Categories
अंधश्रद्धा शाखा वार्ता

वर्धा जिल्ह्यात गुप्तधनाच्या लालसेतून झालेल्या वादात एकाचा खून

जुलै - २०१५

खरांगणा पोलिस स्टेशन अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आर्वि तालुक्यात येणार्‍या अकोली जवळील चोरांबा शिवारात 25 एप्रिल रोजी मानवी मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती हा खुन गुप्त धनाच्या लालसेपायी झालेल्या कासवांच्या वादातून झाला असे तपासाअंती उघड झाले. त्यामुळे 302 चा गुन्हा दाखल झाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा शाखेच्या वतीने राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशन खरांगणा येथे भेट देऊन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजनपाली पो. स्टे. अधिकारी पी. एस. पांडे यांचेकडे भेट देऊन सर्व आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी विनंती करण्यात आल्यावर संपूर्ण तपासाअंती निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, भास्कर चिकराम वय 26 याचा चोरंबा शिवारात मृतदेह आढळून आला. खरांगणा पोलीसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. शवविच्छेदनात गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून 13 मे रोजी अज्ञात इसमाविरोधात 302 अन्वये हत्येचा गुन्हा नोंद असून तपास केला असता निवृत्ती भाऊराव खरगे वय 36 रा. बोद सावळा तुकाराम तेलघाणे वय 40 रा. गौरखेडा या दोघांसोबत वाद झाला. असे तपासात आढळून आल्यामुळे या दोघांना खरांगणा पोलिसांनी ताब्यात घेऊन हिसका दाखवताच खुन केला हे सविस्तर सांगितले त्यानुसार चोरांबा गावातील एका मांत्रिकाने गुप्तधन कोठे आहे हे यांना सांगितले. भास्कर, निवृत्ती, सावलू हे तिघेही एकमेकांना ओळखत होते व गुप्तधनाच्या सतत शोधात होते. वरील मांत्रिक गुप्तधनाचा पत्ता व विधी सांगतो असे समजल्यावरून त्याची भेट घेतली. त्याने गुप्त धन शोधण्यासाठी कासव हा प्राणी लागतो असे सांगितले. तेव्हा भास्करने माझ्या शेतातील विहिरीत कासव आहे असे सांगितल्यामुळे तिघेही शेतातील विहिरीजवळ गेले मात्र गासव मिळाले नाही. भास्करने दुसर्‍याच्या शेतात कासव असेल असे म्हणून दोन-तीन विहीरी दाखविल्या मात्र कासव मिळाले नाही. त्यातच गुप्तधनाची लालसा, भास्करचा खोटेपणा, फिरण्याचा झालेला त्रागा यावरून तिघात वाद झाला या वादात भास्कर चिकराम याचा निवृत्ती व सावलू यांनी गळा आवळून खून करून तो नाल्याजवळ फेकून दिला. व तेथून पळ काढला ही सर्व हकीकत पोलिसांनी दोघांकडून मिळवली या वेळी मांत्रिकाच्या घरी जाऊन पोलिसांनी विचारपूस केली मात्र यात मांत्रिक सहभागी नाही असे वाटल्यामुळे पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली नाही. दोन्ही आरोपीस आर्वि न्यायालयात हजर करून 30 मे पर्यंत कस्टडी देण्यात आली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी राजनपाली करीत आहेत.

या प्रसंगी अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, नरेंद्र कांबळे, अ‍ॅड. विशाल गोडघाटे, निशांत जगताप, श्रेया गोडे, मंगेश शेंडे यासह चेतना विकास संस्थेच्या समुपदेशक संध्या सातपुते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

गजेंद्र सुरकार

मोबा. 9822219100