आर्वी(ता. कोरेगाव) इंगळे वस्ती येथील हुकमुद्दीन उमर मुलाणी(वय 55) अंगात दैवी संचार आहे असे म्हणून दरबार भरवणार्या भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूगिरी करताना रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश दिलीप पांचगे(पाटील) रा. प्लॉट नं. 20 केसकर कॉलनी, महादरे रोड, सातारा(ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, पांचगे(पाटील) यांच्या पहिल्या पत्नीचा स्टोव्हचा भडका होऊन 23 ऑक्टोबर 2011 ला मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी 11 नोव्हेंबर 2014 रोजी स्वाती यांच्याशी दुसरा विवाह केला. तेव्हापासून ते पत्नी स्वाती, आई सुरेखा, वडील दिलीप, मुलगी ज्ञानेश्वरी असे एकत्रित कुटुंब राहते.
स्वाती पाटील यांचा विवाह झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हुकूमद्दिन मुलाणी(देवऋषी) रा. आर्वी, ता. कोरेगाव याच्याकडे दोघेजण गेले. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे हुकूमद्दिन बाबाला सांगितले. तेव्हा त्याने स्वाती पाटीलला वाटीमध्ये काहीतरी टाकून पाणी प्यायला द्यायचा व त्यामुळे तिचे डोके सुन्न झाले. त्यानंतर तो चमत्कार करून दाखवायचा. नंतर त्याने पाचंगे यांच्या मयत पहिल्या पत्नी अपेक्षा हीचा आत्मा आहे तुम्हाला त्रास देत असून त्या आत्म्यापासून तुमची मुक्ती करून देतो व अपेक्षा हिचा आत्मा घालवतो व तुमचा संसार सुखी करतो व आर्थिक परिस्थिती सुधरवतो मला दहा हजार रूपये द्या, असे सांगितले.
त्यानंतर काही दिवसांनी श्री व सौ. पाचंगे(पाटील) यांनी हुकूमद्दिन बाबाला ठरल्याप्रमाणे 10 हजार रूपये दिले. परंतु काही फरक पडला नाही. बाबाने त्यांच्यावर दैवी दहशत निर्माण करून मानसिक पिळवणूक व आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांच्याकडे तक्रार केली. समितीचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार, शंकर कणसे, भगवान रणदिवे, मधुकर माने, शिवाजी शिंदे, अमर माने, केतन जाधव, आकाश राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत ढगे व पोलीस कर्मचार्यासह दुपारी अचानक हुकुमद्दिन मुलाणी(बाबा) याच्या आर्वी(ता. कोरेगाव) येथील राहत्या घरावर छापा टाकला असता. हुकुमद्दिन बाबा आठ ते दहा लोक घेऊन दरबार भरवून उदबत्ती डबीवर पेटवून कौल लावत बसलेला आढळला.
पोलिसांनी त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या अंगात दैवी संचार असलेने त्याच्या आधारे लोकांच्या अडचणी कौल लावून सोडवतो असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत ढगे हे करीत आहेत.
हुकुमुद्दिन बाबाच्या दैवी चमत्काराच्या साहित्यात लाल रंगाचा काट असलेला पटका, सोनेरी रंगाची जरीची शाल, नऊ माळांपैकी दोन कवड्यांच्या माळा, सहा स्फटीकच्या माळा, एक अपरिचित भाषा मुद्ती, पांढर्या मण्याची माळ आदी साहित्य पंचनाम्यात जप्त करण्यात आले.
–प्रशांत पोतदार, सातारा