“मित्रहो, प्रत्येक वक्त्याला वेळ कमी असल्यामुळे भाषणाच्या अगोदर जो दळणाचा कार्यक्रम असतो, तो मी क्रॉस केला. डायरेक्ट बोलूया भाषण आता. आपण ज्या गंभीर विषयावर चर्चा करीत आहोत, ‘असहिष्णुता : आव्हान व उपाय.’ मी दोन टप्प्यात हा विषय मांडणार आहे. कारण जो समाज, जो देश जातीय विषमतेवर उभा असतो, स्त्री – पुरुष भेदाभेदावर उभा असतो, धर्मा-धर्मातील भेदावर उभा असतो, गरीब-श्रीमंत भेदावर उभा असतो, तो मुळातच असहिष्णू असतो. तेव्हा असं समजायचं कारण नाही, की असहिष्णुता आजच वाढलेली आहे. आपण ज्या काही बर्या-वाईट परंपरा घेऊन निघालेलो आहोत, त्यात असहिष्णुतेची एक परंपरा आहे. तुम्ही देशातल्या कोणत्याही कालखंडामध्ये जा, जरा इतिहासाची पानं उलगडून पाहिली असता तुम्हाला तिथे असहिष्णुता सुध्दा दिसेल. तुम्ही पुराणात जा. असहिष्णुतेचा जो अंश आहे, तो प्रत्येक प्रकरणामध्ये झिरपत-झिरपत पुढे जातो. ‘रामायण’ काळामध्ये ज्या एका शूद्राने, ज्ञानसंपादनाचा प्रयत्न केला आणि त्याचं मुंडकं उडवलं गेलं. ही काय असहिष्णुता नव्हती? की होती? एका असहाय स्त्रीच्या, वस्त्रहरणासाठी, शंभर-सव्वाशे कौरव एकत्र येतात, ती असहिष्णुता होती का, नाही? नात्या-गोत्याचा विचार करू नका, रक्त सांडा आणि विजय मिळवा,’ हा गीतेतला उपदेश असहिष्णू आहे की नाही ? ‘युद्ध कर!’ किती मोठी असहिष्णुता आहे! तू बाप बघू नको, आई बघू नको, बहीण बघू नको; युद्ध कर! आणि हे युद्ध धर्माच्या तोंडून वदवून घेतलं होतं. धर्माच्या नावाने स्पॉन्सर केलेली असहिष्णुता-असहिष्णुता म्हणजे ते आहे. जातिभेदावरून एका मोठ्या समूहाला वर्षानुवर्षे छळत आलेले आहेत. त्यांची पिळवणूक करत आहेत; मग तो देव असेल, साधू असेल, माणूस असेल, तो विचारवंत असेल किंवा तो अजून कुणी असेल, त्याचा सातत्याने झालेला छळ, हे असहिष्णुतेचे उदाहरण आहे की नाही? आणि महाराज आत्ता बोलता-बोलता पंढरपूरपर्यंत आले. पंढरपूर हे संतांचं, वारकर्यांचं ठिकाण असेल-नसेल मला काही माहिती नाही; पण ते असहिष्णुतेचं सर्वांत मोठं केंद्र होतं, हे पण मान्य करायला पाहिजे. ज्या साने गुरुजींनी मंदिरप्रवेशासाठी तिथे लढाई केली, त्याचवेळेला हे साने गुरुजी उद्या महारा-मांगांना घेऊन देवळात येतील, विठोबा भ्रष्ट होईल म्हणून त्या विठोबाचा पंचप्राण काढून घेतला! कुणी घेतला महाराज? कुणी घेतला? धारूरकर शास्त्रीने घेतला अन् तो नेऊन ठेवला कुठे? एका बाटलीत. त्या वेळेला ‘बिसलेरी’ नव्हती; साधी बाटली होती. त्याच्यात पाणी ओतलं आणि घरातल्या पडवीत ती बाटली, अशी ठेवून दिली. मी जेव्हा पंढरपूरला गेलो आणि मला कळलं, कारण त्यांनीच जाहीर केलं. साने गुरुजींनी आंदोलन केल्यापासून विठ्ठल तेथून पळून गेला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरी पूजा झाली तरी तो काय येत नाही. येडाय काय? तो येतच नाही. धारूरकर आणि कंपनीने प्रचार केला, तिथे आता फक्त मूर्ती आहे भुसा भरलेली, खरा विठ्ठल बाटलीत आहे. त्यामुळं बाटली इतकी महत्त्वपूर्ण का झाली, मला कळत नव्हतं. तिला अध्यात्माचं स्वरूप का आलं, हे पण मला कळत नव्हतं. आणि जेव्हा मी पंढरपूरमध्ये गेलो, मला सांगण्यात आलं की, ’दर्शनाला चला!’ मी म्हटलं, ‘आम्ही काही साधे भक्त नाही हो! आम्ही कळसवाले भक्त आहोत. आमचा विठोबा कळसातून उगवतो. तिथून ‘टाटा – बाय-बाय’ करतो आणि निवांत मागे येतो! मग मी धारूरकर शास्त्रींच्या घरी गेलो. खरा ओरिजिनल, गॅरंटी, वॉरंटी व एक्सपायरी डेट असलेला विठोबा बघायचा होता. बरोबर ना महाराज? आणि तिथं तो शास्त्री जिवंत होता. त्याने ओळख करून दिली. हे खूप मोठे पत्रकार आहेत, लेखक आहेत. त्यालापण बरं वाटलं. उठला! पडला होता असा खाटावर! म्हातारा झाला होता. पाणी दिलं. ‘चहा पाहिजे का?’ मी म्हटलं ‘नको!’ कारण शास्त्रीकडचा चहा घेतला की नळ लवकर उलटतो, डेंग्यू होतो. आपण कधी शास्त्रीच्या घरी चहाच पित नाही. तुम्हीपण पित जाऊ नका. मग मी प्रश्न विचारला, ‘शास्त्रीबुवा, विठ्ठल कुठे आहे? त्याचं परीक्षण घ्यायला आलोत. मी असा जरा देवळाला हात लावला. हे काय तिथं पडवीवर बाटलीत आहे ! आईशप्पथ मी ती बाटली हातात घेतली, खाल-वर हात फिरवला! पुन्हा अशी बाटली ठेवली, इतकं भारी ‘विठ्ठलदर्शन’ कुणाला पुन्हा झालं नसेल! विठोबा मुठीतच आला माझ्या! मग मला पोचवायला म्हणून तो बाहेर आला. जतीनभाई, आणि बोलता बोलता म्हणाला, ‘तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहात, तुमचं नाव नाही सांगितलं!’ आणि नाव विचारल्यानंतर आईशप्पथ, पोटात असा गोळा आला ! ज्याअर्थी मी नाव सांगितलं की, ते मरणार! आता त्याला कुणी विठोबा वाचवणार नाही! कुणी रुक्मिणी वाचवणार नाही ! गेला असता की नाही? पण माझ्याबरोबर जो मित्र होता तो जोशी होता! मी त्याला म्हटलं, “माझी सगळी माहिती जोशींच्याकडे आहे आणि सगळ्या कुंडल्या जोशींच्याकडेच असतात! कधी आठवण झाली, कुडमुड्या जोशी नाही मिळाला की, हा बघ. याच्याकडे आहे.
‘कार्ड तरी द्या!’ मी म्हटलं, कार्डची काही गरज नाही. मी जातो!
किती मोठी असहिष्णुता आहे ही ! लाखो, कोट्यवधी लोक ज्या आस्थेने पंढरपूरमध्ये येतात तो विठोबा, दुसराय म्हणून सांगायचं आणि ओरिजिनल विठोबा बाटलीत आहे म्हणून सांगायचं! शास्त्री खूप-खूप दिवस जगले आणि ते जगतातच. त्यांना काय प्रॉब्लेम नसतो. ती बाटली तिथंच आहे. धार्मिक क्षेत्रातील ती सर्वांत मोठी असहिष्णुता होती, जी आपण काल- परवापर्यंत पाहत होतो. मी निदान असं केलं, भारतीय समाजरचना जातीवर, भेदावर उभी असल्यानं जातिव्यवस्थेचं पहिलं लक्षण असहिष्णुता तयार करणे, त्यामुळे असहिष्णुतेविरुद्धची लढाई, ही एका अर्थाने जातिअंतासाठी चाललेली लढाई आहे. ही भेदा भेदाविरुध्दची चाललेली लढाई आहे आणि जिथे भेदावर समाज आहेत, तिथे सगळ्या प्रकारच्या असहिष्णुता सगळ्या धर्मात आहेत. असं समजू नका की हिंदू धर्मातच आहेत आणि मुस्लिम खूप सोवळ्यातले आहेत, ख्रिश्चन खूप सोवळ्यातले आहेत, तिथेपण देव फासावर टांगलेले आहेत; इकडे पळवून लावलेले आहेत. इकडं-तिकडं काहीतरी झालेलं आहे. जिथे भेद आहे, तिथे असहिष्णुता आहे. त्यामुळं मी अंनिसला पहिल्यांदा धन्यवाद देतो. त्यांची आजची परिषद ही गेल्या चार वर्षांत काय घडत आहे, त्याचा अर्थ समजून घेणारी अशी परिषद आहे. तसंच हे जातिअंताकडं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि दाभोलकर त्यांच्या शेवटच्या चरणामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व देत होते आणि ते सांगत होते, की जात ही एक मोठी अंधश्रध्दा आहे.
आता गेल्या साडेचार वर्षांत असहिष्णुता वाढली म्हणजे काय-काय झाले? आणि ते कोणत्या-कोणत्या क्षेत्रात झाले? पहिल्यांदा सामाजिक क्षेत्रापासून आपण सुरुवात करू. कारण माणूस समाजात राहतो. या समाजक्षेत्रामध्ये गेल्या साडेचार वर्षांमध्ये शूद्र पोराने मिशी राखली म्हणून त्याची हत्या झाली. शूद्र बाई दांडी खेळायला गेली, कुठलं ते दांडिया का? हां, आपल्याला एकच दांडी माहीत आहे. हे असलं काही माहीतच नाही आपल्याला. दांडिया खेळायला गेली म्हणून तिला मारलं ! प्रेमविवाह केला म्हणून हत्या झाली. घोड्यावर बसून मिरवणूक काढली, हत्या झाली. लग्नानंतर वरातीचं प्लॅनिंग केलं, हत्या झाली. एका लेखकानं पुस्तक लिहिलं, ‘ऑनलाईन स्यूसाईड’ झाली त्याची. सामाजिक क्षेत्रात काय घडत होतं ? आणि याच काळामध्ये ज्या पुरातन, सनातन गोष्टी इथल्या पुरोगामी चळवळीने अनेक वेळेला गाडण्याचा प्रयत्न केला, ‘मनुस्मृती’ जाळण्याचा प्रयत्न केला, जाळली, या सगळ्यांची थडगी उकलण्याचा कार्यक्रमसुध्दा साडेचार वर्षांत मोठ्या प्रमाणात झाला. कुठल्या थडग्यात मनू सापडला, कुठे अजून काहीतरी सापडलं, कुठे हाडं सापडली, कुठे नळ्या सापडला, कुठे काय सापडलं आणि त्याचा वापर करून सामाजिक क्षेत्रामधली अतिशय टोकाची, अतिशय विषमतापूर्वक असहिष्णुता जन्माला आली. लोकांना कळतच नव्हतं, मिशी राखली, तर असा काय गुन्हा होतो? जेव्हा आम्ही इतिहासाची पानं चाळत जातो, की या समाजामध्ये, याच देशामध्ये 78 टक्के लोकांना मिशी राखण्याचा अधिकारच नव्हता. बरं झालं गुरुजी, तेव्हा तुम्ही जन्माला आले नाही! हे कुठून येत होतं? हे काही आज उगवलं नव्हतं! हे तिथून इकडं येत होतं. दलितांच्या बाबतीत असहिष्णुता, स्त्रियांच्या बाबतीत असहिष्णुता. कारण केरळसारख्या राज्यामध्ये चाळीस-पन्नास वर्षे स्त्रियांना स्तनांवर टॅक्स देण्याची पद्धत होती. इथेच! ‘सारे जहाँसे अच्छा!’ आणि धोक्यात आलंय म्हणे! मला तर वाटतं रोज धोक्यात होतं! असलं आपल्याला नकोच आहे. या असल्या गोष्टी जोपासणारी व्यवस्था आम्हाला नकोच आहे. ती धोक्यात आली काय? अन् गेली काय? अन् तिची शोकसभा झाली काय? कुछ नहीं बिगडनेवाला! साडेचार वर्षांत सार्वजनिक पातळीवर काय-काय चाललं होतं? गाडल्या जाणार्या जाती उकरून-उकरून काढल्या जात होत्या. जातपंचायत एकदम शार्प झालेल्या होत्या. जेवढी माणसं रोगात मरतात तेवढी जातपंचायतीत मरत होती. जेवढी माणसं कोर्टात फाशीची शिक्षा घेतात, तेवढी जातीच्या कोर्टात मरत होती. हे का घडत होत असं? सामाजिक क्षेत्रामध्ये? धार्मिक क्षेत्रामध्ये धर्माची नवीनच व्याख्या आणायला लागले आणि जी व्यवस्था आपल्याला सांगत होती, धर्म आणि राजसत्ता दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, ते सगळे भगवे घातलेले, ते सगळे माया जपणारे, ते सगळे यज्ञ घालणारे, जे सत्याला शिव्या देत होते, तेच निवडून सत्तास्थानावर गेले. आपल्या देशात पहिल्यांदा असं घडत होतं. सत्ताधारी, भांडवलशाही आणि धर्मशाही मिठ्या मारत एकमेकांच्या गळ्यात कितीतरी वर्षांनी ते पडलेले आहेत. कसं काय? राज्यघटनेनं कुठं सांगितलं होतं? बुवांनी – बायांनी निवडून जावं तिथे म्हणून? ते गेले निवडून आणि तिथे गेल्यानंतर त्यांना जे काही करायचं होतं, तेच त्यांनी करायला सुरुवात केली. माणसाचं अवमूल्यन जे व्हायला लागलं…. कसापण माणूस मरतो आहे. एक समूहच माणसाची कत्तल करतो? कारण काय? संशय! संशयावरून माणूस माणसाला मारतो? तो चोर असेल, ती वेश्या असेल, तो गुन्हेगार असेल! नुसता संशय घ्यायचा आणि कत्तल करायची आणि हे जे कत्तल करतात, यापैकी कुणालाही अद्याप अटक झालेली नाहीए. स्वामी अग्निवेशवर हल्ला करणार्याला पण अटक झालेली नाही आणि ज्यांनी ‘मॉबहत्या’ केल्या त्यातल्या एकालाही शिक्षा झालेली नाही. कारण बाबासाहेबांनीच सांगितलं होतं, ‘जेव्हा समाजच हातात कायदा घेतो, तेव्हा कुणालाही आरोपी करून शिक्षा देता येत नाही.’ समाज आरोपी होण्याकडे का चालला मग? का चालला? असं कोणतं टॉनिक त्याला मिळायला लागलेलं आहे की तो ते पितो आणि गुन्हेगार व्हायला निघालेलाय तो? देवा-देवात भांडणं गेल्या साडेचार वर्षांत लागलेली आहेत. तेवढी इतिहासात केव्हा भांडणं नाहीयेत. गेल्या साडेचार वर्षांमध्ये लागले. महत्पुरुषांची विटंबना करण्याचे जेवढे प्रकार गेल्या साडेचार वर्षांत झाले तेवढे फुले, शाहू, आंबेडकर, गांधींच्या काळात देखील झाले नसतील. पुतळ्याचं मुंडकंच तोड, पुतळ्याचा हातच तोड, पुतळ्याला भगवाच लाव, गांधीजींच्या चपलाच पळवून ने, त्यांची शेळीच गायब कर, त्यांची खादीच गायब कर, खादीचं नावच बदल हे जे करण्याचं ‘सामर्थ्य’ माणसांमध्ये येतं, सामान्य माणसांमध्ये. कारण वरचे लोक हे कोण करत नाहीत. वरचे लोक ‘बत्ती’ पेटवतात आणि खालचे लोक जळून जातात. त्या मेणबत्तीसारखं आहे ते. त्या दिव्यावर झडप घालणार्या पाखरासारखं आहे. काय म्हणतात त्याला ? परवाना…… परवान्याला कधीच कळत नाही, आपलं मरण आहे तिथं ! एक समूह मानसिकता बदलण्याचा प्रयत्न गेल्या साडेचार वर्षांत झाला. धर्माच्या नव्या नव्या कल्पना आणि कळत नाही आज, आपल्याला दिल्ली सरकार कोण चालवतं? खरोखर मोदी पंतप्रधान आहेत? की रेशीम बागेतून कुणीतरी ऑर्डर सोडायला लागलेला आहे? अरे तुम्हाला परवाना कुणी दिला? तुम्ही कोण आहात आमचे? ‘यू आर अनरजिस्टर्ड इन्स्टिट्यूशन!’ णपीशसळीींशीव! विजेचं बिल भरलं नाही, तर बत्ती गुल होते आपली, आणि अवैधपणे संस्था चालवून काहीही बोलायला लागलात, त्याला काही होतच नाही! त्याचं कारण सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. भांडवलशाहीबरोबर त्यांची मैत्री झाल्यामुळे संपत्ती त्यांच्या ताब्यात आहे. आणि धर्मशाही त्यांची बटीक झाल्यामुळं ती पण त्यांच्या ताब्यात आहे. म्हणून आत्ता चर्चा करत आहोत. अशी परिस्थिती यापूर्वी आलेली नव्हती. कारण या तिन्ही आघाड्या प्रत्येक वेळेला स्वतंत्र-स्वतंत्र राहायच्या. आम्ही सुविचारच केलेले होते. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकमेकीला कधी भेटू नये. सरकार सेक्युलर पाहिजे. म्हणजे ‘सेक्युलर’ असलेल्या राज्यघटनेची शपथ घेऊन आत जायचं आणि आत गेल्यानंतर, ‘नॉनसेक्युलर’ कारभार सुरू करायचा. सब उल्टा हो गया! “मैं राज्यघटनाकी शपथ लेता हूँ” आणि बाहेर आल्यावर आणि आतसुद्धा, बरोब्बर नॉनसेक्युलर वर्तन करायचं! हे काय होतंय याचा मला प्रश्न पडलेला आहे. हे इतकं उघडपणे का होतं? आणि कुठे-कुठे झालंय? हे सगळीकडं झालेलं आहे. हे राजकारणामध्येच झालं का? प्रशासनात काय झालेलं आहे?
‘राधेमाँ नाव माहीत आहे का ! कोण आहे ती?’
‘डॉक्टर’…?
‘आणि दुसरा एक साधू झालेला तो कोण होता? आणि ते नाही…’
‘लुगडं नेसून फिराय लागला कोण तो ?…’
‘अरे ….नाही….नाही…’
‘अरे तो पोलीस खात्यातला सगळ्यात मोठा अधिकारी होता. जे ‘नॉनसेक्युलॅरिजम’ तिचादेखील मुडदा पडला. राम-रहीम कसा जन्माला आला? आसाराम कसा तुरुंगात गेला? आणि सगळे जे झालेले आहेत, हे नव्वदीनंतरचे तयार झालेले आहेत आणि गेल्या 2014 पासून यांना जबरदस्त प्रतिष्ठा मिळायला लागलीय. ती देणारे आपणच आहोत. ती देणारे कोण आहेत? त्यांना जाळं कोण देतं? त्यांना आश्रम कोण बांधून देतं? त्याच्या पायाला हात लावण्यासाठी पाच हजार रुपये कोण देतं? त्याच्या गळ्यात हार घालण्यासाठी लाख रुपये कोण देतं? हे जी विचार करणारी जी मंडळी होती, ही बुद्धिजीवी मंडळी होती. ती सगळी या व्यवस्थेमध्ये ‘इनअॅक्टिव्ह’ व्हायला लागली. निष्क्रिय व्हायला लागली. का निष्क्रिय व्हायला लागलीत ? कारण व्यवस्था इतकी जबरदस्त होती, की आपलं काही चालणारच नाही. ‘कुछ होनेवाला नहीं है। ‘डिप्रेशन’मध्ये जायला लागलीय. त्यामुळे पहिली जबाबदारी अशी आहे, ‘डिप्रेशन’मध्ये जाऊ पाहणारे, हरणारांच्या तंबूमध्ये जाऊ पाहणारे, या व्यवस्थेला शरण जाऊ पाहणार्या माणसाला पहिल्यांदा बाहेर काढायचं; फक्त आणि फक्त आपणच जिंकू शकतो. कारण यश आपलंच असतं. ’ते’ जिंकतील, असं वर्तनच करायचं नाही आपल्याला. आपल्या वर्तनात बदल पडला की ते जिंकतात. त्यामुळे आपल्या वर्तनामध्ये पहिल्यांदा बदल केला पाहिजे. आणि तो बदल करायचा असेल, तर आहे त्या परिस्थितीमध्ये या लोकांच्या विरुद्ध ‘हत्यार घेऊन’ लढणं म्हणजे आपण आपल्या विचाराविरुध्द लढण्यासारखे आहे. डॉ. बाबासाहेबांना माहीत होतं, उद्या ही राज्यघटना जन्मास आल्यानंतर, इथला जो शंभर कोटी वर्ग आहे, तो गरीब आहे, दुबळा आहे, वंचित आहे, मागासवर्गीय आहे, आदिवासी आहे. याला व्यवस्थेच्या विरूद्ध हत्यार घेऊन लढायची काही गरज नाही. कारण सगळ्या हत्यारांची बाप असलेली राज्यघटना त्यांनी आपल्या हातात दिली आहे आणि राज्यघटनेइतकं धारदार हत्यार दुसरं कुठलं नाहीच आहे! राज्यघटनाधिष्ठित एक समाज तयार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ते धर्माधिष्ठित समाज तयार करायला निघालेले आहेत. ते देवाधिष्ठित समाज तयार करायला निघालेले आहेत आणि सामान्य माणसाला मतिमंद, गतिमंद, स्थितिमंद करायला निघालेले आहेत. म्हणून आज या विषयावर आपण चर्चा करत आहोत. ही जी आव्हाने आहेत, त्याच्यावर उपायपण आहेत. काहीही झालं तरी आपण हिंसेच्या मार्गाकडे जाता कामा नये. हिंसेतून मिळालेले विजय, तात्कालीक विजय असतात आणि विचारांतून मिळालेले विजय अजरामर असतात, जगाच्या इतिहासामध्ये. तुम्ही जगाचा इतिहास काढा ना! तुम्ही जगाचा कोणताही इतिहास काढून मला सांगा. हुकूमशहाचा विजय खूप कमी काळाचा विजय असतो आणि लोकशाहीवाद्यांचा विजय दोनशे, तीनशे, चारशे वर्षे चालत-चालत लोकशाहीच्या रुपाने आपल्यापर्यंत पोचतो. त्यामुळं शस्त्राला शस्त्र उत्तर नाहीए. तसं असतं तर बाबासाहेबांनीच एक घातक शस्त्राचे कारखाने सरकारला काढायला सांगितले असते आणि रेशनकार्डाबरोबर एक शस्त्रपण दिलं असतं. त्यांनी तसं नाही केलं. विचार दिलेला आहे आणि असहिष्णुतेच्या विरोधात लढायांसाठी आपला विचार कसा घासा-पुसायला पाहिजे! आपला विचारांवर विश्वास पाहिजे. अगदी काल-परवापर्यंत मी अंनिसच्या सर्व कार्यक्रमांमध्ये नियमित सांगत आलो की, आपल्या जगाच्या पाठीवर, पनामा आणि इक्वॅडोर ही दोन छोटी राष्ट्रं आहेत. जतीनभाई, आपको मालूम होगा, अमेरिकेनं तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती बळकावण्यासाठी, जगातल्या महाकाय एन.जी.ओ. सोडल्या. सैन्य दिलं त्यांच्याकडं आणि ‘पनामाला लुटा! त्यांना लुटा! नाही लुटलं तर त्यांचे सरकार पाडा. त्यांच्या अध्यक्षांची हत्या करा.’ दोन्ही अध्यक्षांचा मृत्यू उडत्या विमानात झालेला आहे. हा काही योगायोग नव्हता. इक्वॅडोरचा अध्यक्ष कुठं मेला? वर विमानात! पनामाचा कुठं मेला? वर विमानात! आणि त्या विमानात आम्ही त्यांना मारलं हे सांगणारं पुस्तक चाळीस वर्षांनी एका माणसानं लिहिलं. ‘एका आर्थिक गुन्हेगाराचा कबुलीजबाब’ या पुस्तकात हे त्यानंच लिहिलंय. या दोन्ही देशातल्या लोकांना शस्त्राच्या जोरावर नमवायचं होतं; पण हे दोन्ही देश, शस्त्राच्या विरोधात विचार घेऊन जात होते. आणि तो जो ओमर होता, पनामाचा अध्यक्ष, बरोबरंय ना? उमर! काश्मीरचा उमर अब्दुल्ला नव्हे. ते एक वेगळंच प्रकरण आहे! तिकडं जायचं नाही आपल्याला. हा भारी होता. हा डुप्लिकेट आहे. काश्मीरवाला अब्दुल्ला बहोत खराब आदमी! जेव्हा उमरला कळलं की, आज ना उद्या आपली हत्या होणार आहे, सगळं असहिष्णुतेचं वातावरण तयार केलं अमेरिकेनं. बाकी महासत्तांनी तेव्हा त्यांना त्यांचे दूत सांगत होते, ‘आज हो म्हण नाही, तर मरशील, उद्या हो म्हण नाही तर मरशील!’ जेव्हा मृत्यू येतोय असं त्याला दिसलं, त्यावेळेला त्याने सगळ्या पनामामध्ये एक ‘होर्डिंग कॅम्पेन’ चालवली. आपल्याकडे असतात की नाही होर्डिंग? सासू मेली..होर्डिंग! बैल मेला …होर्डिंग! कुणाला कुत्रा चावला….होर्डिंग! च्यायला, होर्डिंगची इज्जतय का काही? होर्डिंग पडणारंय! सब खराब हो गया होर्डिंग! तर त्याने होर्डिंगची कॅम्पेन केली आणि प्रत्येक होर्डिंगवर त्याचा फोटो आणि एकच वाक्य लिहिलेलं होतं. ते वाक्य काय होतं? ते वाक्य असं होतं ‘माणसाची स्वप्नं मारणारी क्षेपणास्त्र अजून कोणी जन्माला घातली नाहीत!’
त्यामुळं हा जो आपला सहिष्णुतेचा जागर आहे, हा जो आपला असहिष्णुतेला विरोध आहे, हा विचारांच्या पातळीवरच चालला पाहिजे. माझं पण परखड तेच मत आहे. कारण शस्त्र प्रश्न सोडवत नाहीत. तर शस्त्रं माणसाला मारतात आणि माणूस मेला की प्रश्न सुटत नाही, तयार होतात. धर्मांनी तयार केलेली असहिष्णुता, भांडवलशाहीने तयार केलेली असहिष्णुता आणि सरकारांनी तयार केलेली असहिष्णुता एकदम एकगठ्ठा आल्यामुळं ती खूप वाढली, असं आपल्याला वाटतं आणि ती वस्तुस्थिती पण आहे. समाजजीवनात आहे, अर्थकारणात आहे. शेतकरी आत्महत्या करतात याचा अर्थ माणूस स्वतःविषयी देखील असहिष्णू झाला. नाही तर तो मरतो कसा? स्वतःविषयीचं प्रेम कमी झालं, स्वतःविषयीचा आदर कमी झाला, स्वतःविषयीचं महत्त्व कमी झालं, जगण्याची इच्छा संपली इतका तो असहिष्णू बनला आणि आत्महत्या करून बसला. तरुण आत्महत्या करतात? आदिवासी मुलं आत्महत्या करतात? बाया आत्महत्या करतात? मरतात माणसं मुंग्यांसारखी! आणि मी सातत्यानं प्रश्न विचारतो, हा देश कुणाचाय? तो ‘इंडिया’ असो नाही, तर भारत असो. हा देश कुणाचाय? हा मरणार्यांचा की जगणार्यांचा देश आहे? हे पहिल्यांदा ठरवा. हा देश कुणाचा? मरण्याचे मार्ग असंख्य झालेले आहेत. आणि जगवण्याचे मार्ग कमी-कमी झालेले आहेत. कारण या तीनही गोष्टी एकत्र आल्यामुळे असहिष्णुतेचं स्वरूपदेखील भडक झालेलं आहे. ते पूर्वी निवेदनं काढायचे, आता डायरेक्ट गोळीच घालतात. आम्ही जेव्हा चळवळीत होतो तेव्हा निवेदनं काढायचो. काही तर मूकमोर्चा काढायचे. आतापण मूकमोर्चे निघतात; पण ते वेगळ्या कारणाने. त्याच्यावर काही चर्चा करू नये. आजपण निघाला होता एक. माझा मुद्दा असा आहे, माणसाचं जीवन कुरुप करण्याचं काम असहिष्णुता करत असते. आपलं जीवन कुरुप झालं की, समाज कुरुप होतो. समाज कुरुप झाला की देश कुरुप होतो. जर यांना सुंदर ठेवायचं असेल, सुरूप ठेवायचं असेल तर ही जी असहिष्णुतेची आव्हानं तयार झालेली आहेत, ती विचारांनी, ती संघटना पातळीवर, ती सगळ्यांना एकत्र घेऊन! मला हे अंनिसचे कार्यक्रम बघितल्यावर अजून एका गोष्टीचा आनंद होतो. खरं म्हणजे जे-जे सगळे ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट’चे लोक असतात ना, ते अंनिसच्या व्यासपीठावर एकत्र येतात. मला अनेकदा मोह होतो की साला, यांचे राजकीय ऐक्य होण्यासाठी सुद्धा अविनाश पाटीलने पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण 19 जवळ आलेला आहे. हा मला मोह होतो. मी काही बोललो नाही अन् मी खासगीत तर अजिबात काही बोललो नाही. काय बोलायचं ते पब्लिकनं बोलायचं म्हणून मी नाही बोललो. एक ताकद आहे त्या विचारांमध्ये. सगळ्यांना का असं वाटतंय ते व्हावं असं? ते का अटी घालत नाहीत? ते का शंका घेत नाहीत? तर असं एक सुंदर ठिकाण तयार झालेलं आहे की, विश्वासानं आपल्याला तिथं जावंसं वाटतं!
शेवटचा मुद्दा, असहिष्णुता जेव्हा तयार होते, तेव्हा मानसशास्त्रीय पातळीवर अनेक गोष्टी घडतात. आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे सगळा समाज हळवा बनायला लागतो. त्याला हळवं केलं जातं. हळवा का ? अर्र..त्या पुतळ्यावर रंग पडला….! अर्र….पुतळा कुरुप झाला…..! अर्र…. देवाच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट गेला…..! जाऊ दे ना…. देवाने कुठे रोजगार हमीवर जाऊन तो आणला होता? आणलाय एका तरी देवाने? हे सगळे ऐतखाऊ लोक आहेत. कुणी सोन्याचा मुकुट देतंय, कुणी चांदीचा मुकुट देतंय, कुणी घंटी देतंय, कुणी काय देतंय ! समाज हळवा होतो! आणि हळवा बनणारा समाज आपला देश, आपला समाज कधी कणखरपणे, कधी निष्ठूरपणे उभा करू शकत नाही. सगळी ताकद त्याच्या हळवेपणामध्ये खर्च होते. माझ्या डोळ्यासमोर एका सुंदर समाजाचं स्वप्न आहे. इथे बसलेल्या सर्वच लोकांच्या डोळ्यांसमोर ते स्वप्न आहे की आम्हाला समाज कसा पाहिजे आहे ? आम्हाला विषमतामुक्त समाज पाहिजे आहे. आम्हाला धर्मनिरपेक्ष समाज पाहिजे आहे. त्यामुळे अशासारख्या ठिकाणी आपण ठरावपण करायला पाहिजे. कोणतापण मंत्री सरकारी पैशात देवदर्शनाला जाणार नाही. कोणत्यापण मंत्र्याला देवदर्शनाला जाताना बंदोबस्त दिला जाणार नाही. त्याला सरकारी विमान नाही मिळणार! ‘तुझा देव आहे तर तुझा तू जा ना! स्वखर्चानं!’ इथे तसं नाहीए. माणूस मंत्री झाला ना तर समाजाच्या पैशावर जगाय लागतो. सरकारच्या पैशावर जगाय लागतो. याच्यातून मेसेज काय जातात ? हिंदू राष्ट्रपती असेल तर फक्त हिंदू देवस्थान करणार, मुस्लिम राष्ट्रपती असेल तर दर्ग्यावर चादरी टाकीत जाणार. ख्रिस्ती असेल, ‘ओ गॉड ब्लेस मी!’ आपल्या या मागण्या असायला पाहिजेत. आपण मागण्याच करत नाहीत. आपण चांगला लोकशाहीवादी नागरिक व्हायचा कधी प्रयत्न करीत नाही. आपल्याकडे राज्यघटनासाक्षरता नाही. काहीही फडतूस वाचतो हो आपण! ‘प्रिअंबल’चा अर्थ समजून घेत नाही. किती अडाणीपणा वाढवायचा? आणि त्याचा परिणाम असा होतो जो अडाणी असतो ना, तो या सांस्कृतिक युध्दामध्ये पहिल्यांदा मारला जातो. तेव्हा अडाणीपण फेकून द्या. या सगळ्या चेतना जागवणार्या गोष्टींचा विचार आपण करावा, असं मला वाटतं.