डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर 34 महिन्यांनी सीबीआयने अखेर हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता व पनवेल येथील सनातन संस्थेत वैद्यकीय सेवा देत असलेल्या वीरेंद्र तावडे याला अटक केली. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना या दोन्ही सरकारांच्या काळात गेली 34 महिने ठप्प असलेल्या तपास प्रक्रियेला या अटकेमुळे किमान काहीतरी गती मिळाली आहे. कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या संदर्भात अटक झालेला समीर गायकवाड हाही सनातन संस्थेचा साधक आहे. सीबीआय, एटीएस, पोलिस या सर्व तपासयंत्रणाच्या संशयाची सुई याच संस्थेभोवती फिरती आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर अनेकांनी दाभोलकर यांच्या खुनामध्ये सनातन्यांचा हात असावा, असा संशय व्यक्त केला होता, त्याला या अटकांमुळे पुष्टीच मिळत आहे. आता तपासाची प्रक्रिया अशीच गतिमान राहून प्रत्यक्ष खून करणारे आणि त्याचे सूत्रधार यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोचतील, अशी आपण आशा करुया. तपासाबाबतचा तपशील याच अंकात इतरत्र दिला आहे.
पण केवळ आशा करण्यात काहीच अर्थ नाही. कारण खुनाचा तपास किमान या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी अंनिस, समविचारी संघटना, कुटुंबीय आणि प्रसारमाध्यमे यांना न्यायालयीन आणि रस्त्यावरील संघर्ष सातत्याने गेली 3-4 वर्षे करावा लागला आहे. किंबहुना केवळ त्या संघर्षाच्या दबावामुळेच सरकारला आणि तपास यंत्रणांना या खुनाकडे दुर्लक्ष करता आलेले नाही. हा दबाव आपल्याला सातत्याने राखावा लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. त्या दृष्टीने 20 जुलै ते 20 ऑगस्टच्या दरम्यान अंनिस आणि इतर समविचारी संघटना यांच्या सहाय्याने राबवावयाच्या मोहिमेला खूपच महत्त्व आहे.
डॉ. दाभोलकरांचा खून हा काही व्यक्तिगत कारणासाठी झालेला खून नाही. नुकतेच न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे, “दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खून म्हणजे संपूर्ण समाजाविरोधातील गुन्हा आहे. या महनीय व्यक्तींचे खून त्यांचे काम आणि विचारांमुळे झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी विचार, भाषास्वातंत्र्य असे सार्वजनिक हीत पणाला लागले आहे.” आदरणीय न्यायालयाच्या या मताशी कोणीही सहमत होईल. आपणही सुरुवातीपासूनच हेच सांगत होतो. आपले म्हणणे अंनिसने तपास यंत्रणांपर्यंत पोचवलेही होते. असे प्रस्थापित विचारांच्या विरोधी विचार मांडणार्यांचे, बहुजनांचा, शोषितांचा कैवार घेणार्यांचे खून पाडण्याची परंपरा जगभरच्या संस्कृतीत पूर्वापार आहे. आपल्याकडेही अगदी चार्वाकांना जाळण्यापासून थेट चक्रधर, बसवेश्वर, तुकाराम या प्रस्थापित ब्राह्मण्यवादी वैदिक मूल्यांच्या विरोधकांना संपविण्याची ही परंपरा दिसून येते. या सर्वांनी ब्राह्मण्यवादी वैदिक मूल्यांना आव्हान दिले होते. आधुनिक काळात याचे सर्वात ठळक उदाहरण गांधींचे आहे. दाभोलकरांचा खूनही याच मालिकेतील आहे. ‘आम्हीच खरे धार्मिक’ म्हणत बुवाबाजी, भूत, भानामती, ज्योतिष, चमत्कार वगैरेंचा भांडाफोड करीत त्यांनी ब्राह्मण्यवादी मूल्यांना आव्हान दिले आणि त्याला बहुजनांचा मिळत असलेला पाठिंबा यामुळेच पोटशूळ उठलेल्या धर्मांधानी त्यांचा खून केला आहे.
आज खुनाचा तपास गती घेतो आहे; पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही. खुनी व सूत्रधार यांच्यापर्यंत पोचण्यासाठीचा विवेकी लढादेखील आपल्याला गतिमान करायचा आहे.
– राजीव देशपांडे (सहसंपादक, अंनिवा)