महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशक वर्षपूर्तीनिमित्त आणि मिश्रविवाह व महिला सहभाग विभागाच्या वतीने लातूर येथे 12 जानेवारी रोजी आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहितांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अर्थातच 3 ते 12 जानेवारी या दरम्यान राज्यात झालेल्या महिला सबलीकरण प्रबोधन अभियानाचा हा समारोप समारंभ होता. समितीचा मिश्रविवाह विभागही अतिशय प्रभावी व दखलपात्र असाच आहे. विचार व परिवर्तनाचा हा एक मूलभूत केंद्रबिंदू आहे. समितीच्या वतीने या विभागांतर्गत गेल्या 11 वर्षांत राज्यात सरासरी 600 मिश्रविवाह लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये केवळ सत्यशोधकीच नव्हे, तर आंतरजातीय-आंतरधर्मीय व आंतरप्रांतीय विवाहांचा समावेश आहे. लातूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, वर्धा, धुळे व मुंबई आदी शाखांचा यात लक्षणीय सहभाग आहे. अशा या राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटनही अतिशय हटके व दमदारपणे झाले. दोन आंतरजातीय दाम्पत्यांच्या प्रत्यक्ष सत्यशोधकी विवाहाने या परिषदेचे अनोखे असे कृतिउद्घाटन करण्यात आले, तेव्हा सहभागी नव्या लोकांसह काही निमंत्रित मान्यवरांनादेखील आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक हे मिश्रविवाह विभागाचे राज्य कार्यवाह दिलीप आरळीकर यांनी केले. त्यामध्ये त्यांनी पूर्वस्थिती व सद्य:स्थितीचा आढावा घेत यातील विविध अडसरांसह काही प्रचलित कायद्यांच्या तांत्रिक उणिवा व प्रशासकीय त्रासांची, अनुभवाची माहिती कथन केली, तर भूमिका मांडणीत समितीचे राज्य प्रधान सचिव प्रा. माधव बावगे यांनी संघटना आणि या विभागाच्या नात्यांचा संबंध विश्लेषित केला. ते म्हणाले की, विवेकी विचार रुजविणे हा या मोहिमेचा एक वैचारिक कृतिशील भाग आहे आणि त्यास डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या चिकित्सक अशा डोळस दृष्टीचा भक्कम आधार आहे; तसेच अशा प्रकारचे कार्य हे राष्ट्रसेवा दल, आंतरभारती, आर्यसमाज व मानवलोक या चळवळीदेखील करत असल्याचा विशेष आदरार्थी उल्लेख त्यांनी केला. त्याचबरोबर अशा तरुणांच्या पाठीशी विचारांचे बळ उभे करून, एकट्या लातूर शाखेने 244 विवाहांची स्वतंत्र भागीदारी केल्याचे ते म्हणाले.
उद्घाटनपर भाषणात ‘आंतरभारती’चे प्राचार्य सदाविजय आर्य म्हणाले, परिवारातील स्त्रीचा समान दर्जा व हक्क हीच यशस्वी विवाह आणि परिपूर्ण कुटुंबाची एक पूर्वअट आहे. स्त्रीचा सन्मान व अधिकार दुर्लक्षित झाल्याने, येथील कौटुंबिक अस्तित्व आणि मानवी जीवन हे संकटाकडे वाटचाल करण्याचा धोका निर्माण झाला आहे; मात्र महाराष्ट्र अंनिसच्या या अभियानासह अन्य काही समविचारी संघटना हे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेकडे जाणारा एक हुकुमी महामार्ग त्यांनी आपल्या भारतीय समाजाला दिल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अमर हबीब म्हणाले की, ज्यांना जातमुक्त समाज व राष्ट्र निर्माण करावयाचे आहे, त्यांनी ही नवीन वाट चाललीच पाहिजे. दारिद्य्र हे जात टिकविते म्हणून गरिबीचे निर्मूलन झाले पाहिजे! राज्यात आज अशा प्रकारचे आघाडीवरील काम हे अंनिसचेच आहे; मात्र या अशा विवाहितांच्या प्रक्रियेत, एक फार मोठी गुंडागर्दीची अडचण आणली जात आहे. अगदी पुणे शहरात पण अशा दाम्पत्यास मारहाण होते आणि हे असे काम येथील सर्व कथित संरक्षक ठेकेदार करीत आहेत. यापूर्वीही येथे जात व धर्म नव्हते काय? तर मग एवढी आक्रमकता आताच कोठून व कशी आली? धर्म आणि जात आता डायनासोरप्रमाणे नक्कीच नष्ट होणार आहेत. पुरुषप्रधान व्यवस्था ही आपण सर्वांनी उद्ध्वस्त केली पाहिजे. स्त्री-पुरुषांनी स्वातंत्र्य फुलवावे; अन्यथा दोघांचेही स्वातंत्र्य समतेविना अगदी करपून जाईल. अशा मुला-मुलींना केवळ वयाचीच अट ठेवावी, अन्य बाबींत त्यांना अटकवू नये. येथील जातीसारखे सर्व संकुचित सनातन आग्रह हे आता अखेरच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे येथील स्त्री, शेतकरी, संशोधक, साहित्यिक आदी सर्जकांनी आपले हात एकमेकांत गुंफले तर स्वातंत्र्य अधिक अर्थपूर्ण होईल आणि त्याकरिता येथील परिघ ओलांडणार्यांसाठी अंनिसचा वटवृक्ष हा अधिक बहरत जावा, अशी मनस्वी अपेक्षा अमर हबीब यांनी व्यक्त केली.
उद्घाटनसत्राचा अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष साथी अविनाशभाई पाटील म्हणाले की, संघटनेची लातूर जिल्हा शाखा ही राज्यात अत्यंत आघाडीवर आहे. गेल्या 30 वर्षांत येथे अनेक राज्यव्यापी कार्यक्रम झाले आहेत. येथील उत्साह, क्षमता व परिश्रम हे सर्वत्र अनुकरणीय आहेत. या संघटनेच्या चळवळीचा तीन दशकांचा टप्पा आहे, तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याने साठोत्तरी ओलांडली आहे. जात व धर्माच्या प्राचीन अनेक अडथळ्यांवर मात करत संघटना व कार्यकर्त्यांनी अत्यंत भक्कमपणे कार्यसंभार उभा केला आहे. अशा विवाहाचे कार्य कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज, पुढे कॉ. पानसरे; तसेच पुणे येथे सुगावा विवाह संस्था, आर्य समाज यामधून होत होतेच. पुढे अंनिसचे लोक अशा स्वरुपाचे कार्य करत आहेत. सामाजिक, मानवतावादी, सत्यशोधक, वैश्विक विवाह अशा सर्व चळवळी व केंद्रांना ही संघटना मदत व मित्र म्हणून स्वत: जोडू इच्छिते. असे अनेक विधायक प्रयत्न या संघटनेने चालविले आहेत. आजचा हा मेळावा आणि उद्याच्या परिषदेमधून एक भावी दिशा ठरणार आहे. हल्ली शासन व त्यांच्या संवैधानिक संस्था या केवळ कागदावर बोलतात; मात्र प्रत्यक्ष व्यवहारात त्या मौनी होतात. खुर्चीवरील अधिकारी व यंत्रणाही अत्यंत नकारात्मकता अंगीकारतात. म्हणून गाव व शहरात आपण दबाव आणि प्रभाव गट उभे केले पाहिजेत. मधुकरराव चौधरी, दादासाहेब रुपवते यांसारखे काही लोक हे या विचार व चळवळींचे मोठे समर्थक होते. शनि शिंगणापूरपासून अंनिसने महाराष्ट्रात महिलांच्या नैसर्गिक प्रश्नांवर अत्यंत जिद्द व चिकाटीने तोंड फोडले. पुढे त्यानंतर हाजीअली ते शबरीमलापर्यंत हे लोण पोचले. पुढे अशा सर्व कामांत संघटना अधिक सजग व सक्रियतेने महिलांना आघाडी देणार आहे. पुढच्या टप्प्यातील वाटचालीची आम्ही भक्कम व परिपूर्ण स्वयंतयारी ठेवली असून, निकोप व समृद्ध समाजनिर्मिती हाच आमचा सामूहिक संकल्प आहे, असेही अविनाश पाटील म्हणाले.
या सत्रामध्ये सौ. आशा वाघमारे, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांची समयोचित मनोगते झाली. या सत्रामध्ये जिल्हाध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, शहराध्यक्ष वैजनाथ कोरे यांची विशेष उपस्थिती होती. या उद्घाटन सत्रामध्ये समितीचे हितचिंतक तथा सामाजिक कार्यकर्ते बब्रूवान गोमसाळे व प्रतिभाताई गोमसाळे या दाम्पत्यास सन्मानपत्र व गौरवचिन्ह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बहाल करून, त्यांचा कृतज्ञतापूर्ण जाहीर सत्कार करण्यात आला.
‘आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाह स्वतंत्र पद्धती!’ या विषयावर प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रमुख मांडणी केली. प्रारंभी थोर विचारवंत आणि प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. आ. ह. साळुंखे व कॉ. किशोर ढमाले यांनी महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान समारोप समारंभास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सदिच्छा देताना डॉ. साळुंखे म्हणाले की, या सभागृहात आपल्या संघटनेच्या वतीने सुमारे 10 वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका राज्यस्तरीय परिषदेस स्वत: मी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, निळूभाऊ फुले आदी मान्यवरांसोबत सहभागी झालो होतो. आपला समाज संमिश्र आहे. त्यामुळे त्यास फूट व तडे अधिक गेलेत. त्यास एकात्म करण्याचा हा एक चांगला भाग आहे.
प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, महाराष्ट्रात 19 व्या शतकात प्रबोधनास सुरुवात झाली. पुढे ती संपूर्ण परंपरा डॉ. दाभोलकरांपर्यंत येऊन पोचते. या देशात अशीही एक संस्कृती आहे की, जी तुम्ही माणसामाणसांत विकृतीने वागा, असे सांगते. विषमतेविरुद्ध समतेची, ब्राह्मणी विरुद्ध बहुजन संस्कृती असा हा संघर्ष चालू आहे. लग्न ही खाजगी बाब नाही, हे प्रथमत: आम्हास महात्मा फुले व त्यांच्या सत्यशोधक चळवळीनेच शिकविले. नवकुटुंब हे लोकशाहीचा एक सार्थक आधार म्हणून त्यांना अपेक्षित होते. येथील सर्व मिथ्स व संकेत हे येथील जाती व धर्मव्यवस्थेतून आलेत आणि ते माणूस वा समाजाला प्रतिबंधित-नियंत्रित करतात. 19 व्या शतकात महात्मा फुले यांनी ही विवाह चळवळ सुरू केली. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ती गांधीविवाह या नावाने चालविली. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरूची संकल्पना पुढे आणली. महात्मा फुलेंची परंपरा वैदिक वळणावर जाऊ नये. काही आदिवासींची विवाह पद्धती अत्यंत निकोप व पूरक आहे. अशा सर्व विवाहांना कायद्याने संमती द्यावी, यासाठीच आपल्या सर्वांची एकत्रित लढाई असणार आहे. सत्यशोधकी विवाह हा धर्मनिरपेक्ष असल्याने त्यास अगदी सर्व ठिकाणी कोठेही करण्याची परवानगी अपेक्षित आहे. राजस्थान सरकार अशा विवाहितांना आठ लाख रुपये मदत करते; परंतु तसे आपल्या महाराष्ट्रात घडत नाही. बहुजनांची मंगलमय अस्सल संस्कृती, आपणास सर्व समाजात पोचवावी लागेल. अशा विवाहेच्छुकांचे शिबीर-प्रशिक्षण हे शासनाने करावे, अशी मागणी आहे.
त्यानंतर प्रा. सुनील स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहितांचे अनुभव कथना’चे सत्र झाले. यामध्ये जवळपास 10 कुटुंबीयांनी आपले अनुभव व्यक्त केले. यात सन 1998 ते 2018 दरम्यान लग्न झालेल्या विवाहितांचा समावेश होता. हे सर्वच परिवार सुखी व यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या विविध भाव-भावनांच्या अत्यंत उत्साही, प्रेरक व रोमहर्षक अशा मांडणीने अख्खे सभागृह तल्लीन झाले. त्यांचे अनुभव जसे व्यामिश्र होते, तसेच ते अत्यंत कुतूहलपूर्ण होते. अनेकदा सभागृहातील दोन्ही बाजूंच्या नेत्रकडा या अगदी आनंद व अभिमानाने गदगदून ओल्या होत होत्या.
यामध्ये प्रा. अनुपमा व प्रकाश पोळ, तहसीलदार ज्योती चव्हाण, कार्यकारी अभियंता आनंद बिराजदार, रणजित आचार्य, श्रीराम चलवाड, संतोेष येळीकर, जयश्री चव्हाण, सतीश चव्हाण, प्रा. पूनम जाधव, सतीश जाधव, निशाताई बडगिरे, पूनम पांचगे आदींचा सहभाग होता. या सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा. सुनील स्वामी म्हणाले की, संतांनी भेदा-भेद अमंगळ असे म्हटलेय, तर मग आपण जाती का पाळावयाच्या? या प्रश्नाने अगदी लहानपणीच माझ्या मनात अस्वस्थता निर्माण केली होती. या अशा विवाहितांना व त्यांच्या अपत्यांना नक्कीच एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, हे निश्चित. अशा मुला-मुलींची लग्ने परत जातीत होऊ नयेत.
‘आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाह समस्या – कायदा व उपाययोजना’ या विषयावर शालिनीताई ओक यांनी मांडणी केली, तर ‘महिला प्रबोधन अभियानाचा आढावा’ हा उषा शहा यांनी घेतला. 3 जानेवारी रोजी वर्धा येथून सुरू झालेल्या या अभियानामध्ये अगदी सर्वत्र केवळ महिला कार्यकर्त्याच सहभागी झाल्या; पण यात पुरुष कार्यकर्त्यांच्या सहभागाचीही अपेक्षा उषा शहा यांनी व्यक्त केली.
सत्यशोधकी विवाहितांचा मेळावा आणि महिला सबलीकरण प्रबोधन अभियानाचा समारोप हा जिल्हा उपाध्यक्ष बब्रुवान गोमसाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. शोभा शिरढोणकर म्हणाल्या की, मी स्वत: आंतरजातीय विवाह केला. तो काळ सन 1977-78 चा होता. मी चळवळीत वाढले. जात ही मनात, कुटुंबात व कार्यव्यवहारात असते. यांत्रिकीकरण, भांडवलशाही, जातियता व कुचकामी ठरलेल्या शिक्षण संस्थांच्या गदारोळात आता आपण आपला विचार टिकवून ठेवायचा आहे. मला अंनिसच्या विचार व विवेकी चळवळीचा आग्रह खूप भावतो. आपण अपरिचित अशा एका नव्या पिढीसमोर अंनिसच्या या विविध उपक्रमांना सोबत घेऊन नक्कीच उभे राहू शकतो!
प्रा. श्रीराम जाधव म्हणाले की, महात्मा फुले, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जातीविरहित अशा नवसमाजाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे महापुरुष होते. फुलेंच्या सोबतचे रानडे एक पाऊल मागे, तर टिळकांच्या घरातील महिला या अशिक्षितच! नुकतेच महाराष्ट्रात घडून गेलेले मोर्चे आणि प्रतिमोर्चे हे भयंकर अस्वस्थता पेरून गेले. कारण त्यांनी आपले विघटनी व तुकड्यातील रूप हे अधिक उघड केले. या मोर्चांनी तिरस्कार, सूड, वैर, हेवेदाव्यांची दरी वाढवून असुरक्षितताच दाखवून दिली आहे; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटनाही येथील प्रत्येकाला आपल्या कवेत घेणारी आहे आणि अंनिसची वाटचालही अगदी त्याच मार्गावरून होत आहे. त्यामुळे आपला आवाका व व्यापकता वाढवून ती नक्कीच समर्थ पर्याय देईल, अशी आशाही प्रा. जाधव यांनी व्यक्त केली.
अविनाश पाटील म्हणाले की, आंतरधर्मीय विवाहितांना देखील शासनाने समर्थन आणि मदत देणे गरजेचे आहे. अशा विवाहितांना 50 हजारांऐवजी किमान 5 लाख रुपयांचा मदतनिधी द्यावा, असा आमचा आग्रह आहेत. तसेच हरियाणा व पंजाब राज्यांच्या ‘सेंटर होम’प्रमाणे महाराष्ट्रातही अशा सोयी-सुविधा अनिवार्य आहे. अशा विवाहितांच्या संरक्षण व हितासाठी शासन गठित चौकशी समित्या निर्माण करून त्यामध्ये तेथील अशा कार्यकर्त्यांचा समावेश असावा. पुढे असे कार्य करणारे सर्व घटक एकत्रितपणे, टप्प्या-टप्प्याने मार्ग काढून येथील विरोधाची धार बोथट करतील, असेही पाटील म्हणाले.