Categories
भांडाफोड

…अखेर चमत्काराचा केला भांडाफोड

सप्टेंबर - २०१८

जग एकविसाव्या शतकात वावरत आहे. विज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळे शोध लावले जात आहेत, तरीही आपण चमत्कारावर विस्वास ठेवतो, हे अविवेकी माणूस असल्याचे लक्षण आहे. थोडाफार काळ लोटला की नवनवीन चमत्कार घाडतात व दर्शनाला भक्तांच्या रांगा लागतात. ‘जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्रिया, भौतिक अभिक्रिया किंवा हातचलाखी असते; तो मुळी दैवी चमत्कार नसतो….! शिर्डीतील व्दारकामाईत साईबाबांची प्रतिमा दिसली हे तेवढंच खरे आहे. पण त्यामागील कारणमीमांसा न शोधता साईबाबा प्रकट झाल्याची पध्दतशीरपणे अफवा पसरविण्यात धूर्त भक्तगण जरी यशस्वी झाले असले तरी विवेकी माणसांनी व मीडियाने सत्य कारण समाजापुढे आणले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील दुसर्‍या चमत्कारामागील वैज्ञानिक सत्य शोधण्यास महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले.

नाशिक जिल्ह्यातील नांदगावपासून अवघ्या पाच किलोमीटर दूर असलेले साकोरे हे गाव. या गावातील संदीप संतोष कासलीवाल या 35 वर्षीय व्यक्तीच्या स्वप्नात गेल्या दहा वर्षांपासून आदिनाथ भगवान यायचे व प्रकट होऊन दृष्टांत दाखवीत म्हणायचे. गेल्या दोन वर्षांत तर हे प्रमाण जास्तच झाले होते. त्यांना बुधवार, दिनांक 11 जुलै 2018 रोजी रात्री दृष्टांत झाल्याने त्यांनी गुरुवारी पहाटे 4 पासून गावाच्या नदीकिनारी असलेल्या दिबाबा ग्रामदेवतेच्या चौथर्‍याजवळ आपल्या कुटुंबीयांसोबत खोदकाम करण्यास सुरुवात केली असता भगवान आदिनाथांची इ.स.1336 च्या काळातील दोन प्राचीन मूर्ती मिळाल्याचा चमत्कार झाला. जमिनीतून मूर्ती काढत असताना मूर्तीने तीनवेळा रंग बदलल्याचाही त्यांनी दावा केला आणि यापुढे अजून 21 मूर्ती निघणार असल्याचे भाकीत केले.

बघता-बघता हा चमत्कार महाराष्ट्रातील जैन बांधवांपर्यंत सोशल मीडियाव्दारे पोचला गेला. दूरवरचे भाविक दर्शनाला येऊ लागल्याने गावास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यादरम्यान आचार्य 108 मुनीश्री भुविसागर महाराजांच्या उपस्थितीत मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आली. गावातून मिरवणूक काढून त्या मूर्ती जैन मंदिरात भक्तिभावाने ठेवण्यात आल्या.

या चमत्काराबाबत मला इत्थंभूत माहिती मिळाली. म्हणून चमत्काराचे सत्यशोधन करण्यासाठी औरंगाबादहून मी शहाजी भोसले व प्रशांत कांबळे; तसेच नाशिक जिल्हा प्रधान सचिव उदयकुमार कुर्‍हाडे, महेश आहेर (येवला), मारुती जगधने, भगीरथ जेजुरकर, राजेंद्र सुरसे, रमेश बोरसे, प्रकाश थोरात, बाबासाहेब बोरसे (नांदगाव) आम्ही साकोरे गावी गेलो. सर्वप्रथम त्या खोदकाम केलेल्या जागेची व त्यानंतर मूर्तींची पाहणी केली.

हे सर्व बघितल्यानंतर हे सर्व ठरवून केलेले कृत्य असल्याचे जाणवत होते. जमिनीतील खोदकाम बघून इतक्या वरवर मूर्ती मिळणे शक्य नव्हते. प्राचीन काळातील मूर्ती बघून त्या नवीन असल्याचे बघताक्षणीच जाणवले. 1336 साली मराठी भाषा नसतानाही त्या मूर्तीवर मराठी भाषेतील लिखाण हा त्याचा सबळ पुरावा होता. जमिनीतून मूर्ती काढण्याचा त्यांनीच तयार केलेला व्हिडीओ मला मिळाला होता. तो व्हिडीओ खोदकाम सुरु केल्यापासून नाही, तर मूर्ती मिळाल्यापासून पुढचा आहे. यामागील राज समजदार समजू शकतात. त्यात मूर्तीने तीन वेळा रंग बदलल्याबाबतचे बोलले गेलेले दिसते; मात्र रंगाबाबत पती व पत्नीच्या बोलण्यात साधर्म्य नाही. येथेच हे सर्व ठरवून केलेले कुभांड सिद्ध झाले होते.

त्यानंतर संदीप कासलीवाल यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही झालेला सर्व वृत्तांत सविस्तर कथन केला. आम्हीही शांतपणे ऐकून घेतला. सर्व ऐकल्यावर हे सर्व काढलेल्या निरीक्षणावरून हा चमत्कार नसून एक षड्यंत्र असल्याचे निदर्शनास आणून दिले. आणि ‘अर्थप्राप्तीसाठी अशाप्रकारे चमत्कार करून लोकांची दिशाभूल करणे हा जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा असल्याने त्या आरोपाखाली सजा होऊ शकते,’ असेही सांगितले. कारण गेल्या तीन-चार दिवसात जैन बांधवांकडून लाखो रुपयांची ‘माया’ श्रद्धेपोटी मिळाल्याचे एका विश्वासू मित्राने अगोदरच सांगितले होते.

संदीप कासलीवाल याची सर्व पार्श्वभूमी बघता त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, असे मला मनापासून वाटत असल्या कारणाने त्याने केलेल्या कृत्याची जाहीर माफी मागावी, अशी अट मी घातली. त्याने बदमाषी केली, हे अख्ख्या गावाला समजून चुकले होते आणि तेवढीच जिम्मेदार त्याची पत्नीही होती. कारण हे पती-पत्नीने संगनमताने रचलेले कुभांड होते. शेवटी गावातील सरपंच देवदत्त बोरसे, संदीप बोरसे आणि महत्त्वाचे त्याचे काका धरमचंद कासलीवाल (जब्रू शेठ) यांच्या मध्यस्थीने संदीप याने चक्क खोटे बोलत, ‘मला कोणतेही स्वप्न पडले नाही व आदिनाथ भगवान माझ्या स्वप्नात आले नाहीत, मला त्या मूर्ती माझ्या शेतात जाताना सापडल्यात व हा कोणताही चमत्कार नाही,’ असे सांगितले.

सरतेशेवटी मी असे आवाहन केले की, ज्या-ज्या बांधवांनी धार्मिक आस्थेच्या नावाखाली संदीप यास पैसे दिले, त्यांनी ते परत घ्यावेत व अनेकांनी बोलीरुपात देऊ केलेली रक्कम देऊ नये; अन्यथा जैनधर्मीयांमध्ये असल्याप्रकाराचे चमत्कार वारंवार होत राहतील. एवढे करूनही ही घटना पूर्णत: थांबली गेली नाही, तर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

शहाजी भोसले, औरंगाबाद