Categories
भांडाफोड शाखा वार्ता

भोंदू विनोद जोशी या ज्योतिषाचा ‘सांगली अंनिस’ कडून भांडाफोड

जुलै - २०१५

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत स्थायिक झालेल्या विनोद जोशी उर्फ जयमल सावरलाल जोशी (वय 30, ब्रम्हपुरी, जोधपूर, राजस्थान) या परप्रांतीय भोंदू ज्योतिषाचा भांडाफोड केला. विश्रामबाग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याच्याकडून माफीनामा घेऊन सोडून दिले.

विनोद जोशी हा काही दिवसांपासून माळी गल्ली येथे भाड्याने रहात होता. वशीकरण, भानामती, गृहदोष, वास्तूदोष यावर उपाय केले जातील. अशी फसवी जाहिरात स्थानिक केबल वाहिनीकडे प्रसिद्धीस दिली होती. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना भोंदू ज्योतिषाची माहिती नुकतीच मिळाली. समितीचे प्रा. पी. आर. आर्डे, राहुल थोरात, चंद्रकांत वंजाळे यांनी अपर अधिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांना तक्रार दिली.

श्री. पाटील यांनी विश्रामबाग पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. अंनिसने तक्रार दिल्यानंतर बनावट ग्राहक पाठवण्याचे ठरले. कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा या सायंकाळी ज्योतिषी जोशी यांच्याकडे गेल्या. दुकान चालत नसल्याची तक्रार केली. जोशी याने ‘करणी केल्याचे सांगून पाच पूजा कराव्या लागतील. प्रत्येकी 11 हजार रूपये खर्च येईल’ असे सांगितले. पोलिसांनी तत्काळ येऊन जोशी याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी त्याची चौकशी केली. पुन्हा कोणाची फसवणूक करणार नाही असा माफीनामा लिहून घेतला.

चंद्रकांत वंजाळे, सांगली