Categories
बुवाबाजी

अमावस्येला पैशांचा पाऊस पाडणार्‍या मांत्रिकावर गुन्हा

फेब्रुवारी - २०१८

जानेवारीच्या अंकात आपण परभणी जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. या अंकात बीड जिल्ह्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या काही गुन्ह्यांची माहिती घेऊ. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि त्यामुळे निर्माण होणारे शोषण यांची घट्ट सांगड या गुन्ह्यांच्या तपशिलातून लख्खपणे समोर येते.

जून 2015 मध्ये बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बुवाबाजी चालत असण्याच्या खबरीवरून सापळा लावून नीता कुटे व शाम कुटे या दोघा आरोपींना जादूटोण्याचा प्रयोग करताना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कॅमेरा घेतलेले एक हवालदार व दोन पंच अशी जय्यत तयारी करून पोलिसांची टीम नीता कुटे (वय 32 वर्षे) हिच्या दरबारात गेली. त्यांनी पाहिले की, एका पत्र्याच्या शेडमध्ये पाटावर बसलेली नीताबाई अंगात आल्यासारखी झुलत होती, तिच्या शेजारी बसलेला इसम तिच्या हातात लिंबू, हळद, कुंकू असे साहित्य देत होता, शेजारी कापलेल्या लिंबांचा खच पडला होता व समोर आठ-दहा स्त्री-पुरुष भक्त बसलेले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते नीताबाईचे भक्त असून, जादूटोण्याद्वारे आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आले आहेत, असे त्यांनी सांगितले. तिच्याकडे मिळालेल्या साहित्यात हळद- कुंकू, भस्म, कपूर इत्यादीसोबत एक फूट सात इंच लांबीचा, पाठीमागून गोल असलेला व दोन लोखंडी गोल आकाराच्या कड्या अडकलेला चिमटा सापडल्याचा उल्लेख आहे. अंनिसचे कार्यकर्ते सप्रयोग व्याख्यानाच्या कार्यक्रमात लंगरमधील कडे सोडवून करणी काढण्याचा चमत्कार करून दाखवतात (व नंतर त्यामागील हातचलाखी स्पष्ट करतात). नीताबाईकडे सापडलेले हे साधन म्हणजे लंगरच असावा, असे या एफआयआरमधील वर्णनावरून वाटते.

दैवी शक्तीच्या सहाय्याने पैशांचा पाऊस पाडून सर्व अडचणी दूर केल्या जातील, या बतावणीला माणसे किती सहजी बळी पडतात, ते पाहून अचंबित व्हायला होते. बी. ए. झालेल्या सुनीता या महिलेच्या घरी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुवर्णा चव्हाण (वय सु. 40 वर्षे) ही अजय श्रीवास्तवला (वय सु. 50 वर्षे) घेऊन गेली व तिने तो स्वतःचा भाऊ असल्याची बतावणी केली. सुवर्णा व सुनीता या गेली सात- आठ वर्षे एकमेकींना ओळखत होत्या. स्वतःची ओळख करून देताना अजय श्रीवास्तवने सांगितले की, ‘मी ज्योतिषी असून, मी एक किलोमीटरवरचे धन खेचून आणतो, दहा किलोमीटरवरचे धन मला दिसते. मी 18 वर्षे तप केले असून मला 127 विद्या प्राप्त आहेत, गेली अठरा वर्षे मी चप्पल वापरात नाही’. त्याचवेळी सुनीता यांच्याकडे स्वाती ही त्यांची शेजारीण आली. स्वातीचा चेहरा उतरलेला का दिसत आहे, अशी श्रीवास्तवने चौकशी केली; त्यावर, ‘घरात अडचणी असतात’ असे स्वातीने सांगितले. ते ऐकून श्रीवास्तव म्हणाला की, ‘तुमच्या अडचणी दूर करतो, तुमचे कर्जपाणी निल करतो, मला प्राप्त असलेल्या विद्येच्या सहाय्याने पन्नास लाख रुपयेपर्यंतचा पैशांचा पाऊस पाडून देतो, त्यासाठी तुम्ही मला प्रत्येकी तीस-तीस हजार रुपये द्या.’ त्याने असे आश्वासन दिले की, अमावस्येपर्यंत पैशांचा पाऊस पडेल, जर वेळ लागलाच तर महिन्याभारत तर नक्कीच पडेल. पैशांचा पाऊस पडला नाही, तर तो साठ हजार रुपये परत देणार होता. सुनीता व स्वाती या आठ ऑगस्टला श्रीवास्तवला भेटल्या, त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे 21 ऑगस्ट रोजी त्या दोघींनी सुवर्णा चव्हाण हिच्याकडे साठ हजार रुपये नेऊन दिले. यात पंधरा दिवसांचा काळ गेला, तरीदेखील पैशांचा पाऊस कसा पडू शकेल, अशी शंका या दोघींच्या मनात आली नाही. दोन महिने झाले तरी पैशांचा पाऊस (अर्थातच) पडला नाही व साठ हजार रुपयेदेखील परत मिळाले नाहीत, तेव्हा सुनीताने व तिच्या शेजारणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. सुवर्णा चव्हाण व अजय श्रीवास्तव यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदा व फसवणुकीच्या भारतीय दंडविधान संहितेमधील कलमांखाली गुन्हा दाखल झाला. पैशांच्या पावसाच्या बहुतेक प्रकरणांत, खात्रीने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, एक पूजा करावी लागेल, असे सांगून महिलांना नग्नपूजा करायला लावली जाते. दोन महिन्यांच्या काळात सुनीता व तिच्या शेजारणीचा श्रीवास्तववरून विश्वास उडाल्यामुळे कदाचित सदर प्रकरणात हा प्रकार घडला नसावा. पैशांच्या पावसासोबतच गुप्तधन शोधणार्‍या टोळीवर देखील बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील मुख्य पोलीस हवालदार सुभाष पवार हे या केसमधील फिर्यादी आहेत.

करणी केल्याच्या संशयावरून एखाद्याला छळणे, करणी उतरविण्यासाठी मंत्र-तंत्र करणे यांसारख्या घटनांवरून असे लक्षात येते की, करणी करून एखाद्याचे वाईट करता येते. यावर आपल्या समाजातील लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. मारोती खडके यांच्या पत्नीची भानामती काढण्यासाठी उत्तम गडदे व नामदेव पवार यांनी त्यांच्या पत्नीचे केस धरून तिच्या डोक्यावर लिंबू कापून ते ओवाळून टाकले म्हणून मारोती खडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. भूत काढण्याच्या नावे बाहुलीत सुया खुपसणे, छडीने फटके मारणे, असे कृत्य करणार्‍या पासष्टवर्षीय लताबाई खेडकर यांच्यावर शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रवीण जाधव यांची आई आजारी असताना, वैजनाथ म्हेत्रे याने ‘आईचे औषधोपचार करू नकोस, करणी काढल्यावर ती बरी होईल,’ असे सांगितले. घरातून बाहुली, बांगड्या, मडक्याचे तुकडे, केस वगैरे साहित्य काढून दिले व ‘बंधन’ करतो, असे सांगून पंचवीस हजार रुपये घेतले. औषधोपचार न केल्याने जाधवांची आई त्या आजारपणात दगावली; त्यानंतर म्हेत्रे यांनी पुन्हा एकदा जाधवांच्या घरातून बाहुली, बांगड्या इत्यादी गोष्टी काढून पुन्हा एकदा ‘बंधन’ न केल्यास घरातील अजून एक माणूस मरेल, अशी भीती दाखवली. डोळे उघडलेल्या जाधवांनी वैजनाथ म्हेत्रे यांच्याविरुद्ध तक्रार केली व गुन्हा दाखल झाला.

भारत जायभाये यांच्या घरी एक दिवस एक स्कॉर्पियो गाडी येऊन थांबली. त्यातून त्यांचा शेजारी राहणारा चुलतभाऊ अश्रुबा व इतर सहा- सात जण उतरले. अश्रुबा यांनी, ‘तू माझ्या बायकोवर करणी करतोस,’ असा आरोप भारत जायभाये यांच्या वडिलांवर केला. सर्वांनी त्यांना भंडारा लावून लिंबू वगैरे कापले व सांगितले की, ‘तुला करणी येते का, ते बघण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामाच्या मंदिरात जायचे आहे.’ मारहाण करत त्यांना गाडीत बसवण्यात आले. दोन तासानंतर अशोक यांना, वडील धारूर गावाच्या एस.टी. स्टँडवर असल्याचे समजले व ते जाऊन वडिलांना घेऊन आले. ‘स्कॉर्पियो’त बसून करणी काढायला जाणं ही गोष्ट, आपलं जीवन विसंगतीने किती भरलेले आहे, याची निदर्शक आहे. विज्ञानाची सृष्टी हवी; पण विज्ञानाच्या दृष्टीचा मात्र पूर्ण अभाव!

गतिमंद असलेल्या राणीची केस मन हेलावणारी आहे. सुरुवातीला जेवण, संडास, लघवी हे देखील राणीला समजत नसे. डॉक्टरांकडे उपचार चालू झाल्यानंतर तिच्यात थोडा फरक पडला होता. गावातील दिलीप रोकडे याच्यामध्ये दैवी शक्ती असल्याचे समजल्याने राणीला बरे करण्यासाठी तिच्या आईने रोकडे यास घरी बोलावून घेतले. राणीला आठ दिवसांत संपूर्ण बरे करण्याचे आश्वासन रोकडेने दिले व रात्री राणीला घेऊन त्याच्या घरी बोलावले. राणीचे वडील शिक्षक आहेत. रात्री आठच्या सुमारास आई-वडील दोघे राणीला घेऊन रोकडेच्या घरी गेले. ओढ्याकाठी लिंबू कापावे लागेल, असे सांगत रोकडे राणीला घेऊ अंधारात बाहेर गेला. राणी परत आली तेव्हा तिची सलवार उलटी घातलेली होती. तपासणी केल्यावर राणीच्या आईच्या लक्षात आले की, तिची अंतर्वस्त्रे व मांड्यांवर रक्ताचे डाग पडलेले होते. लिंबू उतरविण्याच्या नावे ओढ्याकाठी नेऊन, रोकडेने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले व त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अगतिकता माणसाला अंधश्रद्धेकडे नेते, अशावेळी वैज्ञानिक मनोभाव परिस्थितीचा स्वीकार करण्याचे बळ देतो; परंतु शिक्षक असलेले वडील हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांच्या समोरील अडचणीचे विश्लेषण करू शकले नाहीत व त्यांनी स्वतःच्या हाताने मुलीला संकटात ढकलले.

भूत उतरविण्याच्या बहाण्याने मारहाण करणे, अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती उत्पन्न करणे, करणी- भानामती या नावाने जादूटोणा करणे, ही कृत्ये जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा आहेत, हे आता सामान्य नागरिक व पोलीस या दोघांच्याही ध्यानात येऊ लागलंय!