Categories
बुवाबाजी

अहमदनगरमध्ये प्रकटले ‘स्वामी समर्थ’?

जुलै - २०१५

दि. 7 जून रोजी सकाळी अहमदनगर शहरात एकच अफवा पसरली. . . . . ती स्वामी समर्थ प्रकटल्याची! शहराच्या मध्यवर्ती भागातील गुजर गल्ली येथील रेखी यांच्या मठात स्वामी समर्थ प्रकट झाले आणि एकच गर्दी या मठाच्या दिशेने जाऊ लागली. सकाळी ही बातमी अंनिसचे कार्यकर्तेजिल्हा सचिव अर्जुन हरेल, महेश धनवटे आणि कुणाल शिरसाठे यांना समजली. त्यांनीही मठाच्या दिशेने धाव घेतली. मठापासून अर्धा किलोमीटरपर्यंत रांग आणि अत्यंत आखुड गल्लीत असलेल्या या मठाच्या मार्गात गर्दीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. मठाच्या व्यवस्थापकाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दर्शन रांगेत थांबून कार्यकर्त्यांनी मठात जाण्याचे ठरवले. अंनिस कार्यकर्तेयेत आहेत हे लक्षात येताच पोलीसही घटनास्थळी आले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असे सांगून त्यांनी त्या बाबाला काही प्रश्न विचारले; मात्र तो बाबा मला नाशिकला सोडा असे सांगू लागला. पोलीस आल्याने त्याची आणि मठ व्यवस्थापक यांची चांगलीच भंबेरी उडाली. दर्शन रांग दुसर्‍या बाजूला असल्याने आणि विरूद्ध दिशेने पोलीस आत शिरल्याने कसलाच अंदाज आला नाही. एका खासगी गाडीत बसून हा बाबा दर्शन रांगेच्या विरूद्ध बाजूने निघून गेला. तेव्हा अनेक अफवा पसरल्या, कोणी बोलू लागले की, बाबा सावेडी मठात गेले, कोणी म्हणू लागले की, अंतर्धान पावले तर काही म्हणू लागले पोलिसांनी पकडून नेले. म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले. तेव्हा तेथील पोलीस उपनिरीक्षक करेवाड यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, सकाळी आम्हाला याबाबत माहिती मिळाली. वाहतुकीच्या प्रवाहाला लक्षात घेता आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेता आम्ही बाबांना तेथून बाहेर काढले ते पोलीस गाडीत बसण्यास तयार नव्हते. मला कुंभमेळ्याला जायचे आहे एवढं म्हणून ते खासगी गाडीत बसून केडगाव येथे त्यांना नाशिक गाडीत बसवून देण्यात आले. त्यांना ताब्यात का घेतले नाही अशी विचारणा केली असता त्या बाबत कोणाची लेखी तक्रार आली नाही असे त्यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक करेवाड आणि मठाचे व्यवस्थापक अजित रेखी यांच्याकडे ते कोठून आले होते याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ही व्यक्ती 6 जून रोजी रात्री 8. 15 ला मठात आश्रयाला आली. रात्रीच त्यांना बघण्यासाठी गर्दी जमा झाली. त्यांचे अनेक फोटो लोकांनी काढले व सोशल मीडियाद्वारे पसरवले. मठाचा असा दावा नाही की ते प्रकटले आणि ते स्वामी समर्थ अथवा त्यांचे अवतार होते. ती व्यक्ती एक संन्याशी होती तिने स्वामी समर्थसारखा पेहराव केला होता. त्यामुळे त्यांना काही लोकांनी समर्थ समजून अफवा पसरवली याचा मठाशी संबंध नाही. खरे तर घाई गडबड करून पोलिसांनी त्या बाबाला नगर शहराबाहेर घालवून दिले; त्यामुळे त्या व्यक्तीबाबत प्रश्नचिन्ह कायम राहिले.

8 जून रोजी वर्तमानपत्रातील बातमी वाचून इचलकरंजीचे कार्यकर्तेविनायक होगाडे यांचा संपर्क झाला. त्यांनी बातमीतील त्या बाबाचा फोटो पाहून कळवले की, ऑगस्ट 2014 मध्ये हीच व्यक्ती इचलकरंजीत गजानन महाराज म्हणून आली होती. यावरून हा निष्कर्ष काढता येऊ शकतो की, ही व्यक्ती भोंदू असून वेगवेगळ्या ठिकाणी गजानन महाराज आणि स्वामी समर्थ असल्याचा भास लोकांना करून देते. बाकीचे सर्व संबंधित लोक अफवा पसरतात.

ही व्यक्ती जर पुन्हा दिसली तर त्यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी पोलिसांकडे करावी. सर्व प्रसार माध्यमांनी या प्रकरणात योग्य भूमिका घेऊन अंनिसच्या भूमिकेला प्रतिसाद दिला. अंनिसने पत्रकार यांच्यासमोर पुढील भूमिका मांडली :

स्वामी समर्थ प्रकटीकरणावर अंनिसची भूमिका

1) अहमदनगर शहरातील रेखी मठात स्वामी समर्थ “प्रकटले” अशी अफवा पसरवली गेली खरं तर हा संन्याशी कुंभमेळ्याला चालला होता. तो 6 जूनला रात्री निवासासाठी मठात थांबला. तो प्रकटला नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केला तेव्हा त्याला केडगावमधून नाशिक गाडीत बसून दिले.

ती व्यक्ती स्वामी समर्थ यांच्यासारखी पेहराव केलेली होती पण ती स्वामी समर्थ नव्हती असं रेखी मठाचे लोक म्हणतात. जर कोणाचा दावा असेल ते प्रकटले तर ते गाडीत बसून का गेले. गायब का नाही झाले?

2) स्वामी समर्थ प्रकटले ही अफवा पसरवली आणि तसे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. तेही जाणीव पूर्वक. ही व्यक्ती कोणालाही अचकट विचकट बोलत होती असे काही पत्रकार सांगत होते. खरे तर अशा व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी करणे आवश्यक होते. जादूटोणा विरोधी कायदा कलम 2(1) (ख) च्या अनुसूचीतील 12 व्या कलमानुसार कारवाई होणे अपेक्षित होते.

3) कोणत्याही व्यक्तीचा, देवाचा अवतार हा दावा तपासला पाहिजे. पण त्याला लोक तपासू देत नाहीत. श्रद्धा ही तपासली तरच खरी ठरते. अंधश्रद्धा तपासू देत नाही.

एखादा देवाचा अवतार असल्याचे सांगून अनेक लोकांना लुटल्याचे प्रकार अंनिसने राज्यभर उघड केले आहेत. अवतार आहे असे सांगून लाखो रूपये जमा केले जातात.

श्रद्धेचा आधार घेऊन आर्थिक फसवणूक होते व ही झालेली आर्थिक फसवणूक आपल्याला मानसिक गुलामीमुळे आर्थिक शोषण वाटत नाही आणि इथे श्रद्धा फसते. अवतारामागे आर्थिक गणिते असतात.

सामाजिक न्याय आणि समाजसुधारणेसाठी काम करणार्‍या गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, विनोबा भावे अशा संतांचे अवतार का येत नाहीत? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

4) मठात हजार पाचशेच्या नोटांचा ढीग लागला. . . . का तर स्वामी प्रकटले. विचार न करता आपण भाबडेपणाने टाकले. आता त्या पैशांचे काय करणार? ते तर अफवेमुळे जमलेले पैसे आहेत, खरं तर हे सामाजिक नीतीमत्तेच्या विरोधात आहे.

अवताराच्या अफवेमुळे जमा झालेले पैसे गरीब मुलांच्या शिक्षणात आणि अनाथ आश्रमाला दान करावे असे आमचे आवाहन आहे.

5) अवताराची अफवा आपणही पसरवू नये आणि इतर लोकांना ही ती पसरवण्यापासून परावृत्त करावे. 21 व्या शतकात जगताना अशी अंधश्रद्धा आपण पाळू नये. विवेकी विचार करावा.

कुणाल शिरसाठे

मोबा. 9767599934