Categories
शाखा वार्ता

मतीमंद मुलाला महाराज बनविण्याचा बनाव हाणून पाडला!लातूर अंनिसची कारवाई

जुलै - २०१५

तळणी, ता. औसा, जि. लातूर येथील मतीमंद इमादत या 18 वर्षीय तरूणास महादेव तुळजाभवानी या देव-देवताकडून साक्षात्कार लाभल्याचे सांगून, स्वत:च्या घरात अशा शिल्प व प्रतिमांची प्रतिष्ठापना करून, दर मंगळवारी व शुक्रवारी याच्या अंगात सवारी येऊन, परिसरातील विविध व्याधीग्रस्त लोकांवर सायंकाळी उपचार दिव्य केले जात. सदर बनेल प्रकार महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेच्या कार्यकर्त्यांच्या कानावर आला. आणि समितीने 9 जूनच्या रात्री, सदर भोंदुगिरीच्या ठिकाणी तत्परतेने धाव घेतली. तेव्हा जन्मजात मानसिक विकलांग असलेल्या, नवबुवाच्या महेबूब मुनवर पटवारी या 65 वर्षीय वडिलांनी, गावकर्‍यांसह समितीच्या कार्यकर्त्यांसमोर, सर्व चमत्कार नाकारून जाहीरपणे स्वत: लेखी कबुली पत्र दिले. आणि घडल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त करत यापुढे हा प्रकार कायम बंद केल्याचे तमाम उपस्थितांना, त्यांनी नि:संदिग्ध अभिवचनही दिले.

या आश्चर्यकारक भोंदूगिरीची थोडक्यात माहिती अशी की, तळणी, ता. औसा येथील महेबूब मुनवर पटवारी यांचे एक भूमिहीन कष्टकरी कुटुंब. थोरला मुलगा खाजगी वाहन चालक. मधला असाच मोकळा व व्यसनाच्या आहारी गेेलेला. तर 18 वर्षीय धाकटा इमादत हा जन्मत:च मतीमंद असलेला. याचे स्थानिक सामान्य शाळेत 7 वी पर्यंत कसेबसे शिक्षण झालेले. अर्थातच रोजगार वा विवाह इत्यादींचा संबंध नाही. असा हा इमादत कोठेही असंबंध बडबड करणारा आणि अधून-मधून 8-8 दिवस, बेपत्ता भरकटणारा. परंतु याच्या व्याधीवर वैद्यकीय उपचार, पूर्णपणे काळजीपूर्वक कोणीही केला नाही. मात्र बाभळगावाच्या एका जोडे-चपला कुंडीतील पाणी, त्यास गावातील एका महिलेच्या सांगण्यावरून, स्वत: पाजले असे चक्क वडिलांनी सांगितले. इमादत हा केवळ मानसिक असंतुलीतच नव्हे तर, त्यास फिटस्ही येत असल्याचे चर्चेवरून कळले. अशा या इमादतच्या आडून, स्वत: च्याच्या वडिलासह काही विक्षिप्त व स्वार्थी लोकांनी या फसवेगिरीस जन्म घातला आणि स्वत:चा व्यवसाय, वेडसराचे पुर्नवसन तर काही हौसी व बनेल टग्यांची, मौज मस्तीची चंगळ अशा गोरख व्यवसायाला सुरवात केली. सदर परिसरातील टमटम व जीपवाल्यांच्या खाजगी धंद्याचे उखळ पांढरे होऊ लागले. पुन्हा उत्साही व उथळ अपरिपक्व प्रसिद्धी. शिवाय चर्चा व अफवाचे तोंडी पेव फुटले. त्यामुळे त्यामुळे इमादतच्या नावे महेबूब यांच्या पत्र्याच्या शेडवर, प्रत्येक मंगळवार व शुक्रवार या दोन्ही दिवशी, केवळ संध्याकाळी जवळ-दूरच्या व्याधीग्रस्त, माणसे-बाया व बापुड्यांची मोठी वर्दळ वाढली. त्यास काल्पनिक व भाकड दाव्यांची भन्नाड जोड. शिवाय काहीसे स्थानिक स्वतंत्र वेगवेगळे कंगोरे, त्यामुळे मंगळवार 9 जून रोजी महाराष्ट्र अंनिसचे प्रधान राज्य सचिव माधव बावगे, राज्य सरचिटणीस रामकुमार रायवाडीकर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा हलकुडे, रूक्साना मुल्ला, बालाजी कोळी, नजीउल्ला शेख आदी कार्यकर्त्यांनी अचानकपणे सदर पर्दाफाश करण्याची कार्यवाही आरंभली. यावेळी पोलीस पाटील प्रकाश हेंबाडे व किल्लारी पोलीस ठाण्याचे साध्या वेशातील एक प्रतिनिधी उपस्थित होते. सरपंच मात्र अखेरपर्यंत आले नाीहत. परंतु अंनिसवाल्यांचा पूर्व सुगावा लागल्याने, पाहणी दरबार बंद करून, आलेल्या बहुसंख्य रूग्णांना त्यांनी जवळपास इतरत्र दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. तर काही व्याधीग्रस्त स्त्रियांनी सदर भोंदू महाराजास देण्यासाठी, परशुराम यांची मूर्तीपण आणली होती.

यावेळी झालेल्या चर्चा संवादामध्ये स्वत: महेबूब मुनवर यांनी चुकीची प्रत्यक्ष जाहीर कबुली दिली. आणि सदर प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली. प्रतिष्ठित, स्थानिक नागरीक व अंनिस कार्यकर्त्यांना त्यांनी लेखी हमीपत्र दिले. यावेळी माजी सरपंच सुभाषराव पवार, पोलीस पाटील प्रकाश हेंबाडे व स्थानिक तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबा हलकुडे

मोबा. 9665128653