Categories
संपादकीय

 उत्तराखंडमधील अनर्थ : शोध आणि बोध

जुलै - २०१३

उत्तराखंड. एकेकाळी निसर्गाने नटलेली समृद्धभूमी. पण परवाच्या पावसाच्या तांडवनृत्यात उत्तराखंड मरणभूमी झाली. एका चबुतर्‍यावर कसा तरी तग धरून राहिलेला केदारनाथ ज्यांनी निर्माण केला ती माणसंच उरली नाहीत. माणसांच्या हावरटपणाचे व हपापा संस्कृतीने घडवून आणलेला हा विनाश आहे. सॉमरसेट मॉमचे एक प्रसिद्ध वचन आहे ‘How cruel human beings are in the name of God!’

            देवाच्या नावाखाली माणसं किती क्रूर बनतात याचे आश्चर्य वाटतं! विकास नामक गोंडस कल्पनेच्या नावाखाली उत्तराखंडमध्ये झालेली वित्तहानी व मनुष्यहानी ही देवकल्पनेचा व्यापार करणार्‍या धनदांडग्यांचा प्रताप तर आहेच पण आपल्यामधील तथाकथित उच्चशिक्षित मध्यमवर्गातील पैसा हाती आलेल्यांचा देवभोळेपणाचाही परिणाम आहे. भूकंप किंवा त्सुनामीचा प्रलय थांबविता येणे कठीण असले तरी निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही हे अर्धसत्य आहे. उत्तराखंडमधील निसर्गप्रकोपात वाहून गेलेले अनेक जीव पर्यावरणहानीमुळे झालेले आहेत हे कटू सत्य आहे.

            विकासाच्या नावाखाली हव्यासाचा अतिरेक झाला की हेच होणार. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उत्तराखंडमध्ये जे घडले त्याला धनदांडग्यांची राक्षसी भूकच कारणीभूत आहे. हरिद्वारला दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. यावेळी काही महिन्यापूर्वी तो पार पडला. तेथील अब्जावधी रूपयांच्या उलाढालीने राज्यकर्त्यांचे व व्यावसायिकांचे डोळे दिपले. हरिद्वारच्या गंगेत डुबकी मारून पाप धुण्यासाठी दररोज लाखभर यात्रेकरू आले तरी कित्येक कोटीची उलाढाल दररोज होऊ शकते. हे ध्यानात आल्यावर हरिद्वारच्या जागेचे भाव गगनाला भिडू लागले. हरिद्वाराबरोबरच बद्रीनाथ, केदारनाथ गौरीकुंड, देवप्रयाग अशा तीर्थस्थानाची झपाट्याने वाढ होऊ लागली. अनेक नवी पर्यटनस्थळे उभी राहू लागली.

            अतिरिक्त पैसा खुळखुळू लागलेल्या अनेक मध्यमवर्गीय पर्यटकांना चारी धाम आकर्षित करू लागले. अशा पर्यटकांचे लोंढे उत्तराखंडकडे सुरू झाले. यांच्या सोयीसाठी मग हजारो हॉटेल्स, धर्मशाळा अतिथीगृहे उभी राहिली. रस्त्यालगत धाबे उभे राहीले.

            पाणी अडवण्यासाठी धरणे, जंगलतोड, बांधकामासाठी नदीकाठचे खणन यामुळे उत्तराखंडचे डोंगर खिळखिळे झाले. नद्या, पहाड व जंगले यांचा ताबा घेण्यासाठी राज्यकर्ते व पंजाब, हरियानामधून आलेले बिल्डर यांच्यात स्पर्धा सुरू झाली. हिमालय सह्याद्रीसारखा खडकप्रवण नाही. तो भुसभुशीत आहे. पर्यावरण आक्रमणामुळे तो अधिक भुसभुशीत झाला. परिणाम काय? नद्या गाळाने भरल्या व परवाच्या अतिवृष्टीत त्या पात्राबाहेर पडून उत्तराखंडमधील अनर्थ घडला.

            तुकोबांनी म्हटलंय, ‘तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी!’ पण देवभोळ्यांना हे कळणार कसे? ते उत्तराखंडमध्ये देवाच्या भेटीला गेले ते परतलेच नाहीत. बिचारा केदारनाथ छत्र हरवून एकटाच चौथर्‍यावर हताशपणे निसर्गतांडव पहात बसला.

            विज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून अमेरिकेतील हवामान खाते नागरिकांना रोजच्या रोज हवामान बदलाची सूचना देत असते. चक्रीवादळाच्या सूचना अमेरिकन नागरिकांना अगोदरच मिळतात. त्यामुळे तेथे मनुष्यहानी होत नाही. मग आपल्याकडे हे का होऊ नये? उत्तराखंड किंवा अशाच प्रकारच्या आपत्तींची पूर्वसूचना मिळविणे शक्य आहे. पण देवभोळे लोक व धूर्त, मतलबी राज्यकर्ते यांच्या मनोवृत्तीत फरक पडल्यावरच हे शक्य आहे. मला ठार करा पण झाडाला मी तोडू देणार नाही असे ठणकवणार्‍या सुंदरलाल बहुगुणांची संख्या वाढून पर्यावरण रक्षणाची चळवळ गतीमान होईल तेव्हाच उत्तराखंडसारखे अनर्थ नियंत्रणात येतील. डोंगर, नद्या, जमीन व पाणी वाचली तरच आपण वाचू.

            संकटकाळात नवी बुवाबाजी निर्माण होण्याचा धोका संभवतो. रोजच्या रोज टी.व्ही.वर ज्योतिषी भविष्याचे रतीब मांडताना दिसतात. त्यांना उत्तराखंडच्या प्रलयाची पूर्वकल्पना का देता आली नाही? कदाचित यानंतर आपणास हे माहीत होते असा पुकारा ते करतील. निसर्ग, देवाच्या अवकृपेमुळे कोपला असा प्रचार सुरू होईल. मग यज्ञयाग व कर्मकांडे यांना ऊत येईल. कदाचित उत्तराखंड सरकारचे प्रतिनिधी मोठा यज्ञही केदारनाथासमोर घालतील. अशा मंडळींना वेळीच आवर घालण्याची सुबुद्धी सर्वांना मिळो.