हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कथाकार उदय प्रकाश यांची ‘आणि प्रार्थना’ ही एक दीर्घ कथा आहे. मध्य प्रदेशात जेव्हा भाजपचे सुंदरलाल पटवा मुख्यमंत्री होते त्या काळात ही कथा घडते. त्यावेळची भाजपा आणि आजची मोदी-शहा जोडीची भाजपा यात जमीन अस्मानचे अंतर आहे. भाजपामध्ये सर्वप्रथम पंचतारांकित कॉर्पोरेट संस्कृती असणार्या प्रमोद महाजनांचा तेव्हा उदय झाला नव्हता. म्हणजे प्रमोद महाजन यांनी पंचतारांकित संस्कृतीचा पाया भाजपमध्ये घातला आणि मोदींनी त्यावर आज कळस चढवला आहे. आर.एस.एस.च्या तथाकथीत त्यागाच्या संस्कारांना आलेली ही ‘गोमटी फळे’ आहेत. असो. उदय प्रकाश यांची ही गोष्ट ‘गोमटी फळे’ येण्याआधीची सुंदरलाल पटवा मुख्यमंत्री होते तेव्हाची आहे.
एक खून होतो, ज्या खुनात तेव्हाच्या सत्ताधार्यांतील वरिष्ठ लोकांचे त्यात हात असतात. मग खून पचवायचा कसा असा प्रश्न उभा राहतो. ही हत्या नसून आत्महत्या आहे किंवा नैसर्गिक मृत्यू आहे असे सिद्ध करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून चालू होतात. मृताचा शव विच्छेदन अहवाल तसा बनवला जावा असे दडपण डॉक्टरांवर आणण्यात येते. त्यासाठी तीन डॉक्टरांची टीम बनवली जाते. त्याचे प्रमुख म्हणून आर.एस.एस.चे स्वयंसेवक असणारे डॉक्टर नियुक्त केले जातात बाकीचे दोन कुठल्याही विचारांचे नसतात. याचा अर्थ तीन डॉक्टरांच्या संमतीने ज्यामध्ये दोन निष्पक्ष असणारे डॉक्टर आहेत त्याचा अहवाल सत्य आहे असे भासवता येऊ शकते. पण या सगळ्या रचनेत एक मोठा घोटाळा होतो. तो म्हणजे या टीमचे जे प्रमुख डॉक्टर असतात ते आर.एस.एस.चे स्वयंसेवक असतात. आणि त्यामुळेच त्यांना गृहीत धरून प्रमुख बनवलेले असते ते ‘सत्याची चाड असणारे’ असतात. शिवाय अनेकांची असते तशी त्यांचीही आर.एस.एस.बद्दल भाबडी समज असते. सेवाभावे असणारे चांगले लोक आजही त्याला बळी पडताना दिसतात.
तर या डॉक्टरना गृहीत धरून हा खून पचवण्याच्या सरकारचा जो प्रयत्न असतो तो या डॉक्टरांच्या सत्याच्या आग्रहामुळे धोक्यात येतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ नोकरशहा, मंत्री, मुख्यमंत्री इतकेच नव्हे तर आर.एस.एस.चे नेते डॉक्टरांवर दबाव आणतात. पण डॉक्टर त्यांना दाद देत नाहीत. दबावाला बळी पडत नाहीत. सत्याला चिकटून राहतात. एकीकडे सत्य आणि दुसरीकडे आपल्याच विचारांच्या लोकांकडून सत्य दडपण्यासाठी येणार दबाव या कात्रीत सापडल्यामुळे डॉक्टरांचा रक्तदाब पराकोटीने वाढतो आणि मेंदूत रक्तस्त्राव होऊन डॉक्टर कोमात जातात. उदय प्रकाश कथा येथे संपते. पण अर्थात कथा येथे संपत नसतेच. आपण तर्कानेच या कथेचा शेवट करू शकतो. अनुभवू शकतो. म्हणजे सत्ताधार्यांकडून खून पचवला गेला असेल.
डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉ.पानसरे यांच्या खुनाला अनुक्रमे दोन वर्षे आणि सहा महिने झाले आहेत. आपल्या हुशार समजल्या जाणार्या पोलीस खात्याला या काळात चिंधी एवढाही पुरावा हाती लागलेला नाही. किंवा असा पुरावा हाती लागला असेल की हा पुरावा हाती धरताना त्यांचेही हातपाय चळाचळा कापत असतील. ही दुसरी शक्यताच तर्कशुद्ध वाटते. कारण पोलीस यंत्रणा इतकी बुद्धू नाही. सी.बी.आय.सारख्या तपास यंत्रणेलाही जर काही सुगावा लागत नसेल तर खून पचवण्याच्या दिशेनेच वाटचाल चालू आहे असे बिनदिक्कतपणे म्हणता येईल. पण खून पचविण्यासाठी खून कोणी केला आहे तर उघड व्हायला पाहिजे. त्यासाठी काही एक पुरावा तर पाहिजे पण काहीही पुरावा नाही. अगदी शुभ्रधवल स्वच्छ खून ज्याचे कोणावर डाग नाहीत मग ते पुसण्याचा दिनवाणा धुवून काढण्याचा प्रश्नच नाही. तंत्रज्ञानातील क्रांतीप्रमाणेच खून पचवण्याचे नवे तंत्रही विकसित झाले की, काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच अन् जेव्हा या पार्श्वभूमीवर वर उल्लेखकेलेल्या आणि प्रार्थना या कथेचा विचार करतो तेव्हा ती बाळबोध वाटू लागते…. आणि आज मध्यप्रदेशात व्यापम घोटाळ्यात जे या घोटाळ्याशी संबंधित 49 लोक या ना त्या कारणाने मृत्यू पावतात तेव्हा तर या कथेतील घटना अगदी किरकोळ वाटू लागते.
इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. म्हणजे खेकडे जसे तिरकस चालतात त्याप्रमाणे त्याच विचारांचे लोक सत्तेवर आले की, इतिहासाची पुनरावृत्ती होणारच ही पुनरावृत्ती गीतेतील ब्रह्मांडदर्शनासारखी सर्वव्यापी, विराट असेल असे वाटले नव्हते. इथेही हा घोटाळा उघडकीस आणणारे आर.एस.एस.चे स्वयंसेवकच आहेत. म्हणजे डिट्टो उदय प्रकाश यांच्या आणि प्रार्थना या कथेची पुढील आवृत्ती. कल्पना करता येणार नाही इतकी व्यापक, जिची पाळेमुळे नागपूरच्या रेशीमबागेपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते. त्यामुळे आर.एस.एस. मूग गिळून गप्प बसली आहे.
महाराष्ट्र जसा पुरोगाम्यांचा आहे तसा प्रतिगाम्यांचाही आहे. पुरोगाम्यांचे अग्रणी महात्मा फुले जसे महाराष्ट्राचे तसे प्रतिगाम्यांचे अग्रणी लोकमान्य टिळकही महाराष्ट्राचे. डाव्या चळवळीचा पाया घालणारे डांगे-रणदिवे जसे महाराष्ट्राचे तसे आर.एस.एस.ची उभारणी करणारे हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी महाराष्ट्राचेच. त्याचप्रमाणे भगतसिंगाबरोबर स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशी गेलेला राजगुरू हा जसा महाराष्ट्राचा तसा स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे नायक ठरलेले महात्मा गांधी यांचा खून करणारा नथुराम गोडसेही महाराष्ट्राचा. शिवाय दोघे एकाच तालुक्याचे. याचा अर्थ ब्राह्मणवर्ण वर्चस्ववादा विरूद्धचा संघर्ष आधुनिक काळात आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे खून याच संघर्षाची परिणती आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा पुढे घेऊन जाणार्या नेत्यांच्या पहिल्या फळीतील नेते, विचारवंत होते. मुळावरच घाव घालण्याचा प्रतिगाम्यांचा प्रयत्न होता. पुरोगामी चळवळ अधू करण्याचा हा प्रयत्न आहे. पण मार्क्सने म्हटल्याप्रमाणे, ‘विचार जेव्हा जनतेच्या मनाची पकड घेतात तेव्हा ते एक भौतिक शक्ती बनतात.’ आणि अशा भौतिक शक्तीला नष्ट करणे कदापीही शक्य नसते. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे आज शरीराने आपल्यात नाहीत पण त्यांनी दाखविलेल्या मार्गाने लाखो पावले भीती झुगारून मार्गक्रमणा करीत आहेत. आणखी, आणखी लोक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत जोडले जात आहेत. त्यांनी चार्वाकाला नाहीसे केले, त्यांनी तुकारामाला नाहीसे केले पण चार्वाक आणि तुकारामाचे बलिदान व्यर्थ गेलेले नाही. त्याचप्रमाणे डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे बलिदानही व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या विचाराची जोपासना करीत चार्वाक बुद्धापासून सुरू झालेली जातवर्गवर्ण स्त्रीदास्यविरोधाची लढाई तिच्या अंतिम विजयापर्यंत चालू राहील. या वाटचालीत डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे कार्यकर्तृत्व एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा आणि प्रकाश देत राहील, वादळात लढण्याची जिद्द देत राहील.
–सुभाष थोरात
लेखक संपर्क : 9869392157