासाठी कुंड ठेवले तर मूर्ती विसर्जनासाठी हौद तयार केले. त्यामुळे प्रत्यक्ष नदीचे प्रदूषण काही प्रमाणात रोखले गेले. उत्सवाचे बाजारीकरण आणि विकृतीकरणाला ते नेहमीच विरोध करतात. ‘डॉल्बीमुक्त गणेश उत्सव’ करण्याचे श्रेय कोल्हापूर जिल्ह्याने घेतले. यामध्येही देशमुख यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. डॉल्बीमुळे मोठ्या प्रमाणात होणारे आवाजाचे प्रदूषण रोखण्यात कोल्हापूरकरांनी केलेले प्रयत्न अनुकरणीय आहेत.
अं.नि.स.ने राज्यभर राबविलेल्या ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर अं.नि.स.आणि समविचारी संघटनाच्या पुढाकाराने दारूबंदीचे व्यापक आंदोलन उभे केले आहे. अनेक गावात दारूबंदी करण्यात यश आले आहे. मात्र ज्या गावात दारूबंदी झाली त्या गावातील अधिकृत दारूची दुकाने बंद झाली मात्र बेकायदा दारू विक्री सुरू झाली. ही बाब कार्यकर्त्यांच्या आणि जिल्हाधिकारी देशमुख यांच्या निदर्शनास आली. जिल्हाधिकार्यांनी ज्या गावात अशी बेकायदा दारू विक्री चालू आहे तिथल्या पोलीस ठाण्यातील प्रमुख, त्या भागाचा तहसीलदार, प्रांत संबंधित अधिकार्यांना एकत्र बोलावून त्यांचे प्रबोधन केले, त्यांच्याशी चर्चा करून बेकायदा दारू विक्री थांबविण्याचे आदेश दिले. ज्या गावात दारूबंदी झाली त्या गावातील बेकायदा दारू विक्री थांबविण्यास प्रशासनाला यश आले. दारूबंदीच्या चळवळीस त्यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. वरिष्ठ शासकीय स्तरांवर निर्णय प्रक्रिया राबविणार्यांची 100 टक्के दारूबंदी व्हावी अशी मानसिकता नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पुरूषप्रधान संस्कृतीमुळे मुलगाच वंशाचा दिवा ठरतो ही एक अंधश्रद्धाच आहे. मुलाच्या हव्यासापोटी गर्भातच मुलींची हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. भ्रूणहत्येबद्दलचे व्यापक प्रबोधन, कार्यवाही आणि कारवाईचे पथदर्शक काम जिल्हाधिकारी श्री.देशमुख यांनी कोल्हापुरात केले आहे. “Save the Baby Girl – Save the Nation” हा विचार घेऊन कोल्हापुरात त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर घेतला जात आहे. सोनोग्राफी हे यंत्र वैद्यशास्त्रातील महत्त्वाचे साधन. सोनोग्राफीमुळे स्त्रीच्या गर्भात असणार्या बाळाची वाढ कशी होत आहे, बाळाला संभाव्य धोके काय आहेत? त्यांच्यात कोणते व्यंग आहे हे या मशिनने समजू शकते. त्यावरील योग्य उपचार, उपाय वेळीच करणे डॉक्टरांना शक्य होत आहे. मात्र डॉक्टरांच्या पैशाच्या लालसेने आणि मुलाच्या हव्यासापोटी पालकांनी सोनोग्राफीचा उपयोग लिंग ओळखण्यासाठी केला याचा वाईट परिणाम मुलींची गर्भात हत्या केली जाऊ लागली, पर्यायाने मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ होऊन. मुलींचे घटते प्रमाण हा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. याबाबत देशमुख यांनी व्यापक प्रबोधन केले व सर्वसामान्य माणसापर्यंत ‘लेक लाडकी अभियान’ पोहचवले. कोल्हापूर जिल्ह्यातील सोनोग्राफीची सर्व यंत्रे त्यांनी ऑनलाईन केली प्रत्येक मशिनला त्यांनी ‘Silent Observer’ बसविले. त्यामुळे कोणी किती सोनोग्राफीचा उपयोग केला, कशासाठी केला हे समजणे शक्य झाले. बर्याच प्रमाणात डॉक्टरांच्या गैरकृत्याला आळा बसला. विसंगत अहवाल, रेकॉर्डमध्ये खाडाखोड, अदलाबदल करणार्या आणि प्रत्यक्ष भ्रूणहत्या करणार्या अनेक डॉक्टरांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिम्मत देशमुख साहेबांनी दाखविली. भ्रूणहत्या विरोधी कायद्याच्या कडक अंमलबजावणी करणार्यांमध्ये त्यांचा वरचा नंबर आहे. देशमुख साहेबांच्या या कामाचे ‘रोल मॉडेल’ संपूर्ण देशभरात वापरले जात आहे. पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यात ‘Save the Baby Girl’ चा कोल्हापूर पॅटर्न राबविला जात आहे.
कालबाह्य, अर्थशून्य विधी व प्रथांना विरोध करून कालसुसंगतपणे विधायक बदलांची आवश्यकता असल्याचे ते सातत्याने सांगतात. देहदान, नेत्रदानाला पर्याय नाही. जे मृत्यूनंतर दहन करतात ती प्रक्रिया बदलली पाहिजे, दहनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतो, प्रदूषण होते त्याऐवजी विद्युत किंवा डिझेल दाहिनीचा अधिक वापर झाला पाहिजे. प्रत्येक गावा-गावात शासनाने या पद्धतीच्या दाहिन्या दिल्या पाहिजेत. रक्षा विसर्जनाच्यावेळी चिमूटभर रक्षा नदीत सोडावी. बाकीची रक्षा शेतात टाकावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. मृत्यूनंतरची कर्मकांडे वाढत चालल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. सप्ताह, सत्संगामध्ये मोठ्या प्रमाणात वेळेचा व पैशाचा अपव्यय होत आहे. वैचारिक प्रगल्भतेमुळेच जिल्हाधिकारी देशमुख यांच्या कामात समाजाभिमुख दृष्टिकोन दिसतो. प्रशासकीय कामाचा प्रचंड व्याप सांभाळत असताना पुरोगामित्व जपण्याचा त्यांचा प्रयत्न इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या आदर्श प्रशासकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
उपक्रमशील प्रशासक, नव्या दृष्टीचा लेखक तसेच सामाजिक चळवळींची बांधिलकी जपणारे अं.नि.स.चे मित्र लक्ष्मीकांत देशमुख यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.
–संजय बनसोडे