Categories
कार्याध्यक्षांची डायरी

कल्पनेकडून ध्येयाकडे

जून – २०१७

गेल्या महिन्यात दोन दौरे झालेत. पहिला धावता दौरा विदर्भाचा केला आणि दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा. संघटनांतर्गत भेटी, वाढ विस्ताराच्या शक्यतांचा, संधीचा शोध, समविचारी मित्र, ज्येष्ठ सहकार्‍यांच्या भेटी, माध्यमांच्या प्रतिनिधींच्या भेटी, चर्चा अशा अनेक गोष्टी या दौर्‍यात घडल्या. काही आश्वासक अनुभव मी अशा दौर्‍यांमध्ये घेतो, त्याबाबत माझ्या भावना मी आपणासमोर व्यक्त करतोय.

संघटनांतर्गत भेटीत माझे कार्यकर्ते, सहकारी मला भेटतात. माझं सन्मानपूर्वक आगत-स्वागतही होतं. काळजी घेतली जाते, हे मला जरी आत्मसंतुष्ट करणारं असलं, तरी मात्र ते संघटनेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. कारण ते स्वागातपुरतं मर्यादित नाही, तर संघटनेच्या कामाप्रती, जबाबदारीप्रती एक सजग बांधिलकीची भावना कार्यकर्त्यांमध्ये मला दिसून येते. कामाप्रती तळमळ तसूभरही कमी झालेली नाही, उत्साहही भरपूर आहे. मजबूत सांघिक भावना तशीच आहे. संघटनेसाठी स्वत: शारीरिक, बौद्धिक आणि आर्थिक झीज सोसण्याचा जजबाही टिकून आहे. चळवळीचा नेता गमावल्यावर असा पोत टिकवणे हे महाकठीण काम संघटनेने साध्य केले आहे. मलाही काळाने अचानकपणे आघात करीत माझ्यावर लादलेल्या जबाबदारीला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याला कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली, याचे समाधान आहे.

हे सर्व समाधान, आनंद देणारे आहे, मात्र चळवळीला कधीच आत्मसंतुष्ट राहून भागत नाही; किंबहुना कोणत्याही चळवळीने तसे राहू नये. त्यासाठी सतत नवीनवी आव्हाने स्वीकारत गतिशील राहण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही महाराष्ट्रात व्यसनमुक्तीसाठी प्रचार, प्रसार, संघटन व संघर्ष करणार्‍या व्यक्ती, संस्था, गट, आंदोलने यांची एक समन्वय बैठक पुण्यात घेतली. महाराष्ट्र नशाबंदी मंडळ व महाराष्ट्र अंनिसच्या संयुक्तपणे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

अनपेक्षितपणे या बैठकीला भरभरून प्रतिसाद मिळाला. व्यसन हा आता वैयक्तिक प्रश्न राहिला नसून तो एक सामाजिक झाला आहे. कारण अंधश्रद्धा या माणसाचा विवेक नष्ट करतात, आणि व्यसनाचा परिणामही विवेक गमावण्यातच होतो. यावर काम करणारे सुमारे सत्तर प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. गावात दारूबंदीसाठी आंदोलन करणार्‍यांपासून अनेक वर्षे शासनाशी धोरणात्मक पातळीवर संघर्ष करणार्‍यांपर्यंत असे विविध स्तरावरील कार्यकर्ते या बैठकीस हजर होते. माणसाला नैराश्य आलं की तो एकतर बुवाबाबांच्या नादी लागतो किंवा व्यसनाच्या आहारी जातो, नाहीतर स्वत:च आपलं आयुष्य संपवितो. हे तीनही मार्ग अविवेकी आहेत. म्हणून महाराष्ट्र अंनिस आता व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणार्‍या साथींचा समन्वय मंच करू इच्छिते. म्हणजे याचा अधिक चांगला परिणाम साध्य होईल. पुणे बैठकीनंतर आता महाराष्ट्रातील महसूल विभागनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे, त्यातील खान्देशाची पहिली बैठक नुकतीच धुळे येथे संपन्न झाली. तिलाही ऐंशी प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील काळात हा विषय प्रखरतेने लढवावा लागेल.

दुसर्‍या बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई, त्यासाठीचा पाठपुरावा निराश न होता आम्ही करीत आहोत. यात शासनाच्या नाकर्तेपणा स्पष्टच आहे. जे काही थोडे घडले किंवा घडतेय ते मा. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच. तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी व त्यांच्या मागील हस्तक पकडले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने चालणारी ही लढाई सुरू राहणार आहे.

वर्ष 2019 साली संघटनेला तीस वर्ष पूर्ण होतील आणि त्याच्या पुढील वर्ष 2025 पर्यंत संघटनेने पस्तिशी पार केली असेल. आम्ही सध्या संघटनांतर्गत 2025 पर्यंत आपण संघटना म्हणून कुठे असू? किंवा कोठे असावे? असे कल्पनेचे सृजन करीत आहोत. थोडक्यात, संघटनेला आपलं 2025 या वर्षाचं ध्येय ठरवायचं आहे. जी माणसं ध्येय निश्चित करतात, ती अधिक कृतिप्रवण होतात, आणि सकारात्मक बदल घडवून आणतात. ज्या लोकांकडे संदिग्ध, अस्पष्ट हेतू असतो, ते मात्र सकारात्मक बदल घडवून आणू शकत नाहीत. म्हणून सध्या संघटनेत भरपूर कल्पना करा, जास्तीत जास्त कल्पना निर्मितीचा प्रयत्न घडवून आणीत आहोत. तितक्याच प्रमाणात दर्जा सुधारत जातो, असा व्यवस्थापन शात्राचा एक नियम आहे. तेव्हा भरपूर कल्पना त्यातून ध्येयनिश्चिती, पुढे त्याचे नियोजन आणि मग बेभान होऊन त्या नियोजनाची अंमलबजावणी असा मार्ग आपण निश्चित केलाय. याबाबत आपल्या काही सूचना असतील तर जरूर सांगा. अशा वेळी प्रसिद्ध कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात-

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही

पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही

येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो

अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही

अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस

मो.नं. 9422590610