Categories
कव्हर स्टोरी

लिंगपिसाट वीरेंद्र देव दीक्षित बाबा

फेब्रुवारी - २०१८

स्वतंत्र देश

आपला देश लोकशाहीप्रधान आहे. इथे प्रत्येकाला आचार, विचार, उच्चार स्वातंत्र्य आहे. कुठेही आणि कधीही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. पण अशा देशात, काही मुलींना डांबून ठेवले जाते. प्राण्यांप्रमाणे पिंजर्‍यात ठेवले जाते. सात कुलूपबंद दरवाजांच्या आत ठेवले जाते. त्यांच्यावर बलात्कार होतात. एक-दोन नव्हे, चाळीसपेक्षा अधिक मुली आढळून येतात; तेही एखाद्या जंगलात, आदिवासी भागात, देशाच्या एखाद्या कोपर्‍यात नव्हे, तर दिल्लीत, खुद्द देशाच्या राजधानीत.

विश्वास बसणे कठीण आहे; पण सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असते. हे शक्य केलंय एका नरराक्षसाने! त्याचे नाव आहे वीरेंद्र देव दीक्षित. जगात अनेक प्रकारचे गुन्हेगार दिसून येतात. उचले, पाकीटमार, चोरी करणारे, दरोडे घालणारे, गुंड, मारामारी करणारे, खून करणारे; पण भारतात यापेक्षा अजून एका वेगळ्या प्रकारचे गुन्हेगार आहेत. ते म्हणजे आध्यात्मिक गुन्हेगार.

आध्यात्मिक गुन्हेगार

आध्यात्मिक गुन्हेगारांचे वैशिष्ट्य म्हणजे लोकप्रतिनिधी, त्यांना मतांसाठी जवळ करतात. पोलीस आणि प्रशासन डोळ्यांवर कातडे ओढतात आणि बळी जाणारे सामान्यजन त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे सर्व प्रकारचे आध्यात्मिक गुन्हेगार आपल्याकडे आढळतात. फसवणारे, लुबाडणारे, महाग वस्तू विकणारे, बोगस औषधे तयार करणारे, खुनी, बलात्कारी, जमिनी हडपणारे, कर बुडवणारे, नाना प्रकार! आणि एवढे करूनही हे गुन्हेगार स्वत:ला दैवीशक्ती असणारे अवतार समजतात.

आध्यात्मिक गुन्हेगारीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना शोधून पकडणारी सक्षम यंत्रणा देशात नाही, तशी इच्छाशक्तीही नाही.

सर्व प्रकारचे गुन्हे पकडण्याचे ट्रेनिंग पोलिसांना दिले जाते; अपवाद फक्त आध्यात्मिक गुन्हेगारांचा! सामान्य गुन्ह्यातील आरोपीला काही तासांत पकडणारे अधिकारी वर्षानुवर्षे आध्यात्मिक गुन्हेगाराला पकडू शकत नाहीत. पीडित भक्तातीलच एखाद्याने आध्यात्मिक गुन्हेगार पकडून दिला किंवा गुन्हेगार स्वत:च कस्टडीत येऊन बसला, तरच तो सापडतो. त्यातूनही एखाद्या कार्यक्षम अधिकार्‍याने आध्यात्मिक गुन्हेगाराला पकडण्याचा सापळा लावला, तर सावज सापडण्यापूर्वीच अधिकार्‍यांची बदली करण्याचे राजकीय ‘कौशल्य’ सत्ताधारी दाखवतात. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी किंवा पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून वरील सत्य उघड झाले आहे. बाबांच्याकडून आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण व्यवस्थित सुरू राहते.

अनेक वेळा पोलीस अधिकारी स्वत:च बाबा-बुवांचे भक्त असतात. कोकणातल्या पाटीलबाबाने, तर त्यावर कडी केली; तो स्वत: पोलीस खात्यात ड्रायव्हर म्हणून नोकरीवर होता; पण त्याच्या ‘आध्यात्मिक प्रगती’ची माहिती खात्याला नव्हती.

अशा परिस्थितीचा फायदा वीरेंद्र देव दीक्षितला मिळाला.

मुख्य समस्या कोणती?

देशात कोट्यवधी तरुणांना नोकरी नाही, राहायला घर नाही, कोट्यवधी जनतेला एक वेळच्या जेवणाची भ्रांत! पण यातील कोणतीच समस्या लोकांना मोठी वाटत नाही. त्यांच्यापुढचा मुख्य प्रश्न असतो, तो मृत्यूनंतर स्वर्ग कसा मिळवावा? मोक्ष कसा मिळवावा? त्यातून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारे बाबा-बुवा गल्ली-बोळात तयार होतात. ते एकाच वेळी भौतिक प्रश्नांवरही उपाय सुचवतात.

मोक्षाची विद्यापीठे!

आपल्या देशात मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारी विद्यापीठे आहेत. अशी विद्यापीठे आध्यात्मिक असल्याने त्यांचे कुलगुरू ‘यूजीसी’च्या नियमाने, राज्यपाल नेमत नाहीत. ते स्वयंभूच असतात. आपल्या डिग्र्या ते स्वत:च जाहीर करतात. कोणी स्वत:ला ‘परमपूज्य’ म्हणवतो, कोणी ट्रीपलश्री, तर कोणी जगद्गुरू! अशा एका विद्यापीठाची प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने स्थापना केली. स्वत: ‘शिवबाबां’नी म्हणजे लेखराज कृपलानींनी! तेच विद्यापीठाचे कुलगुरू! विद्यापीठाच्या शाखा गावोगाव उभ्या राहिल्या. पांढरा-शुभ्र ड्रेसकोड आणि छातीवर परमपिता परमात्म्याचा अंडाकृती बिल्ला लावून विद्यापीठातले प्राध्यापक व विद्यार्थी लगबगीने फिरताना दिसतात. त्यांना ब्रह्माकुमारी आणि ब्रह्माकुमार म्हणतात.

या विद्यापीठाच्या परमज्ञानानुसार सर्व मानव आणि प्राणिमात्रांचा पिता एकच ‘शिवबाबा’ आहे. पिता एकच असल्याने सर्वजण एकमेकांचे बहीण-भाऊ झाले. सर्व मानवजात एक! त्यात भेदभाव करू नये! इथपर्यंत ठीक आहे; पण सर्वजण नात्याने बहीण-भाऊ झाल्याने विवाह कुणाशी करणार? किंवा विवाहितांनी हे नाते निभवायचे कसे? नवरा-बायकोने सुद्धा परस्परांना बहीण-भाऊ मानायचे! नाते निभावण्यासाठी सर्वांनीच ब्रह्मचर्य पाळायचे! त्यासाठी आहारही स्वात्विक(?) द्यायचा! तिखट, तेलकट, मसालेदार, कांदा, लसूण वर्ज्य!

हा सक्तीचा ब्रह्मचर्याचा नियम अनेक बाबा-बुवांना गोत्यात आणतो. मग शारीरिक गरज भागविण्यासाठी त्यांना ढोंगबाजीशिवाय पर्याय राहत नाही. ‘आसाराम बापूं’चा जन्म त्यातूनच होतो.

गुजरात पॅटर्न

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात पाल्दी नावाचा इलाखा आहे. येथील प्रभूपार्कमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची एक शाखा आहे. वीरेंद्र देव दीक्षित इथे अध्यात्मात पीएच.डी. करायला गेले. अध्यात्मात एस.एस.सी., बी.ए., एम.ए.वगैरे अधल्या-मधल्या पदव्या टाळून एकदम पीएच.डी. करण्याची सोय असते. इथे त्यांना ब्रह्माकुमारी ‘वेदांती’ यांनी पीएच.डी.कोर्सची माहिती दिली. ‘वेदांती’ हे घेतलेले नाव आहे. त्याचा वेद किंवा त्याच्या अंताशी काही संबंध नाही. अध्यात्मात हीही सोय असते. कोणी स्वत:ला अदृश्य महाराज, कोणी परमानंद, ब्रह्मानंद अशी नावे घेतात.

हे साल होते 1969. वीरेंद्रांचा पीएच.डी.चा अभ्यास सुरू असतानाच या विद्यापीठाचे संस्थापक आणि पदसिद्ध कुलगुरू लेखराज कृपलानी यांचा अंत झाला. वीरेंद्र देव यांना ‘साक्षात्कार’ झाला की, लेखराज यांच्या आत्म्याने आपल्या शरीरात प्रवेश केला आहे. ही खबर त्यांनी बहेनजींना दिली. ‘लेखराज राम होते, तर आपण कृष्ण आहोत.’ पुढे तर ‘आपणच शंकर आहोत,’ असाही दावा त्यांनी केला.

अशा रीतीने ‘आत्मे-परमात्मे’ एका देहातून दुसर्‍या देहात जाण्याच्या प्रथा ‘अध्यात्मा’त आढळतात. अध्यात्माची प्रचिती ज्याची-त्याने घ्यावयाची असल्याने इतरांनी संशय घेण्याचा प्रश्न येत नाही. प्रमाणपत्र मागता येत नाही. प्रमाणपत्र स्वत: तयार करून स्वत: प्रत अर्पण करायची असते. वीरेंद्रनी तेच केले. त्यांनी लेखराज झाल्याचे प्रमाणपत्र घेतले. कृष्ण, शंकर झाल्याचेही प्रमाणपत्र घेतले.

पण आश्रमातल्या महिलांनी म्हणजे ब्रह्माकुमारींनी, बहेनजींनी यावर अविश्वास दाखवला. वीरेंद्रला ‘कृष्णा’चा अवतार म्हणून मान्यता दिली, तर पुढे काय अनर्थ होतील, याचा त्यांना अंदाज आला असावा. नाहीतरी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. यांनी वीरेंद्रला बाहेरचा रस्ता दाखवला. या विद्यापीठाचे मुख्य ठाणे आहे माऊंट आबू येथे. वीरेंद्रनी तिथेही दाद मागितली; पण बोगस डिग्रीवाल्याला शिक्षणमंत्री करायला नकार द्यावा, तसे झाले. गुजरात आणि माऊंट अबू येथे डाळ शिजत नाही म्हटल्यावर त्यांनी दिल्ली गाठली.

गुजरात पॅटर्न दिल्लीमध्ये

गुजरातमध्ये फेल गेलेला ‘गुजरात पॅटर्न’ त्यांनी दिल्लीत राबवण्याचा प्रयत्न केला. ‘आपण शंकराचे अवतार’ आहोत, असे म्हणत त्यांनी अनेक महिलांशी संधान जुळवले. दिल्लीची सीतामाता, पुष्पामाता, कडकडूमाची संतोषमाता, फरिदाबादची सीमा आणि शांतीबहेन यांच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. प्रत्येक ठिकाणी स्वत: शंकर बनून ‘बहेनजींना’ जगदंबा बनवले.

इतक्या ठिकाणी यश मिळाल्यावर 1976 साली त्यांनी नवीन पाऊल उचलले. त्यांनी ‘अ‍ॅडव्हान्स पार्टी’ नावाचा ग्रुप बनवला. लवकरच त्याचे नाव बदलून ‘आध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय’ ठेवले. त्यांचे ‘आध्यात्मिक कार्य’ पाहून 1977 साली अशोक पाऊजा यांनी त्याची धुलाई केली. तेव्हा वीरेंद्रनी आपला मुक्काम दिल्लीहून फारूखाबादच्या काम्पिल येथे आणि नंतर कानपूर येथे हलवला. इथे एका ब्रह्माकुमारीची साथ मिळाली आणि ‘आपल्या शरीरात लेखराज कृपलानी यांच्या आत्म्याने प्रवेश घेतला आहे,’ या दाव्याला जीवदान मिळाले. आश्रमाला ऊर्जितावस्था येऊ लागली, तसे त्यांनी आपल्यामध्ये कृष्णाचा आत्मा असून त्याला 16108 गोपींची आवश्यकता असल्याचा दावा केला.

श्रीकृष्णाबद्दल जनसामान्यांमध्ये आत्मियता आहे. त्यांचा आदर्श सांगताना कोणी सांदिपनी आश्रमातील गुरूभक्ती, कोणी सुदाम्याबरोबरचे मित्रप्रेम, द्रौपदीबरोबरचे बंधुप्रेम, कृष्णार्जुनाची दोस्ती, राजकारणातले चातुर्य, सर्वांना रुचेल अशी गीता, अशा बाबी सांगतात. पण वीरेंद्र देव दीक्षितला श्रीकृष्णाच्या जीवनातली आवडलेली गोष्ट म्हणजे सोळा हजार एकशे आठ गोपी!

श्रीकृष्ण कथेचा काळ हा स्त्रीसत्तांचा अस्त आणि पुरुषसत्तांच्या उदयाचा संधिकाळ होता. स्त्रीसत्ताक राज्यात मातेवरून वंश ठरत होता. देवकीचा मुलगा किंवा मुलगी राज्याची वारस होणार होती. ही पाळी येऊ नये म्हणून कंसाने आपल्या बहिणीची संतती जगूच द्यायची नाही, असे प्रयत्न केले. दरबारात काहीजण देवकीच्या पक्षाचेही असणार. त्यांनी तिचे मूल राजवाड्यातून बाहेर काढून गोकुळात वाढवले. तोच श्रीकृष्ण. त्याने कंसाला मारून वारशाने मिळणारे राज्य परत मिळविले.

नाव श्री कृष्णाचे; काम जरासंधाचे

पुरुषांच्या सत्तेत अनेक सुंदर तरुणी स्वत:साठी राजे राखून ठेवत असत. पुढच्या काळात त्याला ‘जनानखाना’ म्हणत. श्रीकृष्णाने जरासंधाचा वध केला. जरासंधाने स्वत:साठी राखून ठेवलेल्या सोळा हजार एकशे तरुणी मुक्त झाल्या. त्या श्रीकृष्णाकडे स्वेच्छेने आल्या. वीरेंद्र देव दीक्षितने आपली कामवासना शमवण्यासाठी श्रीकृष्णाचे नाव घेतले; पण जरासंधाप्रमाणे तरुणींच्यासाठी कारागृहे तयार केली. त्यांना पशूप्रमाणे पिंजर्‍यात ठेवून आपली वासना शमवली. त्याशिवाय इतरांना मुली पुरवून पैसा मिळवला!

31 डिसेंबर 1995 रोजी एका दक्षिण भारतीयाने त्याला विरोध केला, दोन दिवसांत त्याचा खून झाला. 30 मार्च 1998 रोजी कलकत्त्याच्या पालकांनी, आपल्या मुलीला महाराजांनी डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याची केस काम्पिल पोलीस ठाण्यात केली. पोलीस काम्पिलमधील आध्यात्मिक आश्रमात गेले आणि तरुणीची सुटका केली. यावेळी अकरा आश्रमवासीयांना अटक करण्यात आली. त्यानंतर चारच दिवसांनी, 3 एप्रिल 1998 रोजी दिल्लीच्या अशोक पाऊजा आणि दीक्षितबरोबर त्याची साथीदार कमला आणि कर्नाटकच्या शांताबहेनवर केस केली. 16 एप्रिल 1998 रोजी मथुरेतल्या एका महिलेने अशीच बलात्काराची केस केली. पोलीस अटक करायला आश्रमात गेले, तर आश्रमवासीयांनी कांगावा करायला सुरुवात केली. पोलिसांनी वीरेंद्र देव दीक्षितबरोबर आश्रमवासीय सेवादार रवींद्र दास, जगन्नाथ, महेश, जनार्दन, मनोरंजन, कोपली, शांताबहेन अशा आठजणांना जेलमध्ये टाकले. ते सहा महिने तुरुंगात होते.

काम्पिलच्या आश्रमावर या काळात आयकर विभागाने छापा टाकून 5 कोटी रुपये जप्त केले. वीजमंडळाने वीजचोरीची केस आश्रमावर घातली.

‘सर्वगुणसंपन्न’ वीरेंद्र देवने नाव श्रीकृष्णाचे घेतले आणि काम मात्र जरासंधाचे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन खंडणी मागणारे गुंड आपल्याला दिसतात. प्रभू रामचंद्रांंचे नाव घेऊन धर्माधर्मात भांडणे लावणारे धर्मांध दिसतात. त्याच यादीत वीरेंद्र सामील झाला.

देशद्रोही बाबा

हे आध्यात्मिक गुन्हेगार आर्थिक गैरव्यवहार करतात, लैंगिक दुर्व्यवहार करतात; शिवाय देशद्रोही कारवायातही मागे राहत नाहीत.

याच बाबाच्या कलकत्त्याच्या आश्रमाचा प्रमुख रॉबिनदास याला 2015 मध्ये अतिरेक्यांना मदत केल्याबद्दल तुरुंगवास झाला. पोलिसांनी छापा मारला, आश्रमातून यावेळी तीस मुलींना बंधमुक्त केले.

सोळा हजार एकशे आठ गोपींबरोबर रासक्रीडा करण्याचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी वीरेंद्र देव दीक्षितने फारुखाबादच्या काम्पिल आणि दिल्लीच्या रोहिणी येथील आश्रमाची निवड केली.

रोहिणी आश्रम नव्हे, किल्ला

आश्रम कसा असावा? पूर्वीच्या ऋषींचे आश्रम प्रसिद्ध आहेत. जेवण करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी, झोपण्यासाठी पर्णकुटी, चिंतन-मनन करण्यासाठी लहान-मोठ्या वृक्षांच्या सावलीत बसण्याची सोय. अभ्यासासाठी, प्रार्थनेसाठी मोठ्या वृक्षांच्या छायेत एकत्र बैठक!

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असे म्हणत ईश्वरचिंतनात, आध्यात्मिक ज्ञानाच्या वाद-संवादात मग्न असलेले गुरू-शिष्य असे चित्र आश्रम म्हटल्यावर समोर येते.

पण आताचे आध्यात्मिक आश्रम याच्या पूर्णत: विरोधी आहेत. भरभक्कम कंपाऊंड वॉलच्या आत तशीच भक्कम इमारत. इथून आतली किंकाळी बाहेर येणार नाही किंवा बाहेरची हाक आत ऐकू येणार नाही, याची खात्री. आध्यात्मिक ज्ञानाने आत्मा मुक्त होतो, परमात्म्याशी संवाद करतो, असे म्हणायचे; पण प्रत्यक्ष साधकाला अनेक बंधनात जखडून ठेवायचे.

आध्यात्मिक छळछावणी

शरीर जखडण्यासाठी उंच भिंती, लोखंडी दरवाजे आणि त्यांना भक्कम कुलपे. त्यातूनही कोणी बाहेर जाईल किंवा बाहेरचा आत येईल, याची धास्ती असल्याने पहारेकरी!

मन जखडण्यासाठी आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक, सुष्ट आणि दुष्ट शक्ती, वाईट शक्ती, काळी जादू, पितर अशा काल्पनिक भ्रामक गोष्टींची भीती, संमोहनशास्त्राचा दुरुपयोग!

शरीर आणि मन दोहोंनाही सुंद करण्यासाठी आधुनिक औषधांच्या गोळ्या आणि इंजेक्शनचा मारा. या सर्वांची बेरीज म्हणजे आध्यात्मिक आश्रम!

हे वर्णन काल्पनिक नाही. वीरेंद्रदेव दीक्षितने असे आश्रम उभे केले.

काही वर्षांपूर्वी मुंबईजवळील अशाच एका दुसर्‍या भोंदूबाबाच्या आश्रमाची माहिती बाहेर आली होती. एका पित्याने आपली मेडिकल कॉलेजची मुलगी या आश्रमात गेली आहे, हे कळल्यावर तिला भेटण्याची इच्छा प्रकट केली. त्याला मारहाण करून हुसकवण्यात आले. म्हणून तो पोलिसांकडे गेला. बापाला भेटायला नाईलाजाने मुलीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चेहर्‍यावर डागल्याच्या खुणा, पाय ओढत, दोन साधिकांच्या सहाय्याने ठाण्यात आलेल्या मुलीने ‘आपण सज्ञान असून आपल्याला आश्रमातच राहायचे आहे,’ असे पोलीस अधिकार्‍यांसमोर सांगितले. तिने बापाशी बोलणेही टाळले. दहशत आणि भीती तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होती; पण पोलीस काही करू शकले नाहीत. हतबद्ध बाप हात हलवत परतला. ही माहिती अंनिसच्या वार्तापत्रात छापली म्हणून उलट वार्तापत्र आणि त्या बापावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात आला.

आध्यात्मिक गुन्हेगार घटनेमधील तरतुदींचा पद्धतशीर उपयोग करून घेतात. वीरेंद्र देवचा रोहिणी येथील आश्रम असाच आहे. आश्रम नसून तो एक किल्लाच असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी वर्णन केले आहे. 19 डिसेंबर 2017 रोजी पोलिसांनी त्यावर छापा टाकला, तेव्हा ही बाब पुढे आली. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाने 21 डिसेंबर रोजी आश्रमाची तलाशी घेतली. त्यासाठी 9 तासांपेक्षा जास्त वेळ लागला, तरीही 22 खोल्यांपैकी केवल 13 खोल्यांची कुलपे तोडली गेली. आश्रमाला जोडूनच दुसरा आश्रम आढळून आला. तो व्ही.आय.पी.साठी असून दोन्ही आश्रम भुयारी मार्गाने जोडले आहेत. या बाबाचे आठही आश्रम तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.

आश्रम तपासण्यासाठी उच्चाधिकारी कमिटी

वीरेंद्र देव दीक्षितच्या आध्यात्मिक कार्याची गंभीर दखल हायकोर्टाने घेतली आणि आश्रमाची तपासणी करण्यासाठी एक कमिटीच फॉर्म केली. त्यानुसार या छाप्यामध्ये रोहिणी विभागाचे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस राजेश गुप्ता, दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मलीवाड आणि ज्येष्ठ वकिलांनी भाग घेतला.

एवढे उच्च अधिकारी असूनही त्यांना मुलींना भेटण्यासाठी दोन तास झगडावे लागले, असे मलीवाड यांनी म्हटले आहे.

आश्रमातील आध्यात्मिक साहित्य

एखाद्या आध्यात्मिक केंद्राला भेट दिली, तर कोणत्या वस्तू, पदार्थ पाहायला मिळतील? पूजेचे साहित्य, उदबत्ती, कापूर, धर्मग्रंथ, देव-देवतांच्या मूर्ती, पळी-पंचपात्र, श्रीफळ म्हणजे नारळ, हळदी-कुंकू अशी मोठी यादी करता येईल; पण या आश्रमात मलीवाड यांना लैंगिक छळाबद्दलची तक्रारीची पत्रे, काही विशिष्ट इंजेक्शन आणि संशयास्पद औषधे यांची भरलेली खोकी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे एकही आध्यात्मिक पुस्तक त्यांना आश्रमात मिळाले नाही. दिल्ली हायकोर्टाने सीबीआयलाही चौकशीचे निर्देश दिले.

साधकांच्या सोयी

आध्यात्मिक ज्ञानाच्या लालसेने आलेल्या भाविकांना कोणत्या सोयी द्याव्यात? त्यांचे चित्त शांत राहावे, एकाग्रता साधता यावी, वातावरण सात्विक राहावे, अशा सोयी अपेक्षित आहेत.

या आश्रमातल्या सोयींचे वर्णन प्रत्यक्षदर्शी अधिकार्‍यांनी केले आहे. “काटेरी तारेने वेढलेल्या, प्राणी ठेवण्यासाठी वापरावयाच्या पिंजर्‍यामध्ये मुली आणि महिलांना ठेवले होते.” हायकोर्टाने या आश्रमाची तुलना हरियानामधील सिरस्याच्या रामरहिमच्या आश्रमाशी केली; ज्याला गेल्याच वर्षी सश्रम कारावास झाला आहे.

आश्रमातील आध्यात्मिक कार्य

चिंतन, मनन, प्रवचन, सत्संग, ईश्वरी ज्ञानाची चर्चा, पूजापाठ अशा कार्यांची अपेक्षा आश्रमात आहे; पण कोर्टासमोर हजर केलेल्या मुली आणि महिलांनी सांगितले की, आश्रमात असताना त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यांना कोर्टासमोर आणणार्‍या एनजीओंनी सांगितले की, असे कार्य या आश्रमात गेली चौदा वर्षे सुरू आहे आणि अशा किमान शंभर महिला आश्रमात डांबून ठेवण्यात आल्या आहेत.

वीरेंद्रबाबाने आपल्यावर अनेकप्रसंगी बलात्कार केल्याची कैफियत बत्तीस वर्षीय महिलेने ‘इंडियन एक्स्प्रेस’ (21 डिसेंबर 2017) समोर मांडली. न्यूज चॅनेलसमोर 15 मुलींनी मुलाखतीत सांगितले की, मुलींना नंबर दिलेले होते, बाबा नंबर पुकारून बोलवत असे आणि मालीश करायला लावत असे. लहान मुलीला मासिक धर्म सुरू झाला की, बाबाच्या संपर्कात पाठवण्यात येई. तो तिच्याशी ‘पती-पत्नी’ प्रमाणे वर्तन करत असे. तो रोज सात मुलींच्यावर बलात्कार करत असे. ‘योग-भोग आणि गर्भपात’ असेही वर्णन एका महिलेने केले.

आश्रमाबाहेरही कार्य

आसपासच्या परिसरातील लोकांना याची कुणकुण होती. ज्यांनी बोलायचे धाडस केले, त्यांना पोलिसांच्या मदतीने दाबण्यात आले. आश्रमावर छापा पडल्यावर भीती नाहीशी झाली आणि शेजारी बोलू लागले. “मध्यरात्री 2 वाजता बंद गाडी येते. ती गेटमधून सरळ बेसमेंटमध्ये जाते. त्यातून मुली व महिलांना बाहेर नेले जाई व आत आणले जाई.”

देशभर जाळे

दिल्लीमधील रोहिणी, द्वारका, उत्तमनगर; याबरोबर फारूखाबाद, बांदा, जयपूर, झुनझुन, माऊंट आबू अशा आश्रमांतून छापे मारण्यात आले. प्रत्येक ठिकाणी मुली बंधमुक्त करण्यात आल्या. जम्मू-काश्मीरपासून मुंबईपर्यंत, असे आश्रम आढळून आले.

भगवान असल्याची लेखी मान्यता

लोक देवाची प्रचिती मनापासून घेतात. चांगल्या वर्तनाचे अनुभव आल्यावर एखाद्याला म्हणतात, ‘हा देवमाणूसच आहे.’ ‘हा माणसातला देव आहे’; पण या बाबाकडे अनुभव घेईपर्यंत थांबायला कोणाला वेळ नव्हता. दहा रुपयांच्या अ‍ॅफिडेव्हिटवर ‘दीक्षित बाबा भगवान आहे,’ हे लिहून दिल्यावरच आश्रमात प्रवेश मिळे. त्यातच ‘आपण आयुष्यभर ब्रह्मचारी राहू’ असेही लिहून द्यावे लागे. मगच आश्रमात ‘बाबांचे कार्य’ सुरू होई!

भोंदू बचाव समिती

भोंदूबाबांच्या बचावासाठी नेहमी ‘भोंदू बचाव समिती’ पुढे येते. इथेही ती मागे राहिली नाही. न्यूज चॅनेलवरील चर्चेत धर्मगुरू आणि भोंदू बचाव समितीने बाबाचा बचाव करताना विविध युक्तिवाद केले. आश्रमावर धाडी पडल्या, वृत्तपत्रांनी बातम्या छापल्या, पोलीस बाबाच्या शोधात आहेत. अशा वेळी ‘बाबा कोर्टासमोर हजर का होत नाही?’ या प्रश्नाचे उत्तर एका धर्मगुरूने दिले. ‘बाबांना समन्स पोचले नसल्याने, त्यांना ठाऊकच नाही.’

‘आसाराम, राम-रहिम आणि आता दीक्षित बाबा यांच्यावर कारवाई करण्यात आली, हे सर्व हिंदू धर्माच्या महाराजांविरोधात षड्यंत्र असून मुस्लिम मौलवींना का पकडत नाही?’ असा कांगावा भोंदू बचाव समितीच्या प्रवक्त्यांनी केला.

‘बंधक’ बनवलेल्या मुली हिंदू आहेत, त्यांची बाजू का घेत नाही? या प्रश्नावर मुस्लिम मुलींनी हिंदू महाराजांना पकडण्यासाठी हा बनाव रचल्याचे उत्तर त्यांनी दिले.

सेक्स स्नान

एका चॅनेलने बाथरूमपासून ते बेडरूमपर्यंत बाबा कसे चाळे करत असे, याची माहिती उघड केली. ‘पंचवीस वर्षे आश्रमात असे कुकर्म चालत असेल, तर लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस अधिकारी काय करत होते? त्यांच्यावरही कारवाई करण्याची हिंमत आहे काय?’ असा खडा सवाल बाबाचा बचाव करणार्‍या एका धर्मगुरूने केला. असा प्रश्न बाबाच्या बचावासाठी विचारला असला, तरी आश्रमाच्या भागातील लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी याचे उत्तर देणे आवश्यक आहे. ही सर्व चर्चा आजही यू-ट्यूबवर आणि ‘द हिंदू’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘इंडिया टुडे’, ‘नॅशनल फ्री प्रेस’ इत्यादी अंकांमधूनही उपलब्ध आहे.

फुग्याला टाचणी

अनेक वर्षे अध्यात्माच्या नावाखाली दुष्कृत्ये करणारे बाबा अचानक प्रकाशात येतात, ते एखाद्याने चिकाटीने केलेल्या प्रयत्नामुळे. इथेही तसेच झाले. राजस्थानमधील झुनझुनच्या विजयसिंग या शेतकर्‍याने चिकाटीने संघर्ष केला आणि बाबाच्या दिल्लीतल्या अभेद्य किल्ल्याला भगदाड पाडले. त्यांची ‘टिका’ नावाची मुलगी 9 नोव्हेंबर 2017 रोजी गायब झाली. त्यांनी पालम इथल्या आनंद नावाच्या एजंटवर संशय व्यक्त केला. त्यानेच ‘विजय विहार’ इथल्या दिल्लीतील आश्रमात तिला नेऊन सोडल्याचा एफ.आय.आर. दाखल झाला. 24 नोव्हेंबर रोजी राजस्थान पोलीस सर्च वॉरंट घेऊन मुलीला परत आणण्यासाठी दिल्लीला पोचले.

पण दिल्ली पोलिसांनी ‘वॉरंट दिल्लीत चालणार नाही’ म्हणत त्यांना परत पाठवले. ‘मुलीला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात यावे,’ असे स्पष्ट आदेश घेऊन पुन्हा राजस्थान पोलीस दिल्लीत आले; पण आश्रमाच्या बंधनातून तिला मॅजिस्ट्रेटसमोर आणण्यात आले नाही. हताश बाप पोलिसाबरोबर दोन दिवस वाट पाहत थांबला; पण दिल्ली पोलीस आश्रमात गेले. आणि ‘मुलगी परत यायला तयार नाही,’ असे सांगत आले. सर्च वॉरंट असूनही मुलीला मॅजिस्ट्रेटसमोर आणून तिचा जबाब नोंदवण्याचे टाळले गेले. पोलिसांनीच नियम पायदळी तुडवला.

विजयसिंग यांनी आरोप केला, ‘आपल्या मुलीला हिप्नटाईझ करून ड्रग्ज चारून आणि इंजेक्शन देऊन बधीर केले आहे, तिचा इमोशनल कोशंट शून्यापर्यंत आणला. त्यामुळे ती कोणत्याच आवाहनाला प्रतिसाद देऊ शकत नाही.’

आश्रमामध्ये दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर विजयसिंग यांच्यासमोर मुलीला आणण्यात आले. सोबत पाच बहेनजी होत्या. ‘मला इथेच राहायचंय,’ एवढं एक वाक्य बोलून पुन्हा आत गेली. इथल्या मुली हिप्नटाईज केल्याचा संशय पोलीस अधिकार्‍यांनीही बोलून दाखवला.

आश्रमात प्रवेश करताना त्यांना आत घेतल्यावर पहिले दार बंद करण्यात आले. पहिल्याला कुलूप घातल्यावरच दुसरे उघडले. या प्रकारे सात दरवाजांच्या आत पोचल्यावर आपण कोणत्या भुलभुलैय्यामध्ये सापडलो आहोत, याचा अंदाज त्यांना येईल. दरवाजे आणि खिडक्याही बंद का असतात? या प्रश्नावर ‘बहनोंके सुरक्षा के लिए।’ असे उत्तर मिळाले. अजूनही बाबा पोलिसांना सापडला नाही. पण या प्रकरणातून अनेक प्रश्न उपस्थित झालेत – आश्रमात आलेल्या मुली आणि महिलांना कैदेत ठेवून, त्यांना ड्रग्ज चारून, हिप्नटाईज करून त्यांच्यावर बलात्कार करून स्वत:ला आध्यात्मिक भगवान म्हणून मिरवणारा बाबा अस्तित्वात का येतो? टिकून का राहतो? अब्जावधी रुपयांचा मालक कसा बनतो? समाज, शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांवर काही उपाय करणार आहेत काय? आध्यात्मिक गुन्हेगारांना शोधणार की नाही? महाराष्ट्रात झालेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अपुरा असेल, तर त्यात भर घालणार की नाही?

उपाय काय?

आध्यात्मिक गुन्हेगारीला आळा घालायचा असेल, कठोर उपायांची गरज आहे. सर्व आश्रम, डेरे, मठ इत्यादी आध्यात्मिक निवासस्थानांना शैक्षणिक वसतिगृहांप्रमाणे नियम लावले पाहिजेत. महिनाभर घाम गाळणार्‍या कामगार कर्मचार्‍याला इन्कमटॅक्स आहे. करोडो रुपयांचे भांडवल उभे करून उद्योग उभारणार्‍या उद्योगपतीला टॅक्स भरावा लागतो; पण काहीही कष्ट न करता, देवाच्या नावावर अब्जावधीची संपत्ती गोळा करणार्‍या बुवाला टॅक्स नाही. उलट समाज आणि शासन त्यांना फुकट जमिनी दान करते. याचा विचार झाला पाहिजे. त्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे.

खरे अध्यात्म

अध्यात्माच्या नावावर पैसे मिळवणार्‍या बुवाबद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात – ‘जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे। गळा घालू नये माळा, बुका लावू नये भाळा॥ तुका म्हणे जे घेती, देती तेही नरका जाती।”

कथा मातेसमान, भाडं घेता न लाजे॥

अध्यात्माच्या नावावर पैसे देणारे आणि घेणारे दोघेही नरकात पडतात आध्यात्मिक कथा आईसारखी आहे, त्यावर पैसे मिळविणे म्हणजे आईचे भाडे घेणे आहे. भाविकांनी आध्यात्मिक गुन्हेगारांना देणग्या देण्यापूर्वी संत तुकारामांचे अभंग अभ्यासावेत.

बाबा-बुवांच्या मागे जाण्यापेक्षा ‘देव रोकडां सज्जनी’ हे लक्षात घ्यावे. लोकप्रतिनिधींनी कॉर्पोरेट बाबांच्या कारवाया थांबवण्यासाठी खास कायदा करावा, पोलिसांना आध्यात्मिक गुन्हेगार पकडण्याचे प्रशिक्षण द्यावे आणि जनतेने स्वत:च आपली पोरे-बाळे आध्यात्मिक बुवांपासून सुरक्षित ठेवावीत.

लेखक संपर्क ः 9764147483