देशात सर्वांत मोठी जातपंचायत म्हणून हरियाणातील खाप पंचायतीला ओळखले जाते. या पंचायतीचा संपूर्ण हरियाणावर प्रभाव आहे. ‘खाप’ची हिंसक कार्यपद्धती व अजब फतवे यामुळे त्या देशभर नेहमीच चर्चेत असतात. सगोत्र विवाह आणि आंतरजातीय विवाहाला या खाप पंचायती कडाडून विरोध करतात. असे विवाह करणार्यांवर बहिष्कार टाकले जातात; प्रसंगी त्यांची हत्या होते. ‘ऑनर किलिंग’मध्ये हरियाणा देशात नंबर एक आहे. याच्या मागील कारणांचा शोध घेण्याचे आम्ही ठरविले आणि हरियाणात प्रत्यक्ष जाऊन तेथील सामाजिक कार्यकर्ते, खाप पंच व पोलीस अधिकार्यांशी संवाद साधला. त्याचे हे रिपोर्टिंग…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांपासून जात पंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे. अंनिसने शासनाकडे पाठपुरावा करून जातपंचायतीविरोधी कायदाही नुकताच संमत करून घेतला.
देशात सर्वांत मोठी जातपंचायत म्हणून हरियाणातील खाप पंचायतीला ओळखले जाते. या पंचायतीचा संपूर्ण हरियाणावर प्रभाव आहे. महाराष्ट्रातील जातपंचायती या बहुसंख्य भटक्या, मागास समाजात आढळतात. परंतु हरियाणातील खाप पंचायत ही जाटांसारख्या पुढारलेल्या क्षत्रिय जातीत आहेत.
संपूर्ण देशभर जातपंचायतचे अस्तित्व आढळून येते. हरियाणा व उत्तर प्रदेशात तिला ‘खाप पंचायत’ म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये ‘सालोशी सभा’ म्हणतात. पंजाबमध्ये ‘मिस्ल’, दक्षिण भारतात ‘कांगारू कोर्ट’ किंवा ‘व्हिलेज कोर्ट’ म्हणतात. महाराष्ट्रात जातपंचायतला ‘गावकी-भावकी’ असेही म्हटले जाते. यापैकी हरियाणात चालत असलेली खाप पंचायत सर्वांत खतरनाक समजली जाते. हरियाणातील ‘खाप’ची हिंसक कार्यपद्धती व अजब फतवे यामुळे त्या देशभर नेहमीच चर्चेत असतात. साधारण चार वर्षांपूर्वी अभिनेता अमीर खान याने दूरचित्रवाणीवर ‘सत्यमेव जयते’ या बहुचर्चित मालिकेत खाप पंचायतवर चर्चा घडवून आणली होती. खाप पंचायतच्या विरोधात कार्यक्रमात बोलणार्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. या भागाचे प्रक्षेपण होण्याअगोदर ही हत्या करण्यात आल्याने खाप पंचांची हिंसक प्रवृत्ती जगासमोर आली. सगोत्र विवाह केलेल्या मनोज-बबली हत्याकांडाची या भागात सखोल चर्चा करण्यात आली होती. इंडियन पॉप्युलेशनच्या सर्वेक्षणानुसार भारतात होणार्या ‘ऑनर किलिंग’च्या घटनेपैकी 90 टक्के घटना या पंजाब, हरियाणा व पश्चिमी उत्तर प्रदेशात होतात. त्यातही हरियाणा अग्रेसर आहे. एकच गोत्रात विवाह केला, एकाच गावात किंवा शेजारच्या गावात कोणत्याही गोत्रात विवाह केला किंवा आंतरजातीय विवाह केला, तर जोडप्यांची हत्या केली जाते. मुलींनी, महिलांनी मोबाईल न वापरणे, जीन्स न घालणे, लग्नाच्या वरातीत सामील न होणे, त्यांनी खेळ न खेळणे आदी फतवे खाप पंचायतकडून काढले जातात. याच्या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही हरियाणात खाप पंचायतीवर स्पेशल रिपोर्ताज करण्याचे ठरविले.
दि. 6 सप्टेंबर 2016 रोजी आम्ही दोघे हरियाणात पोचलो. तर्कशील सोसायटीचे कार्यकर्ते राजाराम हंडियाया व राजेश पेग्गा हे आम्हास घेण्यास दिल्लीला आले. हंडियाया व पेग्गा ही गावांची नावे आहेत. हरियाणात जातीयवाद जास्त असल्याने पुरोगामी कार्यकर्त्यांनी स्वत:च्या नावापुढचे आडनाव काढून गावाचे नाव लावल्याचे पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्यासोबत आम्ही ‘जाट लॅण्ड’ म्हणून ओळखल्या जाणार्या जींद जिल्ह्यातील राजेशच्या पेग्गा या खेडेगावात गेलो.
दिल्लीच्या तीन बाजूंनी हरियाणा राज्याने घेरले आहे. हरियाणाची लोकसंख्या अडीच कोटी! हरितक्रांतीमुळे हा प्रदेश देशात शेतीत अग्रगण्य आहे. तांदूळ व गहू ही मुख्य पिकं. हिमाचल प्रदेशमधून पाण्याचा अखंड स्रोत चालू असल्याने सर्वत्र हिरवेगार दिसते. प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले गेले आहे. प्रत्येक गावात वीज पोचली आहे. शेतकरी हा सुखी आहे. त्यांची मोठमोठी घरे, घरात दोन-चार म्हशी, चारचाकी गाडी, घरात एसी लावलेले. यामुळे त्यांच्या समृद्धतेची ओळख होते. हरियाणात बहुसंख्य जाट जातीचे लोक राहतात. जाट लोक शरीराने धष्ट-पुष्ट आहेत. बहुतेक जाट लोक घरातील दूध विकत नाहीत. त्यामुळे दररोजच्या जेवणात दूध, दही, लस्सी, लोणी व तूप यांची मुबलकता असते. ‘हरा-भरा हरियाणा, दूध दही का खाना।’ असं तिथं म्हटलं जातं. जाट तरुण हा उंचपुरा, पैलवानासारखा दिसतो. कुस्तीही खेळली जाते. खेळामध्येही हरियाणवी लोक अग्रेसर आहेत. बहुतांश गावांत क्रिडांगण असल्याने खेळास बढावा मिळत आहे. हरियाणातील महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक कष्टाळू आहेत. भल्या पहाटे उठून त्या जनावरांची कामे करतात. सकाळी त्या शेतावर जाऊन गवत आणतात. म्हैस असलेल्या गाडीला ते ‘बुग्गी’ असे म्हणतात. कोणत्याही खेड्यात ‘बुग्गी’ वरून गवत आणणार्या महिला आपणास दिसून येतात. मुस्लिम स्त्रियांसारखे चेहर्यावर पर्दा घेणे, ही एक विशेषता आहे. गावातील सुना व वयस्कर महिला चेहरा झाकून घेतात. पंजाबी ड्रेस घालणं व चेहर्यावर ओढणी पांघरूण घेणं हे सर्वत्र दिसून येतं. याला ‘लत्ता’ घेणं, असं म्हणतात. प्रत्येक गावाच्या शेजारी पाणी असलेला मोठा तलाव असणे, ही सुद्धा खेड्यांची ओळख आहे. पाण्याची चारी किंवा कॅनॉलला ‘नहर’ म्हणतात. नियमितपणे ‘नहर’ने तलावात पाणी सोडले जाते. एकंदरीत हरियाणात संपन्नता आहे. हरियाणवी भाषा ऐकायला मधुर वाटते; परंतु लिखित स्वरुपात तिचं अस्तित्व नाही. लिहिण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला जातो. आर्य समाजाचा या भागावर विशेष प्रभाव राहिला होता. आज मात्र तो क्वचितच आढळतो. इतर सामाजिक सुधारकांचा इतिहास हरियाणाला नाही.
वरकरणी हरियाणा आर्थिकदृष्ट्या सुधारलेला दिसत असला, तरी आतील समाज वास्तव वेगळेच आहे. खापांची हुकूमशाही येथे अधिक प्रमाणात दिसून येते. खाप पंचायतची कार्यप्रणाली पाहून याचा अनुभव येतो. मागील वर्षी जाट आरक्षण आंदोलन झाले. त्यावेळी दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. प्रवासी महिलांवर बलात्कार होण्याचे प्रकार घडले. आम्ही ज्या पेग्गा गावात मुक्कामी होतो, तेथे दलितांची व सवर्णांची वेगवेगळी मंदिरे आहेत. हरियाणात चर्मकार समाज अधिक प्रमाणात असल्याने रविदासांचे मंदिर वेगळे आहे.
पेग्गा गावात मध्यभागी एक ‘चौपाल’ मजबूत स्थितीत आहे. गावातील लोकांना एकत्र येण्याचे ठिकाण किंवा धर्मशाळा म्हणूया. पूर्वी त्या ठिकाणी जातपंचायत भरत असत. आता खाजगी शाळा भरते. गावात नीरव शांतता असते. कामाशिवाय महिला घराच्या बाहेर येत नाहीत. जाट तरुण शेती करतो. स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण हरियाणात अधिक आहे. त्यामुळे लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड जात आहे. पेग्गा गावातील तरुणांची वयं तीस-पस्तीस वर्षे झालीत, तरी अजून त्यांची लग्ने झालेली नाहीत. अनेकांनी तीस-चाळीस हजार रूपयांत नेपाळ किंवा छत्तीसगड यासारख्या ठिकाणावरून मुली आणून त्यांच्यासमवेत लग्न केले आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणातील खाप पंचायतने आंतरजातीय विवाहास परवानगी दिल्याची बातमी वाचनात आली होती. मात्र खरी परिस्थिती तेथे गेल्यावर समजली. लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने मुलांना दुसर्या जातीची मुलगी करण्यास परवानगी खाप पंचायतीने दिली आहे. मात्र त्यांच्या स्वतःच्या मुलींचे ते आंतरजातीय विवाह करण्याचे नावसुद्धा काढत नाहीत. जाट मुलीने दलित मुलासोबत विवाह केल्यास त्यांची नक्कीच हत्या केली जाते. मुलांपेक्षा मुलींच्या हत्येचे प्रमाण अधिक आहे. सगोत्र किंवा एकाच किंवा शेजारच्या गावात विवाह केला व तो जरी जातीत असला, तरी मुलीचा जीव घेतला जातो. मुलीचा जीव घेतल्याने इज्जत वाढते, असा त्यांच्यात गैरसमज असतो. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळते; अन्यथा लोक नावे ठेवतात. मुलीने पसंतीने विवाह केल्याने घराची, गावाची, पंचक्रोशीची इज्जत जाते. मुलीचा जीव घेतल्यास त्या कृतीचे समाज समर्थन करतो. त्यामुळे इज्जत परत येते, असा अजब तर्क अनेकांनी बोलून दाखविला.
हरियाणात गेल्या तीन वर्षांत 290 ‘ऑनर किलिंग”

आम्ही ज्या दिवशी हरियाणात पाऊल ठेवले त्याच दिवशी एका बातमीने आम्हास अस्वस्थ केले. दैनिक भास्करने पहिल्या पानावर “हरियाणात गेल्या तीन वर्षांत 290 ‘ऑनर किलिंग” अशी मोठी बातमी केली होती. या बातमीमधील सर्व्हेमध्ये 290 ऑनर किलिंग केसेसमध्ये 65 टक्के वीस वर्षांपर्यंतची मुलं-मुली, तर 35 टक्के पंचविशीतील तरुण-तरुणी आहेत. भयावह बाब अशी की, 74 टक्के मारेकरी हे आई-वडील व भाऊ आहेत, 23 टक्के चाचा-मामा व नातेवाईक, तर 3 टक्के काँट्रॅक्ट किलर आहेत. हत्यांचे ठिकाण हे जींद जिल्हा व लगतचे जिल्हे आहेत. हत्या झालेल्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या भयावह अहवालाचे कारण जाणून घ्यायचे असेल, तर हरियाणातील खाप पंचायतची मानसिकता समजावून घ्यावी लागेल. गेल्या काही वर्षांत घडलेल्या व देशभर गाजलेल्या काही हत्याकांडांचा आढावा घेऊ.
खापांना पहिला धक्का – फाशीची शिक्षा

(मनोज–बबली हत्याकांड)
कैथल जिल्ह्यातील करोडा गावात मनोज टी.व्ही. रिपेअर करण्याचा व्यवसाय करत होता. त्याचे बबली नावाच्या मुलीसोबत प्रेम झाले. दोघेही एकाच जातीतले व एकाच गोत्रातले असल्याने त्यांना सगोत्र विवाह म्हणून विरोध झाला. खरा विरोध बबलीच्या घरचा असला, तरी पूर्ण गाव यात सामील झाले. मनोज व बबली यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कायदेशीररित्या लग्न केले व ते गुप्त ठिकाणी राहायला लागले. गावच्या पंचांनी लग्न अमान्य केले. इकडे बबलीच्या घरातील मंडळींनी मनोजच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे दोघे न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने दोघांसाठी पोलीस संरक्षण देण्याचे व इच्छित स्थळी त्यांना पोच करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्याप्रमाणे हरियाणा महामंडळाच्या बसमधून दोघे दिल्लीला जात असताना बबलीच्या परिवाराने त्यांना गाठले. पोलिसांसमक्ष दोघांना जबरदस्तीने खाली उतरवले व स्कॉर्पिओ गाडीत टाकून त्यांना घेऊन गेले. सातव्या दिवशी दोघांची प्रेतं नहरच्या पाण्यात सापडली. प्रसार माध्यमांत याची मोठी दखल घेतली गेली. पोलीसांनी बबलीच्या परिवाराला व हत्या करण्यासाठी मदत करणार्या खाप पंचायतच्या पंचांना अटक केली. त्यानंतर या विषयावर खाप पंचायत बसली व तक्रार मागे घेण्यास मनोजच्या परिवारावर दडपण आणले. उलट त्यांनाच माफी मागण्यास सांगण्यात आले. त्यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. कुणी मनोजच्या परिवाराशी बोलले, तर पंचवीस हजार रुपयांचा दंड करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्याशी बोलणार्या व्यक्तीची माहिती देणार्यास अकरा हजार रुपये इनाम देण्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर पीडित परिवार शेजारच्या गावात जाऊन जीवनावश्यक वस्तू आणत होता. काही दिवसांनी कुरूक्षेत्र या ठिकाणी जाटांची खाप पंचायत झाली. त्यामध्ये मनोज-बबलीच्या हत्येसाठी वातावरण तयार करणारा पंच गंगाराम यास ‘जाट गौरव’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुढे कर्नाल जिल्हा न्यायालयाने पाच आरोपींना फाशी, एकाला जन्मठेप व एकाला सात वर्षांची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने फाशी झालेल्या पाचपैकी चौघांना जन्मठेप व एकाची सुटका केली. मनोजच्या परिवाराने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तो निर्णय अजून येणे बाकी आहे. अनेक सामाजिक संघटना मनोजच्या परिवाराच्या बाजूने असल्याने ते हिमतीने लढत आहेत. कुरूक्षेत्र येथे झालेल्या सर्वखाप पंचायतमध्ये बलियान खापचे प्रधान चौधरी महेंद्रसिंग टिक्कैत यांनी जाहीर धमकी दिली की, ‘जे युवक खापच्या परंपरेच्या विरोधात लग्न करतील, त्यांची हत्या करण्यात येईल.’
‘इज्जत के बदले इज्जत’
(पडाना केस)
जींद जिल्ह्यातील पडाना या गावी एका मुला-मुलीचे प्रेम होते. त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कायदेशीर लग्न केले. मुलगा हा दलित समाजातील, तर मुलगी वरच्या जातीतली होती. या लग्नामुळे पंचायत बसली. त्यानंतर मुलाच्या दहावीत शिकणार्या बहिणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. शाळेतून घरी परतणार्या मुलीला सर्वांसमोर ओढून नेले, तरी कुणीही विरोध केला नाही. आरोपीला वाचविण्यासाठी अनेकवेळा खाप पंचायती बसल्या. लोकांनी पैसे एकत्र केले. प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेतही जिल्हा न्यायाधीश विचित्र पद्धतीने वागले. ‘दहावीत शिकणार्या मुलीला शरीरसंबंध ठेवण्याची अगोदरपासूनच सवय आहे’, असे धक्कादायक वक्तव्य न्यायाधीशांनी केल्याने राज्यभर तीव्र नाराजी पसरली. जनवादी महिला समितीने न्यायाधीशांच्या विरोधात कोर्टावर मोर्चा काढून उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. ‘इज्जत के बदले इज्जत’ असे जे म्हटलं जाते, ते या घटनेतून दिसून येते.
दलितांना एकमेकांना चप्पलने मारण्याची खापांची शिक्षा
(तलाव केस)
झज्जर जिल्ह्यातील जाट जातीच्या मुलीचे दलित जातीच्या मुलासोबत प्रेम होते. त्यांनी राजस्थानला पळून जाऊन लग्न केले. मुलीला साथ देण्यास तिची बहीण सोबत होती. घरच्यांनी पोलिसांच्या मदतीने तिघांना पकडून आणले. न्यायालयात मुलीने सांगितले की, आम्ही आमच्या मर्जीने लग्न केले असून, आम्हाला गाववाल्यांपासून धोका आहे. तरीही दोघी बहिणींना घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आलं व मुलावर अपहरणाची केस करून तुरुंगात धाडण्यात आलं. दुसर्याच दिवशी दोन्ही बहिणींची हत्या करण्यात आली. गावातील दलितांवर हल्ले करण्यात आले. त्यांना शेतात येण्यास बंदी करण्यात आली. काही दलितांनी गाव सोडले, तर एका महिलेने आत्महत्या केली. दलित युवकांमुळे गावाची बदनामी झाली, या आरोपामुळे गावच्या पंचायतीमधील उपस्थित दलितांना एकमेकांना दहा-दहा चप्पल मारण्याची शिक्षा खाप पंचायतीने फर्मावली. एकवीसशे रुपयांचा दंडही ठोठाविण्यात आला.
लग्नानंतरही बहीण–भाऊ व्हा – खापांचा आदेश
(रवींद्र–शिल्पा केस)
झज्जर येथील रवींद्र व शिल्पा यांचे वाजतगाजत लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी ते आपल्या मूळ गावी ठराणा येथे गेले. शेजारी बसलेल्या महिलांनी शिल्पाला तिच्या आजीचे गाव व गोत्र विचारले. तिने तिचे ‘कादियान’ गोत्र सांगितले. तेथूनच तिच्यावर संकट आले. कारण रवींद्रचे गोत्रही ‘कादियान’च होते. पंचायत बसली. पंचायतच्या नियमाप्रमाणे शिल्पा ही ठराणा गावची मुलगी असल्याने सून होऊ शकत नव्हती. पंचायतने झालेल्या लग्नाला नकार दिला. दोघांना बहीण-भाऊ मानण्याचा आदेश पंचायतीने दिला, अन्यथा त्याच्या खानदानाने गाव सोडून जाण्यास सांगितले. त्यामुळे रवींद्रने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
भाईचारा असणार्या गावात लग्न होणार नाही
(नवीनकुमार – बबिता केस)
नवीनकुमार या सव्वीस वर्षीय युवकाचे गोत्र ‘संघ’ आहे. मागील वर्षी त्याने ‘बुरा’ गोत्र असलेल्या बबिताशी लग्न केले. बबिता कैथल जिल्ह्यात एका बँकेत मॅनेजर आहे. दोघांचे गोत्र वेगळे असले, तरी गोत्र भाईचारामध्ये येतात, त्यामुळे दोघे बहीण-भाऊ आहेत. त्यांनी खाप पंचायतच्या नियमाप्रमाणे लग्न रद्द करण्याचा आदेश दिला. कारण दोन्ही गोत्रांचा मूळपुरुष एकच असल्याचे खाप पंचांचे म्हणणे आहे. खरे पाहता, दोघांच्या गावात शंभर किलोमीटरचे अंतर आहे; परंतु खाप पंच ऐकायला तयार नाहीत. त्यांनी पुन्हा नऊ गावाची खाप पंचायत बसवून परिवारावर सामाजिक बहिष्काराचा आदेश दिला. दोन्ही गावे पूर्वी एकाच ठिकाणी वसली असल्याने हे लग्न त्यांनी रद्द ठरविले. शिक्षक असलेल्या नवीनकुमारच्या वडिलांनी नंतर पोलिसांत खाप पंचाविरोधात तक्रार दाखल केली.
अशा कितीतरी घटना सांगता येतील. प्रत्येक घटनेत महिलांवर अन्याय झालेला दिसतो. खाप पंचायतचे बहुतांश फतवे हे महिलांना समोर ठेवूनच काढलेले दिसून येतात. काही दिवसांपूर्वी ‘बारह बिरोहर’ खाप पंचायतचे प्रधान राजेंद्रसिंग यांनी असे म्हटले होते की, “आमच्या महिलांनी डोक्यापासून पायापर्यंत ढिल्ला पोशाख घालावा. त्यांचे डोळे सुद्धा पडद्यात असायला हवेत. त्यामुळे इतर पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होणार नाहीत.” खापचे फतवे त्यामुळे अजब वाटतात. तरुणींनी जीन्स घालू नये. त्यांनी मोबाईल वापरू नये, प्रेमविवाह, सगोत्र, एकाच किंवा शेजारच्या गावात विवाह करू नये, त्यांनी लग्नाच्या वरातीत सामील होऊ नये, रात्रीचे विवाह करू नये. बर्गर खाल्ल्याने बलात्कार होतात. त्यामुळे बर्गर खाऊ नये. यासारख्या फतव्यांनी खाप पंचायती देशभर चर्चेत राहिल्या आहेत. यामागची मानसिकता समजून घेण्यासाठी आम्ही आठ दिवस हरियाणाच्या विविध भागांत फिरलो. खाप पंचायतचे पंच, पीडित परिवार, सामाजिक कार्यकर्ते, इतिहास व समाजशास्त्राचे अभ्यासक, पोलीस अधिकारी, खाप पंचायतविरोधात लढणारे लोक यांच्या भेटी घेतल्या.
आम्हाला एखाद्या खाप पंचाला भेटण्याची इच्छा होती. आम्ही ही इच्छा पुरोगामी विचाराचे पोलीस अधिकारी रामेश्वर दास यांना बोलून दाखविली. त्यांनी लगेच एक-दोन पंचांना फोन केले. त्यातील काही पंचांनी मुलाखतीस नकार दिला. शेवटी त्यांनी कुलदीपसिंह ढाण्डा यांना फोन करून मुलाखत देण्याची विनंती केली. त्यांनी ती आनंदाने मान्य केली व आम्हास त्यांच्या घरी बोलावले.
कुलदीपसिंह ढाण्डा हे सर्वजातीय सर्वखाप पंचायत हरियाणाचे संयोजक आहेत. ते जिंद या जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात. 72 गावच्या पंचायतीचे प्रमुख असलेले व ‘प्रधानजी’ नावाने ओळखले जाणारे कुलदीपसिंह धष्ट-पुष्ट आहेत. डोक्यावर ते हरियाणवी पगडी घालतात. मोठ्या आनंदाने त्यांनी आमचे स्वागत केले. आम्ही आमची ओळख करून दिली. सोबत तर्कशील सोसायटीचे कार्यकर्ते रामेश्वरदास, सुभाष तितरम, राजाराम हंडियाया व राजेश पेग्गा हे होते. आम्ही त्यांच्याशी केलेल्या चर्चेचा काही अंश.
प्रश्न : खाप पंचायतची रचना नेमकी कशी असते?
खाप हा शब्द ‘ख’ आणि ‘आप’ पासून बनला आहे. ‘ख’ म्हणजे आकाश व ‘आप’चा अर्थ आहे पाणी. खाप म्हणजे अशी व्यवस्था की, जी आकाशासारखी सर्वोच्च आणि पाण्यासारखी स्वच्छ, निर्मल व सहज उपलब्ध होणारी. खाप पंचायतची रचना गोत्रावर आधारित असते. प्रत्येक गावात एक पंचायत असते, तिला ‘गाँवपंचायत’ म्हणतात. गावच्या स्तरावर वाद सोडविला गेला नाही, तर शेजारच्या गावांची एकत्र पंचायत बोलविली जाते. तिला ‘गुहांड’ म्हणतात. ‘गुहांड’चे क्षेत्र पाच ते सात किलोमीटरपर्यंत सीमित असते. तिच्यात इतर गोत्रांचेही सदस्य असतात. तेथेही वाद सुटला नाही, तर बारा किंवा चोवीस गावांची एकत्र पंचायत बोलाविली जाते. तिला ‘तपा’ म्हणतात. शेवटी अनेक गुहांड व तपा एकत्र येत खाप पंचायत बोलवली जाते. त्यामध्ये अनेक गोत्रांचे व अनेक जातींचे सदस्य असतात. प्रत्येक खाप पंचायतची गावे निश्चित असतात. जसे मितरोल खापाची 24 गावे, ददियॉ खापची 40 गावे, तोमर खापची 84 गावे, पालम खापची 365 गावे आहेत. मोठ्या प्रश्नांवर राज्यभरातील अनेक खापपंचायती एकत्र आल्यास तिला ‘सर्वखाप’ म्हटलं जातं. मुख्य निर्णय ‘सर्वखाप’ मध्ये घेतले जातात. इतर राज्याचे सदस्य सर्व खाप पंचायतमध्ये सहभागी असतात. विशेषत: पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व महाराष्ट्राचे मुख्य पंच सर्व खापमध्ये येतात.
प्रश्न : खाप पंचायतचे महत्त्व व जरुरत किती आहे?
हरियाणात प्रत्येक व्यक्तीचा संबंध हा खाप पंचायतशी जोडला गेला आहे. खाप पंचायत हे लोकशाही पद्धतीचे संघटन आहे की, ज्यात वाद घटनात्मक न्यायालयात न नेता पंचांच्या देखरेखीखाली सोडवले जातात. पंचांच्या निर्णयाला परमेश्वराचा निर्णय मानला जातो व तो सर्वांना स्वीकारावा लागतो. कारण सार्वजनिक सहमतीला येथे महत्त्व दिले जाते. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. खाप पंचायतची विशेषत: ही आहे की, ती भेदभाव करत नाही. घटनात्मक न्यायालयात आरोपी खोटं बोलतो; परंतु खाप पंचायतमध्ये कुणीही खोटं बोलत नाही. आम्ही लोकांकडे जात नाही, तर ज्याचा वाद आहे, तो आमच्याकडे येतो. आम्ही फैसला करत नाही, तर समझोता करतो. त्यामुळे आजही खाप पंचायतचे महत्त्व व आवश्यकता आहे. खाप पंचायत नसत्या, तर तुरुंग भरले गेले असते.

प्रश्न : सगोत्र विवाहास खाप पंचायत विरोध का करते? जीव का घेते?
पूर्वी ऋषीच्या नावाने गोत्र होते. त्यांच्याकडे अभ्यासासाठी आलेल्यांचे गोत्र त्या ऋषींच्या नावाने ओळखले जायचे. त्यामुळे एका गोत्रात असणार्यांचे भाऊ-बहिणींचे नाते असते. पुढे गोत्रांचा विस्तार झाला. जाटांमध्येही शेकडो गोत्र निर्माण झाले; परंतु प्रत्येक गोत्राचा मूळ पुरुष एकच असल्याने आपण त्याचे वंशज आहोत. एक गोत्रातील पुरुष-स्त्रीमध्ये बहीण-भावाचे नाते असते. त्यामुळे एकाच गोत्रात होणार्या विवाहास आम्ही विरोध करतो. तसेच लग्न करताना मुलाचे गोत्र व त्याच्या आजीचे व नानीचे गोत्र यापैकी कोणतेही गोत्र मुलीच्या गोत्राशी मिळाले, तर लग्न केले जाते. तसेच हरियाणात प्रत्येक गावात गावाच्या मूळ पुरुषाचे मंदिर आहे. त्याला ‘खेडा’ म्हणतात. याचा अर्थ असा की, हे एक गाव एका व्यक्तीने वसवले असेल, तर त्या गावात राहणारे पुरुष-स्त्री त्याचे वंशज आहेत व त्यांच्यात बहीण-भावाचे नाते आहे. जवळच्या नात्यात लग्न केल्यास पुढची पिढी कमकुवत निघते. हिजडे जन्माला येतात. त्यामुळे कोणतेही गोत्र असो, कोणतीही जात असो, गावातल्या गावात लग्न होत नाही. होत असेल, तर ते आम्ही थांबवतो. पूर्वी मोठ्या गावापासून शेजारच्या छोट्या गावाची निर्मिती झाली असल्याने त्या दोन गावात भाईचारा आहे, असे आम्ही मानतो. एकाच मूळ पुरुषाची ही दोन गावे वंशज आहेत. त्यामुळे आमच्या गावाच्या शिवा ज्या-ज्या शेजारील गावाला लागून आहेत, त्या शेजारील गावातील मुली आम्ही करत नाही. पंचक्रोशीतील गावात लग्न न करण्याची प्रथा हरियाणात पूर्वापार आहे. सध्याची तरुण पिढी हे सर्व नियम तोडून सगोत्र अथवा पंचक्रोशीत विवाह करत आहे. त्याचा आम्ही विरोध करतो. हिंदू मॅरेज अॅक्टमध्ये बदल व्हावा व त्यामध्ये सगोत्र विवाह निषिद्ध असावा अशा मागणीची याचिका आम्ही सुप्रिम कोर्टात दाखल केली आहे. आमच्या खाप परंपरेचे आम्ही पालन करतो; पण कुणाचा जीव घेण्यास आम्ही सांगत नाही.
प्रश्न : महिलांच्या संदर्भात आश्चर्यकारक फतवे तुम्ही का काढता?
आमच्याकडे सध्या एक वाद आला आहे. नवरा-बायकोचे भांडण झाले आहे. कारण काय तर बायको घरातील सर्व गोष्टी मोबाईलवर तिच्या आईला सांगते. आई मुलीच्या संसारात हस्तक्षेप करते. मग नवरा-बायकोचा संसार मोडायला लागला. आम्ही सूचना केली, महिलांनी मोबाईल वापरायचा नाही आणि गरज असेल, तेव्हा नवर्याच्या समोर बोलायचे. आता तुम्हीच सांगा की, यात चुकीचे काय आहे. विवाहाबाबत आमच्या पूर्वजांनी जे नियम घालून दिले आहेत, ते आदर्श आहेत व त्यांचे आम्ही फक्त पालन करतो. मीडियाने मुद्दामच आमची प्रतिमा मलीन केली आहे. आमचे काही निर्णय चुकले असतील; पण त्याचा अर्थ असा नव्हे की, आम्ही जे करतो, ते सर्वच चुकीचे आहे.
प्रश्न : हरियाणात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण अधिक आहे, यावर खाप पंचायतीची प्रतिक्रिया काय?
2011 मध्ये हजार मुलांमागे मुलींचा दर 879 इतका कमी होता. आता तो 903 पर्यंत पोचला आहे. यात खाप पंचायतची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आम्ही अनेक वेळा ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या कारणांसाठी खाप पंचायत बोलावली होती. स्त्रीभ्रूणहत्या करणार्यास मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा कायदा करावा, अशी आम्ही सरकारकडे मागणी केली आहे. या महिन्यात डबवाली येथे 85 पंचायतींनी एकत्र येऊन स्त्री भ्रूण हत्या करणार्यास सामाजिक बहिष्कृत करण्याची शपथ घेणार आहेत. मुख्य म्हणजे याचे आयोजन प्रशासनाने केले आहे. त्याचप्रमाणे हरितक्रांतीमुळे हरियाणाची प्रगती तर झाली; परंतु कीटकनाशकाच्या अतिरेकामुळे कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे खाप पंचायतने जैविक शेती करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. नुकताच आम्ही चौदा गावांत कृत्रिम कीटकनाशकांचा वापर कमी केला आहे. या व्यतिरिक्त शैक्षणिक, सांस्कृतिक बाबतीत ‘खाप’ नेहमीच चांगले काम करत आहे.
लाईव्ह खाप पंचायत :
प्रधानजी कुलदीपसिंह यांनी आमच्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरं दिली. प्रधानजी कुलदीपसिंह म्हणाले की, “काही पत्रकार दिल्लीमधल्या ए.सी. स्टुडिओत बसून रिपोर्टिंग करतात व आमची खाप पंचायत बदनाम करतात. त्यामुळे चला, आज मी तुम्हाला खाप पंचायत कशी चालते, हे प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनीच दाखवितो.” ते आम्हाला जिंद जिल्ह्यामध्ये गांगोली या खेडेगावात घेऊन गेले. सोबत पोलीस अधिकारी रामेश्वर दास, राजाराम हंडीयाया होते. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. जिंदपासून 30 किलोमीटर दूर गंगोली या खेडेगावात जातपंचायत भरली होती. नवरा-बायकोचे भांडण सोडविण्यासाठी तब्बल सत्तर गावचे खापचे पंच एकत्र आले होते. त्या गावच्या पंचाच्या घरी सर्व मुख्य पंच एकत्र जमले होते. मोठ्या मनाने त्यांनी आमचे स्वागत केले. एक वयस्कर माणूस मध्यभागी बसला होता. तो हुक्का पित होता. आमचा पाहुणचार करण्यासाठी त्यांनी हुक्का आमच्याकडे सरकावला आम्ही त्यास नम्रपणे नकार दिला. हुक्का पिणं ही हरियाणाची संस्कृती समजली जाते. हुक्का पिताना उजव्या बाजूला मुख्य पंच बसण्याचा नियम आहे. डावीकडे छोटे पंच पदाच्या क्रमवारीने बसतात. सर्वांत लहान असणार्याने हुक्का तयार करून फिरविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा नियम असतो. पंचायत चालू असताना कधी-कधी पंच आरोपीस हुक्क्याला हात लावून शपथ घ्यायला लावतात. त्यामुळे खाप पंचायतमध्ये हुक्क्याचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच ‘हुक्का-पाणी बंद’ हा शब्दप्रयोग बहिष्कारासाठी तेथे वापरला जातो. गंगोली गावच्या ‘चौपाल’मध्ये सर्व लोक जमल्याचा निरोप आल्याने आम्ही सर्व तिथे हजर झालो. एका मोठ्या धर्मशाळेत दोन-तीनशे लोकांचा जमाव जमला होता. मधोमध दोन हुक्के ठेवले होते. त्याच्या बाजूने वर्तुळाकार पद्धतीने मुख्य पंच बसले होते. गावातील सर्व तरुण बाहेरच उभे होते, तर कुणी चहा-पाणी वाटत होते. तरुणांना या पंचायतमध्ये सहभागी होता येत नाही. पंचायतीमध्ये गावातील वयस्कर लोकच सामील होतात. आम्ही मागच्या बाजूला बसलो. पंचायत सुरू झाली. सत्तर गावचे पंच या खाप पंचायतमध्ये उपस्थित झाले होते. मुख्य पंच कुलदीपसिंग ढाण्डा उभे राहिले. त्यांनी आजची खाप पंचायत बोलविण्याचे कारण विषद केले. महाराष्ट्रातून आलेले पाहुणे आपल्यात उपस्थित असल्याने कुणी गोंधळ करू नये, अशी विनंती केली. आमचा परिचय करून दिला. सर्वांना बोलण्याची संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम मुलाच्या वडिलांनी मुलाची बाजू मांडली. ते झाल्यावर मुलीच्या गावच्या पंचांनी मुलीची बाजू मांडली. तेव्हा कुठे आम्हाला झालेला प्रकार समजला. राजेश-सोनिया या पती-पत्नीचे भांडण होत असे. सोनियाला वाटत होते की, दोघांनी सासू-सासर्यांपासून वेगळ्या ठिकाणी राहावे. राजेशने घरावर दुसरा मजला चढवला; परंतु सोनिया ते ठिकाण सोडून इतर ठिकाणी राहण्यास आग्रही होती. एके दिवशी राजेशने सोनियाला मारहाण केली. सोनियाने शंभर नंबरला फोन करून तक्रार केली. नंतर ती तिच्या छोट्या मुलांसोबत माहेरी निघून गेली व पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, मुलाने त्याच्या लहान मुलास आईकडून ओढून आणले. त्यावर सोनियाच्या भावाने चिडून राजेशला मारहाण केली. सोनियाच्या गावाकडून आलेल्या प्रत्येक पंचाने हात जोडून राजेशच्या घरच्यांची माफी मागितली व सोनियाला पुन्हा नांदवण्याची विनंती केली. परंतु सोनियाच्या भावाने राजेशला मारल्याने त्याच्या घरचे नकार देत होते. एक-एक पंच उभे राहून बोलत होता. आम्हाला जणू हायकोर्टात युक्तिवाद ऐकतो आहे, असे वाटत होते. वाद-प्रतिवाद झाले. सर्वांनी मुला-मुलींना दोष दिला; पुन्हा एकत्र येण्याची विनंती केली. राजेशचे वडील कुणाचंही ऐकून घेत नव्हते. शेवटी निर्णय देण्यास मुख्य पंच कुलदीपसिंह उभे राहिले व आपण देणार असणारा निर्णय सर्वांना मान्य होणार आहे का, अशी विचारणा केली. परंतु राजेशच्या वडीलांनी त्यावर नाही म्हटले. मग मुख्य पंचांनी राजेशकडच्या पंचांना विचार करण्यास अर्ध्या तासाची वेळ दिली. माफीचे महत्त्व पटवून दिले. राजेशच्या वडिलांना पटवून देण्यासाठी एक पंच उभे राहिले. त्यांच्या मुलाचा खाप पंचायतच्या लोकांनी न्यायालयाच्या आवारात खून केला होता. त्या मुलाच्या वडिलांनी खाप पंचायतचा मान राखत व माफी मागितल्याने केस मागे घेतली व खाप पंचायतीने त्यांना पुढे पंच बनविले. ही आपबीती त्या पंचांनी सांगूनही राजेशचे वडील तयार होईनात. अर्ध्या तासाने पंचायत बसली; परंतु एकमत होईना. सायंकाळ होत आल्याने पुन्हा पुढील आठवड्यात पंचायत बोलविण्याचे ठरले.

आम्ही चार-पाच तास खाप पंचायतमध्ये बसून सर्व ऐकत होतो. अनेकांना ते धोकादायक वाटले. कारण प्रसारमाध्यमांमुळे खाप पंचायतची बदनामी होत आहे, याचा वारंवार उल्लेख अनेक पंच करत होते. शिवाय खाप पंचायतमध्ये अनोळखी व्यक्तींना प्रवेश नसतो. सर्वांत तरुण असणारे केवळ आम्हीच तिथे हजर होतो. आश्चर्य याचे वाटले की, एकही महिला अथवा तरुण यांना सहभागी करून घेतले गेले नाही.
कुलदीपसिंह ढाण्डा यांनी खाप पंचायतची सकारात्मक बाजू मांडली. मात्र वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉ. जगमती सागवान यांची रोहतक येथे जाऊन भेट घेतली. त्या गेल्या वीस वर्षांपासून खाप पंचायतच्या मनमानीविरोधात लढत आहेत. अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांना व्हॉलिबॉलमध्ये शासनाचा भीम पुरस्कार मिळाला आहे. हरियाणात खाप पंचायतच्या विरोधी आंदोलनात त्या सर्वांच्या पुढे असतात. हरियाणात सर्वांत चांगली बाब आम्हाला पाहण्यास भेटली, ती म्हणजे न्यायालयाच्या आदेशाने चालत असलेले ‘सेफ होम.’ नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मोफत हक्काचं घर सरकारने पुरवलं आहे. ते अस्तित्वात येण्यासाठी त्यांनीच पाठपुरावा केला होता. आम्ही त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तेव्हा त्यांचे मनोधैर्य किती मोठे आहे, याची जाणीव झाली.

प्रश्न : तुम्ही खाप पंचायतच्या विरोधात काम करावे, असे तुम्हाला का वाटले?
खाप पंचायती या संविधानविरोधी समांतर न्याय व्यवस्था आहेत. देश स्वतंत्र झाल्यावर त्या नष्ट व्हायला हव्या होत्या. परंतु अजूनही त्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यांची मानसिकता मध्ययुगीन आहे. त्या मानव अधिकाराचे उल्लंघन करतात. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतात. त्या गरीब, महिला, दलित, भूमिहीन यांच्या विरोधात आहेत. पर्दा प्रथा, महिलांना मारहाण, मुलींना वडिलांच्या संपत्तीत हिस्सा न देणे, स्वत:च्या लग्नाचा अधिकार हिरावून घेणे, मजुरांनी शेतीची मजुरी वाढवली, तर त्यांच्यावर बहिष्कार टाकणे, जातीच्या आधारावर अपराधी व बलात्कारित पुरुषांना वाचवणे व त्यांना संरक्षण देणे, वेगवेगळे फतवे काढणे, स्वत:च्या लग्नाचा निर्णय घेणार्या जोडप्यांचा जीव घेणे इत्यादी अमानवी कृती खाप पंचायत करते. त्यामुळे माणसांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतो.
प्रश्न : हरियाणात ‘ऑनर किलिंग’च्या घटना होण्यामागे नेमके कारण काय असावे?
एखाद्या जोडप्याने स्वेच्छेने लग्न केल्यास त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो की, त्यांनी आमची इज्जत खराब केली. गावची संस्कृती, परंपरा मोडली.
आंतरजातीय, गोत्रात किंवा गावातल्या गावात लग्न झाले, तर विचारूच नका, इतका वाद होतो. गावाच्या भाईचाराचे काय होईल, गावातील मुलींना बहू म्हणायचे की बेटी? याची पंचांना काळजी वाटते. परंतु याकडे आपण अभ्यासपूर्वक नजरेने बघितले, तर पुरुषप्रधान वर्णव्यवस्था दिसून येते. मुलीने आपल्या संपत्तीत अधिकारी होऊ नये, जातिव्यवस्था तुटू नये, खानदानी वर्चस्वावर बाधा येऊ नये, यासाठी गोत्र-क्षेत्राचे निकष ओलांडणार्यांचा जीव घेतला जातो. मुलांपेक्षा जास्त बळी मुलींचे जातात, हे विशेष. मुलीचा जीव घेतल्याने इज्जत परत येते, असा गैरसमज पसरविला जातो. त्यामुळे ‘ऑनर किलिंग’ला बढावा मिळतो. खरे तर खाप पंचायत भरवून जीव घेण्याचे असे फतवे काढले जातात. आजकाल खेडं विस्तारलं जातंय. त्यात नवीन गोत्राची भर पडते आहे. शहरांचेही तसेच झाले आहे. त्यामुळे खाप पंचायतने आपल्या नियमांत बदल करायला हवा. खाप पंचांकडून असा दावा केला जातो की, नजीकच्या नात्यांत लग्न केल्यास आपल्यात व्यंग तयार होते किंवा पुढची पिढी कमकुवत होते. परंतु सगोत्र विवाह करण्याला मुख्य विरोध ते संस्कृतीच्या, परंपरेच्या नावाखाली करतात. ‘हिंदू मॅरेज अॅक्ट’ मध्ये सगोत्र विवाह मान्य आहे. केवळ सपिंड विवाह वर्ज्य सांगितला आहे. हे स्वीकारण्याऐवजी खाप पंच या कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत.
प्रश्न : खाप पंचायतमध्ये महिलांचे स्थान काय असते?
कोणत्याही खाप पंचायतमध्ये महिलांची उपस्थिती नसते. शिक्षण, रोजगार, आधुनिकीकरण यामुळे महिला पुढे येऊन आपल्या हक्कासाठी लढण्यास तयार होत आहेत. त्यामुळे खाप पंचांकडून तिच्या विरोधात तिरस्कार, बहिष्कार, उपहास, हिंसा, उपेक्षा, अशी नवनवी हत्यारं बाहेर काढली जात आहेत. मागे महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधात खाप पंचायती रस्त्यावर आल्या होत्या. परंतु त्यांची डाळ शिजली नाही. वडिलांच्या संपत्तीत मुलीला अधिकाराच्या ते विरोधात आहेत. त्यांच्या दबावापुढे हरियाणा सरकारने महिलांच्या वडिलांच्या संपत्तीतला अधिकार संपविण्याचा कायदा बनविला होता. मात्र राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली नाही. महिलांना जास्त शिक्षण दिले जात नाही, संपत्तीत अधिकार मिळू नये, यासाठी विधवा विवाहास ते मान्यता देत नाहीत; परंतु एखाद्यास मूल होत नसेल, तर दुसर्या लग्नाचे समर्थन करतात. ‘दहिया’ खापने एकदा ‘सर्व खाप’ बोलावून असा निर्णय घेतला की, स्त्रीला संपत्तीत अधिकार वडिलांच्या नव्हे, तर नवर्याच्या मिळकतीत असावा, मुलींना शिक्षण द्यायचे असेल, तर मुला-मुलींची महाविद्यालये वेगवेगळी असावीत. यावरून आपणास पंचाची महिलांप्रती मानसिकता दिसून येते.
प्रश्न : दलितांबाबत खापचे काय धोरण आहे?
परंपरेने आलेली जातिव्यवस्था परिपक्व राहावी, यासाठी खाप पंचायत दक्ष असते. गावात दलितांची मंदिरंसुद्धा वेगळी असतात. आंतरजातीय विवाहास ‘खाप’ मान्यता देते, हे खोटे आहे. दलिताच्या मुलाने जाटांच्या मुलीशी विवाह केला, तर नक्कीच जीव घेतला जातो. गावागावांत दलितांची वेगळी पंचायत असली, तरी सर्वखाप पंचायतमध्ये दलितांना स्थान मिळत नाही. भूमिहीन, दलित यांनी आपली मजुरी वाढविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना शेतात येण्यास बंदी घातली जाते. दुलीना, गोहाना, मिर्चपूर या ठिकाणी दलितांवर खापपंचायतीकडून हल्ले केले गेले आहेत. अपराध्यांना वाचवायला खाप पंचायती भरविण्यात आल्या. दलित हत्याकांडात दोषी ठरविल्या गेलेल्या आरोपींचे समर्थन केले गेले.
प्रश्न : केवळ सगोत्र विवाह केल्यानेच अधिक हत्या होतात का?
नाही, सगोत्र विवाह केल्याने हत्या होतात, हे खरे आहे; परंतु आंतरजातीय विवाह केल्याने अधिक हत्या होतात. मुलीला मारून टाकल्यावर इज्जत वाढते, असा गैरसमज रूढ झाल्याने मुलींना मारण्यात येते. मनोज-बबली हत्याकांडानंतर सगोत्र विवाह असावेत की नसावेत, यावर प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली. त्याचा एक तोटा असा झाला की, मूळ मुद्दा जो ‘ऑनर किलिंग’चा होता, तो बाजूला पडला. त्याचा आम्हाला फार त्रास झाला. काही दिवसांपूर्वी शक्ती वाहिनी व राष्ट्रीय महिला आयोग यांनी एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये एफआयआर दाखल झालेल्या 354 घटनांचा अभ्यास केला गेला. त्यात केवळ 3 टक्के विवाह सगोत्र होते. 72 टक्के विवाह हे आंतरजातीय होते. यावरून असे सिद्ध होते की, जाट खाप पंचायती मुद्दामच सगोत्र विवाह चर्चेत ठेवतात. त्यासाठी ‘हिंदू मॅरेज अॅक्ट’मध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. आपल्या घरी कोणत्याही जातीची मुलगी चालेल; परंतु आपली मुलगी जातीतच राहावी, हा त्यांचा आग्रह असल्याने हत्या होत आहेत.
प्रश्न : जनवादी महिला समिती खाप पंचायतच्या मनमानीविरोधात कसे काम करत आहे?
गेल्या वीस वर्षांपासून आम्ही खाप पंचायतच्या दमनकारी बाबींच्या विरोधात काम करत आहोत. सर्वांत मोठा मुद्दा असतो विवाहाचा! नेमके याच विषयावर खाप पंचायतकडून फतवे निघतात. विवाह केलेल्या जोडप्यांवर अन्याय होतो. स्वेच्छेने विवाह करणार्यांसाठी आम्ही मदत करतो. अशा विवाहांना आम्ही प्रोत्साहन देतो. नवीन विवाह केलेल्या जोडप्यांना आधार देतो, संरक्षण देतो. खाप पंचायतच्या अवैध फतव्यांना आम्ही नेहमीच विरोध केला आहे. अगदी त्यांच्यात जाऊन सुद्धा विरोध नोंदविला आहे. काही घटना घडल्यास आम्ही त्यांचा निषेध करतो. त्याविरोधात मोर्चे काढतो, पीडित परिवाराची भेट घेतो, त्यांना हिंमत देतो, न्यायालयीन लढ्यासाठी मदत करतो, अनेकवेळा पीडितांना आम्ही आमच्या घरी ठेवून घेतले आहे. खाप पंचायतच्या विरोधात अनेक वेळा आम्ही परिषदांचे आयोजन केले आहे. अनेक वेळा पत्रके काढून किंवा प्रसारमाध्यमांच्या मदतीने खाप पंचायतच्या चुकीच्या कामाचा पर्दाफाश केला आहे. अनेक वेळा आम्हाला धमक्या आल्या आहेत. मला नोकरीतून काढून टाकावे, यासाठी प्राचार्यांवर दबाव आणण्यात आला. त्यांचे दबावाचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. पोलीस सहजासहजी गुन्हे दाखल करून घेत नाहीत. आम्ही प्रभावी हस्तक्षेप करून गुन्हे दाखल होण्यास भाग पाडतो व आरोपींस अटक व्हावी, यासाठी प्रशासनावर दबाव ठेवतो. ‘ऑनर किलिंग’च्या प्रकरणासाठी वेगळा कायदा असावा, अशी मागणी आहे. खरे तर आमच्या पाठपुराव्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्याच्या ठिकाणी ‘सेफ होम’ तयार झाली, ही निश्चितच चांगली बाब आहे.

सेफ होम : अभिनव योजना
जगमती सागवान यांच्याशी झालेल्या चर्चेत ‘सेफ होम’चा मुद्दा आला. हे आमच्यासाठी वेगळं व आश्चर्याचा सुखद धक्का देणारं होतं. आम्ही ‘सेफ होम’ला भेट देण्याचे ठरविले. पोलीस अधिकारी असलेल्या सुभाष तितरम यांच्यामुळे ते शक्य झाले. हरियाणात होणारे ‘ऑनर किलिंग’ थांबावे, यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी, पोलीस निवासालयाच्या शेजारी ‘सेफ होम’ बांधण्यात आली आहेत. आंतरजातीय लग्न केलेल्या जोडप्यांच्या जीवाला धोका असेल, तर न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सेफ होम’मध्ये प्रवेश मिळतो. साधारण महिनाभर जोडप्यांना मोफत राहण्यास परवानगी असते. दोन वेळचे जेवण, चहा, नाश्ता वगैरे ‘सेफ होम’मध्ये मोफत मिळते. मधल्या काळात मुला-मुलींच्या आई-वडिलांना तिथे बोलावून घेतले जाते व त्यांचे समुपदेशन केले जाते. कायद्यानुसार स्वेच्छेने त्यांना विवाह करण्याचा अधिकार आहे, असे सांगितले जाते. जोडप्याच्या जीवास धोका निर्माण झाला, तर पालक जबाबदार असल्याची जाणीव करून दिली जाते. शक्यतो मतभेद मिटवले जातात. नवीन जोडप्यांवर आईवडिलांकडून खोट्या केसेस दाखल होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. जोडप्याला मारून टाकणार नाही, असे लिहून घेतले जाते. ‘सेफ होम’ला पोलिसांची सुरक्षा असते.
सहाय्यक उपनिरीक्षक रामेश्वर दास यांच्या म्हणण्यानुसार दर महिन्याला दहा ते पंधरा जोडपी एका ‘सेफ होम’मध्ये असतात. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेले ‘सेफ होम’ हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. ‘सेफ होम’मुळे ‘ऑनर किलिंग’च्या घटना कमी होतात.

‘सेफ होम’मधील अमित व सपना या जोडप्याशी आमची मुलाखत झाली. हे दोघे ‘सेफ होम’मध्ये पंधरा दिवसांपासून राहत होते. अमितच्या घरचे लोक आज त्यांना घ्यायला आले होते. सपना आमच्याशी बोलत असताना अचानक तिचा दीर समोर आला. सपनाने क्षणार्धात ‘लत्ता’ चेहर्यावर घेतला. पंधरा दिवस ते ‘सेफ होम’ मध्ये राहिले. अगदी पती-पत्नी सारखे! त्यामुळे दोघेही खूष होते. महाराष्ट्र व इतर सर्वच राज्यांत ‘सेफ होम’ होणे गरजेचे आहे. आंतरजातीय विवाहासंबंधी काम करणार्या सर्व संघटनांनी यासाठी पाठपुरावा करायला हवा.
शेकडो आंतरजातीय विवाह लावणार्या हिस्सार येथील जनवादी महिला समितीच्या कार्यकर्त्या कॉ. शकुंतला जाखड यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी गेल्या तीन वर्षांत हरियाणात 290 ‘ऑनर किलिंग’ झाल्याचा अहवाल आमच्या समोर ठेवल्याने आम्हाला धक्का बसला. आम्ही येणार असल्याने त्यांनी आंतरजातीय विवाह लावलेल्या एका जोडप्याला बोलावून घेतले होते. सोबत त्याकामी मदत करणारे वकील सहकारीही होते. आम्ही त्यांची भूमिका जाणून घेतली. हरियाणात असे काम करणे मोठ्या हिमतीचे असल्याने त्यांचे आम्ही आभार मानले. त्यांनी केलेल्या कामातून त्यांच्या आव्हानांची व्याप्ती खूप मोठी असल्याचे जाणवले. शकुंतला मॅडमशी आम्ही संवाद साधला.
प्रश्न : हरियाणात महिलांचे समाजातील स्थान काय?
हरियाणात महिलांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. तिला नेहमीच विविध बंधनात जखडून ठेवले जाते. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा हरियाणात मुलींचा जन्मदर कमी आहे. याला जबाबदार खाप पंचायत आहे. कारण त्यांचा महिलांवर अनेक प्रकारचा दबाव असतो. गावातील एखादी स्त्री मोठ्यांसाठी मुलगी व लहानांसाठी बहीण असल्याचे वरकरणी दाखविले जाते; मात्र तिला चेहर्यावर ‘लत्ता’ घेण्याची प्रथा, तिला बंधनात जखडून ठेवते. जन्माला आल्यापासून तिच्यावर बंधने घातली जातात. तिच्या उच्च शिक्षणाला, नोकरीला विरोध केला जातो. या पार्श्वभूमीवर स्वत:चा जोडीदार निवडणे म्हणजे मोठे संकट ओढावून घेण्यासारखे असते.
प्रश्न : आंतरजातीय किंवा स्वेच्छेने विवाह लावताना काय अडचणी येतात?
हरियाणात जातीतला जोडीदार निवडणे, हेही मोठे आव्हान असते; आंतरजातीय विवाह तर दूरची बाब आहे. कारण हरियाणात एका जातीतला जोडीदार असला, तरी गोत्र पाहण्याची पद्धत आहे. अनेक ठिकाणी मुलामुलींचे वडिलांच्या व आईच्या वडिलांच्या आईचे म्हणजे दादीचे नानीचे गोत्र पाहिले जाते. यात चुकून एखादे गोत्र सारखे आले, तर ते लग्न रद्द केले जाते. आंतरजातीय विवाह करायचा असेल, तर जोडीदार गावचा किंवा पंचक्रोशीतला असेल, तर मोठी अडचण येते. आजकाल तरुण मुलंमुली प्रेम करताना जात पाहत नाहीत, गोत्र पाहणेसुद्धा दूरची बाब आहे. अशावेळी स्वेच्छेने विवाह करायचा असेल, तर अनेक जोडपी आमच्याकडे येतात. कायद्याने योग्य असलेल्यांचे आम्ही विवाह लावतो. आमच्यासारखेच आर्य समाजाचे लोक दिल्ली येथील मंदिरात लग्न लावून देतात. खापपंच आम्हाला व त्यांना विरोध करतात. आम्हाला धमकीचे प्रकार नवीन नाहीत. अनेक विवाह आम्ही आमच्या कार्यालयात लावलेले आहेत. कायद्याने ‘लिव्ह इन रिलेशन्स’ला मान्यता मिळाली आहे; परंतु हरियाणात स्वेच्छेने लग्न करणे, मुश्कील झाले आहे. अनेकांचा जीव जाण्याची भीती असते; परंतु ‘सेफ होम’मुळे हे प्रमाण कमी झालंय.

प्रश्न : अशा स्वेच्छेने केलेल्या विवाहांबद्दल राजकीय भूमिका काय असते?
काही दिवसांपूर्वी बलात्कार रोखण्यासाठी महिलांनी मोबाईल वापरू नये, मुलींनी जीन्स परिधान करू नये, असा खाप पंचायतींनी फतवा काढला होता. या फतव्याला हिंदू महासभेने पाठिंबा दिला होता. या विरोधात कुणी राजकीय व्यक्ती बोलली नाही. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीसुद्धा एक शब्दही उच्चारला नाही. राज्यात जाटांची संख्या अधिक असल्याने व खाप पंचायत असलेला प्रदेश बहुतांश असल्याने राजकीय व्यक्ती बोलत नाहीत. यात सर्व मताचे राजकारण आहे. कोणतेही सरकार आले, तरी ते खाप पंचायतीचा रोष ओढवून घेत नाही. भाजपचे सरकार जुन्या परंपरांना अधिक मानणारे असल्याने खाप पंचांना आता तर मोकळे रान मिळाले आहे. मतदानाचे वय 21 वरून 18 केले गेले. त्याच धर्तीवर मुलींचे लग्नाचे वय 15 वर्षे करावे, अशी मागणी खाप पंचायतने भाजप सरकारकडे केली आहे. बलात्कार कमी करण्याचा हा एक उपाय असल्याचे पंचांचे म्हणणे होते. असे अनेक विचित्र फतवे खाप पंचायतीकडून काढले जातात. सरकारने त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र सरकारसुद्धा त्यांना घाबरत असल्याचे दिसून येत आहे.
प्रश्न : खाप पंचायतीकडून स्वेच्छेने होणार्या विवाहास विरोध केला जात असल्याने, आगामी काळात तुमची रणनीती काय आहे?
गरीब, दलित, पीडित, महिला यांची एकजूट करून या असंवैधानिक खाप पंचायतींविरोधात उभे राहणे गरजेचे आहे. समाजातील लोकतांत्रिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घटनात्मक ग्रामपंचायतींना सक्षम केले पाहिजे. कारण हरियाणात अनेक गावांत ग्रामपंचायत कार्यालये नाहीत. सरपंचांच्या घरातून कारभार हाकला जातो; शिवाय घटनात्मक ग्रामपंचायतीपेक्षा खाप पंचायतीचा मोठा दबदबा आहे. गावाच्या निर्णयात महिलांचा, दलितांचा हस्तक्षेप वाढविला पाहिजे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्व निर्णय झाले आहेत. वर्तमान सामाजिक संकटातून बाहेर पडण्याचा खात्रीचा रस्ता म्हणजे प्रगतिशील समाज सुधार आंदोलन हेच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्या हक्कांप्रती जाणीव होऊन त्यांना अन्यायाविरोधात संघटित करणे, हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्रात जसा जातपंचायतच्या मनमानी विरोधात कायदा झाला, तसा हरियाणात झाल्यास अन्यायकारक फतव्यांवर वचक बसेल व आमचा तसा प्रयत्न राहणार आहे.
हरियाणातील आर्ची :

आमची चर्चा चालू असताना पूनम व रवी नावाचे जोडपे मिठाई घेऊन आले. नुकतेच त्यांचे लग्न कॉ. शकुंतला यांनी लावून दिले होते. दोघांचे आंतरजातीय लग्न लावताना मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या. पूनमच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. काही दिवस त्यांनी तिला राजस्थानात लपवून ठेवले होते. तेथून पूनमने सुटका करून घेऊन रवीशी लग्न केले. कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत लग्न लावून दिले. यावर चिडून पूनमच्या घरच्यांनी रवीवर नऊ पोलीस केसेस घातल्या. त्याला हैराण करून तुरुंगात टाकले. शेवटी पूनमने ‘सैराट’मधील ‘आर्ची’सारखा पोलीस स्टेशनमध्ये दंगा घातला. पोलिसांना दम देऊन त्याची सुटका केली. तेव्हा पूनमशी बोलताना आम्हाला ‘सैराट’च्या आर्चीची आठवण येत होती.
आंतरजातीय विवाह झाल्यावर ‘ऑनर किलिंग’च्या घटनेत मुलांना मारण्यात येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे कॉ. शकुंतला यांनी सांगितले. मुलींच्या हत्या दडपून ठेवल्या जातात. वृत्तपत्रात बातम्या येत नसल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. 2010 मध्ये केंद्रीय महिला व बालकल्याण समितीने ‘ऑनर किलिंग’च्या विरोधात ‘प्रिव्हेंटेन्शन ऑफ क्राईम इन द नेम ऑफ ऑनर अॅण्ड ट्रेडिशनल बिल’ तयार केले आहे. 2012 मध्ये हे बिल राज्याकडे पाठवले आहे; परंतु अजून कुणीही उत्तर दिले नाही. याबद्दल कॉ. शकुंतला यांनी नाराजी व्यक्त केली.
सगोत्र विवाह व ‘ऑनर किलिंग’ हे खाप पंचायतचे एक सूत्र झाले आहे. एका गोत्रात जन्मलेल्या सर्व व्यक्ती एकाच मूळ पुरुषाच्या वंशज असल्याने ते भाऊ-बहीण असतात. त्यामुळे एकाच गोत्रात लग्न करता येत नाही, असा खाप पंचायतचा दावा असतो. या दाव्यात किती तथ्य आहे व सगोत्राचा इतिहास नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही दयानंद कॉलेज, हिस्सार येथील इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉ. महेंद्र विवेक यांची भेट घेतली. नावाप्रमाणे ते तर्कशील सोसायटीचे विवेकवादी कार्यकर्ते आहेत. खोदकामात मिळालेल्या सिंधू संस्कृतीतील प्राचीन वस्तूंचे संग्रहालय त्यांनी बनविले आहे. सिंधू संस्कृतीचा परिसर येथून अवघ्या शंभर किलोमीटरवर असल्याने या संग्रहालयास वेगळे महत्त्व आहे. संग्रहालय बघितल्यानंतर त्यांनी आम्हास गोत्रांचा इतिहास सांगितला.
प्रश्न : गोत्रांचा इतिहास काय आहे?
ऋग्वेदाच्या नवव्या मंडळात गोत्राचा उल्लेख 138 वेळा आला आहे. प्राचीन काळी ऋषीकडे शिकण्यास असलेले शिष्य एका गोत्राचे समजले जात असे. सुरुवातीला अशा ऋषींची संख्या आठ होती. त्या-त्या गोत्रातील व्यक्ती हे बहीण-भाऊ मानले जाऊ लागले. पुढे गोत्रांची संख्या वाढत गेली. पशु-पक्ष्यांच्या व इतर नावाने गोत्र ओळखले जाऊ लागले. काही लोकांनी हुशारीने गोत्र वाटून घेतले. अगोदर गोत्र निर्माण झाले. वर्ण नंतर आले. एक गोत्र अनेक जातीत दिसून येते. उदाहरणार्थ पुनिया हे गोत्र ब्राह्मण व क्षत्रिय या दोन्हीतही आढळून येते. जाट समूह हा अगोदर खालच्या वर्णात होता; परंतु आर्य समाजाच्या प्रभावामुळे हा समाज वरच्या वर्णात गेला. अशा पद्धतीने वर्ण खाली वर झालेला आढळतो. मूळ गोत्र वाढत गेले आहे.

प्रश्न : सगोत्र विवाह करण्याला वैज्ञानिक आधार काय आहे?
हिस्सार येथील विद्यापीठात महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे ‘ऑनर किलिंग’वर एक चर्चासत्र घेण्यात आले. त्यात सीनिअर प्लांट ब्रीडर महावीर सिंग नरवाल यांनी असे सांगितले की, एकाच गोत्रात दोन लाख सदस्य असल्यास ते बहीण-भाऊ कसे होऊ शकतील? त्यांच्या विधानात तथ्य आहे. सुरुवातीला खाप पंचायतीनुसार सगोत्र विवाह हा चार व्यक्तींच्या गोत्रात वर्ज्य मानला जात असे. स्वत:चे गोत्र, आईचे गोत्र, आईच्या आईचे गोत्र व वडिलांच्या आईचे गोत्र यापैकी कुणाचे गोत्र समोरच्या होणार्या जोडीदाराशी सारखे आल्यास लग्न रद्द केले जाई. आता आईच्या आईचे जे गोत्र आहे, त्याला सूट देण्यात आली आहे. एकाच गोत्रात लग्न केल्याने अपंगत्व येते, याला काही वैज्ञानिक आधार नाही, असे अभ्यासक समजतात. एका गोत्रात कमीत कमी पन्नास लग्न होऊन त्यांचा अभ्यास झाला, तर निष्कर्ष निघू शकेल; परंतु अजून असा अभ्यास झाला नाही. पंजाबी, मुसलमान, पारशी अशा लोकांत जवळच्या नात्यात विवाह होतात; परंतु असा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
प्रश्न : मग तरीही सगोत्र विवाहाला विरोध का होतो?
खरे तर यामागे पितृसत्ताक पद्धती कारणीभूत आहे. सगोत्र विवाह केल्याने मुलगी मिळकतीत भागीदार होऊ शकते, या भीतीतून अशा विवाहास विरोध होतो आहे. आपली मिळकत आपलीच राहावी, यासाठी अलिकडेच खाप पंचायतने असा फतवा काढला आहे की, “मुलींना वडिलांची कायदेशीर मिळालेली मिळकत विकता येणार नाही.” यातून खाप पंचांची मानसिकता समजते. एका गोत्रात भाईचारा असतो. मिळकतीमुळे तो खराब होऊ नये, अशी काहींची भावना असते; तसेच पूर्वी कृषिप्रधान संस्कृतीमुळे एक गाव म्हणजे एक कुटुंब होते. सर्वजण एक- दुसर्यावर आधारलेले होते. त्यामुळे एकमेकांतील संबंध बिघडू नयेत, या कारणांसाठी अंतर्गत विवाह अमान्य केले असावेत. खरे तर विवाह हे स्त्रीला नियंत्रित करण्याचे माध्यम आहे. तिने तिच्या मर्जीने विवाह केल्याने ती भाषा, भाग, जाती-धर्म यांच्या मर्यादा तोडते. हे खाप पंचायतला धोकादायक व संस्कृतीवरचे आक्रमण वाटते. याच कारणासाठी ते तिच्या स्वेच्छेने होणारे विवाह अमान्य करतात.
प्रश्न : सगोत्र विवाहास कायदेशीर आधार आहे का?
1946 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माधवराव विरुद्ध राघवेंद्रराव या केसमध्ये सगोत्र विवाहास मान्यता दिली आहे. सगोत्र विवाहावर बंदी घालण्यासाठी हिंदू मॅरेज अॅक्टमध्ये सुधारणा करण्याची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने 2010 मध्ये फेटाळून लावली आहे. न्या. एन. एस. धिंगरा आणि न्या. ए. के. पाठक यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते नरेश कदियान यांना न्यायालयाचा वेळ घालविल्याबद्दल दंड ठोठावण्याचा इशारा दिला. सगोत्र विवाहावर बंदी घालावी, असे कोणत्या हिंदू ग्रंथात म्हटले आहे, अशी न्यायालयाने विचारणा केली असली, तरी ती चुकीची वाटते. कारण हिंदू शास्त्रात लिहिलेल्या नियमांना वर्तमान न्यायालयीन व्यवस्थेत स्थान नाही. अनेक देशांत न्यायालयात धर्माचा हस्तक्षेप चालतो; परंतु भारतात तसे नाही. असे असतानाही सगोत्र विवाह करणार्याचा जीव घेतला जातो, हे संतापजनक आहे. मागील महिन्यात सगोत्र विवाह करणार्यास शंभर चप्पल मारण्याचा आदेश बागपत खाप पंचायतने दिला आहे, हे निषेधार्ह आहे.

प्रश्न : स्वेच्छेने विवाह करणार्या तरुणांकडे तुम्ही कसे बघता?
मी अगोदर म्हटल्याप्रमाणे पूर्वी गावात बलुतेदारी होती. प्रत्येकजण दुसर्यावर अवलंबून होता; परंतु आज आधुनिकीकरणामुळे एकमेकांवरचे ते अवलंबून राहणे संपले आहे. त्यामुळे कुणी स्वेच्छेने विवाह करणार असेल, तर त्यास सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. परंतु खाप पंचायत तसे करत नाही. एका बाजूने गावाचा भाईचारा म्हणत दलितांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा दुटप्पीपणा करत आहे. आजचे तरुण-तरुणी प्रेम करत स्वत:चे निर्णय घेतात. त्यामुळे परिवाराचा सन्मान दुखावला जाण्याची भावना तयार होते. मग खाप पंचायत काहीतरी फर्मान काढते. म्हणजे आरमान, सन्मान व फर्मानचा हा मामला आहे. आज तरुण कुंडलीसुद्धा बघत नाहीत, जात बघत नाहीत; गोत्र तर दूरच राहिले! जाटांच्या मुलींना दाबून ठेवले गेले आहे. मात्र स्वेच्छेने आंतरजातीय विवाह करणार्यांमध्ये जाट मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे मी खात्रीशीर सांगू शकतो आणि आपण त्याचे स्वागत केले पाहिजे.
प्रा. विवेक यांनी आमच्या अनेक शंकांचे निरसन केले. नंतर आम्ही कुरुक्षेत्र विद्यापीठाचे समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुभाषचंद्र यांची भेट घेतली. त्यांनी सगोत्राची माहिती दिली. ते म्हणाले की, गोत्र हा शब्द ‘गौक्षेत्र’ या नावापासून बनला गेला. माणसाचे पूर्वीपासून दोन पारंपरिक व्यवसाय राहिले आहेत ते म्हणजे कृषी व पशुपालन. पशुपालनात गाय व बैल हे मुख्य पशू राहिले आहेत. प्रत्येक परिवारास गायी चारण्यासाठी गावातील ठराविक क्षेत्र राखीव असत. त्याला गोक्षेत्र म्हटले जाई. ओळखीसाठी त्याला ठराविक नाव दिले जाई. त्यामुळे गोक्षेत्र त्या-त्या लोकांची ओळख बनली. लोकसंख्या वाढल्याने लोक दूरदूरपर्यंत पसरले व आपल्या ओळखीसाठी गोक्षेत्राचा वापर करू लागले. पुढे यालाच गोत्र म्हटले जाऊ लागले. पारंपरिक पद्धतीने आलेल्या गोत्राचा अभ्यास केला, तर असे दिसते की, गोत्र केवळ पुरुष पिढीच्या नावाने ओळखले जाते. त्यात स्त्रीला काही स्थान दिले गेले नाही. एखादे लग्न झाल्यावर होणार्या मुलात आई व वडिलांचे रक्त मिसळले जाते. पुढच्या पिढीत तिसर्या गोत्रात लग्न होते. त्यामुळे त्या पिढीत आणखी एका गोत्राचे रक्त मिसळले जाते. अशा अवस्थेत प्रारंभिक पितृगोत्राचा अंश पंचवीस टक्केच असतो. आणखी काही पिढ्यांनंतर ते प्रमाण पाच टक्क्यांहून कमी होत जाते. तरीही गोत्र पित्याच्याच नावाने पुढे चालले जाते. सगोत्र विवाह केल्याने परिवाराचे, गावाचे संपूर्ण गोत्राचे नाक कापले जाते, असा गैरसमज असल्याने ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडत आहेत. जी जोडपी प्रेमविवाह केल्यानंतर गावी जातात, त्यांचा जीव जाण्याचे प्रमाण अधिक आहे.
हरियाणात एवढे भयावह वातावरण असताना सरकार खाप पंचायतींना पाठीशी घालते. मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी राजीनामा देऊन उत्तर प्रदेशात निवडणूक लढविली. देशात खाप पंचायत उपयुक्त असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान म्हटले होते. येणारे प्रत्येक मुख्यमंत्री खाप पंचायतींना पाठबळ देतात. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरियाणातील भाजपच्या प्रचार अभियानाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी खाप पंचायतींना नमन करून केले. अर्थात, यात मताचे राजकारण आहे. यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी राजकारणात असलेले खाप पंच टेकराम कण्डेला यांची आम्ही भेट घेतली.

टेकराम कण्डेला हे ‘कण्डेला गोत्र’ खापचे प्रधान व सर्वखाप पंचायतचे राष्ट्रीय संयोजक आहेत. विधानसभेची निवडणूक त्यांनी दोन वेळा लढवली आहे. जींद येथील राहत्या घरी आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी असे सांगितले की, “हरियाणातील प्रत्येक व्यक्ती खाप पंचायतीशी जोडली गेल्याने खापांच्या मदतीशिवाय निवडणुकीत कुणीही निवडून येऊ शकत नाही. आलेला प्रत्येक वाद हा खाप पंचायतीमध्ये मिटविला जातो. साधारण 70 टक्के केसेस खाप पंचायतीमधून मिटविल्या जातात. खाप पंचायत नसत्या, तर तुरुंगांची संख्या वाढवावी लागली असती. त्यामुळे खाप पंचायती या सामाजिक कार्य करतात.” खरे तर खाप पंचायतींना ‘लोकअदालती’चा दर्जा देऊन त्यात सरकारचा एक प्रतिनिधी समाविष्ट करावा, खाप पंचांना राष्ट्रपतीकडून सन्मानित करावे, राज्यसभेवर नियुक्ती व्हावी, अशा मागण्या घेऊन आम्ही सर्व खाप पंच राज्यपाल कप्तानसिंग सोलंकी यांना भेटलो होतो. आता पंतप्रधानांनाही भेटणार आहोत.
टेकराम कण्डेला हे हरियाणाच्या खाप पंचायतमधील वजनदार नाव आहे. त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढली असली, तरी दोन्ही वेळा त्यांना हार पत्करावी लागली. याचाच अर्थ सामान्य जनतेला खाप पंचायतची कार्यपद्धती मान्य नाही. परंतु सर्वच ‘खाप’चे प्रधान एकत्र येऊन मतदार सोबत असल्याचा दिखावा करतात. राजकीय लोकांनाही हेच हवे असल्याने त्यांची एक युती होती. त्यामुळे खाप पंचायत असंवैधानिक फतवे काढतात. परंतु न्यायालयाच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे आता बदल होण्यास सुरुवात झाली आहे.
खरंच बदल होण्यास सुरुवात होत आहे का, याच्या माहितीसाठी आम्ही काही तरुणांशी संवाद साधला. सर्वांना खाप पंचायतची कार्यप्रणाली मान्य नाही. तरुण जोडीदाराची निवड करत गोत्र, गाव, जात काहीच बघत नाहीत. प्रेम झाल्यावर ते विवाह करतात व पुन्हा गावाकडे न जाता शहरात स्थायिक होतात. खाप पंचायतचे फतवे त्यांना मान्य नाहीत. हिस्सार जिल्ह्यातील चुडीपूर गावात बन्सी नावाचा एक तरुण भेटला. तो अजून अविवाहित आहे. लग्नानंतर त्याची पत्नी चेहर्यावर ‘लत्ता’ ओढून घेणार नाही. या भूमिकेवर तो ठाम आहे. त्याने आपल्या मोठ्या भावाला असे चॅलेंज दिले होते की, ‘तू तुझे लग्न झाल्यावर पत्नीला डोक्यावर ‘लत्ता’ घेण्यापासून परावृत्त केल्यास मी तुला माझ्या नावची शेतजमीन देईन.’ त्याचे मोठ्या भावाने ऐकले. त्याने बायकोला ‘लत्ता प्रथे’पासून मुक्त केले. बन्सीने मोठ्या मनाने भावाच्या नावावर आपली शेतजमीन करून दिली आहे. अशा पद्धतीची आव्हाने तरुणांकडून उभी राहत आहेत.
बिडसिकरी या गावातील एका शाळेला आम्ही भेट दिली. मुख्याध्यापक मेवासिंग यांनी आमचे स्वागत केले. सहकार्यांच्या मदतीने त्यांनी काही वेळातच जाटांच्या चाळीस गोत्रांची नावे सांगितली. आपणाकडे सामान्य माणसाला त्याचे गोत्र शक्यतो माहीत नसते; पण मेवासिंगने यादी तयार करण्यास मदत केली. याचे कारण हरियाणात एकमेकांची ओळख गोत्रावरून होते. लोकांना गोत्राबद्दल प्रेम असल्याने ते आडनावासारखे लावतात, तसेच दुकानाला गोत्राचेच नाव देतात. शाळेतील मुलांशीही आम्ही चर्चा केली. आनंदाची बाब म्हणजे एकही विद्यार्थी आडनाव लावत नाही. स्वत:च्या नावापुढे आईवडिलांचे नाव लावले असल्याचे पाहून आम्हास आनंद झाला.

महाराष्ट्रात मामाच्या मुलांशी वाजतगाजत विवाह केला जातो. परंतु हरियाणात असे काही झाले, तर ‘ऑनर किलिंग’ होतं. भारताच्या अनेक भागात जवळच्या काही नात्यांत विवाह केला जातो. काही समाजात एका गोत्रात लग्न होते. लोकसंख्या वाढल्याने गोत्राचा विस्तार झाला आहे. जसे की भारद्वाज या गोत्राचा विस्तार हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांत झाले आहे. अशा वेळी एका गोत्रात विवाह केल्याने जोडप्याचा जीव घेण्याचा अधिकार खाप पंचांना कुणी दिला? सगोत्र विवाहास विरोध करताना ते असा दावा करतात की, जवळच्या नात्यांत विवाह केल्याने येणार्या अपत्यात शारीरिक व्याधी असतात. मग हा दावा क्षणभर खरा मानला, तर मग आंतरजातीय विवाह यावर योग्य उपाय होऊ शकतो. परंतु आंतरजातीय विवाहांनाही खापांकडून परवानगी मिळत नाही. एक बाब लक्षात आली, ती म्हणजे सगोत्र विवाहांना विरोध करण्याचे खाप पंचांचे खरे कारण म्हणजे जुन्या चालत आलेल्या परंपरांचे पालन करणे, हे आहे. खाप पंचायतींना आवर घालण्याचा एकमेव उपाय म्हणजे न्यायालयाचा हस्तक्षेप हा होय. ‘सेफ होम’ निर्माण करणे असो वा हिंदू विवाह कायदा बदलविणारी याचिका रद्द करणे; यामध्ये भारतीय संविधानच वरचढ असल्याचे सिद्ध होत आहे.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जातपंचायतीच्या मनमानीविरोधात कायदा झाला आहे, तशाच एका कायद्याची सध्या हरियाणाला अत्यंत गरज आहे.
कृष्णा चांदगुडे : 9822630378
राहुल थोरात : 9422411862