ज्यांनी धर्मातील कर्मकांडाला व अमानुष प्रवृत्तीचा भांडाफोड केला अशांना आजअखेर संपवण्यात आले पण अशा वृत्तीच्या लोकांना चळवळीतून सडेतोड उत्तर देऊन त्यांच्यावर प्रहार करण्यात आला. व्यक्तीला संपवून कधी विचार संपत नाहीत असा संदेश देत ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाटकातून सनातन प्रवृत्तीवर प्रहार करण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व पुरोगामी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावतीने ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाटकाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या रिंगणनाटकाचा सांगलीत 85 वा प्रयोग होता. यावेळी शैला दाभोलकर, मेघा पानसरे, प्रा. आर. बी. शिंदे, तारा भवाळकर, बापूसाहेब मगदूम, गौतमीपुत्र कांबळे आदी उपस्थित होते. सॉक्रेटीसने धर्मव्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवत तेथील तरूणांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला विष प्राशन करण्याची शिक्षा देण्यात आली. या नाट्यमय घडामोडीतून रिंगणनाटकाची सुरवात केली गेली. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरोधात केलेला द्रोह समजून तुकारामाचीही हत्या केली. अशाच प्रवृत्तीच्या लोकांनी डॉ. दाभोलकरांचा व कॉम्रेड पानसरेंचा देखील हल्ला करून त्यांना मारले.
सनातन वृत्तीने केलेला या भ्याड हल्याचा विरोध करत या रिंगणनाटकातून व्यक्ती मारल्यावर किंवा त्याची हत्या केल्यावर विचार संपत नाहीत आणि येणारी पिढी हे सहन करणार नाही कारण आता आम्ही सूर्य पाहिला आहे असा संदेश देत सनातन प्रवृत्तीवर प्रहार करत चळवळीचा जागर करण्यात आला. याप्रसंगी शैला दाभोलकर म्हणाल्या, समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट व्हावी या एकमेव ध्येयाने डॉ. दाभोलकरांना झपाटले होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत यासाठी प्रयत्न केले. पण सनातनी लोकांनी अखेर डाव साधला पण अशा वृत्तींच्या लोकांना हे माहिती नाही की व्यक्तीला मारून त्याचे विचार कधी संपत नाही. आज वेळ आहे ती अशा प्रवृत्तींना विरोध करून वेळीच रोखण्याची यासाठी समाजातील विवेकवादी लोकांना एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
मेघा पानसरे यांनी रिंगणनाटकातील कलाकारांचे कौतुक केले. सनातनी प्रवृत्तीवर बोलताना म्हणाल्या, डॉ. दाभोलकरांचे व कॉम्रेड पानसरेंचे विचार नाटकातून पोहोचवले जात आहेत. अनेक वेळा हत्यारे पकडावेत म्हणून निवेदने देण्यात आली. तरी देखील आजअखेर हत्यारांचा शोध लगला नाही पण चळवळीच्या विचारांना संपवण्याचा जर कोणी प्रयत्न करेल त्याला तरूण पिढी जशास तसे उत्तर देईल.
संजय बनसोडे, योगेश कुदळे, विजय नांगरे, जगन्नाथ नांगरे, अवधूत कांबळे, अजय काळे, अजय भालकर, सुयश तोष्णीवाल, सुनिल जाधव, इंद्रायणी पाटील, अरूण भोसले हे कलाकार रिंगणनाटकात सहभागी होते. प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, चंद्रकांत वंजाळे आणि महाराष्ट्र अंनिसचे सांगलीतील सर्व कार्यकर्ते यांनी संयोजन केले.
– प्रसाद माळी, सांगली