अंधश्रद्धा निर्मूलनावरील निवडक खंडांचे प्रकाशन ज्ञानवर्धक
तुकडोजी महाराज व गाडगेमहाराज यांच्या साहित्य विचार व कृतीचा अंधश्रद्धेचा कडवा अभ्यासक आहे. त्यामध्ये भर ही शहीद डॉ. दाभोलकर यांच्या विवेकवादी विचारांची झाली आहे. त्यामुळे मी त्यांचे तीन हजार रुपयांचे साहित्य विकत घेऊन वाचत आहे. आचरणात आणत आहे व आपल्या चळवळीचे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मी 1 जुलैपासून चालू केले आहे. या मासिकामधून ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’तील निवडक लेखांचे खंड प्रकाशित होत आहेत, याचा मला आनंद होत आहे. त्यामुळे दाभोलकरांच्या 25 वर्षांतील चळवळीची वाटचाल मला अभ्यासायला मिळणार आहे. माझ्या ज्ञानात भर पडण्याला मोठ्या प्रमाणात मदत होईल, अशी मला आशा आहे.
– पांडुरंग कोगदे, कुंभारमाठ, जि. सिंधुदुर्ग
कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे ‘समग्र अंनिवा खंड’
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’त डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेले लेख आणि गेल्या पंचवीस वर्षांतील विविध लेखकांनी लिहिलेले साहित्य यांचे तीन खंड पुस्तकरुपाने प्रकाशित होत आहेत, त्याबद्दल मन:पूर्वक आभार. या साहित्यातून अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्याचे मोठे कार्य होणार आहे.
– एस. बी. चौगुले, नेसरी, जि. कोल्हापूर
परखड विचाराबद्दल अभिनंदन!
डोंबिवली येथील 3 जुलै रोजी झालेल्या ‘वाचक मेळाव्या’त आणि शिबिरात आपण ‘फसवे विज्ञान’ या विषयावर दिलेले व्याख्यान खूप आवडले. अभ्यासपूर्ण, परखड आणि निर्भीड आपण विषय मांडलात, याबद्दल अभिनंदन! मी प्रसिद्ध केलेल्या साहित्यातही अशाच तर्हेने निर्भीडपणे व्यक्त झाले आहे.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’ची वर्गणी नियमितपणे भरत असते. इतरही काही वाचकांना वर्गणीदार व्हायला प्रवृत्त करते. या मासिकाची समाजाला खूप गरज आहे.
सौ. नीला शाह, डोंबिवली, जि. ठाणे
बुवाबाजीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याबद्दल अभिनंदन!
जुलै 2016 च्या अंकात सांगलीतील मौलाना जमीर मुजावर आणि कांदिवलीच्या सागर जोशी यांच्या बुवाबाजीचा पर्दाफाश करणारे लेख छापलेत. याबद्दल अभिनंदन! आपण जनतेला फसवणूक करणार्या बुवा-बाबांबद्दल तक्रारी करण्यास सर्व लोकांना आवाहन करावे.
छोट्या बुवांना आपण पकडतो; पण पैशाच्या माजाने मोठे झालेल्या आणि लाखोंच्या संख्येने अनुयायी असलेल्या मोठ्या बाबांचे पितळ उघड करण्याचे काम आपण जरूर हाती घ्यावे. हे बुवालोक मोठमोठ्या जाहिराती वर्तमानपत्रांतून देतात. त्या कशा बंद होतील, याबाबत कायदेशीर मार्ग शोधावा.
– बा. स. कुलकर्णी, विरार, जि. पालघर