Categories
जादूटोणा

पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टराकडून महिलेवर तांत्रिक उपचार

एप्रिल - २०१८

जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

छातीत दुधाची गाठ निर्माण झाल्याने संध्या सोनवणे (वय-24, रा.पर्वती, पुणे) या महिलेवर डॉ. चव्हाण यांच्या स्वारगेट येथील रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र तेथील उपचाराला यश न आल्याने संध्या यांना दीनानाथ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, डॉ. चव्हाण यांनी सोनवणे यांना ‘सकाळी 7 ते 8:30 ही यमाची घंटा असते’ असे सांगून ऑपरेशन करण्यास विलंब केला आणि मांत्रिकाला बोलावून घेत, नारळ, फूल, गुलाल आणि मंत्राच्या सहाय्याने अघोरी उपचार केले. त्यानंतर संध्या सोनवणे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक 13.03.18 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी डॉक्टर सतीश चव्हाण आणि मांत्रिका विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेत महेश विष्णु जगताप (वय 22) रा. इंद्रायणीनगर, भोसरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सद्यस्थितीनुसार डॉ. सतिश चव्हाण फरार असून अघोरी उपचार करणारा मांत्रिक सदाशिव येरवडेकर (वय 48, रा. कसबा पेठ, पुणे) याला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केला असता प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी विशाखा पाटील यांनी 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दि. 21 फेब्रुवारीला दिनानाथ रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात संध्या यांना दाखल केले. येथे त्यांच्यावर डॉ. समीर जोग यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना डॉ. सतीश चव्हाण हे भेटायला येत. त्यांनी परस्पर एका मांत्रिकाला बोलावून रुग्ण बरा होईल असे सांगून जादूटोण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप महिलेचा भाऊ महेश जगताप यांनी केला आहे. त्याचा व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला आहे. त्यांना संशय आला. त्यांनी मांत्रिकाच्या सर्व कृतींचे चित्रीकरण करून ठेवले. हा जो अघोरी उपचाराचा प्रकार घडला तो अन्य कोणावर होऊ नये. प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. या करिता सामाजिक कार्यकर्तेसचिन तावरे व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना जगताप यांनी हा प्रकार सांगितला. सचिन तावरे हे शिवसेनेचे स्थानिक नेते असून अंनिस शाखा पुणे मधील धडाडीचे ज्येष्ठ कार्यकर्तेअरुण जाधव यांचे जावई आहेत. त्यांनी हे प्रकरण अरुण जाधव यांच्या कानावर घालून त्यास अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांच्यामार्फत वाचा फोडण्याचे कार्य केले. अंनिसने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले व पीडित कुटुंबाला धीर दिला.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेतलेल्या महिलेवर डॉक्टर आणि नर्सच्या समक्ष मांत्रिकाद्वारे जादूटोणा केल्याच्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीर दखल घेतली. राज्य आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकांनी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले. त्यानुसार महापालिकेकडून तीन डॉक्टरांचे विशेष पथक दीनानाथ रुग्णालयात दाखल झाले. या बाबत महापालिकेच्या आरोग्यविभागाचे सहाय्यक अधिकारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, राज्यसरकारच्या आरोग्यसेवा विभागाच्या उपसंचालक कार्यालयातून लेखी आदेश आल्यानंतर तातडीने तीन डॉक्टरांचे विशेष पथक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मंगळवारी दि. 13.03.18 ला पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाईल. तसेच महापालिका प्रशासनाकडून स्वारगेट परिसरातील ‘चव्हाण नर्सिंग होम’ चीही तपासणी केली जाईल.

पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या शहरात डॉक्टरसारखी विज्ञान शिक्षण घेतलेली मंडळी असे अघोरी उपचार करतात, हे अनाकलनीय आहे. समाजात अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी काम करीत राहिले पाहिजे.

देविदास इंगळे, पुणे