भामरागड तालुक्यातील नारगुंडा गावातील बाजू कोपा नरोटे याला त्याच गावातील गावपंचायतीसमोर महिला व पुरुषांनी ‘जादूटोणा करून लोकांना मारतो व त्यांनीच पुंगाटी परिवारातील तीन व्यक्तींना जादू करून मारले,’ या संशयावरून दिनांक 30 मार्च 2018 ला दुपारी तीनच्या सुमारास जीवे मारले. त्यावेळी इतर लोक बघ्याची भूमिका बजावत होते व परिवारातील सदस्य असहाय होऊन ते दृश्य पाहण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते. अशीच दुसरी घटना भामरागड तालुक्यात कोठी या गावातील आहे. दोबा चैनू गाडवे स्वतःच्या शेतात पत्नीसह मुक्कामी असताना त्याच गावातील रुपू डुकारू पुंगाटी यांनी त्यांच्या मुलीस जादूटोणा केला, या शंकेवरून माहारू दसरू गाडवे या व्यक्तीला सोबत घेऊन दोबाला कुर्हाडी व लोखंडी घणाने जीवानिशी ठार केले. मारल्या गेलेल्या दोन्ही व्यक्ती पुजार्याचे काम करीत असत. बाजू हा पुजार्याचे काम करीत होता, परंतु दोबाने मात्र तीन वर्षांपासून पुजार्याचे काम करणे सोडलेले होते. तरी परंतु एकदा का व्यक्ती जादूटोण्याचे किंवा मांत्रिकाचे काम करते एवढे माहीत झाले, तरी त्याच्यावरील संशयाचे भूत त्याचा कधी घात करेल, हे सांगता येत नाही, हेच वरील घटना दर्शवितात.
आम्ही अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नारगुंडा गावातील मयत बाजू यांच्या परिवारातील सदस्यांना भेटून जादूटोण्यात किंवा मंत्रात काही दम असतो का? याविषयी जाणण्याचा प्रयत्न केला असता, ते काहीही सांगायला तयार नव्हते. परिवारातील सर्व सदस्य निरक्षर होते, तर पोलीस पाटलाच्या घरी उपस्थित असलेले सदस्य शिकलेले असताना देखील, काही लोक जादूटोणा करून मारतात याला दुजोरा दिला. भामरागड येथील एक महिला गेल्या दोन वर्षांपासून गरोदर असल्याचे सांगत असून ती अजूनही पुजार्याचा सल्ला घेत आहे. डॉक्टरने तिला सोनोग्राफीनंतर हे मूल नसून पोटात गोळा असल्याने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. सौ. भारती इष्टाम यांनी देखील तिला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती अजूनही पुजार्याच्या वार्या सोडायला तयार नाही. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यात एफआरआय नोंदविला असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे, असे सांगितले व या भागात गावागावात पुजारी असून कुठलाही आजार झाला तरी ते डॉक्टरकडे न जाता पुजारीच तो दुरूस्त करतात, अशी मानसिकता झालेली असावी, असे म्हणाले. “या परिसरात अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे एक आव्हान आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी मोठी संधी असून जेवढे शक्य होईल तेवढे अवश्य सहकार्य करेन,” असे आश्वासन दिले. भामरागड येथील घटनेची माहिती जाणून घेण्याच्या प्रक्रियेत विलास निंबोरकर कार्याध्यक्ष, पुरुषोत्तम ठाकरे (प्रधान सचिव), विठ्ठलराव कोठारे (कोषाध्यक्ष), प्रशांत नैताम सदस्य, समाज सेविका तथा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्या श्रीमती भारती इष्टाम आदी उपस्थित होते. भारती इष्टाम यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
-विलास निंबोरकर, गडचिरोली