सर्वसामान्य जनता अनेक लेखक, चित्रपट कलाकार, नाट्यकलावंत (ज्याला आजच्या भाषेत ‘सेलिब्रिटी’ असे ओळखले जाते) यांना आपली मानते. त्या ‘सेलिब्रिटींचा खूपसा प्रभावही सर्वसामान्य जनतेवर असतो. त्यातले मोजकेच ‘सेलिब्रिटी’ आपल्या कलाकृतीतून, अभिनयातून, लिखाणातून केवळ ‘करमणूक’च करत असतात, असे नव्हे; तर त्याबरोबरच पुरोगामी, आधुनिक मूल्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नही करीत असतात. असे अनेक मान्यवर, लोकप्रिय कलाकार ‘अंनिस’शी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत. त्यांना ‘अंनिस’बद्दल काय वाटते, त्यांचा या विचारांकडे प्रवास कसा झाला, त्यांना कोणता संघर्ष करावा लागला, अशा अनेक प्रश्नांबद्दल सर्वसामान्य जनतेनेच कुतुहल शमविण्याचा प्रयत्न आम्ही या विभागात केला आहे व त्या अनुषंगाने आम्ही ‘पीके’, ‘थ्री इडियटस्’ सारख्या चित्रपटांचे पटकथालेखक अभिजात जोशी, ‘फँड्री’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे, तुकारामाची भूमिका साकारणारा जितेंद्र जोशी, ‘अंनिस’च्या कामाशी प्रत्यक्षपणे जोडली गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ‘देऊळ’सारखा चित्रपट निर्माण करणारा दिग्दर्शक, अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचे लेख व मुलाखती आम्ही ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी देत आहोत.
संकलन : मुक्ता दाभोलकर