संत तुकारामांच्या एका अभंगात अज्ञानात बुडालेल्या समाजाबद्दल कळवळा व्यक्त करणारे एक विधान आहे- ‘बुडती हे जन। न देखवे हे डोळा।’ तुकोबांच्या काळात बहुजन समाजाला विळखा घालणार्या अंधश्रद्धा, अंधरुढी आणि कर्मकांडे यांचा अतिरेक झालेला होता. हा विळखा सुटावा म्हणून त्यांनी अभंगाच्या रुपात समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला. तुकोबांनंतर महाराष्ट्रात विविध समाजसुधारकांनी रान उठविले. महात्मा फुल्यांनी आपल्या धारदार शब्दरुपी आसुडांनी पुरोहितशाहीच्या विळख्यातील समाजाला जागे करण्याचा जोरदार प्रयत्न केला. फुल्यांचा आदर्श घेऊन सत्यशोधक समाजाची स्थापना होऊन बहुजन समाजबदलाचा प्रयत्न केला गेला. बहुजनांच्या शिक्षणाचा वसा घेतलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वत: सत्यशोधकी जलशात सहभाग घेतला होता; पण….?
इतके प्रयत्न होऊनही आणि विज्ञानाचा सूर्य माथ्यावर येऊनही समाजात कालानुरूप नवा दृष्टिकोन प्रभावी झाल्याचे दिसत नाही. विवाहविधी, मृत्यूनंतरची कर्मकांडे, स्त्रियांमध्ये वाढत चाललेली विविध व्रतवैकल्ये याद्वारे असत्याच्या पूजेचे स्तोम वाढतानाच दिसत आहे. कर्मकांडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी सामाजिक पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तत्सम संघटना जोरदार चळवळ चालवीत आहेत. याचबरोबर व्यक्तिगत पातळीवर विविध सामाजिक गटातदेखील नवे सत्यशोधक प्रयत्नशील होताना दिसत आहेत. सांगलीचे ए. डी. अर्थात आनंदराव धोंडिराम पाटील हे त्यापैकी एक होत. सांगली परिसरात मराठा समाजातील अंधश्रद्धांविरोधात कृतिशील प्रबोधन करणार्या ए. डी. पाटील या झुंजार कार्यकर्त्याचे प्रवाहाविरुद्धचे कार्य इतरांना प्रेरणादायी ठरेल.
ए. डी. पाटील मूळचे मिरज तालुक्यातील करोली (एम.) गावचे. शिक्षणासाठी सांगलीत आल्यावर ते प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि शांतिनिकेतन परिवाराचे संस्थापक पी. बी. पाटील यांच्या सहवासात आले. शांतिनिकेतन महाविद्यालयात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या भाषणाने ते प्रभावित झाले. याच काळात क्रांतिवीर नाना पाटील यांचे विचारही त्यांनी आत्मसात केले. पी. बी. पाटील यांच्या सहवासातून माणसातील देव जाणण्याचा संस्कार त्यांनी घेतला. दगडात देव नाही, याची त्यांना खात्री पटली. कर्मकांडात देव नाही; उलट आपले नित्याचे काम करण्यात आहे, हे त्यांना जाणवू लागले. या वातावरणाचा आणि बुद्धिनिष्ठ स्वभावाचा परिणाम म्हणून ए. डी. पाटील तरुण वयातच विवेकवादी बनले.
ज्येष्ठांची प्रेरणा
नोकरीनिमित्ताने ए. डी. सांगलीला स्थायिक झाले. सांगलीमध्ये पवार गुरुजी आणि सुबराव पाटील ‘मराठा परिवारा’च्या परिवर्तनासाठी काम करत होते. त्यांच्याबरोबर ए. डी. पण या कामात सहभागी होऊ लागले. पवार गुरुजींच्या अनेक धाडसी निर्णयांतून ए. डीं. नी पण स्वत:ला झोकून दिले. आपणांपैकी बर्याच जणांना सामाजिक परिवर्तनाचे विचार पटतात; पण ते अंगीकारणे बहुतेकांना जमत नाही. मग कुणी घरातल्यांचा विरोध होतोय, अशी पळवाट काढतात; तर कुणी समाज काय म्हणेल, या भीतीचा आसरा घेतो आणि स्वत:त बदल करण्याचं टाळतो. मग अशी मंडळी केवळ भाषणबाज बनतात. परिवर्तनाचे गोडवे गातात; पण कृतीत काहीच आणत नाहीत. अशा व्यक्तींना आपण ‘बोलके’ सुधारक म्हणतो. ए. डी. पाटील अशा बोलक्या सुधारकांपैकी नाहीत. त्यांनी सामाजिक सुधारणेची सुरुवात आपल्या घरापासून केली.
आजीचे मृत्यूचे कर्मकांड
नोव्हेंबर 1998 मधील घटना. त्यावेळी ए. डी. पाटील 35 वर्षांचे होते. मराठा समाजात व्यक्ती मेल्यावर रक्षाविसर्जन तिसर्या दिवशी, नंतर दहावा, नंतर तेरावा; म्हणजे उत्तरकार्य असे विधी केले जातात. 1998 साल म्हणजे 20 वर्षांपूर्वीची घटना. अशा काळात ए. डी. पाटील यांनी एक धाडसी निर्णय घेतला. आजीच्या मृत्यूनंतरची सर्व कर्मकांडे पाचव्या दिवशीच उरकायची, हा निर्णय जाहीर केल्यावर जमलेल्या भावकीत चलबिचल सुरू झाली. खरं तर कर्मकांडाबद्दलचा काळ कमी होणे लोकांना पटत होतं; पण बोलायचं कुणी? काही मंडळींना हा निर्णय मान्य नव्हता. शेवटी ए. डी. आपल्या मताशी ठाम राहिले. भावकीतील काही मंडळी उठून गेली. या विरोधाला न जुमानता ए.डीं.नी आजीचे विधी पाचव्या दिवशीच पार पाडले. हे धाडस तसं सोपं नव्हतं; पण ए.डीं.नी ते केले. त्यांच्या कुटुंबाने आणि भावकीतील काही मंडळींनी त्यांना साथ दिली. परिवर्तनाची सुरुवात ए. डीं.नी अशा तर्हेने घरापासून केली.
प्रामाणिकपणे विचार केला, तर स्वत:लाच काही गोष्टी पटू लागतात; पण सभोवतालच्या घटना आणि प्रसंगाबाबत डोळसपणे विचार तर करायला हवा. ए.डीं.च्या गावातील एक बाई देवीचा दरबार भरवायची, त्यामध्ये लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची; पण देवाचं एवढं करूनही त्यांचं घराचं छप्पर फाटकं ते फाटकंच राहिलं. अंगावरची साडीपण फाटकीच. ए.डीं.च्या मनात प्रश्न आला की, देव असेलच तर ही गरीब कशी? देवाचं काहीही न करणारी माणसं सुखात दिसतात; मग ही कशी दु:खातच राहिली? अशा घटनांतून ए. डी. कर्मकांड व देवधर्म याबाबत चिकित्सा करू लागले. प्रखर बुद्धिवादातून त्यांना उत्तरे मिळत गेली. ते अधिकाधिक निर्भय बनू लागले व स्वत:च्या जीवनात कर्मकांडांना फाटा देण्यासाठी सज्ज होऊ लागले.
आनंदरावांनी स्वत:चा विवाह कुठलीही धार्मिक कर्मकांडं न करता नरसोबाची वाडी येथे पार पाडला. घरच्यांच्या व पत्नीकडील विरोधाला न जुमानता त्यांनी हे लग्न केले. लग्नानंतर कोणताही धार्मिक विधी केला नाही. गावदेवाला जाणे, सत्यनारायण पूजा घालणे अशी कर्मकांडे केली नाहीत.
आनंदरावांच्या नात्यातील एका ज्योतिषाने त्यांचा संसार सुखाचा होणं शक्य नाही, असं भाकीत केलं होतं. कारण याचे ग्रह जमत नाहीत. आज आनंदराव म्हणतात, ‘कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. माझ्याबाबतीतही हे खरं आहे. मी माझ्या संसारात सुखी व समाधानी आहे.’
आनंदरावांनी त्यांच्या शेतात फार्म हाऊस बांधले. त्याची वास्तुशांती त्यांनी घातली नाही; उलट मित्र-आप्तेष्टांना त्यांनी मांसाहारी जेवण दिलं. गावात नवीन बांधलेल्या घराचा गृहप्रवेश त्यांनी वास्तुशांतीची कर्मकांडे न करता अभिनव पद्धतीने केला. घरात सावित्रीबाई फुले आणि जिजाबाई यांचे फोटो ठेवले होते. कुठलेही धार्मिक विधी केले नाहीत.
आनंदराव गुढीपाडव्याला गुढी उभारत नाहीत. त्यांचा असे उत्सव साजरे न करण्यामागे खास विचार आहे. आपलं नेहमीचं कर्म हाच उत्सव. हे काम करून थकवा आला, तर कामात बदल म्हणजे विश्रांती असा त्यांचा विचार आहे. पतसंस्थेतील काम संपलं की, ते थेट मराठा समाजाच्या व मराठा सोशल ग्रुपच्या कामात सहभागी होतात. शेले विणणारा कबीर या वीणकामातच राम शोधतो, तसंच आनंदराव वेगवेगळ्या कामांत देव शोधतात. त्यांचा देव दगडात नाही, तर माणसांत आणि कर्मात राहण्यात आहे.
आनंदरावांनी मुलीचा विवाह ठरविला आणि अचानक त्यांच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. अशा प्रसंगी लोक लग्न पुढं ढकलतात. मृताची कर्मकांडे पार पाडतात. सूतक पाळतात. आनंदरावांनी काय केले? वडील गेलेत. दु:ख जरूर आहे; पण यात मुलीची काय चूक? तिचे भवितव्य महत्त्वाचं नाही का? ए.डीं.नी वडिलांचा पुढे अंतेष्ट विधी तीन दिवसांत संपवून सातव्या दिवशी मुलीचा विवाह पार पाडला. काही दिवसांनी ए.डीं.ना हृदयविकाराचा झटका आला. लगेचच घरातील म्हैस मेली. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ‘वडिलांचे विधी केले नाहीत म्हणूनच अशी संकटे आली,’ असे लोक बोलू लागले. त्याच दरम्यान आईला कावळा शिवून गेला. पण ए.डी. डगमगले नाहीत. या सर्व घटनांचा वडिलांच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही, हे त्यांनी समजून घेतले आणि आपला पुढील जीवनक्रम निर्भयपणे चालू ठेवला.
राऊतबाबूंच्या पुस्तकाचा प्रभाव
राऊतबाबू म्हणजेच सुखदेव शंकर राऊत. शिक्षण मराठी सातवी. खाजगीरित्या मॅट्रीक परीक्षा इंग्रजीसहीत 86 टक्के मार्काने उत्तीर्ण होण्याचा पराक्रम त्यांनी केला. पोस्टात कारकून म्हणून नोकरी करत ते यशस्वी जीवन जगले. राऊतबाबू उच्चशिक्षित नसतानाही बुद्धिप्रामाण्यवादी जीवन जगले. तर्कशून्य, देव, धर्म, रुढी आणि वर्णव्यवस्था झुगारून राऊतबाबूंनी तर्कशुद्ध विज्ञान, श्रम, निसर्ग व मानवतावाद अंगीकारला; परिणामी ते वैभवपूर्ण स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वावलंबी सुखी जीवन जगले. राऊत बाबूंनी ‘माझे मानवतावादी देवरहित सुखी जीवन’ या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध केले. हे पुस्तक आनंदराव पाटील यांनी मिळविले आणि ते त्यातील विचारांनी झपाटून गेले. दैववाद व कर्मकांड यांना आपल्या आयुष्यात थारा द्यावयाचा नाही, हे निश्चित करून आनंदरावांनी मराठा समाजाला नवी दिशा देण्याचा दृढसंकल्प केला आणि ते कामाला लागले.
समाजपरिवर्तनाचा प्रारंभ
सांगलीमध्ये आंबेडकर रोडवर ‘मराठा समाज’ नावाची संस्था समाजामध्ये विचारात आणि कृतीत कालानुरूप बदल व्हावा यासाठी काम करते. पत्रिका न पाहता विवाह करणार्या जोडप्यांना उत्तेजन देते. मराठा समाजात विधवांचा पुनर्विवाह न करण्याची रुढी आहे. त्यात कालानुरूप बदल व्हावा म्हणून विधुर आणि विधवांच्या विवाहासाठी मेळावे घेते. अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा प्रचार व्हावा, यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कारां’चे आयोजन करते. कालवश अॅड. दत्ताजीराव माने यांनी सुरुवातीला मराठा समाज संस्थेला कालानुरूप नवे वळण देण्यासाठी चालना दिली. त्यांच्यानंतर या संस्थेचे पदाधिकारी त्यांचे विचार निष्ठापूर्वक अमलात आणण्याचा वारसा चालवीत आहेत. आनंदराव मराठा समाज संस्थेत पदाधिकारी आहेत. आपल्या या पदाचा उपयोग त्यांनी मराठा समाजातील परिवर्तनाची आस असलेल्या इतरांचा स्नेह मिळविण्यासाठी घेतला. ‘मराठा सोशल गु्रप’ या नावाने ही मंडळी समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहेत. या कार्यात आनंदराव अग्रभागी आहेत.
सांगली परिसरात सुरुवातीला पवार गुरुजी आणि सुबराव पाटील यांच्यासमवेत मृत्यूनंतरच्या कर्मकांडात कालोचित बदल करण्याच्या कार्यात आनंदरावांनी उडी घेतली. सुरुवातीला पवार गुरुजी व सुबराव पाटील यांच्यासमवेत ज्या कुटुंबात व्यक्तीचे निधन झाले आहे, तेथे आनंदराव हजर राहत. कुटुंबियांना आणि मित्र-आप्तेष्टांना आवाहन करीत. मृत्यूनंतरच्या कर्मकांडातील अंधश्रद्धा आणि अज्ञान समजावून देत. या प्रवाहाविरुद्धच्या कामात बर्याच वेळा अवमानाचे प्रसंग वाट्याला येत; पण काही कुटुंबियांना नवा विचार पटतही असे. ते कर्मकांडांना फाटा देण्याचे मान्य करीत. हळूहळू का होईना समाजमन बदलण्यास सुरुवात झाली होती.
पवार गुरुजींच्या निधनानंतर, आनंदरावांनी इस्लामपूरचे प्राध्यापक विजय गायकवाड यांच्या बरोबर सत्यशोधक पद्धतीने अंतेष्ट विधी आणि विवाह विधी करण्याचे काम सुरू केले. याकामी अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे यांनी त्यांना महात्मा फुले यांचे याबाबतचे साहित्य उपलब्ध करून देऊन मार्गदर्शन केले. चालू वर्षातील चार महत्त्वाच्या घटनांचा येथे जरूर उल्लेख करावा लागेल. करोली, सांगली, आष्टा आणि कुची येथील या घटना आहेत. या चारही घटनांवेळी आनंदरावांनी संबंधित कुटुंबियांचे यशस्वी प्रबोधन केले. कर्मकांडातून वाचलेला पैसा सामाजिक कार्यासाठी दान करण्याचे आवाहन ते संबंधित कुटुंबियांना करतात.
करोली येथील सजाक्का इंगवले यांचे 31 डिसेंबर 2017 रोजी निधन झाले. इंगवले-देशमुख कुटुंबियांनी तेरा दिवसांचा विधी पाच दिवसांत आटोपण्याचा निर्णय घेतला. सजाक्कांच्या अस्थी नदीत न सोडता शेतात वृक्षारोपण करून त्याच्या मुळाशी रक्षाविसर्जन केले. ए. डी. पाटील व मराठा सोशल गु्रपच्या पदाधिकार्यांनी इंगवले कुटुंबियांचे व करोली ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
ऑगस्ट 2017 मध्ये प्रकाश चव्हाण यांच्या वडिलांचे निधन झाले. प्रकाश चव्हाण हे प्रागतिक व विवेकवादी विचारांचे उद्योजक. त्यांनी मराठा समाज संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दत्ताजीराव माने यांनी मराठा समाजाला अंधश्रद्धामुक्त करण्याचे सुरू केलेले कार्य अधिक गतिमान केले आहे. सुधारणेची सुरुवात स्वत:पासून केली, तरच समाज सुधारणे शक्य आहे. चव्हाण यांनी रक्षाविसर्जनावेळी दगडी पिंड तयार केली नाही. रक्षेला नैवेद्य आणला नाही; फक्त फुले वाहिली. रक्षाविसर्जन त्यांच्या कारखान्यातील बागेत नवीन वृक्षाच्या मुळाशी प्रकाश आमटे यांच्या हस्ते केले. यावेळी बाबा आमटे यांच्या कार्यास त्यांनी 50 हजार रुपयांची देणगी दिली. त्यानंतर कोणतेही धार्मिक विधी त्यांनी केले नाहीत. या कामी ए. डी. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
चळवळीला यश येऊ लागले. सप्टेंबर 2017 मध्ये आष्टा येथील आकाराम मोहिते यांचे निधन झाले. ए. डी. पाटील यांनी मोहिते कुटुंबियांचे प्रबोधन केले. शंकर व भास्कर मोहिते यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी दहन, रक्षाविसर्जन, केस अर्पण, बारावा-तेरावा, उत्तरकार्य नैवेद्य, सूतक अशा रुढी अजिबात पाळल्या नाहीत. वडिलांची रक्षा शेत व घराच्या आसपास टाकून त्यावर वृक्षारोपण केले. आई काशीबाई यांनी सौभाग्य अलंकार काढले नाहीत.
मराठा सोशल गु्रपचे सभासद असलेले कुची येथील यशवंत शिवाजी पाटील यांच्या वडिलांचे ऑक्टोबर 2017 मध्ये निधन झाले. यशवंत यांनी कुटुंबियांची समजूत काढून ए. डी. पाटील यांचे सहकार्य घेतले. वडिलांच्या नावे कुटुंबियांनी वृक्षारोपण केले आणि त्यांची रक्षा मुळाशी विसर्जित केली. मातोश्री कमल यांचे सौभाग्य अलंकार तसेच ठेवले. पुढच्या सर्व विधींना फाटा दिला. कर्मकांडांना फाटा देऊन निसर्गपूरक अंत्यविधी करून पाटील यांनी कुची परिसराला आदर्श घालून दिला.
ए. डी. पाटील यांनी अंत्यविधीबाबत तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला. चितेभोवती मडक्यातून पाणी शिंपडण्याची प्रथा पूर्वी का निर्माण झाली असावी? पूर्वी चितेभोवती जंगल आणि गवत असे. चितेच्या ज्वालामुळे ते पेटू नये म्हणून चितेभोवती पाणी शिंपडले जाई. आज त्याची गरज उरलेली नाही. विज्ञानाने शरीरातून उडून जाणार्या आत्म्याचे अस्तित्व अमान्य केले आहे. अशा अस्तित्वात नसलेल्या आत्म्याचे मरणोत्तर समाधान करण्याचा विधी अवैज्ञानिक आहे. संबंधित व्यक्तीला ती जिवंत असताना सांभाळणे हेच योग्य आहे. म्हणून अंत्यविधींना अर्थ नाही, हे ए. डी. संबंधित कुटुंबाला कळकळीने समजावून देतात. कावळा हा तीव्र घ्राणेंद्रिय असलेला पक्षी आहे. त्याला दूरूनही वास येतो. तो धीट पक्षी आहे म्हणून तो पिंडाजवळ येतो, हे लक्षात घेतले तर पिंडाला कावळा शिवणे कसे शक्य आहे, ते कळते. एकाच वेळी दोन व्यक्तींचे रक्षाविसर्जन स्मशानात जवळजवळ होते. ज्या रक्षाविसर्जनाचे ठिकाणी मांसाचा नैवेद्य ठेवला होता, त्याला कावळा शिवला. दुसर्या नैवेद्याला तो शिवाला नाही. कारण कावळा हा अधिक मांसाहारी आहे. हे निरीक्षण आहे आनंदराव अर्थात ए.डीं.चे. काही वेळा पिंडाला कावळा लवकर शिवत नाही अगर शिवतही नाही. याला वैज्ञानिक कारणे आहेत. त्याचा मृतात्म्यांशी काहीही संबंध नाही. कारण मृतात्माच नाही.
आपल्या प्रिय व्यक्तीचं मरणोत्तर अस्तित्व नाही, हे स्वीकारणं माणसाला अवघड जातं. म्हणून अंत्यविधीबाबत माणसं आग्रही असतात. समजून घेतलं, तर ठीक नाही तर ती समजून देणार्याबद्दल गैरसमज करून घेतात म्हणून या क्षेत्रात प्रबोधनाचं काम खूप कठीण होतं. ए. डीं.ना याचाही अनुभव वारंवार आलाय. काही वेळा अपमानित व्हावं लागलंय, काही वेळा शिव्या खाव्या लागल्यात. अलिकडेच त्यांच्या मित्राच्या आईचं निधन झालं. मित्रानं ए. डीं.ना याबाबत प्रबोधनासाठी बोलावलं. यावेळी ए. डी. म्हणाले, रक्षाविसर्जनाच्या ठिकाणी रक्षेचे विसर्जन न करता रक्षेतच फुलं वाहा. दगड ठेवू नये, नैवेद्य ठेवू नका व त्याला फुले वाहू नका. यावेळी मृताचे नातेवाईक ए. डी. पाटील यांना जाब विचारू लागले की, तुमच्या पद्धतीमुळे कावळा येईना. अखेर कावळा आला आणि ए. डी. मार खाण्यापासून बचावले. या प्रसंगावेळी ए. डीं.ना प्रचंड निराशा आली. आपण हे काम सोडावे, असं त्यांना क्षणभर वाटलं. पण नंतर ते सावरले आणि प्राणावर बेतलं, तरी हे काम चालूच ठेवायचं, असा निश्चय त्यांनी केला.
कालबाह्य रुढीतून मुक्त व्हावं, समाजानं वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, अनावश्यक विधीचा खर्च टाळावा, विवाहातील चुकीच्या प्रथा टाळाव्यात, यासाठी सांगलीची मराठा समाज संस्था प्रयत्नशील आहे. समाजाच्या प्रगतीसाठी लोकांनी अंधश्रद्धामुक्त व्हावं, ही काळाची गरज आहे, हे मराठा सोशल गु्रपला मनोमन पटलंय. या कार्यासाठी अॅड. दत्ताजीराव माने हे प्रेरक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात असताना दत्ताजीराव दरवर्षी त्यांना मराठा समाज संस्थेत प्रबोधनासाठी बोलावत. डॉ. दाभोलकर ‘विवेकवाद आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर श्रोत्यांचे प्रबोधन करीत. या प्रयोगातून कालानुरूप आपण बदलायला हवं, हा विचार मराठा समाजात मूळ धरू लागला. त्याचीच परिणती म्हणजे प्रकाश चव्हाण, पवार गुरुजी, सुबराव पाटील, प्रा. विजय गायकवाड, इंजि. आर. एस. पवार, जयवंत सावंत आणि ए. डी. पाटील; तसेच मराठा सोशल ग्रुपचे सर्व साथीदार यांनी गतिमान केलेला मराठा समाजाचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर.
कालानुरूप अंतेष्ट विधी व विवाह यामधील कालबाह्य कर्मकांडे टाळण्यासाठी आनंदरावांनी प्रयत्न सुरू केले. विवाहामध्ये अक्षता म्हणून तांदूळ वापरले जातात हेच तांदूळ लोकांच्या पायात पडतात आणि वाया जातात. म्हणून ए. डी. हा तांदूळ वृद्धाश्रमाला द्यावा म्हणून आग्रही राहतात. लोकांनी आशीर्वाद टाळ्या वाजवून द्यावेत, तांदळाचा अपव्यय टाळावा, असे त्यांचे मत आहे. बहुजन समाजाने आपले आचरण सुधारण्याचे मार्ग आनंदराव सुचवितात. कर्मकांडांऐवजी पैसा मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबाच्या आरोग्यावर वापरून अनावश्यक खर्च टाळावा. कर्मातच देव आहे, यावर विश्वास ठेवावा. कोर्ट-कचेर्याचा मार्ग टाळावा. पोथ्या-पुराणे टाकून विज्ञानाची पुस्तके हातात घ्यावीत. निराधारांना व अपंगांना आधार द्यावा; तसेच मंदिराऐवजी शाळा आणि वाचनालय यांना मदत करा. असा उपदेश ते बहुजनांना करतात. मी आता दुसरं काही करणार नाही. आता वेळ मिळेल, तेव्हा आणि निवृत्तीनंतर पूर्ण वेळ मराठा समाजाला अंधश्रद्धा मुक्त करण्यासाठी धडपडण्याची इच्छा त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारांच्या अभ्यासातून आनंदराव प्रभावित झालेत. सत्यशोधकी विवाह अंत्यविधीत कालानुरूप बदल आणि सार्वजनिक सत्यधर्मानुसार सर्व व्यावहारिक आचार वा विचारांचा प्रसार करणे, हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले आहे. पतीनिधनानंतर पत्नीने सौभाग्यलंकार आहे तसेच ठेवावेत, असा विचार ए.डी. मांडतात. याचबरोबर राऊतबाबू यांचे देवरहीत मानवतावादी विचार प्रसारित करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. केवळ ध्यास आणि विचार नव्हे, तर त्यापेक्षा कृतिशीलतेचा अंगीकार. त्यांच्या कृतिशीलतेला आणि त्यागाला आपण सलाम करू या.