कुंभमेळा जवळ आला आहे, त्या निमित्ताने या मेळ्याच्या पार्श्वभूमीविषयी केलेले हे (वृथा) चिंतन!
देवांनी जर हे सगळं जग निर्माण केलं असेल तर दैत्यांची निर्मितीही देवांनीच केली असणार हे उघड आहे. देव आणि दैत्यांमधील अनेक लढाया आपल्याला माहिती आहेत, म्हणजे निर्मात्याला आपल्याच निर्मितीशी लढा द्यावा लागण्याचा खेळ फारच जुना आहे असं दिसतं. मानवाने संगणकाचा शोध लावला आणि हे संगणक मानवाने दिलेल्या कृत्रिम बुद्धीच्या जोरावर मानवाचेच अस्तित्व संपवून टाकावयास निघाले, असा कल्पनाविलास अनेक अमेरिकन चित्रपटांत पहावयास मिळतो. देवांचीच निर्मिती असलेल्या दैत्यांशी देवांना लढावे, झुंजावे लागावे, हा प्रकारही तसाच झाला. समुद्रमंथनातून बाहेर आलेला अमृतकुंभ दैत्यांच्या हाती लागू नये म्हणून तो देवांनी पळवला आणि त्यातले थेंब जिथे सांडले त्या त्या ठिकाणी आता कुंभमेळा भरत असतो, असं म्हणतात. दैत्यांशी सरळ सरळ संघर्ष करण्याचे देवांनी टाळले, याचा अर्थ त्याकाळी देवांपेक्षा दैत्य अधिक सबळ झाले असले पाहिजेत. अमृत म्हणजे अमरत्वाचे वरदान. ते कोणात्याही हाती न लागता सांडून गेले, त्यामुळे अमृत हे खरोखरच अमरत्व देते का, या प्रश्नाच्या उत्तराची झाकली मूठ गेली हजारो वर्षं झाकलेलीच राहिली आहे. देवांच्या स्मरणाशिवाय अनेकांचे पान हलत नाही, याचा प्रतिकात्मक अर्थ, ‘देवांना अमरत्व प्राप्त झाले’ असा घ्यायचा तर देवांसोबतच आपण दैत्यांचीही आठवण काढतोच, त्यामुळे त्यांनाही आपोआपच अमरत्व प्राप्त झाले, असे आपल्याला म्हणावेच लागणार. आता हे अमृत एकूण 12 ठिकाणी सांडले आणि त्यातली 4 स्थाने पृथ्वीवर आहेत, असे म्हटले जाते. याचा आणखी एक अर्थ असा की, त्याकाळी बहुधा ‘ओपन’ म्हणजे छप्पर नसलेल्या एखाद्या हवाई वाहनात अवकाशात देव आणि दैत्य हा संघर्ष झाला असावा. प्रयाग, अलाहाबाद, नाशिक ही सगळीच ठिकाणे एकमेकांपासून दूर आहेत म्हणजे अत्यंत वेगने अवकाशात प्रवास करत असलेल्या, छप्पररहित वाहनात ही अमृतकुंभासाठीची लढाई झाली आणि त्या झटापटीत कुंभातले अमृत खाली पडले. याचा अर्थ तेव्हा अवकाशप्रवासाची साधने फारच विकसित होती आणि आतासारखी केवळ पृथ्वीच्या वातावरणात उडणारी साधी प्रवासी विमाने म्हणजे फारच किरकोळ गोष्ट झाली. कुंभातील अमृत ज्या इतर 8 ठिकाणी सांडले, त्यात कदाचित काही ठिकाणे मंगळ ग्रहावरचीही असू शकतात. कदाचित देवांच्या किंवा दैत्यांच्या हातून घरंगळलेला रिकामा कुंभही एखाद्या ग्रहावर सापडू शकेल. त्यात थोडेफार अमृत शिल्लक असलेच तर ज्याला कुणाला ते सापडेल तो अमर होणार. कुंभातले अमृत सुकून किंवा वाळून जगण्याचा प्रश्नच नाही, कारण अमरत्व देणारा द्रव स्वत:ही अमरच असणार. तेव्हा भारताच्या पुढील अवकाश मोहिमांमध्ये मंगळावर पाण्याच्या शोधाऐवजी अमृताचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि नासाच्या मोहिमेत ‘कुंभशोध’ हे कलम समाविष्ट व्हावे असा आग्रह भारताने ओबामांकडे धरला पाहिजे. आपले पंतप्रधान ओबामांना बराक या घरगुती नावाने हाक मारतात, त्यामुळे त्यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधाचा फायदा घेऊन आपण हे नक्कीच(नक्कीच हा शब्द मराठी वृत्तवाहिन्यांच्या अँकर्सकडून उसना घेतला आहे. त्यांना तो प्रत्येक वाक्यानंतर लागतो) करू शकतो. तर, नासाने कुंभाचे अस्तित्व शोधून काढले की, मग भारत किंवा हिंदुस्तान एकेकाळी किती प्रगत होता, हे वेगळे सिद्ध करण्याची गरज राहणार नाही.
आता लवकरच नाशिकला कुंभमेळा आहे. जीवनाचा मोह नसलेले, पैसा, संपत्ती यांचा त्याग केलेले परंतु तरीही अमृताच्या शोधात असलेले अनेक साधू देशभरातून नाशिकात येतील. या साधूंना जर जीवनाचा मोह नाही, तर ते अमृताच्या भानगडीत कशाला पडतात, असा प्रश्न पडतो. एकेकाळी जेव्हा महाराष्ट्रातील लोक मराठी बोलायचे तेव्हा एखाद्याला ‘संतापू नकोस’ या अर्थी ‘डोक्यात राख घालून घेऊन नकोस’ असा उपदेश केला जायचा. परंतु या कुंभमेळ्यात डोक्यात राख घातलेले आणि अंगालाही राख फासून घेतलेले अनेक साधू जत्थ्याने येतात. ते म्हणे भयंकर संतापी असतात. त्यांच्या डोक्यात राख असताना ते संतापीच असणार हे उघड आहे. आपण अज्ञानापायी साधूत्वाचा संबंध सर्वसंगपरित्यागाशी, साधनेच्या एका मानसिक अवस्थेशी जोडतो. या कुंभमेळ्यातले साधू मात्र संतापाने एकमेकांच्या अंगावर धावतात, एकमेकांच्या जटा धरतात(सामान्य भाषेत आपण त्याला झिंज्या धरणे म्हणतो). गरीब, कष्टकरी लोकांना भ्रम आणि दैन्य यांचा विसर पडावा म्हणून दारूचा आधार घ्यावा लागतो. मात्र दारूबंदी करून सरकार या श्रमिकांचा आपले कष्ट विसरण्याचा अधिकारही हिसकावून घेते. कुंभमेळ्यातील साधूंना मात्र चिलमीत भरून वाट्टेल त्याचा धूर काढण्याची मुभा असते. कुस्तीच्या मैदानांना ‘आखाडे’ का म्हणतात असा प्रश्न अनेक दिवस पडला होता. परंतु या साधुंची भांडणे पाहून आणि या साधुंच्या गटांना आखाडे म्हणतात हे कळल्यावर आपल्या ‘आखाडा’ या शब्दाचा उगम कुठे आहे ते कळले.

दर 12 वर्षांनी येणार्या या कुंभमेळ्यासाठी आपण करोडो रूपये खर्च करतो. दर 12 वर्षांनी पुन्हा बांधता यावेत असे पक्के रस्ते तयार करणे, फार काळ टिकणार नाही असा घाट नदीवर बांधणे, कंदमुळे खाऊन ज्यांनी गुजराण करावी अशी अपेक्षा असते अशा साधुंच्या शाही भोजनाची व्यवस्था करणे आणि करोडो रूपयांचा हिशेब दाखवून आलेला सर्व पैसा खर्च झाल्याची कागदपत्रे तयार करणे, अशी ही मोठी ‘पर्वणी’ असते.
मात्र अद्याप एक खास गोष्ट कुणाच्याच बरे लक्षात कशी आली नाही? ज्या अमृताचा ही साधू मंडळी दर बारा वर्षांनी शोध घेतात ते अमृत आता प्रत्यक्षात हजारो लोक पित असतात. पुराणकाळी नाशिकच्या जमिनीवर पडलेले अमृत भूमीत झिरपले आणि त्यातून वेली उगवल्या. त्या वेलींना छोटे छोटे अमृतकुंभ लगडून आले. त्यांनाच आपण द्राक्ष म्हणून ओळखतो. द्राक्ष आणि रूद्राक्ष या दोन शब्दांच्या उच्चारात साम्य आहे ते या अध्यात्मिक पार्श्वभूमीमुळेच. तर या द्राक्ष नामक कुंभार लपलेले अमृत अखेर मानवाने प्रयत्नाने शोधून काढले आणि ते आता बाटलीबंद स्वरूपात विकले जाते. या अमृताचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला कुंभमेळ्याची वाट पाहण्याची गरज नाही. ते कधीही उपलब्ध असते. फक्त ते ओळखण्याची आपली पात्रता हवी.
–तंबी दुराई