त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीचे सरकार पराभूत होऊन भाजपप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीची ही एक सर्वसाधारण परंपरा आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका होऊन सरकारे बदलली जातात किंवा जुनीच सरकारे सत्तेवर परत येतात. भारतीय जनतेला राज्यघटनेने बहाल केलेला हा मौलिक अधिकार आहे. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर ते ज्या पक्षाचे असते, ज्या विचारांचे असते, त्या पक्षाने निवडणुकीत जनतेला जी आश्वासने दिलेली असतात, त्यानुसार त्यांनी राज्य चालवावे, धोरणे आखावीत ही सर्वसाधारण अपेक्षा असते. तशी पद्धत असते; पण जुन्या सरकारने; ते ज्या विचारांचे असते, त्यानुसार त्यांना प्रेरणा देणार्या, त्यांच्या विचारांचे आदर्श असणार्या महापुरुषांचे जर कृतज्ञता म्हणून स्मारक उभारले, पुतळे उभारले किंवा इतर काही गोष्टी केल्या, तर नवे येणारे सरकार; जे वेगळ्या विचारांचे आहे, ते पुतळे पाडू लागले, स्मारके नष्ट करू लागले, तर या देशात लोकशाहीची परंपरा शिल्लक राहील काय? हे पुन्हा राजेशाहीकडे आणि हुकूमशाहीकडे जाणे ठरणार नाही काय?
शेवटचा बौद्ध राजा बृहदरथ याचा खून करून सत्तेवर आलेल्या पुष्यमित्र शुंगाने 84 हजार बौद्ध विहारे पाडली, लाखो बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या, जैन साधूंना उकळत्या तेलात बुडवून मारले. कारण ते पुन्हा सत्तेवर येऊ नयेत, पुन्हा डोके वर काढू नयेत, तीच गोष्ट आपल्याला आधुनिक हुकूमशाहीत हिटलर, मुसोलिनी यांनी केलेली दिसून येते. लेनिन यांच्या नेतृत्वाखाली रशियात कामगार क्रांती झाली, तेव्हा क्रांतिकारकांनी अशीच पाडापाडी सुरू केली होती. लेनिन यांनी आदेश काढून या गोष्टी जनतेच्या मालकीच्या झाल्या आहेत, त्यांचा नाश करू नये, असे बजावले. अर्थात, क्रांती किंवा प्रतिक्रांतीत जेव्हा सत्ता समूळपणे नष्ट केली जाते, तेव्हा अशा गोष्टी अपरिहार्य ठरतात. रशियात प्रतिक्रांती होऊन सोव्हिएत सत्तेचे पतन झाल्यानंतर लेनिनचे पुतळे पाडले गेले. अर्थात, सोव्हिएत सत्तेत ज्यांचे हितसंबंध नष्ट केले होते, अशा जमीनदार, जहागीरदार वर्गाच्या वारसांनी हे पुतळे पाडण्यात पुढाकार घेतला होता; पण त्रिपुरातील सत्तापरिवर्तन ही क्रांती आहे काय? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आजही 45% मतदान आहे. उद्या पुन्हा जेव्हा डावे पक्ष सत्तेवर येतील, तेव्हा त्यांनी त्रिपुरात भाजपच्या सरकारने जर दीनदयाळ उपाध्याय आणि शामाप्रसाद मुखर्जी यांचे पुतळे उभे केले, तर ते तोडावेत काय? हे असे राजकारण भारतीय संसदीय लोकशाही समृद्ध करणारे, प्रगल्भ करणारे ठरेल काय? अर्थात, त्यांनी जर जातिव्यवस्था समर्थक मनुचा आणि महात्मा गांधी यांची हत्या करणार्या नथुरामाचा पुतळा उभा करायचे ठरवले तर… ते अर्थातच मान्य होणार नाही. याला विरोध होईल. अर्थात, आज ते हे करणार नाहीत; परंतु सर्वंकष सत्ता जेव्हा त्यांच्या हाती येईल, तेव्हा ते हे जरूर करतील. त्यावेळी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, रामस्वामी पेरियार यांचा एकही पुतळा जागेवर ठेवणार नाहीत.
इथे आपण पुतळ्यांचीही वर्गवारी करायला हवी. म्हणजे महापुरुष कोण आणि सर्वसाधारण कोण? महापुरुष अथवा महात्मा कसे निर्माण होतात? आपण महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि पेरियार यांची उदाहरणे घेऊ. आज भारतात हे महापुरुष म्हणून गणले जातात. त्यांनी जे कार्य केले, ते अवघ्या समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. त्यांच्या कार्याबद्दल अशाच लोकांना शंका असू शकतात की, ज्या लोकांचे हितसंबंध त्यांच्यामुळे धोक्यात आले. वरील चारीही महापुरुषांमध्ये समानता ही आहे की, ते सर्व आधुनिक विचारसरणीचे आहेत, माणसांच्या मूलभूत हक्कांच्या बाजूचे आहेत आणि त्यासाठीच त्यांनी आयुष्य वेचले आहे. म्हणूनच ते महापुरुष आहेत. ते कुठल्या जात-धर्माचे आहेत, याला एका मर्यादेनंतर काही अर्थ राहत नाही. ते अवघ्या भारतीय समाजाचा अभिमानबिंदू म्हणून पुढे येतात. वरील सर्व महापुरुष जातिव्यवस्थाविरोधी असल्यामुळे भारतातील भाजप-आर.एस.एस. किंबहुना एकंदर संघ परिवार यांच्या विरोधात आहे. ज्याने महात्मा गांधींचा खून केला, तो संघविचारांचा माणूस होता. तीच गोष्ट महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, पेरियार यांच्या बाबतीत आहे. लेनिन यांचा पुतळा पाडल्यानंतर या संघ विचारांच्या लोकांनी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आणि पेरियार यांचेही पुतळे पाडण्याचा, विद्रुप करण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा उत्साहाच्या भरात तामीळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्या विरोधात जेव्हा जनमत उभे राहिले, तेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला जाग आली. तामीळनाडूतीलच नव्हे, तर अवघ्या दक्षिण भारतातील भाजपच्या राजकारणाचा खेळ त्यामुळे बिघडलेला आहे.
लेनिनचा पुतळा पाडला गेला, तेव्हा भाजपाचे सरचिटणीस; जे पूर्वी आर.एस.एस.चे प्रवक्ते होते, त्या राम माधव यांनी “हे रशिया नाही, तर त्रिपुरा आहे.” “चलो पलटाय” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर अहिर नावाच्या केंद्रीय मंत्र्याने “लेनिन परकीय होता, क्रूरकर्मा होता. त्याचा पुतळा भारतात कशाला,” अशी वल्गना केली; परंतु जेव्हा कोलकत्यात शामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना केली, तेव्हा त्यांना पुतळ्याच्या पाडापाडीच्या राजकारणातील गांभीर्य लक्षात आले आणि मग त्यांनी ‘चलो पलटाय’ सुरू केले. पुतळे पाडणे आमची संस्कृती नाही, अशी पोपटपंची सुरू केली; पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि भाजप-आर.एस.एस. चा फॅसिस्ट चेहरा पुन्हा एकदा उघडा झाला होता.
वसाहतवादी कालखंडात स्वदेशी-परदेशी या संकल्पनांना काहीएक अर्थ होता. राष्ट्रवादाशी, स्वातंत्र्याच्या भावनेशी जोडलेली ती गोष्ट होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील साम्राज्यवादाला आपला असलेला विरोध हा देशातील साधनसंपत्ती आणि श्रमशक्ती यांची लूट करणार्या साम्राज्यशाही अर्थनीतीला असणारा विरोध आहे. सार्वभौम असणार्या देशा-देशातील देवाण-घेवाण, आदान-प्रदान ही समानतेच्या पायावर शोषणविरहित असली पाहिजे, प्रत्येक राष्ट्राला आपले सार्वभौमत्व अबाधित होऊन करता आली पाहिजे. आधुनिक काळातील भांडवलशाहीकडे साम्राज्यवादी स्वरूप उघड करताना लेनिन यांनी वरील विचारांची मांडणी केली आणि साम्राज्यशाहीचे नवे शोषक रूप जगापुढे आणले. याच दृष्टीतून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिला. पुढे स्वतंत्र भारताला मूलभूत उद्योग उभारणीत रशियाने जी मोलाची मदत केली, त्याचे उत्तर वरील विचारात आहे.
जगभराच्या मानवजातीचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास हा अदान-प्रदानातून झाला आहे. तंत्रज्ञान असो, नवेनवे शास्त्रीय शोध असोत, तत्त्वज्ञान असो, साहित्य असो, धर्म असो, यांच्या देवाण-घेवाणीतूनच विश्व मानव संस्कृती उभी राहते. भारतात जन्मलेल्या बुद्धाचे जगभरात त्यामुळेच पुतळे आहेत, तीच गोष्ट लेनिनची आहे. लेनिन हे आंतरराष्ट्रीयवादी होते. त्यांच्या विचारात अंध राष्ट्रवादाला राष्ट्रीय दुराभिमानाला थारा नव्हता. ते जगातील सर्व शोषित जनतेच्या मुक्तीचे स्वप्न पाहणारे होते. त्यामुळे ते विश्वाचेच नागरिक होते. त्यांच्या विचारांनी ज्यांना-ज्यांना शोषणमुक्तीच्या लढ्यासाठी प्रेरणा दिल्या, तेथे-तेथे त्यांचे पुतळे उभारले गेले. त्यांच्या नावाने स्मारके उभी राहिली; पण ज्यांना हिटलर, मुसोलिनीची हाफ चड्डी परकीय वाटत नाही, त्यांनी तरी परकीय-स्वकीय असल्या बिनबुडाच्या गोष्टी करू नयेत.
आपल्या काळात जे लोक जाती, पाती, धर्म, देश वंशापलिकडे जाऊन अवघ्या समाजासाठी कार्य करतात, ते महापुरुष म्हणून अजरामर होतात. ते अमरच असतात. छत्रपती शिवाजी महाराज, चक्रधर, बसवेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर हे महापुरुष जनतेच्या मनात जिवंतच असतात. त्या अर्थाने त्यांचे पुतळे निर्जीव नसतात. अडीच हजार वर्षेउलटून गेलीत, तरी बुद्ध आहेच. आजही त्यांच्या मूर्ती घडतच आहेत, आजही त्याचे पुतळे उभे राहतच आहेत.
लेखक संपर्क : 9869392157