श्री.नागेश किसन कुसळे यांचा जन्म दिनांक : 1 जून 1956 चा. त्यांचे बालपण पिम्प्रीगवळी ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे गेले. घरची परिस्थिती हालाखीची होती. वडील दगडफोडणे, बांधकाम करणे, विहिरी बांधणे अशी पारंपारीक व्यवसायिक कामे करत होते. नागेश यांना दोन भाऊ आणि एक बहीण. गावात इयत्ता चौथीपर्यंतच शाळा होती. पुढील इयत्ता सातवी पर्यंतच्या शिक्षणासाठी शेजारील गावी पायी जाऊन येऊन केले. त्यांच्या वडीलांना देवधर्म करणे, बुवाबाजी करणे आणि तीर्थयात्रेस जाण्याचा नाद होता. सर्व पंचक्रोशीत ते ‘बुवा’ नावाने ओळखले जायचे. त्यांनी डोक्याचे केस पायापर्यंत वाढवून त्याच्या जटा केल्या होत्या. त्यांच्या या वागण्याच्या अतिरेकामुळे नागेश यांना या गोष्टींचा तिटकारा होऊ लागला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनाथ विद्यार्थी गृहात राहून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान ते राष्ट्र सेवा दलाच्या दैनंदिन शाखेत नियमीत जाऊ लागले. समता, बंधुता, व्यायामाचे महत्व, वैज्ञानिक दृष्टीकोन याचे धडे त्यांना इथे मिळू लागले. सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊ लागली. ते अहमदनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. 2 जानेवारी 1981 ला सुनीता गोटे यांच्याशी विवाहबद्ध झाले.
1982 साली बी. प्रेमानंद यांची विज्ञानयात्रा अहमदनगर येथे झाली. यात अनेक चमत्कारांची प्रात्यक्षिके वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली. याच कार्यक्रमात डॉ.नरेंद्र दाभोलकर अनवानी तलवारींच्या धारधार पात्यांवर उभे राहीले होते आणि धगधगत्या निखार्यावरून चालून गेले होते. या कार्यक्रमाने नागेश खूप प्रोत्साहीत झाले आणि आपण स्वतः देखील असे सप्रयोग व्याख्याने देऊन लोकप्रबोधन करावे असे वाटू लागले. ही संधी 1986 मध्ये चोपडा येथील शिबीरात त्यांना मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजीत या शिबीरात सात दिवस विविध विषयांवर डॉ.नरेंद्र दाभोलकर, शाम मानव आणि मधु जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. अहमदनगर मध्ये 1987 पासून अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या स्वरूपात वैयक्तीक स्वरूपात काम करू लागले. त्यानंतर अं.नि.स.ची अहमदनगर शाखा स्थापन केली. गावोगावी जाऊन चमत्कार सादर करुन बुवा कशी फसवणूक करतात आणि विज्ञानाची कास धरून आपण ही फसवणूक कशी टाळू शकतो या वर ते व्याख्याने देत संपूर्ण जिल्हात फिरले.
केडगाव येथे मोठ्याप्रमाणात समाजावर पगडा बसवलेल्या नागबाबाचा फोलपणा उघडकीस आणला. अं.नि.स. च्या मोहीमा, शनीशिंगनापूर येथे स्री- पुरुष समता आंदोलन, विज्ञानयात्रा, खगोलविज्ञान यात सक्रिय सहभाग. कॉलेज युवकांसाठी विज्ञानबोध वाहिनी आणि युवक शिबीर चालवले. अं.नि.स.च्या मध्यवर्तीने राबवलेल्या ‘चमत्कार दाखवा आणि पाच लाख रूपये मिळवा’ आणि ‘बुवाबाजी हल्लाबोल’ या मोहिमात सक्रीय सहभाग घेतला.
नागेश कुसळे यांना वाचनाची आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. यातूनच त्यांनी स्वतःच्या घरी वाचनालय चालू केले. यातूनच नवीन कार्यकर्त्याना साहित्य उपलब्ध करुन त्यांची प्रगल्भता वाढविली. त्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा शब्दगंध साहित्य परिषदेने त्यांना ’साने गुरुजी पुरस्काराने गौरविले. मागील वर्षीचा महाराष्ट्र अंनिसचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
कुसळे सर संघटनेसाठी निधी संकलन व जाहिरात संकलन करीत असत. संघटनेच्या वतीने कुसळे सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!