Categories
प्रासंगिक

अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक वाई येथे संपन्न

जुलै - २०१७

शिस्तबद्ध, सनदशीर आणि अहिंसक मार्गाने लढणार्‍या अंनिसच्या कार्यकर्त्यांसमोर आज परिस्थितीने अनेक आव्हाने उभी केली आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन अंनिसचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. अंनिसच्या वाई शाखेने यजमानपद भूषवलेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप वाईत पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.

अडीच दिवस चाललेल्या या बैठकीत अंनिसच्या सर्व कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 2025 पर्यंतच्या कामाचे नियोजनही करण्यात आले. समारोपाच्या सत्रात सुरुवातीला सुशीला मुंडे, माधव बावगे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार या राज्याच्या प्रधान सचिवांनी आपापल्या महसूल विभागातील कामकाजाचा जिल्हावार आढावा सादर केला. अंनिसच्या अत्यंत अवघड कामाला समाजातून सर्वव्यापी पाठींबा आहे असा आश्वासक सूर या मांडणीत दिसून आला. हैदराबादचे पोलीस कमिशनर महेश भागवत यांनीही या प्रसंगी अन्य राज्यात अंनिसचे काम वाढले पाहिजे असे सुचवत कामाला सदिच्छा दिल्या. अंनिसच्या प्रयत्नातून राज्यात पारित झालेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयाची प्रत त्यांना देण्यात आली. अशाच प्रकारचा कायदा तेलंगणात करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसची मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उपस्थित प्रतिनिधींतर्फे बोलताना अनेकांनी स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. नेटक्या नियोजनामुळे सर्वाधिक उपस्थिती असलेली ही ऐतिहासिक बैठक होती, अशीही भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाला डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे दोनशे पदाधिकारी, तसेच दिलीप डोंबिवलीकर, अतुल पाटील, प्रमोद भिसे, संजय सकटे, रुपाली पाटील, लक्ष्मीकांत रांजणे, डॉ. शंतनू अभ्यंकर, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सोनपाटकी, नितीन कदम अन्य नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप डोंबिवलीकर यांनी भावपूर्ण भाषणात मदत करणार्‍यांचे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांचे नावानिशी आभार मानले. हम होंगे कामयाब’च्या सुरांनी भारलेल्या वातावरणात, विवेकाचा आवाज बुलंद करू या’ ही घोषणा दुमदुमली आणि कार्यक्रम संपन्न झाला.

दिलीप डोंबिवलीकर, वाई