Categories
संपादकीय

प्रबोधनाची दमदार वाटचाल

वार्षिकांक - २०१६

पाव शतकाच्या वाटचालीनंतर अं. नि. वार्तापत्राने पुढची दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. प्रबोधनाची ही वाटचाल दमदारपणे आणि निर्धाराने चालू ठेवण्यात चळवळीतील कार्यकर्त्यांनी जे धैर्य दाखविले त्याचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चळवळीत सामील न होता, ज्या हितचिंतकांनी देणगी आणि जाहिरातींच्या रुपात जी साथ दिली, त्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद देऊ या. हा अंक नेहमीपेक्षा थोडा उशिरा प्रसिद्ध झाला, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

हे जग अधिक सुंदर करणार्‍या विचारधारेचे आपण पाईक आहोत. योग्य काय आणि सत्य काय, याचा शोध घेत घेत माणूस हजारो वर्षांपासून उत्क्रांत होत चाललाय. मानव आणि तो ज्या पृथ्वीवर वावरतोय त्यांच्या हिताचा आणि संरक्षणाचा विचार करून त्यासाठी कृतिशील राहणारी विचारधारा अखंडपणे तेवत राहिली आहे. त्या विचारधारेतील ‘अंनिस’ ही एक प्रकाशधारा आहे. पण तमापासून तेजाकडे वाटचाल करणार्‍या या संस्कृतीबरोबरच अंधारवाटेने जाणारी विकृतीपण मानवाच्या प्रगतीला झाकोळून टाकताना दिसते. या विकृती कधी धर्माच्या, कधी जातीच्या, तर कधी लिंगभेदाच्या रुपात जगात कुरुपता वाढवताना दिसतात. एके काळी निरंकुश बनून समाजाच्या हिताचा देखावा करणारी; पण प्रत्यक्षात शोषण करणारी धर्मसत्ता जगात राजसत्तेने नियंत्रित केली, राजसत्तेला सुद्धा नियंत्रित करणारी लोकसत्ता समाजाने स्वीकारली.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या रक्षणासाठी मानवी समाज सज्ज झाले. पण प्रगतीचे हे चक्र कधी उलट गती घेईल, हे सांगता येत नाही, असं इतिहासात घडलं आहे. वर्तमानात ते घडण्याचा धोका निर्माण होताना दिसतोय. लोकशाही मूल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा, असा घोष राज्यकर्त्याकडून केला जातोय. या संदर्भातील एक परिसंवाद हे या अंकाचे वैशिष्ट्य ठरेल.

जातीचा विलय होण्याऐवजी जाती संघटना हा सुद्धा चिंतेचा विषय बनू पाहत आहे. याचबरोबर जात प्रथेचा जुलूम अजूनही कमी होत नाही. कृष्णा चांदगुडे आणि राहुल थोरात यांनी हरियाणातील खाप पंचायतीचा घेतलेला शोध वाचकांचे प्रबोधन करणारा ठरेल.

बुवाबाजी स्त्रियांच्या शोषणाचे शस्त्र आहे, हे इतिहासकाळापासून चाललंय. ‘बुवा तेथे बाया’ हे अध्यात्माच्या क्षेत्रात घडलं; पण विज्ञानाचे क्षेत्रही याला अपवाद नाही. मेस्मर नामक एका डॉक्टरने पॅरिसमध्ये छद्मविज्ञानाचा वापर करून अमीर-उमरावांच्या बायकांना भुरळ घातली होती. त्याचा पर्दाफाश आपल्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरेल.

अशा समृद्ध साहित्याने नटलेल्या या अंकात, व्यक्तिमत्त्व परिचय, कथा, कविता, बालसाहित्य आणि तत्सम विविध विषयांनी मोलाची भर घातली आहे. वाचक या अंकाचे निश्चित स्वागत करतील, याबद्दल आम्हास शंका नाही.