औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपालसिंह यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादावर हल्ला चढविला. वर्तमानपत्रातील रिपोर्टिंग जर खरं असेल, तर त्यानुसार ते म्हणाले, ‘मला डार्विनचा उत्क्रांतीवाद मान्य नाही. कारण त्याचा वेदांमध्ये कुठेही उल्लेख नाही. जे उत्क्रांतीवाद शाळेत शिकवतात त्यांचे पूर्वज माकड असले पाहिजेत; आमचे नाहीत. डार्विनचा उत्क्रांतीवाद शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकायला हवा.’
सत्यपालसिंहांच्या या गर्जनेवरून उत्क्रांतीवादाबाबत 1860 साली झालेल्या एका प्रख्यात वादविवादाची मला आठवण झाली. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्युझियममधील हॉलमध्ये हजारभर लोकांसमोर प्रख्यात धर्मोपदेशक बिशप विल्बरफोर्स आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस हक्सले यांच्यात झालेल्या शाब्दिक खडाजंगीचा विषय होता ‘डार्विनचा उत्क्रांतीवाद.’ थॉमस हक्सले हा वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे बोलणारा डार्विनचा बुलडॉग म्हणजे खंदा समर्थक, तर विल्बरफोर्स हा तिखट जिभेचा, उपरोधिक शैलीत आपल्या विरोधकाला आडवातिडवा करणारा वाक्पटू. अनेक वक्त्यांची उत्क्रांतीवादावर भाषणे झाल्यावर विल्बरफोर्स बोलायला उठला. उत्क्रांतीतत्त्वातील अपुरेपणाबाबत तर्कशुद्ध हल्ला चढविताना आपल्या प्रतिवादाच्या शेवटी तो हक्सलेकडे बघून हेटाळणीच्या सुरात म्हणाला – ‘तुमचे पूर्वज माकडापासून आले असतील, तर ते तुमच्या आजीकडून की आजोबाकडून?’
या विधानावर हक्सलेने जी प्रतिक्रिया दिली, तीमुळे विल्बरफोर्स निष्प्रभ झाले. हक्सले म्हणाला, ‘आपल्या आजोबाचे पूर्वज माकडापासून आले असतील, तर त्याची लाज वाटण्याचे कारण नाही; पण बुद्धिमान समजला जाणारा आणि आपल्या क्षेत्रातील यशाबद्दल असमाधानी असणारा तुमच्यासारखा माणूस आपला ज्या क्षेत्राशी संबंध नाही, त्यावर तर्कहीन, छद्मी भाष्य करून, धार्मिक पूर्वग्रहाच्या आधारे लोकांना गोंधळात टाकत असेल, तर अशांचा पूर्वज माणूस असून काय उपयोग? त्यापेक्षा माकडाचा वंशज असणे केव्हाही सत्याच्या समर्थनासाठी मला अधिक अभिमानास्पद वाटेल.’
थॉमस हक्सलेने विल्बरफोर्सला दिलेले उत्तर आजच्या प्रसंगी सत्यपालसिंह यांच्या विधानाला तितकंच चपखलपणे लागू पडतं. सत्यपाल सिंह हे जीवशास्त्रज्ञ आहे काय? नसतील, तर डार्विनच्या उत्क्रांती तत्त्वावर प्रतिकूल टीका करण्याचा त्यांना काय अधिकार आहे? उत्क्रांतीबाबतच्या पुराव्यांचे त्यांनी अध्ययन केले नसेल, तर उत्क्रांतीतत्त्व खोटं आहे, असं ते कसं म्हणू शकतात? सत्यपालसिंहांनी उत्क्रांतीवादावर आजतागायत नवंनवं संशोधन झालं आहे, याचं वाचन करायला हवं आणि मगच त्यावर टीका करायला हवी. रिचर्ड डॉकिन्स या प्रख्यात जीववैज्ञानिकाने उत्क्रांतीतत्त्वाला भक्कम पुरावे देणारं विविध प्रकारचं संशोधन केलं आहे. ते त्यांनी वाचलं असतं, तर असं विधान करण्याचं धाडस त्यांना झालं नसतं.
उत्क्रांतीवादाला आक्षेप घेणारे धार्मिक तत्त्वज्ञान पाश्चात्य ख्रिश्चन समुदायातही आढळते. त्याचं नाव आहे निर्मितीवाद. अर्थात, उीशरींळेपळीा. पृथ्वीचा जन्म व तीवरील जीवसृष्टीचा विकास ही ईश्वरप्रणीत सहा दिवसांची रचना आहे आणि एकाच वेळी सर्व प्राणी व शेवटी माणूस ईश्वराने बनविला, असं बायबल सांगतं. आपल्याकडे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, असं धर्मग्रंथ सांगतात. मुस्लिम धर्मात अल्ला हाच सृष्टीचा निर्माता आहे, अशी समजूत आहे. आता प्रश्न असा की, नेमका कोणता ईश्वर सृष्टी व मानवाचा निर्माता आहे? याला सत्यपालसिंह व त्यांच्या धार्मिक संप्रदायातील लोक म्हणतील, ‘वेदात जे लिहिलंय ते सत्य.’ मग बायबल आणि कुराणाचं काय करायचं? धार्मिक पूर्वग्रहातून विचारभ्रम पसरविण्यातून मानवीपण बाजूला पडून आपण कलह पसरविणारा रानटीपणा वाढवायचा काय?
शालेय अभ्यासक्रमातून डार्विन वगळायचा, तर त्यासाठी संविधानातील तरतुदीनुसार सत्यपालसिंहांना उत्क्रांतीतत्त्व असत्य आहे, याचे पुरावे द्यावे लागतील. त्या पुराव्यांचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. हक्सलेने म्हटल्याप्रमाणे छद्मी उपरोधिक विधानातून धार्मिक पूर्वग्रह वाढवायचा व लोकांना गोंधळात टाकायचा उद्योग धर्मवाद्यांनी न केलेला बरा.
सत्यपालजी, प्रामाणिकता आणि सत्यनिष्ठा या कसोटीचा विचार केला, तर उत्क्रांतीवाद शिकवणारे शिक्षक आमचे पूर्वज माकडापासून उत्क्रांत होत गेले, याबद्दल खंत बाळगणार नाहीत. उलट त्याबद्दल त्यांना अभिमानच वाटेल. उलट माणूस हा विचार करणारा उत्क्रांत प्राणी असूनही तो अज्ञानाचं समर्थन करत असेल, तर माणसापेक्षा माकड बरं. ज्यांचा पूर्वग्रह तसाच आहे, असा माणूस असण्यापेक्षा अपूर्णतेतून विवेकाकडे वाटचाल करणारा माणूस बनणं केव्हाही चांगलं.