ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, लोकविज्ञान संघटनेच्या संस्थापक सदस्या आणि कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे 1 डिसेंबर 2016 रोजी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. सुलभाताईंचा जन्म सातारला 1932 मध्ये झाला. सुलभाताई या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, सहकार चळवळीचे प्रवर्तक धनंजयराव गाडगीळ व सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला काळे यांच्या कन्या. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ हे त्यांचे थोरले बंधू. त्यांचे शालेय आणि डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण पुण्यातच झाले. त्यानंतरचा संशोधन अभ्यास त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’, सोव्हिएत रशिया आणि पुढे अमेरिकेतील हॉर्वर्ड येथे केला. 1972 ते 77 दरम्यान त्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या संचालक मंडळाच्या सदस्या होत्या.
आपल्या संशोधन अभ्यासाचा वापर करीत त्यांनी शेती-ऊर्जा- औद्योगिक क्षेत्रांचे नियोजन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यास, धोरण समीक्षा, नियोजनाची गरज आणि धोरणात्मक पर्याय यांची मांडणी केली. अलिकडील काळात त्यांनी नवउदारवादी आर्थिक धोरणांमुळे उद्भवलेली परिस्थिती, धर्मांध हिंसाचार, गोवंशबंदी, काश्मीर प्रश्न अशा वर्तमानातील जवळजवळ प्रत्येक प्रश्नावर पुस्तिका प्रकाशित केल्या. अनेक डाव्या आणि पुरोगामी नियतकालिकांत त्यांनी लेख लिहिले. त्यांची सुस्पष्ट वैचारिक भूमिका, परखड चिकित्सा, आकडेवारीसह विश्लेषण आणि पर्यायी उपायांची दिशा ही वैशिष्ट्ये त्यांच्या पुस्तिकातून व लेखातून दिसून येतात. जागतिकीकरणविरोधी चळवळ, महराष्ट्र दुष्काळ निवारण मंडळ, नामांतर चळवळ, हिंदू-मुस्लिम एकतेच्या चळवळी, अण्वस्त्रविरोधी आणि शांतता चळवळ, एन्रॉन, जैतापूर आंदोलन यात त्यांचा केवळ पुस्तिका लिहिण्यापुरताच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतही सहभाग असे.
सुलभाताई अत्यंत साधेपणाने एकट्याच राहत. पण त्यांचे घर विविध प्रवाहातील पुरोगामी, डाव्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच खुले असे. अनेक कार्यकर्ते, संघटना, विद्यार्थी, कामगार चळवळींना त्या बिनबोभाटपणे भरघोस मदत करत असत. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील विविध क्षेत्रातील अभ्यासक, डाव्या, पुरोगामी परिवर्तनवादी असंख्य कार्यकर्त्यांचा आधार त्यांच्या निधनाने नाहीसा झाला आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परिवर्तनाचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या सुलभाताईंना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंनिवाचे संपादक मंडळ अखेरचा सलाम करीत आदरांजली वाहत आहे.