Categories
कार्याध्यक्षांची डायरी

धर्मसोहळे आणि प्रदूषण याचे वास्तव समाजासमोर यायला हवे!

जुलै - २०१५

आपल्या समाजात परंपरागत रूढी, व्रतवैकल्ये, धार्मिक सोहळे याचे महत्व वाढत चालले आहे. ते वाढण्यात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा राजकीय, सामाजिक व्यक्ती याला सर्वतोपरी हातभार लावीत आहेत. 1991 च्या सिंहस्थामध्ये 30 कोटीचा आराखडा असलेले अंदाजपत्रक 2003 च्या सिंहस्थामध्ये 448 कोटींवर पोचले. या वर्षीच्या सिंहस्थामध्ये आराखड्याचे अंदाजपत्रक जवळजवळ 2500 हजार कोटीपर्यंत असल्याचे समजते. याचा अर्थ काय होतो? या निमित्ताने शहर विकासाच्या कायम सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असे मान्य केले तरी केंद्र व राज्य शासनाकडून आलेला पैशांचा पूर ‘भाविकांच्या मनोकामना पूर्तीसाठी हे शासन सदैव दक्ष व तत्पर आहे. ’ हे मनोमनी ठसविण्यासाठीच आहे, हे उघड आहे. महाराष्ट्रात सर्व स्तरावरच्या शिक्षणाच्या सुविधासाठी आर्थिक तरतुदीची प्रचंड कमतरता असताना आणि बहुसंख्याचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले असताना तर ही विसंगती आणखीनच जाणवते.

समाजाने आपल्या गरजा व त्यावर खर्च करावयाचा वेळ, श्रम, पैसा याचे प्राधान्य क्रम निश्चित करावयास हवेत, ही समितीची भूमिका आहेच. परंतु देशाच्या संविधानाने धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य व्यक्तीला दिले आहे. त्याचाही समिती आदर करते. मात्र याच घटनेने नागरिकांनी डोळस बनावे, वैज्ञानिक दृष्टिकोनाने वर्तन करावे हे देखील नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. त्यामुळे विधायक वृत्तीने धर्मचिकित्सा करणे म्हणजे घटनेतील कर्तव्याचे पालन करणेच आहे, असे समिती मानते. याप्रमाणे पाहिले तर काय दिसते?

कुंभमेळ्यासाठी येणारे अनेक साधू मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन करतात. याबाबत कायदेशीर कारवाई करावी अशी समितीची मागणी आहे, मादक पदार्थांची समाजघातक शक्ती लक्षात घेता ती आवश्यक आहे. येणारे साधू व भाविक यामुळे पाण्याचे आणि एकूणही अन्य प्रचंड प्रदूषण होणार हे उघड आहे. याबाबत शासनाने दक्षता बाळगावी हा समितीचा आग्रह आहे. समिती स्वत:ही स्वतंत्रपणे याबाबतचे सर्वेक्षण करणार आहे. धर्मसोहळे आणि प्रदूषण याचे वास्तव यामुळे समाजासमोर येईल. साधूंच्या बरोबर अनेकदा चमत्कार येतातच. यामुळे भाविकांची दिशाभूल होते व चुकीचे संकेत जातात. या बाबतीतही समिती दक्ष रहाणार आहे. लोकजागृतीसाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘पर्वणी’ ही सिंहस्थाबद्दलची कविता, संत तुकारामांचे मर्मभेदी विवेचनाचे अभंग हे पोस्टर्स स्वरूपात छापून वितरीत केले जाणार आहे. हा प्रबोधन मोहिमेचाच हा एक भाग असणार आहे.

यापेक्षा व्यापक पातळीवर आणि अधिक प्रभावी कृतीच्या द्वारे सिंहस्थाच्या निमित्ताने मतप्रदर्शन व्हावयास हवे. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील आजच्या अवस्थेत ते घडावे, अशी अपेक्षा आहे. सामूहिक प्रयत्नातूनच त्यावर मात करावयास हवी.

अविनाश पाटील

लेखक संपर्क : मो. 9422790610